गेल्या १५-२० वर्षांत मराठी सिनेमा आणि मराठी नाटक आमूलाग्र बदललेलं दिसतं. एकेकाळी सशक्त आशय-विषयांची नाटकं हे मराठी रंगभूमीचं वैशिष्टय़ होतं. गेल्या काही वर्षांत मराठी सिनेमानं हे व्रत घेतलं आहे. नवनव्या तंत्रज्ञानाच्या झंझावाताने गावागावापर्यंत पोहोचलेल्या सिनेमा व टीव्ही या माध्यमांनी ही क्रांती घडवून आणली आहे. तळागाळापर्यंत पोहोचलेल्या या माध्यमांनी गावपातळीवरील सृजनशील युवापिढीला व्यक्त होण्याचं एक नवं साधन दिलं.. सिनेमा! जो त्यांचं म्हणणं, त्यांचं व्यक्त होणं नाटकापेक्षा अधिक प्रभावीरीत्या मोठय़ा लोकसमुदायापर्यंत व सर्वदूर पोहोचवणारा होता. साहजिकच त्यात ‘प्रयोग’ करणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढली. या संक्रमणाला आर्थिक उदारीकरणामुळे घडलेल्या आर्थिक-सामाजिक स्थित्यंतरानंही मोठी साथ दिली. म्हणूनच आज नाटकापेक्षा मराठी चित्रपट अधिक आशयघन व समृद्ध होताना दिसतो आहे..  
सध्या अनेक चांगले, आशयघन, विषयांचं वैविध्य असलेले मराठी सिनेमे येत आहेत. कधी नव्हे इतकं हे चित्र सुखद, आशादायी आणि सकारात्मक आहे. एकेकाळी मराठी नाटकांतून सामाजिक, कौटुंबिक समस्याप्रधान विषय हाताळले जात. मनोविश्लेषणात्मक आणि समकालीन वास्तव मांडणारी नाटकंही मराठी रंगभूमीला अपरिचित नाहीत. आजही वर्तमान सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक वास्तव मांडणारी नाटकं मराठी रंगभूमीवर होत आहेत. त्यांचं प्रमाण पूर्वीइतकं नसेल कदाचित; पण आशयसंपन्न नाटकं आजही रंगभूमीवर होत आहेत. फक्त त्यांचे विषय आज बदलले आहेत. मराठी चित्रपटांतून आजचा भवताल, त्यातली गुंतागुंत आणि वर्तमान समाजवास्तव अधिक प्रकर्षांनं येताना दिसतंय, हे मात्र खरंय.
यासंबंधात विचार करताना दोन-तीन मुद्दे ठळकपणे लक्षात घ्यायला हवेत. कुठल्याही कलेच्या संबंधात बोलताना तो देश, ते राज्य आणि त्या विशिष्ट भागातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक तसंच शैक्षणिक बदलांसंबंधी.. तिथल्या स्थित्यंतरांविषयी न बोलता ्र२’ं३्रल्ल मध्ये नाही बोलता येणार. महाराष्ट्रात गेल्या १५-२० वर्षांत जे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बदल झाले, स्थित्यंतरे झाली, ती बारकाईने पाहिली तर कलेतील आणि कलाव्यवहारातील बदलांची कारणं सापडू शकतील.
गेल्या वीसेक वर्षांत मराठी नाटकांचा लेखक बदललाय. दिग्दर्शक बदललाय. रंगभूमीवर काम करणारे कलावंत बदलले आहेत. एवढंच कशाला, मराठी नाटकाचा प्रेक्षकही पार बदललाय. त्यामुळे पूर्वी ज्या प्रकारचं नाटय़लेखन होत असे तसं आज होताना दिसत नाहीए. त्याचं कारण नाटकाशी संबंधित सगळे घटकच आज बदलले आहेत.
पूर्वी मराठी नाटकाचा जो मुख्य प्रेक्षक होता- मध्यमवर्गीय प्रेक्षक- त्याच्या समस्यांचं चित्रण करणारी.. त्याला भावणाऱ्या, रुचणाऱ्या व पचणाऱ्या विषयांभोवतीच तेव्हाची नाटकं केंद्रित झालेली असत. ती करणारी माणसंही बहुधा याच वर्गाशी संबंधित अशी होती. मग तो लेखक असेल, दिग्दर्शक असेल, कलाकार असेल. त्यामुळे स्वाभाविकपणेच ती नाटकं एका विशिष्ट वर्गाचं प्रतिनिधित्व करणारी आणि बहुतांशी त्यांच्याच समस्या मांडणारी असत.
१९९१ सालानंतर जागतिकीकरण आणि आर्थिक उदारीकरणाचे वारे जोमानं आपल्याकडे वाहू लागले. त्याचे परिणाम सार्वत्रिक आणि सर्वदूर होत होते.. अजूनही होत आहेत. त्यावेळच्या मराठी नाटकाचा मुख्य कणा- जो मध्यमवर्ग  होता, त्याचं आर्थिकमान वाढलं. तो उच्च मध्यमवर्गात गणला जाऊ लागला. ग्लोबलायझेशनमध्ये पुढं जायचं असेल तर वाघिणीच्या दुधाला पर्याय नाही. त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढय़ा मराठी माध्यमात शिकल्या नाहीत. याच दरम्यान, हा वर्ग आर्थिक समृद्धीमुळे तसंच इतरही व्यवहारिक कारणांनी इतस्तत: पांगला. तो पूर्वीसारखा एकजिनसी राहिला नाही. त्याच्या बदललेल्या जीवनशैलीत ‘नाटक’ हे त्याचं पाहण्याचं माध्यम राहिलं नाही. यामुळेही मराठी नाटक गेल्या दोन दशकांत हळूहळू बदलत गेलं.
या सामाजिक-आर्थिक अभिसरणात ज्यांच्यापर्यंत तोवर आर्थिक, शैक्षणिक समृद्धीची फळं पोचली नव्हती, त्या वर्गात ती झिरपू लागली. त्यातून एक वेगळाच सामाजिक वर्ग निम्न स्तरांतून वर आला. या वर्गाला एकाएकी लाभलेल्या आर्थिक समृद्धीमुळे त्यांच्या सांस्कृतिक भूकेनंही उचल खाल्ली. या वर्गातल्यांनी मग त्यांच्या पद्धतीची नाटकं करणं, लिहिणं आणि पाहणं सुरू केलं. त्यामुळेही गेल्या दोन दशकांत मराठी नाटक बदलत गेलेलं दिसतं.
यालाच समांतरपणे आणखीनही एक गोष्ट होताना दिसली. ती म्हणजे सिनेमा आणि टीव्ही ही माध्यमं जास्त लोकाभिमुख व्हायला लागली. आधी टीव्ही सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आला. त्यानंतर सिनेमा हे माध्यम.. जे स्पेशल होतं, तेही डिजिटल क्रांतीमुळे घराघरांत गेलं. आणि सर्वदूर पोहोचलं. मुख्य म्हणजे ते कुणाच्याही सहज आवाक्यात आलं. अकीकडे ही तंत्रज्ञान क्रांती घडत असतानाच आर्थिक उदारीकरणाच्या परिणामी लोकांच्या हाती पैसा आला. तो वाढत गेला. त्यामुळे सिनेमा माध्यमातील ग्लॅमरच्या आकर्षणामुळे अनेकजण मराठी सिनेमात पैसे गुंतवण्यास पुढे आले. अशाने सिनेमा निर्माण करणारे लोक वाढल्याने तो तयार करणारे आणि पाहणारे लोकही आपसूकच वाढले.
तशात मल्टिप्लेक्स संस्कृतीही सर्वत्र फोफावू लागली. मल्टिप्लेक्सचं येणं ही थेट अर्थकारणाशी संबंधित गोष्ट आहे. टीव्हीमुळे सिनेमे गावागावांत पोहोचले होतेच. त्यामुळे आपल्या अवतीभोवती असलेल्या समस्यांबद्दल व्यक्त होणं.. आणि ते व्यक्त होण्यासाठी ‘माध्यम’ शोधणं सुरू झालं. या प्रक्रियेत व्यक्त होण्याच्या माध्यमामध्येही बदल झाला. आधी नाटकांतून व्यक्त होणारी पिढी बदलून त्यांची जागा सिनेमाने घेतली. पूर्वी जिथे गावागावांत छोटय़ा नाटय़संस्था असत, तिथे आता लघुपट निर्माते निर्माण झाले आहेत. अलीकडेच साताऱ्यात मोबाइलच्या माध्यमातून तयार केलेल्या शॉर्टफिल्म्सचा फेस्टिव्हल झाला. हे या बदललेल्या वातावरणाचेच फलित आहे. नाटकापेक्षा सिनेमा हे माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्याचे अतिशय प्रभावी आणि चिरस्थायी असं माध्यम आहे. त्यात अगणित सृजनात्मक शक्यता आहेत. कॅमेऱ्यामधून मोठय़ा जनसमुदायापर्यंत तुम्ही त्याद्वारे पोहोचू शकता. आणि प्रॅक्टिकलीही कॅमेरा हे माध्यम आपल्याला जे मांडायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, त्यासाठी जास्त सोयीचं आणि सुकर आहे. म्हणजे बघा- नाटकासाठी आवश्यक असलेले सर्व घटक जमवणं.. दर प्रयोगाला त्यांना एकत्रित आणणं, हे व्यावहारिकृष्टय़ा दिवसेंदिवस अवघड बनत चाललं आहे. याउलट, तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे सिनेमा बनवणं त्यामानाने सोपं झालं आहे. हे खूप मोठं स्थित्यंतर कलेच्या माध्यमात गेल्या वीसेक वर्षांत झालेलं दिसतं.
आणखीनही एक वेगळी बाजू यासंदर्भात तपासून पाहायला हवी. शहरांतील समस्या गेल्या काही वर्षांत संपूर्णपणे बदलल्या आहेत. मध्यम आणि उच्च मध्यमवर्ग आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अशा सर्वच दृष्टय़ा समृद्ध झाला आहे. त्यांना पडणारे प्रश्नही आता बदलले आहेत. याचा तडक परिणाम म्हणजे आपल्या नाटकांचे विषयही त्यानुरूप आज बदलले आहेत. मुंबईसारख्या शहरात हौशी नाटकं करण्यापेक्षा टीव्ही इंडस्ट्रीच्या वाढत्या प्रभावामुळे आणि प्रसारामुळे मालिका वा सिनेमा हा व्यवसाय म्हणून स्वीकारणं हल्ली जास्त सोपं झालं आहे. त्यामुळे दिवसा नोकरी आणि संध्याकाळी नाटक करण्याचा जमाना इतिहासजमा झाला आहे. त्याऐवजी पूर्णवेळ ‘कला’ हाच व्यवसाय म्हणून स्वीकारणारे लोक वाढले आहेत. आज सर्वच क्षेत्रांमध्ये व्यावसायिकता आणि स्पर्धाही प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सरकारी-निमसरकारी आस्थापने, बँका वगैरेंतून कलाकारांना पूर्वी ज्या सोयीसुविधा, सवलती दिल्या जात, त्या मिळणं आता बंद झालंय. त्यामुळेही कलाक्षेत्रात पूर्णवेळ काम करणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
दुसरीकडी खेडय़ांतून वा लहान गावांतून पूर्वी ज्या समस्या होत्या, त्या एका पातळीवर फारशा बदललेल्या नाहीत. म्हणूनच भारत आज ज्याकडे वेगानं चाललाय ती म्हणजे तफावत.. दरी. ती वाढतेय. परंतु म्हणून काही खेडय़ांतल्या प्रत्येकाला शहरात येऊन मध्यम वा उच्च मध्यमवर्गात दाखल होणं शक्य नाहीए. त्यामुळे मला असं वाटतं की, पूर्वी सत्तरच्या दशकात हिंदीत समस्याप्रधान सिनेमे करणारे लेखक, दिग्दर्शक, नट हे बऱ्यापैकी मध्यम वा उच्च मध्यमवर्गातले होते. श्यामबाबू (श्याम बेनेगल) काय किंवा गोविंद निहलानी काय; की ज्यांनी समाजातल्या निम्न स्तरांतल्यांच्या समस्या आपल्या चित्रपटांतून त्याकाळी हाताळल्या. पण गेल्या काही वर्षांतल्या बदललेल्या तंत्रज्ञानामुळे, सिनेमा व टीव्हीच्या व्यावसायिक भरभराटीमुळे, शिक्षणाच्या सर्वदूर प्रचार व प्रसारामुळे ग्रामीण भागांतल्या, निम्न स्तरांतल्या युवकांकडेही सिनेमातून व्यक्त होण्याची ताकद आता आलीय. डिजिटल क्रांतीने तर खऱ्या अर्थाने सिनेमात ‘लोकशाही’ आणली. याच्याच बरोबरीनं महाराष्ट्रातलं इतर क्षेत्रांतलं अर्थकारणही खूप सुधारलं. ज्यामुळे त्या व्यवसायांतला पैसा हा आज मराठी सिनेमात यायला लागलाय.
याचदरम्यान आणखीही एक गोष्ट अशी झाली, की पूर्वी ‘फेस्टिव्हलचा सिनेमा’ म्हणून ज्याला हिणवलं जायचं, त्या सिनेमालाच गेल्या काही वर्षांत फेस्टिव्हलचा सिनेमा म्हणून नावाजलं जाऊ लागलंय. यामुळे चित्रपटाच्या व्यवसायाव्यतिरिक्तही फेस्टिव्हलचा म्हणून एक व्यवहार सुरू झाला.. चांगल्या अर्थाने. आणि या सगळय़ा बदलत्या वातावरणाचा, बदललेल्या मानसिकतेचा फायदा प्रेक्षागृहांमध्येही दिसू लागलाय. सिनेमाचा प्रेक्षकवर्ग वाढायला लागलाय.
या अशा सगळय़ा सकारात्मक कारणांची नुसती नोंद जरी घेतली, आणि या अनुषंगाने येणारी इतरही अनेक कारणं ध्यानी घेतली, तर लक्षात येईल की, सिनेमा हे आजच्या तारखेला व्यक्त होण्याचं सर्वात प्रभावी, सगळय़ात ताकदवान आणि सर्वाधिक लोकप्रिय माध्यम का आहे! स्वाभाविकच त्यात व्यक्त होणाऱ्यांच्या जीवनजाणिवा, त्यांचं समाजवास्तवाबद्दलचं भान, त्याबद्दलचं त्यांचं आकलन, त्यांच्या अंतर्मनात दडलेला सुप्त जाणिवांचा प्रदेश.. हे सारं सिनेमात न येतं तरच नवल! म्हणूनच आज मराठी नाटकापेक्षा चित्रपटांतून आशय-विषयांचं वैविध्य, ते मांडण्याच्या पद्धती, त्यातली संपन्नता जोरकसपणे प्रत्ययाला येते आहे. ‘नाटक’ या माध्यमाच्या मर्यादांवर, त्यातल्या त्रुटींवर मात करण्याचं आणि काळाला पुरून उरण्याचं सामथ्र्य ‘चित्रपट’ माध्यमात असल्यानंही आजची युवापिढी त्याकडे मोठय़ा संख्येनं वळताना दिसते.
तंत्रज्ञानातील क्रांतीचा फायदा सर्वानाच होत असतो. जसा आज तो सिनेमाला होताना दिसतो आहे! तसंच कुणी सांगावं- उद्या कुणी याच प्रगतीशील तंत्रज्ञानाच्या आधारे ‘नाटक’ या माध्यमाचाही चेहरामोहरा संपूर्णपणे बदलू शकेल.. त्यात क्रांती घडवू शकेल. आणि आज जे सुखद, आशादायी चित्र मराठी सिनेमाच्या बाबतीत पाहायला मिळतंय, ते नाटकाच्याही वाटय़ाला येईल. माझं असं स्पष्ट मत आहे, की महत्त्व ‘व्यक्त होण्याला’ आहे; ‘माध्यमा’ला नाही! त्यामुळे जर आज अनेकांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सिनेमा हे माध्यम अधिक प्रभावी वाटत असेल, आणि त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर होत असेल, तर त्यात गैर काहीही नाही.
मराठी सिनेमातल्या या सकारात्मक बदलांबाबत बोलत असतानाच एकीकडे एक खंतही आहेच, की आपण ‘फॅण्ड्री’, ‘वेन्स्डे’ चित्रपटांसारख्या समस्या मांडण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो आहोत का? वस्तुस्थिती अशी आहे, की अशा सिनेमांचं स्वागत दोन्ही हात पसरून प्रेक्षकांकडून अजूनही होत नाही. हे कटू वास्तव कायम आहे. समाजवास्तवातील कटू सत्यं पाहायला प्रेक्षकांना आवडत नाही. अशा चित्रपटांना जो भरभरून प्रतिसाद मिळायला हवा, तो अद्यापि मिळत नाही, हे वास्तव तसंच आहे. त्यात फार मोठा बदल झालेला नाही. म्हणूनच आज गरज आहे ती अशा समस्या मांडण्याच्या पद्धतीत बदल करण्याची! सिनेमा हे महागडे माध्यम असल्यानं लोकांच्या पचनी पडेल, त्यांना रुचेल अशा पद्धतीनंच त्या समस्या लोकांपर्यंत नेणं गरजेचं आहे. याकरता सिनेमा हे खूप प्रभावी माध्यम आहे. सध्याच्या सकारात्मक परिस्थितीत त्याचा पुरेपूर उपयोग व्हायला हवा.
नाहीतर ७० च्या दशकात हिंदीत समस्या मांडणारा सिनेमा जसा काही वर्षांनी नष्ट झाला, तसं आजचा मराठी सिनेमाच्या वाटय़ाला येऊ नये. मराठी प्रेक्षकांनीही यासाठी अशा सिनेमांना भरभरून पाठिंबा द्यायला हवा. आणि मराठी चित्रपट व्यावसायिकांनीही असे सिनेमे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवेत.
शब्दांकन : रवींद्र पाथरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा