त्याला सध्या खूप नराश्य आलं होतं. सतत मनात नकारात्मक विचार येत होते. रात्री झोप लागत नव्हती. कामातही लक्ष लागत नव्हतं. काम करताना त्याच्या हातून खूप चुका होत होत्या. त्यामुळे बॉसकडून सारखी बोलणी खावी लागत होती. एमबीएच्या अभ्यासातदेखील लक्ष लागत नव्हतं. किंबहुना, तो करावासाच वाटत नव्हता. गेल्या काही महिन्यांपासून त्याची ही अवस्था सुरूझाली होती. आता तर झोप येत नाही म्हणून आणि हा सगळा ताण विसरायला म्हणून त्याने दारूचा आसरा घ्यायला सुरुवात केली होती. मी त्याला विचारलं की, ‘‘तू एकटाच का आलास? तुझ्याबरोबर घरचं कोणी कसं आलं नाही? त्यांना माहीत आहे का, तू येथे आला आहेस ते?’’
त्यावर विनय म्हणाला की, ‘‘तीच तर माझी खरी समस्या आहे! आमच्यात काही नातंच उरलेलं नाही.. भावनाच नाहीत. नुसती कर्तव्यं. एकत्र राहायचं म्हणून मी राहतो आहे, एवढंच. आता ते माझ्या लग्नासाठी मुलगी शोधू लागलेत. त्यावरूनच आमच्यात खटके उडू लागले आहेत. मला मुळात लग्नच करायचं नाहीए. पण त्यांना हे पटतच नाहीए. त्यामुळे मला असं वाटू लागलंय की, मला कुणी समजूनच घेऊ शकत नाही. त्यामुळे मी आणखीनच निराश होतो.’’
‘‘पण तुला लग्न का करायचं नाही?’’
‘‘कसं करू लग्न? कसं जमेल मला ते नातं जुळवून घ्यायला? आमच्या घरात कधीच कुणाचं नीट नातंच नाही. लहानपणापासून मी पाहत आलो आहे की, आजी-आजोबा आणि आई-बाबा सारखे एकमेकांशी नुसते भांडत असायचे. आजी-आजोबा एकमेकांशी, आई-बाबा एकमेकांशी, आई-आजी, बाबा-आजोबा यांची सतत भांडणं होत असतात. वेगवेगळ्या परम्युटेशन-कॉम्बिनेशनमध्ये भांडणंच भांडणं. आजोबा गेल्यानंतर भांडणं थोडी कमी झाली; पण शीतयुद्ध सुरूच राहिलं. आई आणि आजी यांच्यामध्ये तर विस्तवही जात नाही. पण तरी कधी कधी एकमेकींशिवाय त्यांचं अडतं. तसंच आई-बाबांचं. त्यामुळे मी कायम कानकोंडा होऊन जायचो.
बाबा एरवी अबोल. माझाही स्वभाव तसाच. त्यामुळे त्यांनी, आईने कोणीच माझ्याकडे नीट लक्षच दिलं नाही. मला वेगवेगळे छंद लावायला, खेळ खेळायला कधी प्रोत्साहनही दिलं नाही त्यांनी. मीही त्यामुळे कुणाशी बोलू शकत नाही. माझीही कुणाशी मत्री होत नाही. माझ्याशी कोणी मत्री करत नाही. सगळ्यांना वाटतं की मी गर्वष्ठि आहे. कामाच्या जागीही मला कोणी मित्र नाही. आणि मलापण वाटतं की, नकोच कोणाशी नातं जोडायला. माझंही त्यांच्याशी भांडण झालं तर? आणि म्हणूनच मला लग्नाचीही भीती वाटतेय. मला असं वाटतं की, माझं तिच्याशी जमलं नाही तर? आमच्याही नात्यात भांडणांचा परत रीपिट टेलिकास्ट झाला तर? त्यापेक्षा नकोच हे सगळं. पण हे आई-बाबांना समजत नाही. माझ्या भावना त्यांनी कधीच समजून घेतल्या नाहीत. मीपण उद्या माझ्या मुलांशी असाच वागलो तर? मला हे नातं फुलवता आलं नाही तर? किंबहुना, ते मला जमणारच नाही असं वाटतंय.’’
थोडक्यात- त्याला जे नराश्य आलं होतं, त्यामागे त्याची विस्कळीत कुटुंबाची घडी किंवा दुरावलेली (तथाकथित) नाती हे कारण दिसत होतं. त्याला असं वाटत होतं की, भविष्यात आपल्याही बाबतीत हेच सर्व तसंच होईल. आणि पुन:पुन्हा तो या घटनांना सामोरा जाऊ इच्छित नव्हता. नंतर मी त्याच्या आई-वडिलांशीही बोललो. विनयने सांगितलेली माहिती तशी खरी होती. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ते प्रत्येक घरात होणारे कौटुंबिक वाद होते. त्याची अभ्यासात व्यवस्थित प्रगती होती. वाचनाचीही त्याला आवड होती. त्यामुळे आणखीन वेगळं काही त्याला शिकवावं, हे त्यांच्या लक्षात आलं नव्हतं. या गोष्टीबाबत कधी त्याच्याशी बोलावं असं त्यांना वाटलंच नव्हतं. थोडक्यात- मानसिक अज्ञानातून असं घडलं असं त्यांचं म्हणणं होतं.
तर- ‘आई-वडिलांमुळे माझं नुकसान झालं. त्यांनीच बदलावं आधी; तरच मी लग्नाबाबत विचार करू शकेन,’ असं विनयचं म्हणणं होतं. विनयला नराश्य आलं होतं. आणि ते त्याच्या लहानपणापासून आलेल्या या अनुभवांमुळे आलं होतं असं कोणीही म्हणेल. परंतु याहीपेक्षा जास्त किंवा असेच अनुभव अनेक घरांमधून घडताना दिसतात. मात्र, त्यामुळे सगळ्यांनाच नराश्य येत नाही. म्हणजे विनयची त्या घटनांकडे बघण्याची दृष्टी हीच या परिणामांचं खरं कारण होती.
पूर्वी वाईट अनुभव आले म्हणजे भविष्यातही असेच अनुभव येत राहणार. मग ते टाळता येत असतील तर किती बरं, हा ‘अविवेक’ होता. सगळ्या नातेसंबंधांच्या घडय़ा सुरळीतच असायला हव्या, त्यात काहीच बिघाड नको, जराही भांडणं नकोतच.. हा दुसरा ‘अविवेक’ होता. तर आधी दुसऱ्यांनी.. समोरच्यांनी बदलावे, परिस्थितीने बदलावे- हा तिसरा ‘अविवेक’ होता. या तिन्ही नकारात्मक किंवा अविवेकी विचारांमुळे तो नराश्याची अनारोग्यदायी भावना किंवा आरोग्यास अपायकारक भावना अनुभवत होता.
मग ‘विवेक’ कशात होता? ‘जरी पूर्वानुभव वाईट आले तरी याचा अर्थ पुढे सगळे वाईटच अनुभव येणार, असा होत नाही. ते पुन्हा येऊ नयेत म्हणून त्यापासून धडा घेऊन ते येणार नाहीत याची खबरदारी घेणं आपल्या हातात असतं. तेवढंच मी करीन..’ हा झाला पहिला ‘विवेक’! रस्त्यात अपघात झालेला पाहिलं, वाचलं म्हणजे आपण रस्त्याने जाणं थांबवावं असं होत नाही, तर आपल्याला अपघात होणार नाही यासाठी सुरक्षितपणे गाडी चालवणं हे आपण करतो; तसंच हे आहे. कोणतेही नातेसंबंध पूर्ण सुरळीत नसतात. दोन व्यक्ती एकत्र आल्या की मतभेद, वाद होणं ओघाने येतंच. पण ते वाढणार नाहीत यासाठी एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या गुण-दोषांशी जुळतं घ्यावं लागतं. हा दुसरा ‘विवेक’! तर परिस्थिती किंवा समोरच्याला बदलणं आपल्या हातात नसतं, तर स्वत:ला बदलणं आपल्या हातात असतं. ते आपण करावं- म्हणजे त्रास कमी होतो, हा तिसरा ‘विवेक’. या तीनही अविवेकांचा स्वीकार करणं ही त्यासाठी पहिली पायरी असणार होती. तो ‘स्वीकार’ झाल्यावर पुढचे बदल करणे सोपे जाणार होते. तो स्वीकार सुरळीत होण्यासाठी औषधोपचारांचीही जोड सुरुवातीस देणं गरजेचं होतं. ‘Miles to go before I sleep’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा