शिक्षण घेण्यासाठी तुम्ही शाळेत जायला लागलात. सुरुवातीला शाळा म्हणजे भरपूर खेळणी आणि खाऊचा डबा, हेच समीकरण असल्यामुळे तुम्ही रमलात. मग तुमच्या आवडत्या बाईंनी हळूच ‘अ आ इ ई’ शिकवायला सुरुवात केली. त्याच्याच बरोबर एकी एक, दुरकी दोन.. असे आकडेही चढत्या भाजणीने तुम्हाला काढता येऊ लागले. सरावाने तुम्ही त्यात तरबेजही झालात. या आकडय़ांची ना एक गंमत असते. ठरावीक गोष्टींशी ज्यांची अगदी गट्टी असते. किंबहुना ते त्यांचे वैशिष्टय़ असते. कधी त्या अंकाची गणितातली किंमत तिथे विचारात घेतली जात नाही. त्याचा शब्दश: अर्थ बघितला जात नाही. कधी तिसराच अर्थ सूचित केला जातो.
कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्याचा मान मिळतो तो एक आकडय़ाला. वर्गात पहिला नंबर आला तर कॉलर ताठ असते ना तुमची, पण ‘एक’ गुण मिळाला तर प्रगती पुस्तकात लाल रेघ अटळ. किती जमीन-अस्मानाचा फरक पडतो ना एकच आकडा असला तरी. तोच एक गुणाकार भागाकारात अगदी तटस्थ असतो. थोडा गोंधळात टाकतो की नाही तुम्हाला?
शाळेतून सहलीला चला किंवा मिरवणुकीला जाताना जोडय़ा करून एकामागोमाग एक शिस्तीत चला, असं बाईंनी म्हटल्यावर दोन आकडा गृहीत धरलाच जातो ना! शास्त्र विषयाचे शिक्षक छोटय़ा डब्यात माती घालून द्विदल कडधान्याचे दाणे पेरायला सांगतात. थोडी वाट पाहायला लावून ते द्विदल स्वरूपात बाहेर येते आणि साहजिकच विषयाची गोडी वाढते. शाळेच्या स्नेहसंमेलनात पाहुण्यांना ‘दोन शब्द’ बोलण्याची विनंती केली जाते आणि प्रत्यक्षात काय होतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुमच्या पाहण्यात जुळी भावंडं आली आहेत का बघा बरं!
गणपतीच्या पूजेसाठी त्रिदल असलेल्या दूर्वा निवडण्याचा आजीचा आग्रह असतो. शंकराला बेल म्हटल्यावर तीन पानांचा समूहच डोळय़ांसमोर येतो. त्रिकोणाशिवाय भूमितीचा अभ्यास होत नाही आणि त्रराशिक मांडल्याशिवाय गणित सुटत नाही. चांगल्या कामाला जाताना किंवा तिसऱ्याला कटवायचं असेल तर ‘तीन तिघाडा, काम बिघाडा’ बरोबर आठवतं ना!
चौकोन, आयत, चौरस म्हणजे चार बाजू असायलाच हव्यात. ‘चार दिवस सासूचे’ किती दिवस बघितलीत सांगा बघू! चित्रकलेच्या तासाला देखावा काढताना आकाशात चार आकडय़ांचे कावळे तुम्ही नेहमी काढताच ना!
हातापायाची बोटं म्हणजे पाच आकडा ठरलेलाच. तीच गोष्ट पांडवांची. पंचमहाभूतं म्हटल्यावर घाबरला नाहीत ना! की पाचावर धारण बसलीय, विचार करा.
दिवाळीच्या आधी सहामाही परीक्षा उरकली की अर्धवर्ष संपल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरून ओसंडून गेलेला जाणवतोच. षड्रात्रीचं खंडोबाचं नवरात्र संपलं की आजी म्हणते ना, ‘‘खा बाबांनो आता कांदा लसूण.’’
साताला सप्तसुरांची साथ असते, शिवाय सात वारांचा तो आठवडा करतो. आजीचे सप्ताह म्हणजे तुमची चैन असते. सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान बघायला धावत सुटता. तुमच्या घरी सातमजली हास्य कोणी करतं का हो?
आठवं वर्ष म्हणजे मुलाची मुंज. ती झाली की अष्टवर्गात वर्णी लागतेच. आठ हा आकडा चीनमध्ये इतका शुभ मानला जातो की ऑलिम्पिकचं उद्घाटन आठ सालात आठव्या महिन्यात आठ तारखेला आठ वाजून आठ मिनिटांनी करण्यात आलं, आहे की नाही गंमत!
सर्वात मोठा एकक म्हणून नऊचा भाव मोठा. अकबराच्या नवरत्नांच्या दरबारातील बिरबलाच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत. हॉटेलात नवरतन कुम्र्यावर ताव मारताना, मग नाकी नऊ कधी येतात सांगा बघू.
एकावर पूज्य दिल्यावर दहा होऊन हा दशम स्थानावर बसतो. दुष्ट प्रवृत्तीचे दशानन रावण वर्तमानपत्रात शोधा, म्हणजे कितीतरी सापडतील. एकावर एक अकरा म्हणजे क्रिकेटची टीम, अगदी तुमच्या जिव्हाळय़ाचा विषय. पण ११ सप्टेंबर म्हटलं की अमेरिकेत झालेला दहशतवादी हल्ला आठवून अंगावर काटा येतो बरं.
घडय़ाळय़ाच्या तबकडीवर दोन्ही काटे एकमेकांना भेटले की बारा वाजलेच. डझनभर वस्तू किंवा एक वर्षांचे महिने बाराच हवेत. दर तीन वर्षांनी वर्षांचे महिने तेरा होतात आणि हा तेरावा महिना अधिक महिना म्हणून मानला जातो.
‘विद्येनेच मनुष्या आले श्रेष्ठत्व या जगामाजी’ म्हणून चौदा विद्या आत्मसात करण्याचा जरूर प्रयत्न करा. रामाने भोगलेला चौदा वर्षांचा वनवास तुम्हाला ठाऊक असेल, पण चौदावं रत्न कोणी तुम्हाला दाखवलंय का? नसेल तर राहू दे. पण आपल्याला आता थांबायला हवं. चौदा आकडय़ाचा रोज संबंध येणार आपल्याशी. असं काय करताय, विसरलात का आपण दोन हजार चौदा सालात पदार्पण करतोय. आता आपली गाठ चौदा सालाशी. काहीतरी खास, वैशिष्टय़पूर्ण, वेगळं कर्तृत्व गाजवून ते स्मृतीत अजरामर करणार आहोत. मग लागा प्रयत्नाला. चौदा सालासाठी भरपूर शुभेच्छा!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children now we have to face new year