आनंद हा अजातशत्रू का आहे याची प्रचिती मला न्यूयॉर्कला आली. आनंद-कास्पारोव्हसाठी एक काचेची खोली बनवण्यात आली होती आणि त्याचं तापमान १८ डिग्री ठेवण्यात येत होतं. नेमकी एके दिवशी ती यंत्रणा बिघडली आणि तापमान २५ डिग्री झालं आणि ते खाली येईना. गॅरी अस्वस्थ झाला आणि त्यानं डाव पुढे ढकलण्यासाठी विनंती केली. जगज्जेतेपदाच्या नियमानुसार दोघे खेळाडू तयार झाले तरच असे काही करता येते. पंचांनी आनंदकडे विचारणा केली आणि आनंदनं अवघ्या १२ चालींत बरोबरी घेऊन कास्पारोव्हचा मान राखला. मला नाही वाटत की, स्वत: गॅरीनं अशी विनंती मान्य केली असती.
सध्या विदित गुजराथी, वैशाली, प्रज्ञानंद यांसारख्या खेळाडूंची नावं गाजत आहेत. भारतीय बुद्धिबळाचा सुवर्णकाळ म्हणता येईल असा हा कालखंड आहे. परंतु या सगळ्याचा पाया कोणी घातला असेल तर त्या महान खेळाडूचं नाव आहे ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद! पाच वेळा जगज्जेता, जगातील महत्त्वाच्या सगळ्या स्पर्धा अनेक वेळा जिंकलेला आनंद कोणत्याही प्रकारच्या वादविवादात कधीही अडकलेला नाही; आणि त्यामुळेच आजही त्याला जगभर मान मिळतो. जागतिक संघटनेनं त्याला उपाध्यक्ष पदाचा सन्मान बहाल केलेला आहे. असा हा भारतीय बुद्धिबळाचा मानबिंदू असलेला आनंद उद्या ५५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. त्याला आपल्या सर्वांतर्फे शतायुषी होण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा!
हेही वाचा – संगीतसंस्कृतीचा उपासक
आनंदला सगळ्यात आधी मी पाहिलं ते चेन्नईमध्ये १९८०-८१ साली इंडियन बँक पुरस्कृत स्पर्धेत! मुख्य स्पर्धेत त्यानं भाग घेतला नव्हता, पण ११-१२ वर्षांचा आनंद एक दिवस संध्याकाळी झालेली जलदगती स्पर्धा खेळण्यास आला होता. मला स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळे या जलदगती स्पर्धेत भाग घेता आला नव्हता, पण स्पर्धा हुकल्याचं दु:ख न होता त्याऐवजी मी देवाचे आभार मानले, कारण समोर चालणारा अप्रतिम खेळ! माझ्या डोळ्याचे पारणे फिटले इतका देदीप्यमान खेळ त्या दिवशी पाहायला मिळाला. एक लहान मुलगा विद्युत वेगानं खेळून मोठ्या मोठ्यांची अक्षरश: धुलाई करतो आहे हे दृश्य मी कधीही विसरू शकणार नाही.
आनंदच्या वडिलांना आनंद ५-६ वर्षांचा असताना भारतीय रेल्वेनं प्रतिनियुक्तीवर फिलिपाइन्समध्ये पाठवलं होतं. श्री. विश्वनाथन हे दक्षिण रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले. गंमत म्हणजे आनंद आपल्या स्वत:विषयी काही माहिती देत नसल्यामुळे (आणि बढाया तर दूरच), कोणालाही त्यांच्याविषयी काही माहिती नव्हती. ग्रँडमास्टर डॅनिअल किंग यानं एकदा लिहिलं होतं की, तो चेन्नईला आला होता त्या वेळी त्याची अपेक्षा आनंदचे वडील रेल्वे इंजिन ड्रायव्हर असावेत अशी होती. पण ज्या वेळी त्याला कळलं की श्री विश्वनाथन यांच्या हाताखाली सुमारे ५०,००० कर्मचारी आहेत, त्यावेळी त्याला धक्का बसला. असो!
योगायोगानं आनंद फिलिपाइन्सला गेला त्या वेळी युजीन टोरेनं नुकताच आशियातील पहिला ग्रँडमास्टर होण्याचा बहुमान मिळवलेला असल्यामुळे बुद्धिबळाचे वारे फिलिपाइन्समध्ये वाहत होते. तेथे दूरचित्रवाणीवरचे बुद्धिबळाचे कार्यक्रम बघून छोट्या आनंदला बुद्धिबळाची गोडी लागली आणि एक इतिहास जन्माला आला. त्यानं आपली पहिली राष्ट्रीय सबज्युनिअर स्पर्धा गोव्यात जिंकली आणि तीदेखील दिमाखात ९ पैकी ९ गुण करून! बघता बघता तो राष्ट्रीय स्तरावरील मोठ्यांच्या खुल्या स्पर्धा जिंकू लागला. जास्त खस्ता न खाता आनंदनं फिलिपाइन्समध्ये जागतिक ज्युनिअर विश्वविजेता आणि लवकरच भारताचा पहिला ग्रँडमास्टर होण्याचा मानही मिळवला. १९८९ साली ग्रँडमास्टर झालेल्या आनंदनं बघता बघता एका रशियन ग्रँडमास्टरला मागे टाकत चक्क कार्पोव आणि कास्पारोव्ह यांसारख्या दिग्गजांना आव्हान देण्यास सुरुवात केली. आनंदनं खऱ्या अर्थानं जागतिक बुद्धिबळाच्या पटलावर आपलं नाव नोंदवलं ते १९८९ च्या नेदरलँडमधील हूगोव्हन या अत्यंत मानाच्या स्पर्धेत! जागतिक ज्युनियर विजेता म्हणून आनंदला बोलावलं होतं, पण १४ पैकी ११ जण त्याच्याहून वरच्या रेटिंगचे ग्रँडमास्टर्स होते. एक भारतीय बच्चा याहून आनंदला कोणी गांभीर्यानं घेत नव्हतं, पण आनंदनं निकोलीच, रिबली आणि सॅक्स यांच्यासह संयुक्त विजेतेपद मिळवलं. मलेशियामध्ये झालेल्या आशियाई सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत तर आनंदनं कमाल केली आणि आपले सर्वच्या सर्व डाव जिंकले. चीनचा बलाढ्या संघ पहिला आला, पण त्यांच्या ‘ग्रँडमास्टर यी’ला पाणी पाजून आनंदनं आपला दरारा निर्माण केला.
अफाट स्मरणशक्ती ही चांगल्या बुद्धिबळपटूसाठी आवश्यक गोष्ट असते. आनंदला तर ते दैवी वरदान आहे. मधे एका खासगी दूरचित्रवाणीनं त्याच्या स्मरणशक्तीची परीक्षा घेण्यासाठी आनंदच्या आयुष्यातील महत्त्वाच्या डावातील १० पोझिशन त्याला दाखवल्या. आनंदनं सर्वांच्या सर्व डाव अचूक ओळखलं आणि वर त्या वेळचे काही किस्सेही सांगितले. पण हाच आनंद इतर संसारी पुरुषांसारखा महत्त्वाच्या गोष्टी विसरतो. एकदा युरोपमधील एका हॉटेलमधील खोलीत असणाऱ्या लॉकरमध्ये त्याची पत्नी अरुणानं पासपोर्ट वगैरे गोष्टी ठेवल्या. आनंदनं तिला पासवर्ड विचारला तर तिनं २७०६ सांगितला. आनंद म्हणाला, ‘‘हा कसला विचित्र नंबर?’’ त्या वेळी अरुणा म्हणाली, ‘‘हा आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे!’’ त्या वेळी सामान्य नवऱ्यांप्रमाणे असामान्य स्मरणशक्तीच्या आनंदचा चेहरा गोरामोरा झाला असणार!
आनंदच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट घडली ती १९९१ साली! फिलिपाइन्स देशात चमकदार खेळ करून जगज्जेतेपदासाठी पात्रता मिळवणारी कामगिरी त्यानं केली. तमिळनाडू बुद्धिबळ संघटनेनं तत्परतेनं त्याची उप-उपांत्य फेरीची लढत चेन्नईमध्ये आयोजित केली. रशियन ग्रँडमास्टर अलेक्सी ड्रिव्हला पराभूत करून आनंदनं उपांत्य फेरी गाठली. आता त्याची गाठ होती ती माजी विश्वविजेत्या अनातोली कार्पोवशी ! बेल्जीयमची राजधानी ब्रुसेल्स येथे कमालीच्या रंगलेल्या या सामन्यात अनुभवी कार्पोवनं निसटता विजय मिळवला, पण समस्त रसिकांची मने मात्र जिंकली होती ती मद्रासच्या वाघानं! आता आनंदचे नाव कार्पोव, कोर्चनॉय आणि कास्पारोव्ह या त्रयीचा आव्हानवीर म्हणून घेतले जाऊ लागले. आणि १९९२ साली आनंदनं या त्रयीला खरा दणका दिला तो इटलीमधील रेग्गीओ एमेलिया या गावी! कोर्चनॉय तेथे नव्हता. पण काही दिवसांपूर्वीच पॅरिसमधील ईमोपार या जलदगती स्पर्धेत आनंदनं त्याचा २-० असा पाडाव केला होता. तरीही इटलीमध्ये कार्पोव आणि कास्पारोव्ह हे दोन आजी-माजी (की अहिरावण आणि महिरावण ?) जगज्जेते होतेच! आनंदनं पहिल्या फेरीत वॅलेरी सालोव्हला पराभूत केलं आणि दुसऱ्या फेरीत त्याची गाठ पडली ती गॅरी कास्पारोव्हशी! आनंदनं कधी नव्हे ते फ्रेंच बचावाची सुरुवात करून गॅरीला गोंधळवून टाकलं. १७ व्या चालीत कास्पारोव्हनं टाकलेल्या सापळ्याला बळी न पडता आनंदनं एक प्यादं मटकावलं आणि त्या नंतर गॅरीला डोकं वर काढायची संधी न देता डाव सफाईनं जिंकला. रशियन वर्चस्वाला एकदा बॉबी फिशरनं पश्चिमेकडून दणका दिला होताच. आता पाळी होती पूर्वेची आणि आनंदच्या समर्थ खांद्यावरची धुरा त्यानं यशस्वीरीत्या पेललीदेखील. भारत सरकारनं ज्या वेळी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची सुरुवात केली, त्यावेळी १९९२ साली समितीनं पहिल्या पुरस्कारासाठी एकमतानं आनंदची निवड केली.
गॅरी कॅस्पारॉव्हनं बंडाचा झेंडा घेऊन समांतर जगज्जेतेपदाची घोषणा केली त्यावेळी आनंदनं दोन्ही जगज्जेतेपदासाठी भाग घेण्याचं ठरवलं. जागतिक संघटनेच्या अधिकृत स्पर्धेत आनंद उपउपांत्य फेरीत भारतात सांघी नगर येथे गॅटा कॅमस्की विरुद्ध आघाडीवर असताना पराभूत झाला, पण त्यानं ताबडतोब कास्पारोव्हच्या जगज्जेतेपदाच्या स्पर्धेत आपली चूक सुधारली आणि गॅटा कॅमस्कीचा पाडाव केला. त्यानंतर रशियन ग्रँडमास्टर ओलेग रोमानिशीनला आनंदनं सहजी पराभूत करून साक्षात गॅरी विरुद्ध खेळण्यासाठी आव्हानवीर होण्याची मजल मारली.
हेही वाचा – दलितांचा आवाज गेला कुठे?
१९९५ चा आनंद- कॅस्पारॉव्ह सामना जगभर गाजला त्याचं कारण गॅरी कास्पारोव्हची व्यावहारिक दृष्टी! सामन्याचं स्थळ होतं अमेरिकेतील न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचा १०५ वा मजला. सामन्याचं उद्घाटन झालं ते ९ सप्टेंबर रोजी! (योगायोगानं त्याच तारखेला २००१ साली अतिरेक्यांच्या हल्ल्यात ही गगनचुंबी इमारत जमीनदोस्त झाली). जगभरातील अनेक देशांनी आपले प्रतिनिधी या सामन्यासाठी पाठवले होते. भारतातील २२ वृत्तपत्रांसाठी मी एका वेळी ‘न्यू यॉर्क’हून स्तंभ लिहीत होतो आणि त्यामुळे मला त्या सामन्यातील चित्तथरारक घटना प्रत्यक्ष अनुभवता आल्या होत्या. दोघेही प्रतिस्पर्धी तुल्यबळ होते आणि आनंदनं पहिले ८ डाव बरोबरीत सुटल्यावर ९ व्या डावात अप्रतिम खेळ करून गॅरी कास्पारोव्हला हादरवलं होतं. आनंदकडे आघाडी आल्यानंतर जगभर त्याचे पडसाद उमटले, कारण जगात सुमारे १९० देशांत बुद्धिबळ खेळले जाते. परंतु गॅरी हा खरा लढवय्या आहे. कार्पोवविरुद्ध विजयश्री खेचून आणण्याचा अनुभव त्याच्या गाठीला होताच. त्या मानानं आनंद अननुभवी होता. कास्पारोव्हनं नंतर विजयाचा धडाका लावला आणि नंतरच्या पाचपैकी चार डाव जिंकून जगज्जेतेपद राखलं. पण आनंदला भरपूर अनुभव गाठीशी बांधता आला. त्याचा पुरेपूर उपयोग आनंदनं नंतर पाच वेळा जगज्जेतेपदे मिळवण्यासाठी कामी लावला.
आनंद हा अजातशत्रू का आहे याची प्रचिती मला न्यूयॉर्कला आली. आनंद-कास्पारोव्हसाठी एक काचेची खोली बनवण्यात आली होती आणि त्याचं तापमान १८ डिग्री ठेवण्यात येत होतं. नेमकी एके दिवशी ती यंत्रणा बिघडली आणि तापमान २५ डिग्री झालं आणि ते खाली येईना. गॅरी अस्वस्थ झाला आणि त्यानं डाव पुढे ढकलण्यासाठी विनंती केली. जगज्जेतेपदाच्या नियमानुसार दोघे खेळाडू तयार झाले तरच असे काही करता येते. पंचांनी आनंदकडे विचारणा केली आणि आनंदनं अवघ्या १२ चालींत बरोबरी घेऊन कास्पारोव्हचा मान राखला. मला नाही वाटत की स्वत: गॅरीनं अशी विनंती मान्य केली असती. चेन्नईमध्ये वाढलेल्या आनंदला खरं तर २५ डिग्रीमध्ये खेळणं कठीण नव्हतं. परंतु त्यानं कास्पारोव्हच्या विनंतीला खिलाडूवृत्तीनं मान दिला. या पूर्वी फुटबॉल स्टेडियमच्या खाली खेळताना आवाजाचा त्रास होतो म्हणणाऱ्या जर्मन ग्रँडमास्टर ह्युबनरला माजी विश्वविजेत्या पेट्रोस्याननं डाव पुढे ढकलण्यास चक्क नकार दिला आणि स्वत:ला कमी ऐकू येत असल्याचा कानातील यंत्र काढून ठेवून फायदा घेतला होता.
पुढच्या लेखात खिलाडू आनंदच्या पाच जगज्जेतेपदाच्या कहाण्या आणि त्याच्याशी अखिलाडूवृत्ती दाखवणारे कार्पोव आणि टोपालोव्ह यांच्या कथा बघू या!
gokhale.chess@gmail.com