प्रशांत कुलकर्णी
prashantcartoonist@gmail.com
अर्कचित्र किंवा कॅरिकेचर ही व्यंगचित्रकलेची एक समर्थ शाखा. आणि जगभरामध्ये सर्वात लोकप्रिय असलेलीसुद्धा! तरीही सगळीच चित्रं आपल्याला ओळखू येत नाहीत. याचं कारण म्हणजे ज्याचं ते अर्कचित्र आहे ती व्यक्ती आपल्याला माहिती असायला हवी, ही प्राथमिक पात्रता वाचकांची हवी. ती असेल तरच अर्कचित्राचा रसास्वाद आपण घेऊ शकतो. एकाच व्यक्तीची अनेक व्यंगचित्रकारांनी काढलेली अर्कचित्रं आपण पाहतो आणि ती वेगवेगळी असतात. याचं कारण म्हणजे एकच व्यक्ती प्रत्येक व्यंगचित्रकाराला तिच्या वेगवेगळ्या वैशिष्टय़ांसह दिसत असते. त्यानुसार तो त्या व्यक्तीचं विरूपीकरण करतो. त्यासाठी त्या व्यंगचित्रकाराच्या चष्म्याचा फोकल पॉइंट काय आहे यावर सगळं अवलंबून असतं.
अर्कचित्र म्हणजे साध्या आणि अशास्त्रीय भाषेत सांगायचं तर चांगल्या चेहऱ्याची विनोदी पद्धतीने मोडतोड करून सादर केलेलं चित्र! आणि शास्त्रीय भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वामधला अर्क विनोदी पद्धतीने रेखाटलेल्या ज्या चित्रात उमटला असेल त्याला ‘अर्कचित्र’ म्हणावं! हा शब्द वसंत सरवटे यांनी मराठी भाषेला दिला.
अर्कचित्र काढताना व्यंगचित्रकार अनेक गोष्टींचा विचार करत असतो. म्हणजे नाक, डोळे, ओठ, कपाळ, केशरचना, कपडे, उभे राहण्याची किंवा बसण्याची स्टाईल याकडे त्याचं बारकाईने लक्ष असतं. बऱ्याच राजकारण्यांच्या वेशभूषेत शाल असते. पण नरसिंह रावांची शाल वेगळी, वाजपेयींची वेगळी आणि बाळासाहेब ठाकरे यांची वेगळी! असं वेगळेपण शोधून ते अर्कचित्रातून मांडून स्वत:ची शैली उमटवणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. नुसती अर्कचित्रं काढणारे अनेक व्यंगचित्रकार जगभर काम करतात. त्यांच्या शैलीमुळे त्यांची चित्रं ओळखू येतात.
चेहऱ्याचा नेमका कोणता भाग ‘हायलाइट’ करायचा आणि त्याबरोबरच त्याच्या स्वभावाचं, व्यक्तिमत्त्वाचं दर्शन चेहऱ्यामध्ये कसं दाखवता येईल याचा विचार हे व्यंगचित्रकार करत असतात. नाक, डोळे, ओठ इत्यादीचं अतिशयोक्त चित्रण करत असताना मॉडेलचं मूळ व्यक्तिमत्त्व मात्र हरवता कामा नये, अशी तारेवरची कसरत हे व्यंगचित्रकार करत असतात. डेविड लो, शंकर, बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्या राजकीय व्यंगचित्रांच्या अत्यंत यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांची कॅरिकेचिरगवरची हुकमत या गुणाचा मोठा वाटा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.
लक्ष्मण यांचा तर फक्त अर्कचित्रांचा ‘फेसेस’ या नावाचा स्वतंत्र संग्रहच आहे. या पुस्तकात लक्ष्मण यांनी अर्कचित्र या कलेविषयी खूप महत्त्वाचं आणि मूलभूत भाष्य केलंय. त्याचा भावार्थ असा : नातेवाईक, मित्र किंवा प्रवासात इकडेतिकडे भेटणारे असंख्य लोकांचे चेहरे आपण फक्त एक ओळखण्याची सोय म्हणून लक्षात ठेवतो. प्रत्यक्षात मनात काय साठवलेलं असतं, तर चेहऱ्यापेक्षा या व्यक्तिमत्त्वाचा अर्क! जेव्हा आपण एखादी व्यक्ती आठवतो तेव्हा त्याचे गरुडाच्या चोचीसारखं नाक, पडलेले कान, झुपकेदार मिशा, पुढे आलेले दोन दात वगैरे आठवत नसून त्याच्या व्यक्तिमत्त्वामधला अर्क आपल्या लक्षात येतो. अर्कचित्रांमध्ये अतिशयोक्ती ही मर्यादित असावी. विनोदबुद्धी ही उपजत असावी लागते. म्हणूनच अर्कचित्र कसं काढावं हे शिकवता येत नाही असं प्रतिपादन लक्ष्मण यांनी केलं आहे.
अर्कचित्राच्या वेगळ्या शैलीसाठी डेव्हिड लिवाइन या अमेरिकन व्यंगचित्रकाराचं नाव प्रामुख्याने घ्यावं लागेल. क्रॉसलाइन टेक्निक किंवा शेडिंग यासाठी ते ओळखले जातात. साध्या पेनाने आणि नाजूक रेषेने केलेलं चित्र हे त्यांचं प्रमुख वैशिष्टय़. न्यू यॉर्क रिवू ऑफ बुक्ससाठी ते नियमित अर्कचित्रं काढत. अर्कचित्रांचा वापर करून राजकीय भाष्य असलेली त्यांची चित्रंसुद्धा भरपूर आहेत. त्यांचं हे (सोबत दाखवलेलं) त्यातही थोडंसं वेगळेपण दाखवणारं अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं अर्कचित्र.
काही वेळेला नुसत्या अर्कचित्रातूनही राजकीय भाष्य केलेलं आढळतं. न्यू यॉर्क टाइम्सचे व्यंगचित्रकार सेमूर शास्ट यांनी काढलेलं अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचं अर्कचित्र यादृष्टीने पाहता येईल. वॉटरगेट प्रकरणात ज्या वेळी निक्सन यांच्यावर असंख्य आरोप होत होते त्या काळातलं त्यांचं हे अर्कचित्र बरंच काही सांगून जातं.
मराठीतलं एक नाव अर्कचित्रांसाठी फार महत्त्वाचं आहे. ते म्हणजे प्रभाकर भाटलेकर. साधारण १९७५ पासून त्यांनी अर्कचित्रं काढायला आणि ती प्रामुख्याने इंग्रजी वृत्तपत्रांतून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. त्यांनीही क्रॉसलाइन टेक्निकच्या शैलीचा वापर करून अर्कचित्रांच्या भारतीय दालनात वैविध्य आणलं. त्यांची ही शैली मराठीच नव्हे, तर भारतीय वाचकांसाठीही नावीन्यपूर्ण होती. साध्या फाउंटन पेनाने बारीक रेषेनं, थोडंफार शेडिंग करून ते व्यक्तिमत्त्व छान उभं करतात. अर्थात या शैलीमध्ये चेहऱ्याला जास्त महत्त्व असतं. बऱ्याच वेळेला त्यासोबतीनं राजकीय भाष्य असल्यानं राजकीय व्यंगचित्रं म्हणूनही ती उत्तम ठरतात. केवळ राजकीयच नव्हे, तर क्रीडा, कला, साहित्य, उद्योग या क्षेत्रांमधील व्यक्तिरेखांनाही भाटलेकर यांनी आपल्या रेषांत गुंतवून आणि गुंगवून ठेवलं आहे. खुद्द जे. आर. डी. टाटा यांनाही त्यांचं अर्कचित्र भेट म्हणून देण्याचा बहुमान त्यांना मिळाला. नटवर सिंग, अरुण शौरी इत्यादी अनेकांच्या संग्रहांत भाटलेकर यांची अर्कचित्रं आहेत. सोबतचं अमिताभ यांचं अर्कचित्र पाहून त्यांच्या शैलीची कल्पना येईल.
थॉमस अँथनी हाही अर्कचित्रकारच. केरळमधील कोट्टायममधल्या ‘मेट्रो वार्ता’ या दैनिकात काम करणारा. किंचित बुटका, बराच जाड आणि चेहऱ्यावर मंद हसू ही त्याच्या व्यक्तिमत्त्वाची प्रमुख लक्षणं. व्यंगचित्रकारांच्या एका संमेलनात कोणीतरी ओळख करून दिली की, हा थॉमस अँथनी.. कॅरिकेचरिस्ट! आणि मग एकदम लख्ख प्रकाश पडला. म्हणजे ती भन्नाट चित्रं काढणारा तो हाच थॉमस अँथनी? मी आश्चर्यानं आणि आनंदानं त्याला शेकहॅण्ड केला. तो किंचित हसला. फार काही बोलला नाही. कारण शब्दांचं त्याला वावडं होतं आणि रेषांचं आणि रंगांचं त्याला वेड होत. वाचकांनाही त्याने ते वेड लावलं. सोबतच्या अटलबिहारी वाजपेयी आणि सलमान रश्दी यांच्या अर्कचित्रांवरून थॉमस अँथनी हा किती वेगळ्या प्रकारे विचार करणारा कलावंत होता हे लक्षात येईल.
मल्याळममध्ये तो थोर कलावंत म्हणून लोकांना परिचित होताच, पण जागतिक पातळीवरही त्याला अर्कचित्रांसाठी कितीतरी पुरस्कार मिळाले आहेत. युनायटेड नेशन्स पोलिटिकल कार्टून अवॉर्ड २००७, फ्री कार्टून अवॉर्ड चीन- २००२, त्याशिवाय वर्ल्ड प्रेस कार्टून बुकमध्ये सलग चार वर्ष त्याची अर्कचित्रं प्रकाशित होत होती. त्याची स्टाईलच तशी होती. रंग, रेषा आकार आणि विरूपण यांची योग्य सांगड घालून व्यक्तिमत्त्व उभं करणं हे अवघड कौशल्य त्याला जमलं होतं.
यंदाच्या जानेवारीत एका शनिवारी त्याने नेहमीचं अर्कचित्राचं काम पूर्ण केलं. हे त्याचं शेवटचं काम ठरलं. हा धक्का मोठाच होता त्याच्या चाहत्यांना आणि व्यंगचित्रकारांना. त्याला श्रद्धांजली म्हणून भारतातल्या शंभर व्यंगचित्रकारांनी त्याचंच अर्कचित्र काढून कोट्टायममध्ये एक प्रदर्शन भरवलं. त्यात यावेळी त्यानं काढलेलं चित्र नव्हतं. मात्र तो शंभर अर्कचित्रांतून सगळ्या व्यंगचित्रकारांकडे त्याच्या त्या मंद हास्यातून पाहत होता!