रघुनंदन गोखले
चेन्नईला झालेलं ऑलिम्पियाड म्हणजे सर्व प्रकारच्या खेळाडूंची जत्राच होती. कार्लसनसारख्या महान खेळाडूच्या खांद्याला खांदा लावून पहिल्यांदाच परदेशी जाणारे आफ्रिकन नवखे खेळाडूही होते. शेकडो खेळाडूंची मांदियाळी म्हणजे ऑलिम्पियाड! तिथे सगळे अव्वल खेळाडू एकमेकांशी खेळतील असंही नाही; परंतु टेक महेन्द्र नावाच्या भारतीय कंपनीनं अचानक बुद्धिबळाचा जंगी महोत्सव जाहीर करून डोळे दिपवणारा कार्यक्रम केला, त्याचं नाव ‘ग्लोबल चेस लीग’. दुबईत २१ जूनपासून सुरू होणारा ‘ग्लोबल चेस लीग’ हा महोत्सव म्हणजे बुद्धिबळातील सर्व प्रकारच्या जगज्जेत्यांना एकत्र बघण्याचा सोहळाच आहे. कार्लसन, आनंद, हू यीफान, डिंग लिरेन यांसारखे महान खेळाडू वेगवेगळय़ा संघांत असतील. त्यांच्या जोडीला उत्तमोत्तम महिला- पुरुष ग्रॅण्डमास्टर्स, तरुण युवक खेळाडू असतील. या सोहळय़ात जगभरातून इंटरनेटच्या माध्यमातून रसिकांना अतिशय अव्वल दर्जाचा खेळ बघायला मिळण्याची खात्रीच आहे.
स्पर्धेचं स्वरूप मोठं गमतीशीर आहे, पण सगळय़ा घटकांना न्याय देणारंही आहे. प्रत्येक संघात तीन पुरुष, दोन महिला आणि एक ज्युनियर खेळाडू असेल. हे सर्व ६ संघ आपल्या प्रतिस्पध्र्याशी दोन-दोन वेळा लढतील आणि त्यामधून जे पहिले दोन संघ निवडले जातील, ते अखेरच्या दिवशी अंतिम सामना खेळतील. रोज फक्त एकच फेरी आणि तीही भारतीय वेळेनुसार संध्याकाळी असल्यामुळे शाळा-कॉलेजमधून परत आलेले विद्यार्थी, कार्यालयातून घरी परतलेले रसिक असे सर्व जण तास-दीड तास या अव्वल दर्जाच्या लढतीचा आनंद घेऊ शकतील.
या विविध संघांचं स्वरूप कसं असेल? या सहा संघांत प्रत्येकी एक एक महान खेळाडू कर्णधार असेल. कोण आहेत हे महान खेळाडू? मॅग्नस कार्लसन, विश्वनाथन आनंद, गेल्या वर्षीच्या सुपरब्रेट जलदगती आणि विद्युतगती स्पर्धेचा विजेता इयान क्रिस्तोफ डुडा, २०२१ चा विद्युतगती स्पर्धेचा जगज्जेता मॅक्सिम वाचिर लाग्रेव्ह, जगज्जेता डिंग लिरेन आणि उपविजेता इयान नेपोमानेची हे ते खास खेळाडू आहेत. अनेक भारतीय तरुण खेळाडूंना या महोत्सवात संधी मिळालेली आहे. अनुभवी कोनेरू हंपी आणि द्रोणावली हरिका या दोन महिलांना आपल्या प्रतिभेचं प्रदर्शन करण्याची ही उत्तम संधी आहे.
या सगळय़ा महोत्सवात भारतीयांचा सहभाग कसा असेल ते पाहू. पाच वेळा जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद ‘गंगा ग्रॅण्डमास्टर्स’ या संघाचा आघाडीचा खेळाडू असेल. त्याच्या संघात हू यीफान ही जागतिक महिलांमधील नंबर एकची खेळाडू आहे, रिचर्ड रॉपोर्टसारखा कोणालाही कधीही हरवू शकेल अशा धडाडीनं खेळणारा खेळाडू आहे. गेल्या वेळेस अशी ऑनलाइन सुपर लीग आपल्या काही यू्टय़ुबवरच्या विनोदवीरांनी एकत्र येऊन घेतली होती. त्यामध्ये डिंग लिरेनच्या संघानं पहिलं बक्षीस मिळवलं होतं. त्या वेळी डिंगला अभिजित गुप्ता आणि भक्ती कुलकर्णी या अर्जुनवीरांची साथ होती. या वेळी मात्र डिंगच्या ‘त्रिवेणी किंग्स’ संघात एकही भारतीय खेळाडू नाही; पण त्याचे दोन देशबांधव यू यांगयी आणि वाई यी त्याच्या सोबत आहेत.
‘चिंगारी गल्फ टायटन्स’ या संघात जवळजवळ तुल्यबळ असलेले इयान क्रिस्तोफ डुडा, मामेडरोव्ह आणि डॉनील डुबाव असे धडाडीचे खेळाडू आहेत. डुबावच्या तयारीला साक्षात कार्लसन वचकून असतो असे म्हणतात. निहाल सरीनवर डुबावनं गेल्या जागतिक जलदगती सामन्यात अवघ्या १८ चालींत केलेली मात- तीपण वजिराचा बळी देऊन- सर्व रसिकांना आठवत असेल. या वेळी निहाल डुडा आणि डुबाव यांच्या संघात आहे.
‘यू मुंबा मास्टर्स’ या मॅक्सिम वाचिर लाग्रेव्हच्या संघात महाराष्ट्राचा आघाडीचा खेळाडू विदित गुजराथी आहे. नुकताच रशियन पीटर स्विडलरला पराभूत केलेलं असल्यामुळे विदित चांगला फॉर्मात आहे. त्यांच्या संघात हंपी आणि हरिका या दोघी भारताच्या सर्वोत्कृष्ट महिलांची जोडी आहे. नायजेल शॉर्टला आपल्या घरच्या मैदानावर पाणी पाजणारा नागपूरचा रौनक साधवानी बालन ‘अलास्कान नाइट्स’ या इयान नेपोमानेचीच्या संघात आहे. रौनक आपल्या खेळात झपाटय़ानं प्रगती करत आहे आणि त्यामुळे तो या स्पर्धेचा डार्क हॉर्स ठरू शकतो. परंतु साऱ्या रसिकांचे लक्ष असेल ते मॅग्नस कार्लसनच्या ‘एसजी अल्पाइन वॉरियर्स’ या संघाकडे! सर्व प्रकारच्या बुद्धिबळाच्या प्रकारात अनेक वेळा जगज्जेता राहिलेल्या मॅग्नस कार्लसनच्या बलाढय़ संघात त्याच्या मदतीला आहेत गुकेश, अर्जुन इरिगेसी आणि प्रज्ञानंद! सध्या गुकेश आणि अर्जुन एकाहून एक स्पर्धा गाजवत आहेत. अर्थातच मॅग्नस कार्लसनच्या जोडीनं त्याच्या संघात खेळणं या सर्व नवयुवकांच्या भावी वाटचालीसाठी भरपूर फायदेशीर ठरेल.
आता रसिकांच्या मनात एक प्रश्न असेल की, येथे अनिश गिरी, हिकारू नाकामुरा, जागतिक महिला विजेती जू वेनजून हे कसे नाहीत? मंडळी, या सर्व जगविख्यात खेळाडूंचे कार्यक्रम महिनोंमहिने आधी ठरतात. त्यामुळे आयोजकांची इच्छा असली तरी त्या सगळय़ांना एकत्र आणता येत नाही. तरीही एक सांगतो, या स्पर्धेमुळे आपला वेळ छान जाईल आणि बुद्धिबळाच्या विद्यार्थ्यांना खूप काही शिकता येईल.
आता आपण हे सर्व संघ कसे विभागले आहेत ते बघू या –
अ) त्रिवेणी काँटिनेंटल किंग्स
डिंग लिरेन वाई यी
यू यांगयी कटरिना लहानो
नाना डेजग्निडेज जोनास बिर्रे.
ब) एसजी अल्पाइन वॉरियर्स
मॅग्नस कार्लसन डी. गुकेश
अर्जुन एरिगेसी एलिझाबेथ पॉट्झ
इरिना क्रश प्रज्ञानंद
क) गंगा ग्रॉण्डमास्टर्स
विश्वनाथन आनंद रिचर्ड रॉपोर्ट
लेनियर डी पेरेझ हू यीफान
बेला खोटेनाशविली आंद्रे एसीपेन्को
ड) चिंगारी गल्फ टायटन्स
इयान क्रिस्तोफ डुडा
शकरियार मामेडरोव्ह
डॉनील डुबाव अलेक्झांड्रा कोस्टेनुक
पॉलिना शुवालोवा निहाल सरीन
इ) उपग्राड मुंबा मास्टर्स
मॅक्सिम वाचिर लाग्रेव्ह
विदित गुजराथी अलेक्झांडर ग्रीसचुक
कोनेरू हंपी द्रोणावली हरिका
जोवाखीर सिंदारोव्ह
फ) बालन अलास्कान नाइट्स
इयान नेपोमानेची तिमूर राजदाबाव
नोदीरबेक अब्दुसत्तारोव
टॉन झोन्गयी निनो बॉटसॉषविली
रौनक साधवानी
gokhale.chess@gmail.com