प्रशांत कुलकर्णी – prashantcartoonist@gmail.com
जगभरातल्या हजारो व्यंगचित्रकारांचा लाडका विषय म्हणजे मानसशास्त्रज्ञ आणि त्याचा रुग्ण. याचे कारण म्हणजे या अतिशय सोप्या चित्रातून विनोदाच्या असंख्य शक्यता निर्माण होतात. या चित्राची रचना अतिशय साधी असते. म्हणजे डोकं जरा उंचावर राहील असा झोपण्यासाठी असलेला एक आडवा कोच आणि त्याच्यामागे एक खुर्ची. कोचवर डोकं टेकून रुग्ण झोपलेला आहे आणि स्वत:च्या मनातील काही प्रश्न मानसशास्त्रज्ञासमोर मांडत आहे. पाठीमागच्या खुर्चीवर काळा कोट घालून मानसशास्त्रज्ञ बसले आहेत आणि ते आपल्या वहीमध्ये काही नोंदी करून घेत आहेत. पाठीमागच्या भिंतीवर फ्रेम केलेलं त्यांचं सर्टिफिकेट. यापलीकडे या चित्रात फारसं काही असत नाही. असतो तो फक्त एक नवा विनोद. कधी खळाळून हसवणारा.. मिश्कील, तर कधी विचार करायला लावणारा.. गंभीर! म्हणूनच हजारो व्यंगचित्रकार पुन:पुन्हा नव्या नव्या कल्पना करून काहीतरी नवं सांगू पाहतात आणि अर्थातच वाचकही मान डोलावून त्या कल्पनेचं कौतुक करतात. सगळा विनोद जेमतेम एक-दोन वाक्यांत असतो आणि काही वेळेला चित्र एक किंवा दोन किंवा तीन भागांमध्ये असतं. विनोदाच्या शक्यतासुद्धा अशा असतात, की एक तर मानसशास्त्रज्ञ काहीतरी विचित्रपणे प्रश्न विचारतो किंवा रुग्ण काहीतरी विचित्र उत्तर देतो! यातले बरेचसे विनोद हे चित्रविचित्र भास होणं, भयंकर कल्पना सुचणं, नैराश्य येणं, एकटेपणा वाटणं, स्वप्न पडणं यासंदर्भातच असतात.
सुरुवातच सर्जिओ या ‘मॅड’च्या व्यंगचित्रकाराच्या सोबतच्या चित्रापासून करता येईल. हे नि:शब्द चित्र दोन भागांत आहे. पेशंट जेव्हा म्हणतो, ‘मला सतत पायांवर खूप कोळी चढत आहेत असं वाटतं..’ तेव्हा मानसशास्त्रज्ञाची अभावितपणे होणारी प्रतिक्रिया आपल्याला हसवते.
सांताक्लॉज हा जेव्हा पेशंट म्हणून मानसशास्त्रज्ञाकडे येतो तेव्हा विनोदाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. सांताक्लॉज म्हटल्यावर ख्रिसमसला भरपूर भेटी आणणार, त्या लहान मुलांना वाटणार, मुलं त्याच्या आगेमागे फिरत राहणार, अगदी लहान मुलं त्याच्याकडे बघून घाबरून रडणार.. वगैरे वगैरे या सर्व गोष्टी स्वाभाविकपणे आल्या. कोचावर झोपलेल्या सांताक्लॉजला मानसशास्त्रज्ञ विचारत आहेत, ‘लहान मुलांचा तुम्हाला तिटकारा आहे, हे साधारण तुम्हाला केव्हापासून लक्षात यायला लागलं?’ दुसऱ्या एका चित्रामध्ये तर खरोखरच एक मानसशास्त्रीय प्रश्न विचारात घेतला आहे. तो म्हणजे सांताक्लॉज हा दु:खी असतो, कारण त्याला ख्रिसमसला कोणीच गिफ्ट देत नाही!
काही पेशंट हे इतके मनोरुग्ण असतात, की ते फोनवरूनच मानसशास्त्रज्ञांना आपल्या अडचणी, भास, त्रास सांगतात आणि सल्ला विचारतात. इथपर्यंत ठीक आहे. पण मानसशास्त्रज्ञही सवयीप्रमाणे तक्रार किंवा त्रास ऐकताना फोन कोचवर ठेवून पेशंटचा त्रास वहीत नोंदवताहेत असंही एका कार्टूनमध्ये आहे!
काही पेशंट हे कानात वेगवेगळे आवाज ऐकू येतात अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात. त्यावर आधारित सोबतचं हे एक वेगळ्याच प्रकारचं व्यंगचित्र आहे. त्यात आलेला ‘विशेष’ पेशंट म्हणतोय की, ‘माझ्या कानात सतत किणकिण आवाज ऐकू येत असतो.’ तेव्हा डॉक्टर तत्परतेने म्हणतात की, ‘मला वाटतं, तुमचा हा प्रॉब्लेम मी नक्की दूर करू शकतो!’ अर्थात पेशंटच्या कानात येणारा हा आवाज कशाचा आहे, हे या चित्रातील डॉक्टरच पटकन् ओळखू शकतो! (व्यंगचित्रकार लीओ क्युलम)
डिप्रेशन म्हणजे नैराश्य.. यानेही अनेक जण गांजलेले असतात. या विकारावरच्या हॉस्पिटलमधली लिफ्टची वर-खाली जाण्यासाठीची बटणं व्यंगचित्रकाराने मोठय़ा कल्पकतेनं चितारली आहेत. (व्यंगचित्रकार माईक बाल्डविन)
पेशंटला दिलासा देणं हे मानसशास्त्रज्ञाचं काम. त्यामुळे जेव्हा एखादा पेशंट म्हणतो, ‘मला खूप एकाकी वाटतंय..’ तेव्हा मानसशास्त्रज्ञ स्वत: कोचवर पेशंटजवळ झोपून त्याला कंपनी देतो, अशीही मिश्कील कल्पना एका व्यंगचित्रात रेखाटलेली आहे.
मानसशास्त्रज्ञांनाही एकूण कामाचा ताण प्रचंड असेल तर त्यांनाही मानसोपचारांची गरज भासणारच. यावर ‘एकमेका साहाय्य करू’ या धर्तीवर दोन मानसशास्त्रज्ञ समोरासमोर कोचावर पडून एकमेकांना आपापली स्वप्नं सांगताहेत असंही एक मजेशीर व्यंगचित्र आहे! तर पेशंटची कंटाळवाणी रडगाणी ऐकून पेशंटबरोबर मानसशास्त्रज्ञही झोपी गेलेत, हे नेमकेपणानं रेखाटलंय ‘न्यू यॉर्कर’चे व्यंगचित्रकार स्टीग यांनी.
या सर्व व्यंगचित्रांमध्ये एक वेगळेच आणि अंतर्मुख करणारे व्यंगचित्र असीम कुलकर्णी या नवोदित व्यंगचित्रकाराचं आहे. पेशंट म्हणून माकड कोचावर बसलं आहे आणि रोबो हा मानसोपचार करणारा डॉक्टर आहे. माकड आपलं भयानक स्वप्न सांगताना म्हणतंय की, मानवाने संपूर्ण पृथ्वीवर कब्जा केला आहे असं स्वप्न त्याला पडतं! वास्तविक (प्रथम मानवाने आणि त्यानंतर) रोबोने संपूर्ण पृथ्वीचा कब्जा घेतल्याचं चित्रात दिसतंय. चित्रातले इतर तपशीलही पाहण्यासारखे आहेत. रोबोला पायांऐवजी चाकं आहेत. माकडापासून रोबोपर्यंत झालेला हा उत्क्रांतीमधला महत्त्वाचा बदल म्हणावा लागेल. (‘पायाला चाकं लावल्यासारखा पळतो आहेस..’ असं आपण म्हणतोच की!) त्याचबरोबर माकडासमोर पारंपरिक केळी हेच अन्न ठेवलेलं दिसतं. या चित्रातल्या कल्पनेचा आवाका हा हजारो वर्षांचा आहे. एका छोटय़ा चित्रात केवढा मोठा आशय सांगण्याची ताकद व्यंगचित्र या माध्यमामध्ये आहे याचं प्रत्यंतर अशावेळी येतं.