रघुनंदन गोखले
गेल्या आठवडय़ात बुद्धिबळातील ‘शोमन’ गॅरी कास्पारोव्ह याचा ६० वा वाढदिवस थाटाने साजरा करण्यात आला. गॅरी जरी आता ज्येष्ठ नागरिक झाला असेल, पण त्याचा खेळ, त्याचा उत्साह नेहमीच तरुण राहील याचा त्याच्या असंख्य चाहत्यांना विश्वास आहे. गेल्या आठवडय़ात आपण गॅरीच्या जगज्जेतेपदापर्यंतची कारकीर्द पाहिली. आज आपण जगज्जेत्या गॅरीच्या उर्वरित बुद्धिबळ राजवटीचे सिंहावलोकन करू या..
गॅरी कास्पारोव्हचे खूप भाषांवर प्रभुत्व आहे. इंग्रजी तर त्याला मातृभाषा रशियनसारखी सहज बोलता येते. त्याचा आव्हानवीर ठरवण्यासाठी नायजेल शॉर्ट आणि अनातोली कार्पोव यांच्यात १९९३ साली सामना होणार होता. त्याचा अंदाज विचारला तर तो त्या सामन्याआधी एका वार्ताहर परिषदेत बोलून गेला होता. ‘‘My next challenger will be Short and our match will be very short!’’ आणि झालेही तसेच! आता आपण त्याच्या पहिल्या जगज्जेतेपदासाठी झालेल्या सामन्यांकडे वळू या.
अपेक्षेप्रमाणे १९८३ साली गॅरी कास्पारोव्हने उपांत्यपूर्व फेरीत अलेक्झांडर बेल्याव्हस्कीचा पराभव केला. त्यानंतर त्याची लढत होती ती गेली अनेक वर्षे अनातोली कार्पोवचा आव्हानवीर राहिलेल्या व्हिक्टर कोर्चनॉयशी. पण त्यामध्ये एक मोठी समस्या उद्भवली होती. कोर्चनॉयविरुद्ध खेळण्यासाठी आपल्याच खेळाडूला अमेरिकेत पाठवायला सोवियत अधिकारी तयार नव्हते. न जाणो कोर्चनॉयच्या सहवासाने हा गरम डोक्याचा तरुण बहकला तर? आणि अमेरिका तयार होतीच शीत युद्धातील एक चकमक जिंकायला! आता कोर्चनॉयला पुढे चाल मिळणार या कल्पनेने संपूर्ण बुद्धिबळ जगतात अस्वस्थता पसरली. पण त्यावेळी ब्रिटिश ग्रँडमास्टर रेमंड कीन पुढे आले आणि त्यांनी लंडनमध्ये हा सामना प्रायोजित केला.
पहिला डाव कास्पारोव्ह हरल्यावर धूर्त कोर्चनॉय आता या अननुभवी गॅरीला सहज गुंडाळेल अशीच सगळय़ांची अटकळ होती. पण एखाद्या जखमी वाघाप्रमाणे गॅरी परत आला आणि एकाहून एक डाव जिंकून त्याने कँडिडेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तिथे त्याला गॅरीच्या जन्माआधी जगज्जेता असणाऱ्या स्मिस्लोवशी लढत द्यायची होती.
वयस्क स्मिस्लोवने तडफेने झुंज दिली, पण अखेर तरुण गॅरीने त्यालाही पराभूत करून अनातोली कार्पोवचा आव्हानवीर बनण्याचा मान मिळवला. आता दोघेही खेळाडू सोवियत संघराज्याचे नागरिक असल्यामुळे सामना मॉस्कोमध्ये होणार यात शंका नव्हती. जो पहिले ६ डाव जिंकेल त्याला जागतिक विजेता म्हणून घोषित करण्यात येणार होते. १०सप्टेंबर १९८४ ला सामना सुरू झाला आणि सुरुवातीलाच कार्पोवने तरुण गॅरीची दाणादाण उडवून दिली. पहिले ९ डाव संपले त्या वेळी जगज्जेत्या अनातोली कार्पोवने ४-० अशी आघाडी घेतली होती. आता आणखी दोन डाव जिंकले की इतिहासातील सर्वात तरुण आव्हानवीर गॅरी कास्पारोव्ह आपला गाशा गुंडाळणार अशी लक्षणे दिसत होती आणि बहुधा सर्वात छोटय़ा सामन्यात!!
इंग्रजी भाषेत एक म्हण आहे Tough times don’ t last but tough people always do! याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की कणखर मनाचे लोक कठीण काळावर नेहमीच मात करतात. एवढय़ा कठीण काळात गॅरीने आपले पाय घट्ट रोवले आणि आपले पहिले लक्ष्य ठेवले ते कार्पोवच्या सहनशक्तीची परीक्षा पाहण्याचे! खंबीर बचाव हे सूत्र ठेवून त्याने लागोपाठ १७ डाव बरोबरीत सोडवले. आतापर्यंतचा सर्वात लांबलेला सामना होता कॅपाब्लांकाविरुद्ध आलेखाइन यांचा. १९२७ साली हा सामना ३४ डाव चालला होता.
२७ वा डाव कार्पोवने जिंकला. आता कार्पोवला फक्त एक विजय हवा होता. ०-५ अशा पिछाडीवर असलेल्या कास्पारोव्हला कडेलोटापासून फक्त चमत्कारच वाचवू शकेल अशी सर्व क्रीडा शौकिनांची धारणा होती. पुन्हा एकदा गॅरीने बरोबरीचा पवित्रा घेतला आणि चार डाव पराभव टाळला. ३२ वा डाव जिंकून गॅरी कास्पारोव्हने जगज्जेतेपदाच्या सामन्यातील आपल्या पहिल्यावहिल्या विजयाची नोंद केली. नंतर तब्बल १४ डाव बरोबरीत सुटले आणि गॅरीने ४७ आणि ४८ वे डाव जिंकून कार्पोवला धक्का दिला. कार्पोवची आघाडी आता ५-३ झाली होती. अशा वेळी नेमके अघटित घडले.
जागतिक संघटनेचे अध्यक्ष फ्लोरेन्सिओ कॉम्पामेन्स यांनी अचानक सामना थांबवला. वाचकांनी जमले तर The KGB plays Chess नावाचे पुस्तक वाचावे. त्यात लेखक आणि स्वत: ग्रँडमास्टर असणारे बोरिस गुल्को आणि व्हिक्टर कोर्चनॉय यांनी असा आरोप केला आहे की कॉम्पामेन्स हे ङॅइ चे हेर होते. कम्युनिस्ट पक्षाची लाज राखण्यासाठी पक्षाचा कडवा समर्थक कार्पोव याला हरू न देणे महत्त्वाचे होते. म्हणून खेळाडूंच्या तब्येतीचे कारण देऊन कॉम्पामेन्स यांनी ५ महिन्यांहून अधिक काळ चाललेला सामनाच रद्द केला आणि नव्या सामन्याची घोषणा केली.
दोन्ही खेळाडूंनी पत्रकार परिषद घेऊन यावर हल्ला केला. कार्पोव म्हणाला की, मला फक्त एकच डाव जिंकायचा उरला होता. तर गॅरीचे म्हणणे होते की त्याला नुकताच सूर गवसला होता. आधीच शरीराने बारीक असणाऱ्या अनातोली कार्पोवचे वजन १० किलोने घटले होते ही वस्तुस्थिती होती. पुढील सामना ठरला ८ महिन्यांनंतर, पण या सामन्यासाठी २४ डावाची मर्यादा होती. जो कोणी १२.५ गुण मिळवेल त्याला जगज्जेता म्हणून घोषित करण्यात येईल असे ठरले. पण १२-१२ वर बरोबरी झाली तर कार्पोव आपला मुकुट कायम राखील अशीही तजवीज होती. कास्पारोव्हने कुरकुर केली, पण अखेर तयार झाला.
अनेक चढउतार पाहून हा सामना २४ व्या डावापर्यंत पोचला त्या वेळेस गॅरी १२-११ असा आघाडीवर होता, पण पांढऱ्या सोंगटय़ांकडून खेळणारा कार्पोव जिंकला तर त्याचे राज्य कायम राहणार होते. गॅरीला फक्त बरोबरी हवी होती. पण त्याने आपला धडाकेबाज खेळ सुरू केला आणि कार्पोववर मात केली. आता गॅरी कास्पारोव्ह हा वयाच्या २२ व्या वर्षी जगाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता झाला होता. ती तारीख होती ९ नोव्हेंबर १९८५!
कास्पारोव्ह – कार्पोव यांच्यात ५ वेळा जगज्जेतेपदासाठी लढती झाल्या आणि त्या चुरशीच्याही झाल्या. पण दर वेळी गॅरी बाजी मारून जायचा! हे दोघे योद्धे किती चुरशीने लढायचे याची कल्पना वाचकांना पुढील आकडेवारीवरून येईल. ५ सामन्यांत ते १४४ डाव खेळले आहेत आणि त्यापैकी कास्पारोव्ह जिंकला आहे २१ तर कार्पोव १९! बाकीचे १०४ डाव बरोबरीत सुटले.
१९८५ साली जगज्जेता झाल्यावर गॅरी सगळय़ा जगाला पादाक्रांत करायला बाहेर पडला, असे म्हणायला हरकत नाही. आणि त्याने आपला वरचष्मा कसा कायम राखला याचे एकच उदाहरण देतो. गॅरी कास्पारोव्ह हा जागतिक क्रमवारीतील नंबर १ म्हणून तब्बल २५५ महिने राज्य करत होता.
आता गॅरी कास्पारोव्हच्या देशप्रेमाची (आणि बुद्धिबळावरील प्रेमाची) एक गोष्ट सांगतो. मी न्यूयॉर्कला १९९५ साली कास्पारोव्ह विरुद्ध आनंद सामन्याच्या विश्लेषणासाठी गेलो असताना एका वार्ताहर परिषदेत गॅरीला विचारले होते की, युरोपमध्ये जास्त मोठे प्रायोजक तयार असताना अमेरिकेत सामना घेण्याचे प्रयोजन काय? कारण अमेरिकेत तर बुद्धिबळाचा काहीही प्रभाव नाही. त्या वेळी गॅरी ने उत्तर दिले होते, अमेरिकेत बुद्धिबळाचा प्रसार व्हावा अशीच त्याची इच्छा होती आणि म्हणून त्याने सामना अमेरिकेत आयोजित केला. परंतु त्याने एक गोष्ट उघड सांगितली नाही की रशियात (आणि आजूबाजूच्या देशांत) उपासमारीची वेळ आलेल्या अनेक ग्रॅण्डमास्टर्सना अमेरिकेचे दरवाजे उघडण्यासाठी त्याने स्वत:च्या बक्षिसाच्या रकमेत कपात करून वल्र्ड ट्रेड सेंटरच्या १०५ व्या मजल्यावर कास्पारोव्ह-आनंद सामना आयोजित केला होता. आणि खरोखरच १९९५ सालानंतर सुसान पोलगार, बोरिस गुल्को यांसारखे अनेक ग्रॅण्डमास्टर्स अमेरिकेत आले. युरोपमधले जाऊ देत, पण भारताचेही अनेक ग्रॅण्डमास्टर्स आज अमेरिकेत राहून नोकरी/ प्रशिक्षण अशी कामे करत आहेत.
जागतिक संघटना खेळाडूंना बरोबर वागवत नाही अशी कास्पारोव्हची कायम भावना होती. त्याने १९८६ साली KGB (ग्रॅण्डमास्टर्स असोसिएशन) नावाची संस्था काढली. १९९३ साली गॅरी आणि नायजेल यांना जागतिक संघटना आपल्याला जगज्जेतेपदासाठी पुरेसे पैसे देत नाही असे वाटत होते. म्हणून त्यांनी फिडेमधून बाहेर पडून ढउअ (प्रोफेशनल चेस असोसिएशन) नावाची वेगळी संस्था काढली आणि त्या संघटनेतर्फे दोघे जगज्जेतेपदाची स्पर्धा खेळले आणि कास्पारोव्ह आरामात १२.५ – ७.५ असा जिंकला. पुढे २००७ साली गॅरीने एका मुलाखतीत ढउअ स्थापन करणे ही आपली मोठी चूक असल्याचे कबूल केले होते.
यथावकाश गॅरीने बुद्धिबळ सोडून बाकीच्या गोष्टींमध्ये इतके डोके घातले की तो तरुण व्लादिमिर क्रॅमनिककडून पराभूत झाला. तरीही २००५ पर्यंत त्यालाच जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू मानण्यात येत होते. एकदा एका वार्ताहराने २७०० रेटिंग झालेल्या अलेक्सी शिरोवला गाठले आणि त्यांच्यात लावालावी करण्याचा प्रयत्न केला. ‘‘तुला गॅरी काल नवशिका खेळाडू म्हणाला.’’ हे ऐकल्यावर शिरोव उसळून काही तरी गॅरी विरुद्ध बडबडेल अशी त्या वार्ताहराची अपेक्षा होती. पण शिरोव खेदाने म्हणाला, ‘‘मी काय करू? गॅरीला तो हक्कच आहे. बघा तो मला कसा हरवतो ते!’’
गॅरी कास्पारोव्हने आता बुद्धिबळात जिंकण्यासारखे आणखी काही उरले नाही, असे म्हणून बुद्धिबळातून आपली निवृत्ती २००५ साली जाहीर केली आणि एका साम्राज्याचा अंत झाला.