‘चंदगडी’ ही पश्चिम महाराष्ट्रातल्या चंदगड तालुक्यातली बोली आहे. ही मराठीची एक वैशिष्टय़पूर्ण बोली. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करताना ही बोली कन्नड भाषेच्या प्रभावाकडून कोकणीच्या प्रभावाकडे  सरकत असल्याचा अनुभव येतो.
‘चंदगड’ हा कोल्हापूर जिल्ह्य़ातील एक दुर्गम आणि डोंगराळ तालुका. कोल्हापूरपासून या तालुक्याचे अंतर सुमारे १५० कि.मी. इतके आहे. ‘आंबोली’ हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण येथून केवळ २५ कि.मी. आहे. त्यामुळे येथील झडीचा पाऊस प्रसिद्ध आहे. या तालुक्याच्या पूर्वेला कर्नाटक राज्य, पश्चिमेला विस्तृत वनक्षेत्राने व्यापलेला कोकण आणि गोवा राज्य आहे. कोकण-गोव्याशी संलग्न असलेल्या तिलारी आणि आंबोली अशा दोन घाटमाथ्यांवर हा तालुका वसला आहे. जिल्हय़ाच्या ठिकाणापासून सर्वाधिक अंतर, दोन भिन्न भाषा-बोलींचा शेजार व नित्य संपर्क, भाषावार प्रांतरचनेपर्यंतचे विविध राजकीय अंमल, अशा अनेक गोष्टींमुळे या परिसरात एक स्वतंत्र बोली तयार झालेली आहे. ती ‘चंदगडी बोली’ म्हणून ओळखली जाते. चंदगड परिसरासह कर्नाटक-महाराष्ट्र सीमावर्ती प्रदेशातील अनेक गावांची ही भाषा आहे.
भिन्न संस्कृतिसंपर्क, दूरत्व, संपर्कक्षेत्रांची भिन्नता, शेजारभाषा इत्यादी कारणांमुळे चंदगडी बोलीची या प्रदेशात दोन भिन्न रूपं दिसून येतात. या तालुक्याच्या पूर्वेकडून पश्चिमेला प्रवास करताना ही बोली कन्नड भाषेच्या प्रभावाकडून कोकणीच्या प्रभावाकडे सरकत असल्याचा अनुभव येतो. शब्दसंग्रह, उच्चाराचा विशिष्ट हेल, सुरावट आणि व्याकरणिक विशेष या सर्वच बाबतीत हे वेगळेपण दिसून येते.
‘चंदगडी’ ही मराठीचीच एक वैशिष्टय़पूर्ण बोली आहे.  स्वत:चा स्वतंत्र शब्दसंग्रह, उच्चारवैशिष्टय़े इत्यादी संदर्भात या बोलीने आपले वेगळेपण जपलेले आहे. चंदगड तालुक्याचा पश्चिम भाग, दोडामार्ग-सावंतवाडी तालुक्याच्या सीमेलगतची सर्व गावे, आजरा तालुक्याच्या दक्षिण भागातील गावे जी बोली बोलतात, ती कोकणीच्या प्रभावाने तयार झालेली आहे; तर चंदगडच्या पूर्व भागात आणि बेळगाव परिसरातील गावांमध्ये कन्नड भाषेच्या प्रभावाने तयार झालेली बोली बोलली जाते.
मराठीच्या अनेक बोली आज कथा, कादंबरी लेखनाच्या माध्यमातून सर्वासमोर येत आहेत. चंदगडच्या भूमीमध्ये यापूर्वी रणजीत देसाई यांच्यासारखे मोठे लेखक होऊन गेले. ते आयुष्यभर या भूमीत राहिले, परंतु त्यांनी ही बोली आपल्या लेखनासाठी वापरली नाही. त्यांच्यानंतरदेखील ही बोली विशेषत्वाने कोणी आपल्या लेखनासाठी वापरली नाही. काही वर्तमानपत्रांमधून झालेले त्रोटक लेखन आणि या तालुक्यातील करंजगाव येथील एक हौशी नाटक मंडळी अलीकडे या बोलीमधून नाटक सादर करताना दिसतात. याव्यतिरिक्त तिची विशेष कोणी दखल घेतलेली नाही.
कोणत्याही भाषेच्या बोलीचे उच्चारण हे त्या बोलीचे खास वैशिष्टय़ असते. बोलीतील शब्दांचे उच्चार, हेल, बलाघात यांची तुलना प्रमाण मराठीशी करता बोलीचे वेगळेपण स्पष्ट होते. बोलीतील एखादा वाक्यप्रयोग प्रमाण मराठीच्या तुलनेत चुकीचा वाटत असला तरी विशिष्ट पद्धतीने बोलणे समाजात रूढ होऊन गेलेले असते. उदाहरणार्थ, चंदगडी बोलीमध्ये स्त्रिया ‘मिय्या जेवलो’, ‘मिय्या बाजारास गेल्लो’ असे बोलतात.
शब्दसंग्रहाच्या बाबतीमध्ये ही बोली संपन्न आहे. प्रमाण मराठीपेक्षा तिचा वेगळा आणि स्वतंत्र शब्दसंग्रह आहे. उदाहरणार्थ, शेस (आहेर), आडाळी (विळती), तरक (लक्ष), डंग (गच्च झुडूप), किरमं (सर्दी), व्हळी (गवताची गंजी), भोवड (शिकार), किरवं (खेकडा), किरपन (बारीक), करक (मशार), बेस (फोड), काडू (गांडूळ), ब्याद (संकट), वांगडास (सोबत),  शिक/न्हंगडं (आजार), भाव (विहीर), ईल (अवतार), मोसबा (नखरा), इस्टन (संपत्ती), डाळी (चटई), गुत्याडणे (धडपडणे), लाटण (कंदील), इस्तारी (पत्रावळी), कांबळ (पाहुणेर/इर्जकि), आरमुट (उर्मट).  
चंदगडी बोलीतील शब्दांचा प्रमाण मराठीतील शब्दांशी तुलना करून पाहण्यासारखी आहे. उदाहरणार्थ, ‘वसूला’ हा शब्द प्रमाण मराठीतील वसूल, वसुली या शब्दांशी संबंधित नाही. ‘वसूला’ हा शब्द या बोलीत‘वशिला’ या अर्थाने वापरला जातो. ‘वट’ हा शब्द ‘हुकमत’ या अर्थाने वापरला जातो, तर ‘वट्टात’ हा शब्द दोन भिन्न अर्थाने प्रचलित आहे. ‘मिय्या वट्टात वाटणी देऊसकी न्हाय’ या वाक्यामध्ये तो ‘अजिबात’ या अर्थाने येतो, तर ‘आमी वट्टात श्यात करूलावात’ या वाक्यात तो ‘एकत्र’ किंवा ‘मिळून’ या अर्थाने येतो.  
चंदगडी बोलीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ तिचे उच्चारण हे आहे. ही बोली एका विशिष्ट उच्चाराने, हेल काढून बोलली जाते. ‘जाऊलेसाय..’ हा एक शब्द वाटत असला तरी, हा या बोलीमध्ये एका वाक्याचे काम करतो. ‘तू जात आहेस का?’ या अर्थाने तो वापरला जातो. या शब्दातील ‘ऊ’ आणि ‘सा’ या ध्वनींचा उच्चार दीर्घ सुरावटीत केला जातो. ‘सा’मधील ‘आ’ जाणवेल इतका स्पष्ट आणि दीर्घ उच्चारला जातो. अशी उच्चारांची सुरावट या बोलीतील बहुतांश शब्दांबाबत  दिसून येते. त्यामुळे व्यवहारात या बोलीलाच एक सुरावट प्राप्त होते. ‘तू आली होतीस का?’ हे प्रश्नार्थक वाक्य वरील ‘तिया यल्लीस’ या दोन शब्दांतून विशिष्ट सुरावटीमुळे बोलता येते. ‘यल्लीस’ या शब्दातील ‘ई’ आणि ‘स’ या दोन्ही ठिकाणी सूर ओढला जातो. ‘ई’ची सुरावट दीर्घ आहे. ‘तिय्या जाऊललीसाय’ या वाक्यामध्ये ‘तू’ हे सर्वनाम ‘तिय्या’ असे होते. शिवाय ‘तिय्या’चा उच्चार पुन्हा खास सुरावटीमध्ये होतो. ही सुरावट, उच्चारविशेष कोकणीच्या जवळची आहे. अशी विशिष्ट सुरावटीमध्ये बोलली जाणारी बोली तालुक्याच्या पश्चिम विभागात दिसते.
पूर्व विभागात बोलीची सुरावट कन्नडच्या प्रभावाने तयार झालेली आहे. कण्णं (केव्हा), कास (कशाला), खट्टे (कोठे), गसली (गेल्या वर्षी), तण्णं (तेव्हा), तवरस्क (तोपर्यंत), चकोट (चांगले), बळ्यान (खोटे), माज (मला), मिय्या (मी) असे शब्द पूर्व विभागात दिसतात. ‘कासनी ते’, ‘खट्टे गेल्ल्यास’, ‘कन्नच्च्यान सोदूलोय मसोटीत गेल्ल्यास काय’ अशी वाक्ये प्रत्यक्ष ऐकणे हा एक अनुभव असतो.
या भागात तूज, माज, त्यास, तिण्ण, मिण्ण, त्यण्णाणी अशी सर्वनामे वापरली जातात. या विभागातील उच्चारणेही वैशिष्टय़पूर्ण आहेत. ‘कोठे’ऐवजी येणाऱ्या ‘खट्टे’ या शब्दातील ‘ट्टे’चा लांबवलेला उच्चार हे या बोलीचे वैशिष्टय़ आहे. ‘तूण्ण पडय़ात कास गल्ल्यास?’ (तू परसात का गेला होतास?) या वाक्यातील ‘ण्ण, डय़ा, ल्ल्या’ या जोडाक्षरी शब्दांचे दीर्घ उच्चारण नवीन व्यक्तीला सहज न उमगणारे असते.
दांडगा (मोठा), व्हलस (घाण), बुरसा (घाणेरडा), आंबरसुका (ओलसर), कळकोटा (भांडणे काढणारा), कळखोचरा (भांडणे उकरून काढणारा), काटकोळा (बारीक), किरपन (सडपातळ), धबला (जाडा), हुसभुरक्या (लाज नसणाऱ्या), व्हळके (होय होय म्हणणारे), थुकमारे (बेशरम) अशी विपुल विशेषणे या बोलीत सापडतात. तांबूस, हिरवट, तांबडालाल, मातकट, तपकिरी, पिवळसर, पिवळाधम्मक अशी रंगवाचक विशेषणे आहेत. नक्काडा (लहान), नकबर (चिमूटभर), दांडगा (मोठा), वावभर (एक मीटर), उलासका (थोडासा) अशी आकारमान वाचक विशेषणे दिसतात, तर हिजडी, देवचार, जोगता, जोगती, खज्जाळी, हूसभुरकी, उंडगी अशी विशेषणे शिवीसदृश आहेत.
या बोलीत वयल्याअंगास (वरील बाजूस), खायल्याअंगास (खालील बाजूस), भायल्याअंगास/भायल्याबाजूस (बाहेरच्या बाजूला), मंगलीमळीक (मंगलसारखी), मागल्यामळीक (मागीलप्रमाणे), तवंम्हेरेन (तेव्हापासून) उशीरच्यान (खूप वेळेपासून) अशी विशेषणेही आहेत. त्याचबरोबर बुरसा (घाणेरडा), तांबडालाल (खूप गोरा), उजळ (गोरा), कडूईक (कडू), गुळमाट (गोड), धबला (जाड), किरपण (बारीक) अशी गुणविशेषणेही वेगळी आहेत.
चंदगडी बोलीतली व्याकरणिक विशेषही वैशिष्टय़पूर्ण आहेत. उदाहरणार्थ, सर्वनामे तीय्या/मिण्ण, आमी, तीय्या, तुमी, आमी, त्यो, ती, त्ये, त्या त्यो, व्हयतो, ही, त्यो, ती, त्ये, खल्यास/खुल्यास, खल्यान अशी दिसतात, तर क्रियापदाची रूपे आल्ली, गेल्ली, यवूलावात, जाऊलावात, व्हईल, काडूलावात, दिल्यानात, यत्तल्यात अशी आहेत.
या बोलीचा शब्दसंग्रह पाहताना तिचे स्वतंत्र अस्तित्व लक्षात येते. चंदगड तालुक्यामध्ये आता तीन महाविद्यालये कार्यरत आहेत. त्यातून शिकणारी नवी पिढी नोकरी-व्यवसायांच्या निमित्ताने आपल्या गावापासून दूर राहणारे लोक आता ही बोली वापरत नाहीत. बोलीतून त्या त्या प्रदेशाचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास जाणून घ्यायला मदत होते. बोलीतील अनेक शब्दांमधून त्या प्रदेशाचा भूतकाळ समजतो. त्या अनुषंगाने चंदगडीसारख्या अनेक अलक्षित बोलींचा अभ्यास होण्याची गरज आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा