अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com

..तर जगाच्या रंगमंचावरील मध्यांतराचा अवकाश आता संपल्यात जमा आहे. सक्तीचा गृह-बंदिवास संपून समस्त मनुष्यप्राण्यांचा मुक्त संचार सुरू होत आहे. तो होताच दृश्यही बदलणं साहजिकच आहे. जागतिक रंगमंचाच्या सूत्रधारांनी ‘काळवंडून टाकू सारी गगने’चे सलग प्रयोग नव्या जोमाने सुरू केले आहेत. निरंतर चालू वर्तमानकाळात राहणाऱ्या कृष्ण पक्षाच्या नव्या ‘लीळाचरित्रा’ची रचना सुरू असून, त्यातील एकेक कहाणी समोर येत आहे.

Sunita Williams forgets how to walk
सुनीता विल्यम्स अंतराळात बसणं, झोपणं अन् चालणंही विसरल्या? प्रदीर्घ काळ अवकाशात राहिल्याचा काय परिणाम होतो?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Ashutosh Joshi Konkan Nature Raigad
…एक पत्थर तो तबियत से उछालो यारो
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ
climate change loksatta
कुतूहल : भूजल आणि हवामानबदल

यंदा सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर उष्मा जाणवत होता. सप्टेंबरमधील नेहमीच्या तापमानापेक्षा ३0 ते ६0 सेल्सियसने ही वाढ होती. ही बाब जगभरच होती. या तापमानवाढीमुळे जंगलवणव्यांचा कहर सुरू झाला. उपग्रहातून कॅलिफोर्निया, अ‍ॅमेझॉन, सायबेरिया, ऑस्ट्रेलियाच्या अरण्यातील अग्नितांडव पाहिल्यास संपूर्ण पृथ्वीस आग लागल्याची भावना होत होती. ऑक्टोबरच्या मध्यात एकाच वेळी अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. तासाभरात १०० ते १५० मि. मी. पाऊस कोसळला. काढून ठेवलेल्या पिकांच्या गंज्या वाहून गेल्या. हवामानबदलाचे हे तडाखे वरचेवर वाढतच आहेत. हवामानबदल हा विषय अत्यंत महत्त्वाचा असूनही अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतील राजकीय विषयपत्रिकेत मात्र तो आलेला नाही.

करोनाकाळातील टाळेबंदीत सुखावणाऱ्या निसर्गाचे काही क्षण दूर होऊन आता उग्र भविष्याचे कवडसे डोकावणं अटळच होतं. ते काम जागतिक हवामानशास्त्रज्ञ संघटनेने केलं आहे. हवामानविषयक संशोधन करणाऱ्या सहा वैज्ञानिक संघटनांनी ‘विज्ञानासाठी एकजूट’ नामक अहवाल तयार केला आहे. ‘यंदा करोनाच्या टाळेबंदीमुळे कर्बउत्सर्जनात काही अंशी घट झाली असली तरी ती फारशी उपयुक्त व परिणामकारक ठरणार नाही. कार्बन संहती  वाढतच आहे. पुढील चार-पाच वर्षांत ही तापमानवाढ सुरू राहील. दरम्यान एल निनोची प्रक्रिया सुरू झाल्यास उष्णतेत आणखी वाढ होईल. २०१६ ते २०२० ही सर्वाधिक उष्ण र्वष राहिली आहेत. २०२४ पर्यंत जगाचं तापमान हे औद्योगिक युगापूर्वीच्या तापमानापेक्षा १.५0 सेल्सियसने वाढण्याची दाट शक्यता आहे,’ असा त्यांचा निष्कर्ष आहे. जागतिक उष्मावाढ व कर्ब-उत्सर्जनवाढ हे मुद्दे हातात हात घालूनच येतात.

१९८८ पासून ‘कर्बउत्सर्जनातील वाढ हा दोष नेमका कोणाचा?’ हा वितंडवाद नेहमी सुरू असतो. १९९२ च्या रियो परिषदेपासून संपूर्ण जगाने ‘प्रदूषकांनी भरपाई करावी’ या तत्त्वाचा पाठपुरावा केला होता. परंतु २०१५ च्या पॅरिस करारातून ‘ऐतिहासिक प्रदूषण’ ही संज्ञाच वगळण्यात आल्याने ‘सर्वाना समान विकास संधी’ या न्याय्य भूमिकेलाच बगल दिली गेली. या धूर्तपणामुळे भूतकाळातील प्रचंड प्रदूषणाची जबाबदारी झटकून टाकण्यात धनाढय़ राष्ट्रं यशस्वी झाली आहेत. देशोदेशीच्या अर्थव्यवस्थेवरून त्यांच्या कर्बवायू उत्सर्जनाचा अदमास घेता येतो. ‘राष्ट्रांचं कार्बन अंदाजपत्रक हाच हवामान कराराचा गाभा असला पाहिजे,’ असं कार्बन उत्सर्जन संशोधक मानतात. कार्बन अंदाजपत्रक करून मग उत्सर्जनाविषयी बोलणं हे सयुक्तिक व तार्किक असलं तरी श्रीमंत राष्ट्रांच्या सोयीचं नसल्याने ते बाजूला ठेवलं गेलं. दरम्यान सर्वानीच १९९२ चा विसर पाडून घेतला.

गेल्या दहा वर्षांत चीन व भारत हे कर्ब-उत्सर्जनात आघाडीवर असले तरी १७५१ साली औद्योगिक क्रोंती सुरू झाल्यापासून आजवर जगात झालेल्या कर्बउत्सर्जनात अमेरिकेचा वाटा सर्वाधिक आहे. या कर्बउत्सर्जनास नेमकं कोण कारणीभूत आहे याची पाहणी सतत केली जाते. तेल/कोळसा उत्पादक कंपन्या, श्रीमंत राष्ट्रं, राजकीय नेते व धनाढय़ व्यक्ती यांच्यापैकी सर्वाधिक जबाबदार कोण? की हे सगळेच? की ही दोषारोपण प्रक्रि याच चुकीची आहे? ओस्लो येथील ‘सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट अँड एन्व्हायर्नमेंटल रिसर्च’चे संचालक ग्लेन पीटर्स यांनी वस्तुस्थिती समोर ठेवली आहे : ‘गेल्या २० वर्षांतील एकंदरीत कर्बउत्सर्जनापैकी ७० टक्के उत्सर्जनास १०० तेल/कोळसा उत्पादक कंपन्या जबाबदार आहेत. लीड्स विद्यापीठाने घेतलेल्या जागतिक सर्वेक्षणात ८६ देशांतील दहा टक्के  धनाढय़ हे जगातील दहा टक्के  गरिबांच्या तुलनेत त्यांच्यापेक्षा २० पटीने अधिक कर्बउत्सर्जन करतात.’ ही आकडेवारीच स्वयंस्पष्ट आहे. श्रीमंतीच्या प्रमाणात घन, द्रव व वायू पदार्थाचं प्रदूषण वाढ जातं हे वारंवार सिद्ध होत आहे. पण धनिकांना ही जबाबदारी इतरांवर किंवा लोकसंख्यावाढीवर ढकलायची आहे. त्यातूनच २००५ पासून जगभर कर्ब-पदचिन्हांची चर्चा वाढू लागली. तेव्हा बी. पी. (ब्रिटिश पेट्रोलियम) कंपनीने हात झटकत ‘हा दोष प्रत्येक व्यक्तीचा आहे, आमचा नाही. तुमचा प्रवास, आहार यांमुळे कर्बउत्सर्जन होत आहे,’ असा डांगोरा पिटत जगातील लोकांवर कर्बउत्सर्जनाचा भार ढकलून दिला. ‘वैयक्तिक पातळीवर कर्ब-पदचिन्हे कमी करणं हे उत्तमच; पण फक्त तेवढय़ानं समस्या संपणार नाही. अति प्रदूषण करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांचा वेगळा विचार करणं अत्यावश्यक आहे. जगातील कुबेरांची यादी जाहीर होते तसेच त्यांच्याकडून होणाऱ्या कर्बउत्सर्जनाचे तपशील जाहीर करणंही गरजेचं आहे. कार्बन कर लावल्याशिवाय कर्बउत्सर्जनासाठी कोण किती जबाबदार आहे हे कळणार नाही.

हवेतील कार्बन डायऑक्साइड वायूकडे विशेषत्वाने लक्ष देण्याचं श्रेय अमेरिकी वैज्ञानिक चार्ल्स डेव्हिड किलिंग यांना जातं. त्यांना १९५६ साली हवेतील कार्बन डायऑक्साइड मोजण्याचा छंद लागला. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हे दिवसापेक्षा रात्री अधिक असते, वनस्पती दिवसा प्रकाश संश्लेषण करून रात्री कर्बवायूचं उत्सर्जन करतात, उन्हाळ्यात वनस्पतींची पानं कुजण्याचं प्रमाण वाढतं व त्यामुळे तेव्हा हिवाळ्यापेक्षा कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त असतं, हे त्यांनीच जगाच्या लक्षात आणून दिलं. त्यांच्या या निरीक्षणामुळे त्यांची विज्ञानवृत्ती त्यांना अस्वस्थ करीत होती. १९५८ साली किलिंग यांच्या अथक प्रयत्नांतून हवाई बेटात मौना लोआ येथे हवामानाची स्वतंत्र वेधशाळा निर्माण झाली. येथे जगातील कर्बउत्सर्जनाचं सातत्यानं निरीक्षण व विश्लेषण केलं जातं. २००५ पर्यंत किलिंग स्वत: जातीने त्यात लक्ष घालत होते. समुद्रसपाटीपासून ११,१३५ फूट उंचीवर असलेल्या हवाई बेटावरील हे ठिकाण सर्व प्रकारच्या प्रदूषणांपासून दूर आहे. ज्वालामुखीच्या थरांपासून बनलेले हे बेट वनस्पतींपासूनही मुक्त असल्यामुळे प्रकाश संश्लेषणातील कर्बउत्सर्जनाचाही प्रश्न नाही. जागृत ज्वालामुखीचे केंद्र असलेल्या मौना लोआ पर्वताजवळ जगाच्या हवामानाचा वेध घेणं ही जोखीम लक्षात येते.

पेट्रोल, डिझेल व कोळसा या जीवाश्म इंधनांमुळे कर्बउत्सर्जन वाढत आहे, हे किलिंग यांनी जगाला दाखवून दिलं. त्यांनी दरवर्षी वाढत जाणाऱ्या कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाचा आलेख काढला असून तो ‘किलिंग वक्र’ (कव्‍‌र्ह) म्हणून प्रसिद्ध आहे. या आलेखानुसार, जगातील कर्ब संहती (कॉन्सन्ट्रेशन) वाढतेच आहे. १९५९ साली जगातील कर्ब संहती ३१७ पार्ट्स पर मिलियन (पीपीएम) एवढी होती. ती  जून २०२० मध्ये ४१४ पीपीएम एवढी झाली असून, या वेगाने ती २१०० साली ५०० पीपीएम होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा कर्बउत्सर्जन शून्यावर नेणं ही तातडीची निकड आहे. असे असूनही हा विषय सध्या जागतिक चर्चेतही नाही. केवळ दोषारोपासाठीच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या. आता तर ती चर्चाही थंडावली आहे. तिकडे कर्बउत्सर्जनाचे प्रताप वाढत आहेत. त्यापायी तीन ध्रुवांची त्रेधातिरपीट उडाली आहे.

काठमांडू येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर द इंटिग्रेटेड माऊंटन डेव्हलपमेंट’च्या दोनशे वैज्ञानिकांनी यासंबंधात अभ्यास केला व त्याची दीडशे तज्ज्ञांनी तटस्थ चिकित्सा केली. ‘जगाने कर्बउत्सर्जन रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि तापमानवाढ १.५0 सेल्सियसवरच रोखली तर सन २१०० पर्यंत हिमालय पर्वतरांगांवरील ३६ टक्के  बर्फ नाहीसा होईल. कर्बउत्सर्जन असंच सुरू राहिलं तर २१०० साली सुमारे ६६ टक्के  हिमालय रांगा बर्फमुक्त होतील.’ या संस्थेचे वैज्ञानिक फिलिप्स वेस्टर म्हणतात, ‘३,५०० कि. मी. लांबीच्या हिमालय व हिंदुकुश पर्वतरांगांकडे जगाचं दुर्लक्ष झालं आहे.’ हिंदुकुश पर्वतरांगा या नेपाळ, भारत, बांगलादेश, भूतान, म्यानमार, चीन, अफगाणिस्तान व पाकिस्तानपर्यंत पसरल्या आहेत. जगातील प्रमुख दहा नद्या- अमु दर्या, ब्रह्मपुत्रा, गंगा, सिंधू, इरावती, मेकाँग, साल्विन, यांग्त्झे, तारिम आणि पीत यांचा उगम हिमालयातूनच होतो. ताज्या पाण्याचा सदैव साठा करणाऱ्या ५४,२५२ हिमनद्या इथूनच निघतात. हिमालयामुळे अन्न व ऊर्जा मिळू शकणाऱ्या लोकांची संख्या ३०० कोटी (निम्मे जग) आहे, तर सुमारे १६५ कोटी लोकांची गुजराण हिमालयावर अवलंबून आहे. ‘तिसरा ध्रुव’ हे हिमालयाचं नामाभिधान आहे ते यामुळेच!  हिमनदी म्हणजे गोठलेल्या पाण्याचं अमोघ भांडार असतं. हिमनद्यांवर भुसभुशीत व कठीण दोन्ही प्रकारचे बर्फ असतात. नवा बर्फ साचत जातो, काही वितळतो. तरीही किमान ३० मीटर जाडीचा बर्फ शिल्लक राहतोच. त्यामुळे हिमनदी कधीही आटत नाही. भूवैज्ञानिक अँडय़्रु कॅब यांनी ‘हिमालयाच्या इतर भागांपेक्षा काश्मीर परिसरात हिमनद्यांच्या वितळण्याचं प्रमाण जास्त आहे. हिमनद्या दरवर्षी २ ते २.५ फुटाने आक्रसत आहेत,’ असं ‘नेचर’ साप्ताहिकात म्हटलं आहे.

२०१४ साली ‘इंटर गव्हर्नमेंटल नॅशनल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’च्या अहवालानेही असाच इशारा दिला होता. त्यात त्यांनी १९५० पासूनच्या हवामान नोंदी तपासल्यास दक्षिण आशियाई देशांमध्ये हवामानबदलाच्या चरमतेचे प्रमाण व वारंवारिता वाढत असल्याचे स्पष्ट पुरावे दिले आहेत. येत्या दोन दशकांत उष्णतेच्या लाटा वाढत जातील, पाऊसमानात फरक पडत जाईल, अवर्षण, अतिवृष्टी, वादळ व महापुराच्या आपत्तींची वारंवारिता वाढेल, ऐन उन्हाळ्यात पिण्याचं व शेतीसाठी पाणी उपलब्ध होणं कठीण होईल, या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या जलविद्युत प्रकल्पांना पाण्याचा तुटवडा भासेल, २०५० पर्यंत हिमालयातून निघणाऱ्या सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्या बारमाहीऐवजी हंगामी होत जातील, अनेक झरे आटत जातील, भूजल पातळी खालावत जाईल असं त्यात म्हटलं आहे. याचाच सध्या अनुभव येत आहे. दुसरीकडे भूकंपप्रवण हिमालयात भविष्यामध्ये ९ रिश्टरच्या भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. तसं झाल्यास दरडी कोसळतील. सरोवरे फुटतील. नद्यांना महापूर येतील. ‘हिमालयीन त्सुनामी’च्या महाभयंकर आपत्तीने अवघा दक्षिण आशिया मेटाकुटीला येईल.

जगातील इतर भागांपेक्षा दक्षिण ध्रुवावरील (अंटाक्र्टिका) तापमान तिपटीनं वाढत आहे. १९८९ ते २०१८ या काळात ते १.८0 सेल्सियसनं वाढलं. २०१० साली अंटाक्र्टिकावर भलीमोठी भेग आढळली होती. तेव्हा वैज्ञानिकांनी ‘विशाल हिमनग विलग होण्याची प्रक्रिया सुरू आहे,’ असा इशारा दिला होता. जुलै २०१७ मध्ये जगातील चौथ्या क्रमांकाचा हिमखंड (अ-६८ असं त्याचं नामकरण केलं गेलं.) दक्षिण ध्रुवापासून विलग झाला. २२०० चौरस कि. मी. आकाराच्या व एक लाख कोटी टन वजनाच्या या महाकाय हिमखंडाच्या विलगीकरणाने जग हादरून गेलं. गेल्या तीन वर्षांत या हिमनगाने १,००० कि. मी. प्रवास केला आहे असं वैज्ञानिकांच्या निदर्शनास आलं आहे.

अंटाक्र्टिकचं क्षेत्रफळ एक कोटी ४० लाख चौ. कि. मी. (तुलनेसाठी भारताचं क्षेत्रफळ-३२ लाख ८७ हजार चौ. कि. मी. आहे.) असून त्यावरील बर्फाची जाडी १.९ कि. मी. एवढी आहे. जगातील एकंदर बर्फापैकी ९० टक्के  बर्फ आणि जगातील उपलब्ध शुद्ध पाण्यापैकी ७० टक्के पाण्याचा साठा हा अंटाक्र्टिकवर आहे. तेथील सरासरी तापमान उन्हाळ्यात १७0, तर हिवाळ्यात उणे ५६0 सेल्सियस इतकं असतं. सर्वात नीचांकी तापमान उणे ९९0 सेल्सियसपर्यंत जातं. १९७० पासूनच वैज्ञानिक अंटाक्र्टिकावरील बर्फाच्या वितळण्याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत. २०१७ मध्ये ‘यू. एस. नॅशनल स्नोअँड आईस सेंटर’ने अंटाक्र्टिकच्या बर्फाचं क्षेत्रफळ २२ लक्ष ५० हजार चौ. कि. मी. झाल्याची नोंद केली होती. पण त्याकडे जगाचं लक्ष गेलं नाही. अंटाक्र्टिकवरील संपूर्ण बर्फ वितळून गेला तर जगातील समुद्राच्या पाण्याच्या पातळीत ६१ मीटरने (२०१ फूट) वाढ होऊ शकते.

जगातील एकंदर बर्फापैकी आठ टक्के  बर्फ हा उत्तर ध्रुवावर (आर्टिक्ट) आहे. सैबेरियात यंदा तापमानाचा पारा ३८0 सेल्सियसवर गेला. तेथे कायम गोठलेला बर्फही आता ढासळू लागला आहे. ही लक्षणं भयावह आहेत. आर्टिक्टवरील तापमानवाढदेखील जगापेक्षा तिप्पट असून आजवर तेथील तापमान ५0 सेल्सियसने वाढलं आहे.  कर्बउत्सर्जन न रोखल्यास ते किती वाढेल व त्याचे परिणाम काय होतील याचे अनुमान लावले जात आहे. जागतिक हवामानशास्त्रज्ञ संघटनेच्या ताज्या अहवालात, ‘२०५० पर्यंत उत्तर ध्रुवावर नाममात्रही बर्फ शिल्लक राहणार नाही,’ असं भाकीत केलं गेलं आहे. येथल्या शतकानुशतकांच्या बर्फाखाली वनस्पती व प्राण्यांचे सांगाडे गाडले गेले आहेत. हे बर्फाचे थर वितळून जाताना मिथेन वायू बाहेर पडू शकतो. वैज्ञानिकांना याचा अंदाज २०११ सालीच आला होता. त्याची प्रचीती आर्टिक्टवर २०१८ मध्ये, तर अंटाक्र्टिकवर २०२० जुलैमध्ये आली. मिथेन हा कार्बन डायऑक्साइडच्या मानाने १० ते २० पटीने अधिक घातक आहे. दोन्ही ध्रुवांवरून मिथेनगळती सुरू झाल्यास जगाचं तापमान ३0  सेल्सियसने वाढलं तर २८० गिगॅ टन कार्बन डायऑक्साइड व तीन गिगॅ टन मिथेन सोडला जाईल. तेव्हा मग हवामानबदलाचं काय होईल?

ध्रुव म्हणजे अढळ, स्थिर! मिथ्यकथांपासून विज्ञानापर्यंत सर्वत्र ध्रुवाला हे स्थान लाभलं आहे. आकाशातील ध्रुव तारा आणि पृथ्वीच्या आसाचे उत्तर व दक्षिण हे दोन स्थिरबिंदू म्हणजे शाश्वतता असंच मानलं गेलं आहे. इथून पुढे भौगोलिकदृष्टय़ा ही दोन टोकं भविष्यात जागेवरच राहतील; परंतु त्यांचं स्वरूप मात्र कुरूप होऊन जाईल. त्याचे परिणाम सातही समुद्रांकाठच्या लोकांना भोगावे लागतील. सुमारे १२०० नयनमनोहर प्रवाळ बेटांसाठी प्रसिद्ध असलेल्या मालदीव (लोकसंख्या- चार लाख) या चिमुकल्या बेटावरील सर्वात उंच ठिकाण हे आठ फूट आहे. सपाट असलेल्या बांगलादेशचा (लोकसंख्या- १६ कोटी) बहुतांश भाग हा समुद्रसपाटीपासून २५ ते ३० फूट उंचीवर आहे. समुद्राच्या पाणीपातळीतील वाढ ही अशा अनेक भूभागांना गिळंकृत करणार आहे. जगातील ५२ छोटय़ा बेटांवरील ६.५ कोटी लोकांवर ही टांगती तलवार आहे. १९०० ते १९९० पर्यंत समुद्रपातळीत दरवर्षी १.२ मि. मी.ने वाढ होत होती. तर १९९० नंतर दरवर्षी ३.४ मि. मी.ने ही वाढ होत आहे. गेल्या तीन वर्षांत ही वाढ ४.८ मि. मी.ने झाली आहे. सागरतज्ज्ञांच्या मते, पृथ्वीचं तापमान १0 सेल्सियसने वाढल्यास समुद्रपातळी ७.५ फूट वाढेल. बर्फाच्या वितळण्याचा वेग वाढत गेला तर यापेक्षाही जास्त वाढ होऊ शकते.

भूकंप व हवामानबदलामुळे १७,००० बेटांनी तयार झालेल्या इंडोनेशियाची स्थिती दिवसेंदिवस भयाण होत आहे. गेल्या वर्षी समुद्रपातळीत वाढ, हवेचं प्रदूषण व वाहतूक कोंडी यामुळे इंडोनेशियाच्या राजधानीतील प्रशासकीय कार्यालये जाकार्ताहून जावा बेटावर स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समुद्रपातळीवाढीचा धोका मुंबईलाही आहेच.

‘अपू त्रयी’तील शेवटच्या ‘अपूर संसार’ची अखेर करताना सत्यजित राय यांनी अपू त्याच्या लहानग्या मुलाला खांद्यावर घेऊन शहराकडे (कोलकात्याकडे) जाताना दाखवला होता. पुढे पाहणाऱ्या पुढच्या पिढीस जग अधिक सुंदर दिसावं व त्यांनी तसं ते करावं, यासाठीचं ते आश्वासक पाऊल ठरतं. वर्तमानाने भविष्याला खांद्यावर बसवून भूतकाळ समजावून सांगत  भविष्याचा वेध घ्यायला अशी मदत करायची असते. मागील तीस वर्षांपासून विज्ञान सांगत असलेल्या भविष्याचा विचार करण्यासाठी (वर्तमानातच गुंतून पडलेल्या) धोरणकर्त्यांना अजिबात फुरसत नाही. भूतकाळाशी फारकत घेतलेला वर्तमानकाळ ‘चालू’ असल्यावर पुढच्या पिढय़ांचं भविष्य कसं असेल?

Story img Loader