राहुल बनसोडे

गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरीस कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘चॅटजीपीटी’ हे चॅटबॉट बाजारात आले आणि जगभरात खळबळ माजली. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर विघातक कार्यासाठी होणार नाही याची काळजी घेत ‘चॅटजीपीटी’च्या प्रवर्तकांनी हे तंत्रज्ञान थेट सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले. तंत्रस्नेह्यांमध्ये पुढले काही दिवस प्रश्न-उत्तरमंजूषा सुरू झाली आणि नंतर गूगलयुगाच्या अस्तापासून कला आणि माहिती आधारित नोकऱ्यांवर पडणाऱ्या भविष्यातील कुऱ्हाडीबाबत कुजबुजचर्चा रंगली. माहितीद्वाराचा नवा ‘सिमसिम’ मंत्र असलेले ‘चॅटजीपीटी’ तंत्रज्ञान म्हणजे काय, ते कसे काम करते आणि भविष्यात आपल्या जगण्यावर त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम कसा होईल, हे सांगणारे दोन लेख..

ते १९९५ साल होते. शाहरुख खान काजलसोबत मोहरीच्या शेतात रोमान्स करीत होता, रंगिलाची ऊर्मिला मातोंडकर नवतरुणांना गुलाबी स्वप्ने दाखवीत होती, गॅट करार संपुष्टात येऊन त्याची जागा जागतिक व्यापार संघटनेने घेतली होती, उदारमतवादाचे नवे वारे वाहात होते आणि गल्लोगल्ली कॉम्प्युटरचे क्लासेस सुरू झाले होते. यापूर्वी कॉम्प्युटर लोकांनी सिनेमामध्ये पाहिले होते किंवा तुरळक बँकांमध्ये. तोवर कॉम्प्युटर सायन्स शिकणाऱ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होत होत्या आणि सरकारदफ्तरी संगणकीकरणाचे सावकाश प्रयत्न सुरू झाले होते. कॉम्प्युटर शिकणे ही काळाची गरज आहे हे प्रत्येकाला कळून चुकल्यानंतर लाखो लोक कॉम्प्युटरचे क्लासेस लावीत होते. असा क्लास लावल्यानंतर सुरुवातीच्या दिवसात संगणकावर बसल्यावर लोक त्याला इंग्रजीत प्रश्न विचारू पाहात. समोर दिसणाऱ्या सी अथवा ए प्रॉम्प्टवर लोक ते प्रश्न टाइप करीत. उत्तर येई ‘बॅड कमांड ऑर फाइल नेम.’ ते कॉम्प्युटरला सांगत ‘टाइप एनी मॅथ्स इक्वेशन’ उत्तर येई ‘बॅड कमांड ऑर फाइल नेम.’ ते म्हणत ‘व्हॉट इज वन प्लस वन’, उत्तर येई ‘बॅड कमांड ऑर फाइल नेम.’ मग कॉम्प्युटर क्लासचा शिक्षक यायचा आणि सांगायचा की इथे असेच काहीबाही टाइप करून चालत नाही, संगणकाची स्वत:ची अशी भाषा असते आणि ती वापरण्याचे स्वत:चे असे नियम असतात. हे मान्य केल्यानंतर लोक ‘एम-एस डॉस’ ही ऑपरेटिंग सिस्टम वापरायचे शिकून घेत आणि हे प्रारंभीचे शिक्षण झाल्यानंतर विंडोज आदी प्रणाली शिकत.

पुढे साधारण दशकभर माणसे संगणकाला अनुकूल होण्यासाठी स्वत:च्या विचारपद्धतीत आणि कामाच्या पद्धतीतही बदल करीत होते. त्यानंतर आले दोन हजार पाच. शाहरुख खान आता प्रिटी झिंटासोबत मोहरीच्या शेतात नाचत होता, जग वल्र्ड ट्रेड सेंटरच्या त्रासदीतून सावरले होते, गुलाबी स्वप्नांची राणी आता प्रियांका चोप्रा होती आणि ट्रायने आंतराष्ट्रीय बँडविड्थच्या किमती ७०% हून अधिक कमी केल्या होत्या. घरगुती इंटरनेट वापराचे दर वेगाने खाली येत होते आणि कामाच्या ठिकाणी अनेकांना इंटरनेट सहज उपलब्ध होते. ‘एमएस डॉस’सारखी प्रणाली आता कालबा होऊन लोक थेट ‘विंडोज’ शिकत होते आणि त्यातही इंटरनेटचे ट्रेनिंग घेण्याऱ्यांची संख्या वाढली होती. या इंटरनेटच्या प्रारंभिक शिक्षणात येई ते ‘सर्च इंजिन’. एव्हाना या क्षेत्रातली ‘याहू’ व ‘एमएसएन’ची ओळख मागे पडून आणि संपून तिथे नव्या कंपनीचा उदय झाला होता- जिचे नाव होते गूगल. इंटरनेट जोडलेल्या कुठल्याही संगणकाच्या ब्राउझरमध्ये लोक गूगल हे सर्च इंजिन उघडत आणि त्यात आपले प्रश्न टंकून पाहत. जगातील सगळय़ात उंच इमारत कोणती आहे? टायटॅनिक पिक्चरची हिरोईन खऱ्या आयुष्यात कशी दिसते? साखर बनविताना खरेच गायीच्या हाडाचा चुरा वापरला जातो का? विदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर काय करावे लागते? लोकांचे प्रश्न अनेक होते आणि हे सर्व प्रश्न ते गूगलच्या सर्च बॉक्समध्ये टाइप करीत. मग गूगल आपल्या डेटाबेसमध्ये असलेल्या बेबसाइट्समध्ये ही माहिती शोधून लोकांसमोर त्याची यादी ठेवी. ही यादी नानाविध ‘साइट्स’ची असली तरी त्यातल्या पहिल्या व दुसऱ्या साइटवरच हवी ती माहिती सहजच मिळून जाई. विशिष्ट प्रश्नांसाठी अधिकाधिक लोक एकाच प्रकारच्या साइट्स क्लिक करीत असल्यास  मग गूगल आपसूकच अशा साइट्सला आधी दाखवीत असे. गूगलच्या संगणकातले अल्गोरिदम आता माणसांशी अनुकूल होण्यासाठी स्वत:च्या गणितीय समीकरणात आणि कामाच्या पद्धतीतही बदल करीत होते.

पुढे बऱ्याच गोष्टी झाल्या. संगणकाची क्षमता आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग वाढत राहिला आणि साधारण दीड वर्षांत दुप्पट प्रगती करीत करीत १५ वर्षांत संगणकांची क्षमता दहापट वाढली, त्याचा आकार लहान होत होत त्यातून स्मार्टफोन जन्माला आले आणि या स्मार्टफोनचा वापर आत्मसात करताना फोनही त्याच्या वापरकर्त्यांना आत्मसात करू लागला. कृत्रिम प्रज्ञा किंवा आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून फोन आणि संगणकाच्या वापरकर्त्यांची विस्तृत माहिती, स्वभावविशेषणे आणि वर्तणुकींचे निरनिराळे आकृतिबंध इंटरनेट कंपन्यांकडे जमू लागले. माणसाच्या एकूण इंटरनेट वापरातला मोठा वेळ ‘गूगल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फेसबुक’ आणि ‘अ‍ॅपल’ या  केवळ चार कंपन्यांची सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर वापरण्यात जाऊ लागला. या चौघांच्या एकत्रित एकाधिकारशाहीतून मग निरनिराळय़ा कंपन्यांची असंख्य उत्पादने विकली गेली, देशोदेशीच्या निवडणुका प्रभावित करण्यात आल्या, वापरकर्त्यांच्या दैनंदिन सवयींवर थेट कब्जा मिळविण्यात आला आणि नफ्यातून मिळणाऱ्या पैशांपेक्षा वापरकर्त्यांचा डेटा ताब्यात असण्याला जास्त महत्त्व प्राप्त झाले. एका तऱ्हेने आपल्या सेवांचे वापरकर्ते हेच त्या कंपन्यांचे उत्पादन बनून गेले.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर कमाविले असले तरी त्यांच्या अंतिम वापरकर्त्यांसाठी हे तंत्रज्ञान थेट स्वरूपात कधीच उपलब्ध नव्हते, त्याची या कंपन्यांना काही गरजही वाटत नव्हती. अगदी दोन हजार बावीस उजाडेपर्यंत तर परिस्थिती बदलली नव्हती. मग आला नोव्हेंबर महिना. लोक श्रीवल्लीच्या गाण्यावर लटके लंगडत रिल्स बनवत होते, रशियाने युक्रेनवर लादलेले युद्ध किचकट होत होते, जागतिक व्यापार संघटनेच्या कह्यत न येता राष्ट्रे इतर राष्ट्रांशी थेट व्यापार करार करीत होते आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये दादा समजल्या जाणाऱ्या कंपन्यांमध्ये कामगार कपातीचे नवे सत्र सुरू झाले होते. अशातच ३० नोव्हेंबर रोजी वापरकर्त्यांना थेट प्रश्न विचारून उत्तर मिळविता येईल अशी नवी प्रणाली बाजारात आली जिचे नाव होते चॅटजीपीटी. तोवर माध्यमांतून, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजे काय? ते साधारण कसे काम करते, त्याचे संभाव्य फायदे-तोटे याविषयी बऱ्याच उलटसुलट चर्चा झाल्या होत्या, पण हे तंत्रज्ञान थेट सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचलेले नव्हते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर विघातक कार्यासाठी होणार नाही याची काळजी घेत चॅटजीपीटीच्या प्रवर्तकांनी हे तंत्रज्ञान थेट सामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिले. लोक चॅटजीपीटीला काय हवे ते प्रश्न विचारू शकत होते आणि चॅटजीपीटी आपल्याला शिकविलेल्या ट्रेनिंग मॉडेल्सच्या आधारे त्याची उत्तरे देत होते. १९९५ साली पहिल्यांदाच संगणक हाताळताना असलेले मूलभूत मानवी कुतूहल इथेही तसेच होते पण या वेळेस संगणक ‘बॅड कमांड ऑर फाइल नेम’असे न म्हणता विचारलेल्या हरेक प्रश्नाला उत्तर देत होता. गंमत म्हणजे या प्रश्नांनाही प्रॉम्प्ट अशीच संज्ञा वापरली गेली. लोकांनी कुतूहलातून चॅटजीपीटीला विचारलेले प्रश्न गमतीचे होते. प्रेम म्हणजे काय? विश्वात किती ग्रह-तारे आहेत? मंगळावर मानववस्ती वसवायची असेल तर काय करावे लागेल? देव आहे किंवा नाही? कुठला धर्म अधिक चांगला आहे? ‘अबक’ धर्माच्या प्रेषितांवर जोक सांग, पिठलं भाकरी ही महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे का? चहा आणि कॉफी एकत्र करून प्यायल्यास त्यामुळे कुठले धोके संभवतात? असे अनेक कुतूहलजन्य प्रश्न लोकांकडे होते- ज्यावर आधीच्या सर्च इंजिन प्रणाली थेट उत्तर देण्यास अक्षम होत्या. या सर्व प्रश्नांची सरळसाधी उत्तरे चॅटजीपीटीनेही दिलीच असे नाही. याशिवाय सुरुवातीच्या काळात चॅटजीपीटीचा वापर चांगली माहिती मिळविण्यापेक्षा त्याला काहीतरी गमतीशीर किंवा उत्तर देताच येणार नाही, असे अवघड प्रश्न बहुसंख्येने लोक विचारीत होते.

मग दोन हजार बावीसही सरले. चॅटजीपीटीच्या वापरकर्त्यांची संख्या वाढू लागली, प्रतीक्षायादीत असणाऱ्या अनेकांना त्याचा अ‍ॅक्सेस मिळू लागला आणि लोक त्याविषयी अधिकाधिक गॉसिप करू लागले. ‘मी चॅटजीपीटीला हे विचारले आणि त्याने असे असे उत्तर दिले’ असे लोक त्याचे ‘स्क्रीनशॉट’ टाकीत सांगू लागले.  चॅटजीपीटी इतकी सरस प्रणाली बाजारात आणण्यास गूगल व फेसबुक यांना उशीर झाला आणि समांतर काळात त्यांनी मोठी कामगार कपातही केली. या कामगार कपातीची साधकबाधक कारणे दोन्ही कंपन्यांनी दिली असली तरी ती विश्वासार्ह म्हणता येतील अशी नाही. येऊ घातलेला काळ हा आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सभोवती विणलेल्या विविध उत्पादनांचा आहे आणि ते बनविण्यासाठी हे कामगार (अभियंते) उपयोगाचे असणार नाहीत, अशा निष्कर्षांप्रत या कंपन्या आल्या असाव्यात, याशिवाय कुणाला कामावर ठेवायचे आणि कुणाला काढायचे हा निर्णय घेतानाही या कंपन्यांनी आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सची मदत घेतलीच नसेल कशावरून? ‘एआय’ ही जर आगामी क्रांती असेल तर क्रांती सर्वप्रथम आपलीच पिले खाते ही उक्ती इथे बरोबर लागू पडते. अर्थात कामावरून कमी केल्यानंतर गूगलसारख्या कंपनीने देऊ केलेला निर्वाहनिधी, सोयीसुविधा, स्टॉक्स हे इतके आकर्षक आहेत की बाहेर काढलेल्यांपैकी अनेकांनी कंपन्यांचे आभारच मानले.

मग आला मार्च महिना. वर्ष बदलले होते, शाहरुख खान आता समुद्रकिनारी दीपिका पडुकोणसोबत रोमान्स करीत होता, उर्फी जावेद प्रसिद्ध मादक ललना बनली होती, युक्रेन युद्धासाठी पुतिन साहेबांना दोषी ठरविले म्हणून ते थेट न्यायाधीशांवरच क्षेपणास्त्र डागण्याच्या धमक्या देत होते आणि सिलिकॉन व्हॅली बँकेसोबत इतर अनेक बँका बुडत होत्या. इथपर्यंत येईस्तोवर चॅटजीपीटी वारंवार अनुपलब्ध व्हायचे. वेळ कमी मिळायला लागला तसे लोकांनी चॅटजीपीटीला निरर्थक प्रश्न विचारायचे सोडून कामाच्या गोष्टी विचारायला सुरुवात केली. आपल्याला आधीच माहीत असलेल्या विषयांमधली अधिक माहिती आणि उपयुक्त ठरतील अशा कितीतरी गोष्टी लोकांनी चॅटजीपीटीला विचारल्या. एकच एक भस्सकन् प्रश्न विचारण्यापेक्षा लोक प्रश्नांचे उपप्रश्न बनवून चॅटजीपीटीशी संवाद साधू लागले. एकाच प्रश्नाचे एकच उत्तर सोडून बहुआयामी संवादाच्या मार्गाने मग चॅटजीपीटीची उपयुक्तता लोकांना लक्षात यायला लागली. चॅटजीपीटीचा वापर अवघड प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी होतो त्यामुळे शिक्षणक्षेत्रात हे टूल प्रचंड उपयोगाचे ठरू शकते, पण कुठलाही अभ्यास न करता गृहपाठ आणि असाइनमेंटसाठी त्याचा गैरवापरही सुरू झाला. चॅटजीपीटीमुळे काही प्रकारच्या प्रोग्रामिंगचे कामही सोपे झाले, पण ते टीमवर्कशी जोडून घेता आले नाही. चॅटजीपीटीमुळे सोशल मीडियात मार्केटिंग करणाऱ्यांचे काम सोपे झाले, पण त्याला म्हणावा असा प्रतिसाद आला नाही. अजूनही केवळ चॅटजीपीटीमुळे कुणाची थेट नोकरी गेलेली नाही, चॅटजीपीटीच्या प्रवर्तकांची तशी इच्छाही नाही; पण हे असे होणारच नाही याची शाश्वती त्यांनाही नाही. पण आता गोष्ट फक्त चॅटजीपीटीची नाही, एआयच्या क्षेत्रात त्यासोबत वेगळी उद्दिष्टे असणारी आणखी काही महत्त्वाच्या प्रणाली जगात आपला जम बसवीत आहेत. फक्त शब्दांनी सूचना देऊन चित्रे आणि ग्राफिक्स बनविणारे एक टूल मिडजर्नी सध्या दृश्यकलेत आणि दृश्यमाध्यमात धुमाकूळ घालीत आहेत, चॅटजीपीटीची मातृसंस्था ओपन एआयचे दुसरे अपत्य डॅल-ईसुद्धा दृश्यमाध्यमात वेगाने प्रगती करीत आहे, गेल्या आठवडय़ात गूगल वर्कस्पेसमध्ये आलेल्या एआय क्षमतांमुळे ऑफिसच्या ज्या कामांसाठी काही तास लागत ते आता मिनिटात होऊ लागले आहे. हा लेख लिहिला जात असतानाच चॅटजीपीटीला टक्कर देऊ शकेल असे गूगलचे बहुचर्चित गूगल बार्ड बाजारात आले आहे. ज्या सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रात भारतीयांचा बोलबाला आहे तिथे गिटहब या मायक्रोसॉफ्टच्या उपकंपनीने को-पायलट एआय तंत्रज्ञान आणले आहे जे नेमक्या आज्ञावलीनंतर तुम्हाला हवा तसा सॉफ्टवेअर कोड लिहून देते वा तुम्ही कोडिंग करीत असताना अर्ध्यापेक्षा जास्त कोड आपोआप लिहून देते.

एआय हे नुसतेच काम सोपे करीत नसून, माणसाच्या कार्यक्षमतेचे पुन:संशोधन करीत आहे. यामुळे काही कामे करणे आधीपेक्षा खूप सोपे होणार, काही कामे ही वेगाने पूर्ण होणार आणि काही कामांसाठी आधीपेक्षा कमी माणसे लागणार. मग इथे एक कळीचा प्रश्न उभा राहतो तो असा की यामुळे नोकऱ्या कमी होतील का? तर त्याचे उत्तर आता आधीपेक्षा थोडे अधिक स्पष्ट झाले आहे. लोकांचे जॉब एआयमुळे जाणार नसून, कुठल्याही कार्यालयात वा कंपनीत निर्णय घेण्याचे अधिकार असलेल्या लोकांमुळे जाणार आहेत. हे लोक कुणाला कामावरून कमी करण्याचा निर्णय कसा घेतील,  हा प्रश्न विविध कार्यक्षेत्रांनुसार, तिथल्या कामांच्या पद्धतीनुसार आणि मनुष्यबळाच्या गरजेनुसार बदलत जाणार आहे. भांडवली ‘विकास’ वेगाने घडवून आणणाऱ्या देशांमध्ये नोकर कपातीचे कायदे अधिकाधिक व्यापारस्नेही आहेत, त्यामुळे ज्याक्षणी दोन माणसांचे काम एकाच माणसाकडून करून घेता येईल, आठ तासांचे काम दोन तासांतच होऊ लागेल. एआयचा वापर करून एखादा ज्युनिअर आपल्या सीनिअरपेक्षा जास्त चांगले काम करू शकेल तेव्हा हळूहळू या नोकऱ्या जायला सुरुवात होईल. याशिवाय आपल्या कंपनीशी विशेष घेणेदेणे न ठेवता फक्त आपले काम करून जागा अडवून ठेवणाऱ्यांच्या, आपले काम दुसऱ्या कुणाला येत नसल्याने ऑफिसमध्ये गुलुगुलु करीत टाइमपास करूनही नोकऱ्या टिकवून ठेवणाऱ्यांच्या आणि दहा मिनिटांचे काम दिवसभर करून पाटय़ा टाकणाऱ्यांच्या नोकऱ्या आता विशेषत: धोक्यात येतील. त्यासाठी अर्थात त्यांच्या पगाराच्या चेकवर सही करणाऱ्यांना चॅटजीपीटी शिकून घेऊन त्यात विशेष प्रावीण्य मिळवावे लागेल. ‘एआय’मुळे जशा नोकऱ्या जातील तशा नव्या नोकऱ्याही निर्माण होणार आहेत. त्या नेमक्या कशा असतील याबद्दल लगेच काही सांगता येत नसले तरी एक नवा ‘जॉब’ निश्चित तयार होणार आहे. गेल्या दोन दशकांत सुरक्षित सरकारी नोकरी आणि भरपूर पगार असणाऱ्या काही अधिकाऱ्यांना आपले काम नीट येत असूनही फक्त संगणक हाताळता येत नव्हता. प्रयत्न करूनही त्यांना हे जमेना तेव्हा अनेक सरकारी ऑफिसमध्ये माफक पगारावर ‘कॉम्प्युटर ऑपरेटर’ नेमण्यात आले. या कॉम्प्युटर ऑपरेटर्सचे मुख्य काम होते ते संगणक हाताळता न येणाऱ्या मोठमोठय़ा अधिकाऱ्यांची कामे बिनबोभाट पार पाडून देणे.

ज्या देशांमध्ये फक्त राजकारणातच नाही तर उद्योगक्षेत्रात, निर्माणकार्यात, कार्यालयात जिथे जिथे म्हणून सरंजामशाहीचे संकेत पाळले जातात तिथे तिथे कॉम्प्युटर ऑपरेटरसारखेच ‘एआय ऑपरेटर’ तैनात होतील. या परिस्थितीत आहे त्या नोकऱ्या आणि तिथले पगार तसेच राहून कष्टाची कामे ‘एआय’ ऑपरेटरला आणि पर्यायाने ‘एआय’ला करावी लागतील. हा अर्थातच माणसाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर मिळविलेला विजय असेल, पण तो फार काळ साजरा करता येणार नाही. वर्ष संपेस्तोवर ‘एआय’च्या मदतीने शाहरुख खान मधुबालेसोबत रोमान्स करताना दिसेल, लोक मुळात जैविक अस्तित्व नसणाऱ्या पण ‘एआय’च्या मदतीने बनविलेल्या सुंदर तसबिरींच्या प्रेमात पडलेले असतील, आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये प्रगती साधणारे देश इतर गरीब देशांवर दादागिरी करीत असतील आणि गल्लोगल्ली चॅटजीपीटीचे क्लासेस सुरू झालेले असतील.

rahulbaba@gmail.com

(लेखक मानववंशशास्त्र आणि तंत्रज्ञानाचे अभ्यासक आहेत.)