शिक्षण घेत असतानाच, कोणते काम केले असताना आपल्याला आनंद होईल आणि त्याचबरोबर अर्थार्जनही करता येईल याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे. त्यासाठी लहानपणापासूनच विविध व्यावसायिक आपापला व्यवसाय कसा करतात, हे लक्षपूर्वक पाहिले पाहिजे. आपल्याला हे करायला आवडेल का, असा साधा प्रश्न स्वत:ला विचारावा. त्यांना पैसे किती मिळतात, हे बघू नये.
आनंदी व्यावसायिक कसा असतो? त्याला आपण काही काम करायला जातो आहोत असे कधीच वाटत नाही. कारण काम करण्यात अतिशय मजा येत असते. तिथे गेल्यावर आपले सहकारी भेटल्यावर त्याला अतिशय आनंद होतो. व्यवसायानिमित्त जे लोक भेटतात, त्यांच्याशी बोलताना तो आपल्या मित्रांशी बोलल्यासारखे बोलतो. त्यांना काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी तो सर्व प्रयत्न करतो. हे करताना आपण काही विशेष करतो आहोत, असे त्याला वाटत नाही. घरी आल्यावर, काय काम होते आज, असे कधीही म्हणत नाही. असे दिवसानुदिवस करताना त्याचा अनुभव वाढत जातो. त्याचा मित्रपरिवार वाढत जातो आणि व्यवसाय करण्यात अधिकाधिक आनंद येत राहतो.
व्यवसाय करताना पैसे मिळवणे अर्थातच महत्त्वाचे असते. पैसे मिळवण्यात उत्तम, मध्यम आणि नीच असे प्रकार असतात. चोऱ्यामाऱ्या करून, खून-दरोडे घालून, शेअर बाजारात लांडय़ालबाडय़ा करून पैसे मिळवणे, अडवणूक करून पैसे मिळवणे हा नीच प्रकार. समाजात अशा प्रकारे पैसे मिळवणारे पण उजळ माथ्याने मिरवणारे अनेक लोक असतात. त्यांनी कसे वागावे, हा त्यांचा प्रश्न आहे. पण सामान्यपणे असे वागून फार मजा येत असेल, असे मात्र वाटत नाही. फक्त पैशाकडे लक्ष ठेवून भावभावनांना थारा न देता, पण कोणतेही गैरव्यवहार न करता पैसे मिळवणे हा मध्यम प्रकार. समाजातील बहुतांश लोक अशा प्रकारे व्यवसाय करत असतात. तर पैसे मिळवण्यासाठी वासनाशून्य प्रयत्न करताना यद्दच्छेने जे पैसे मिळतील, ते जोडत जाणे हा उत्तम प्रकार. व्यवसाय करताना या गोष्टींचे भान असणे आवश्यक असते. याचे कारण असे की, आपण जागरूकपणे व्यवसाय करत असताना काही व्यक्ती आपला गैरफायदा घेऊ शकतात. सामान्यपणे प्रत्येक व्यावसायिकास एक-दोनदा फसल्यानंतर आपला गैरफायदा घेणारे लोक लक्षात येतातच. अशा वेळेस गोड पण स्पष्ट बोलणे आवश्यक ठरते. उत्तम व्यवसाय करून जनतेचे आशीर्वाद घेण्यामुळे पुण्य मिळते, अशा भ्रामक समजुतीत मात्र कुणी राहू नये. पण त्यामुळे आपल्या ऊर्जेचा स्तर उंचावलेला राहतो हे मात्र खरे. आपल्याला नवनवीन गोष्टी करायची, शोधायची उभारी येते. आपण आणखी चांगले व्यावसायिक होत राहतो.
ज्यांच्या छंदाचे व्यवसायात रूपांतर होते, ते लोक नशीबवान आणि भाग्यवानच म्हणावे लागतात. ज्यांच्या व्यवसायाचे छंदात रूपांतर होते, तेदेखील तितकेच नशीबवान आणि भाग्यवान. हे होण्यासाठी एक प्रकारची जागरूकता मात्र जरूर लागते. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा व्यवसाय होऊ शकतो. भांडी हाताने घासूनही पैसे मिळतात. भांडी घासण्याचे यंत्र बनवून विकले तरी पैसे मिळतात. या दोन्ही गोष्टीमुळे जे पैसे मिळतात, त्यात मात्र फारच मोठी तफावत असते. पण स्वत: हाताने जो भांडी घासेल तोच ती घासायचे यंत्र बनवू शकेल, हे मात्र नक्की. त्यामुळे आनंदाने काम करत असताना हेच काम आणखीन सोपे कसे करता येईल, असे डोके सतत चालत राहिले, म्हणजे नवनिर्मिती होत राहते.
उत्तम व्यावसायिक हा उत्तम विद्यार्थी असतो. तो सतत शिकत असतो. त्याला कोणतेही काम करताना कष्ट तर वाटत नाहीतच; पण ते काम पूर्ण केल्यावर तो काहीतरी शिकलेला असतो. तो कुणाकडूनही शिकतो. एखादे काम कमी दर्जाचे आणि एखादे उच्च दर्जाचे असे त्याला कधीही वाटत नाही. तसेच एखादे काम कमी महत्त्वाचे आणि एखादे जास्त महत्त्वाचे असे त्याला वाटत नाही. कारण कामाचा दर्जा हा त्यातील सर्व गोष्टी मिळूनच ठरतो.
काही व्यवसाय अतिशय धोकादायक असतात आणि सामान्यपणे आवड असते, म्हणूनच त्यात लोक टिकतात. रेड अडेअर नावाचा एक फायर फायटर काही वर्षांपूर्वी वारला. जगातील तेल विहिरींना लागलेल्या आगी विझवणे हा त्याचा हातखंडा व्यवसाय होता. तो वयाच्या ८५व्या वर्षांपर्यंत कार्यरत होता. त्याच्या आयुष्यात इतके धोकादायक काम करूनदेखील त्याला कधी इजा झाली नाही. याबद्दल त्याला विचारले असता तो म्हणाला, ‘माझ्या फार लवकर लक्षात आले की, जेव्हा जेव्हा मी एखादी आग ही किरकोळ आहे, असे मानू लागायचो तेव्हा तेव्हा मी निष्काळजी झालेला असायचो. कोणतीही आग ही कधीही किरकोळ नसते. हा धडा मी लवकर शिकलो.’ पूर्णपणे भानावर राहून आयुष्य काढलेल्या थोर माणसाचे हे शब्द आहेत. हे वाक्य प्रत्येक व्यावसायिकाने लक्षात ठेवण्यासारखे आहे.
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी अशी आपल्याकडे एक म्हण आहे. पण आपण जे करतो, ते आपल्याला आवडत असेल तर त्यात उच्च-नीच काही राहत नाही. वडील करतात, म्हणून मी करतो किंवा वडिलांनी सांगितले म्हणून हे मी करत आलो, अशा प्रकारे जे मनाविरुद्ध काम करतात त्यांच्या आयुष्यात कधीही मजा येत नाही. यासाठी जे काम मनाविरुद्ध आहे ते करताना संधी शोधण्यासाठी सदासर्वकाळ लक्ष पाहिजे. अचानक आपले आवडते काम करण्याची संधी येते. त्या वेळेस नावडते काम सोडायचे धैर्य मात्र अंगी पाहिजे. नोकरी आवडत नाही, पण व्यवसाय काय करायचा कळत नाही, अशा त्रिशंकू अवस्थेतील लोकांनी अत्यंत संयमाने परिस्थितीस दोष न देता सतत आकाशात उडणारा गरुड ज्याप्रमाणे खाली आपल्या सावजाकडे सतत लक्ष ठेवून असतो, तसे लक्ष ठेवले पाहिजे. ज्यांना नोकरी करणे आवडते त्यांनी अर्थात नोकरीच केली पाहिजे. नोकरीनिमित्त ज्यांचा जनतेशी संबंध येतो त्यांनी आपल्यासमोरच्या रांगेतील प्रत्येक जण हसत हसत कार्यालयातून बाहेर जाईल, असे पाहिले तर कामातली मजा आणखी वाढलेली कळेल.
कोणत्याही व्यवसायाचे ग्राहक आणि विक्रेता असे दोन भाग असतात. काही सेवा विकतात, तर काही वस्तू विकतात. आपण प्रत्येक जण कधी ग्राहक तर कधी विक्रेते असतो. विक्रेत्याने ग्राहकाला लुबाडणे अगर ग्राहकाने विक्रेत्याला ओरबाडणे सारखेच दु:खकारक असते. कोणत्याही देवाण-घेवाणीनंतर दोघांनाही समाधान हवे. हे समाधान आनंदाने व्यवसाय करणारे लोक देऊही शकतात आणि घेऊही शकतात.
आयुष्याच्या अखेरीस आनंदाने उत्तम व्यवसाय केलेले लोक सत्पुरुष म्हणून गणले जातात. त्यांचा शब्द म्हणजे नियम होतो. त्यांनी दिलेला सल्ला आणि संतवचन यात काही फरक उरत नाही. ते कर्मयोगी होऊन जातात. एक आनंदाने केलेला व्यवसाय ‘याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा’ ही उक्ती सार्थ ठरवतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा