इसिडॉर इस्साक राबी हा पदार्थवैज्ञानिक व नोबेल पारितोषिकविजेता त्याच्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहे. तो म्हणत असे, ‘माझ्या आईने तसा काही हेतू नसताना मला शास्त्रज्ञ बनवलं. जेव्हा ब्रुकलिनमधली प्रत्येक ज्यू माता तिच्या मुलाला शाळा सुटल्यावर विचारत असे- ‘आज काही शिकलास का?’ तेव्हा माझी आई विचारत असे, ‘इझी, तू आज काही चांगला प्रश्न विचारलास का?’ या एक चांगला प्रश्न विचारण्याच्या फरकामुळे मी शास्त्रज्ञ बनलो.’
अर्जुनाने प्रश्न उपस्थित केले म्हणूनच श्रीकृष्णाने त्याच्या प्रज्ञेला दिशादर्शन केले.. जी आपण आज ‘भगवद्गीता’ म्हणून ओळखतो. एकदा एका साधकाने गुरूला विचारले की, ‘चांगल्या लोकांना वाईट गोष्टी का सतावतात?’ तेव्हा गुरूंनी उत्तर दिले की, ‘मुळात तुझा प्रश्न असा असायला हवा, की जेव्हा चांगल्या लोकांना वाईट गोष्टी सतावतात, तेव्हा त्यांचं काय होतं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे- ते अधिक चांगले लोक बनतात. कारण सर्वसाधारण लोक अशा परिस्थितीत स्वत:ला एक प्रश्न विचारतात, ‘मीच का? माझ्याबाबतीतच का?’ तर हे लोक त्रास होतो तेव्हा- किंवा अनुकूल गोष्टी घडतात तेव्हा- दोन्ही परिस्थितीत विचारतात, ‘मी यापासून काय शिकलो?’ .. जो त्यांना प्रगल्भ बनवतो. समजा, एखाद्या व्यक्तीबरोबर पटत नसेल तर, ती व्यक्ती मला का समजू शकत नाही? हा प्रश्न इतरांवर दोषारोप करण्याच्या दिशेला नेतो. उलट, ‘माझा पवित्रा कसा असला म्हणजे तिला मला समजून घेता येईल?’ या प्रश्नाने परिस्थिती नियंत्रणात आल्यासारखी वाटेल. अशा प्रश्नाने ती व्यक्ती अधिक प्रगल्भ, समाधानी बनायला मदत होते.’
अविवेकाकडून विवेकी विचारसरणीकडे जायचा हा प्रवास- किंवा त्यासाठी करायचा बदल- या सर्वात स्वत:शी होणारा हा प्रश्नात्मक संवाद खूप महत्त्वाचा असतो. स्वत:ला विचारायचे हे प्रश्न हा बदल घडवून आणण्यास मदत करतात. पण बदल किंवा परिवर्तन हे आव्हानात्मक नसतं, तर हे परिवर्तन सातत्याने टिकवणं हे खरं आव्हान असतं. उदा. आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानबंदीचा कायदा आहे. पण कोण पर्वा करतो? सर्रास सार्वजनिक ठिकाणी लोक धूम्रपान करताना दिसतात.
याच्या अगदी विरुद्ध सिंगापूरमध्ये काही दशकांपूर्वी कचरा रस्त्यावर टाकायला प्रतिबंध करणारा कायदा केला गेला. पण प्रत्येकजण तो कायदा पाळतो. काय फरक आहे दोघांत? कायद्याच्या अंमलबजावणीवर नागरिक व सरकार दोघांकडून सिंगापूरमध्ये देखरेख केली जाते. आपल्याकडे ती केली जात नाही. अशा देखरेखीच्या साहाय्याने परिवर्तन टिकवलं तर आयुष्य सतत वर चढणारी चक्राकार गती पकडते, नाहीतर बदल घडवून आणणं, तो बदल गमावून बसणं, पुन्हा तो घडवून आणणं, पुन्हा गमावणं- या दुष्टचक्रात ते सापडतं.
म्हणून अविवेकी विचारसरणीकडून विवेकी विचारसरणीकडे एकदा गेलं म्हणजे संपलं असं नाही. एकदा विवेकाने विचार करण्यास शिकलो म्हणजे कायम विवेकानेच विचार करू, हाही अविवेकच! त्यामुळे ‘विलगपणे’ आत्मपरीक्षण करत राहून प्रत्येक चांगल्या-वाईट परिस्थितीत विचार तपासत राहिलं पाहिजे.
आपल्या अहंपासून विलगपणे आपल्या विचारांची, गुण-अवगुण यांची आपण तपासणी करू शकलो तर आपल्यामध्ये आत्मस्वीकाराची वृत्ती वाढत जाते व विचारांची दिशा त्यामधूनच समजून येते. या सर्व आत्मपरीक्षणासाठी महत्त्वाचा असतो तो स्वत:शी संवाद (self talk). वर उल्लेखिल्याप्रमाणे स्वत:ला प्रश्न विचारणे व स्वत:शी बोलणे हे महत्त्वाचे ठरते.
जे ‘मीच सर्वगुणसंपन्न आहे’ किंवा ‘मी अवगुणांनी पोखरलेला आहे’ असे समजत असतात त्यांचा हा विवेक पूर्णपणे विलय पावलेला असतो. त्यामुळे त्यांच्यात वृक्षाची कठीणता आलेली असते. त्यांच्या ठायी लव्हाळ्यांची लवचिकता नसते. त्यामुळे अशा व्यक्ती असे तटस्थपणे आत्मपरीक्षण करू शकतीलच असे आपण म्हणू शकत नाही. परंतु जास्तीत जास्त लोकांनी अशी सवय आत्मसात केली तर ही ‘तटस्थ देखरेख’ परिवर्तनाकडे जायला मदत करेल.
याची सरुवात ही पुन्हा स्वीकारापासूनच करावी लागेल. अल्बर्ट एलिस यांनी मांडलेलं समीकरण A + B = C त्यासाठी महत्त्वाचे आहे. नेहमी आपण एखाद्या घटनेमुळे आपल्याला नराश्य आलं, चिंता निर्माण झाली, असा संबंध लावतो. म्हणजेच A मुळे C निर्माण झाला असे मानतो. परंतु आपण आजवर बघितलंय की, अविवेकी विचारसरणी (B) मुळे विरूप भावना (C) निर्माण व्हायला हातभार लागतो. म्हणूनच पूर्ण ABC चा स्वीकार होणं आवश्यक आहे. AC कडून ABC कडे जाणे हे त्यासाठी फार महत्त्वाचे आहे. हा स्वीकार आला तर पुढच्या देखरेखीच्या पायरीवर आपण पोहोचू शकतो. त्यासाठी ही देखरेख म्हणजे आत्मपरीक्षण, स्वसंवाद वगरे बौद्धिक साधने, भावना तपासणे व त्याद्वारे वर्तनावर नियंत्रण आणणे, ही साधने निष्ठेने वापरावी लागतील. विचारांवर देखरेख ही मेंदूच्या एका भागाकडून केली जाईल, तर भावनांमध्ये, वर्तनामध्ये बदल आणण्यासाठी योगमार्ग, शिथिलीकरणाचे व्यायाम, इतर व्यायामप्रकार असे ‘हायपोथॅलॅमिक’ (मेंदूचा दुसरा भाग) उपाय योजावे लागतात. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेच आहे की, प्रत्येक आत्मा ब्रह्मस्वरूप आहे. या अव्यक्त ब्रह्मस्वरूपाचं प्रकटीकरण कसं होईल, ते पाहिलं पाहिजे. बाह्य़ व आंतरिक प्रकृतीवर नियंत्रण मिळवून ही गोष्ट साध्य करता येईल. कर्म/ उपासना, मनाचा संयम, ज्ञान या सर्वाचाच एकत्रित उपयोग अर्थात् योगोपचाराने ते साध्य होईल.
थोडक्यात, संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे-
जव वेरी अर्जुना। तो बोधू न भेटे मना॥
तवचि येया साधना। भजावे लागे॥
त्यामुळे अत्यंत सातत्याने या सर्व मार्गाचा अवलंब केल्यास हा बदल शक्य होईल. तो शिकवण्यासाठी असे अनेक ठिकाणी त्याचे प्रशिक्षण वर्ग उपलब्ध आहेत. ज्याचा वापर प्रत्येकजण करू शकतो. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच ती खणून तयार केलेली चांगली!
हा जो बदल वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने केला पाहिजे तसाच सामाजिक पातळीवरही तो केला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केला पाहिजे. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील वाईट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठीही केला पाहिजे. मात्र, त्याकरता केवळ दिवाणखान्यातील चच्रेऐवजी प्रत्येकाने वैचारिक बदलाची तुतारी मनापासून वापरली पाहिजे. ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकात लेखक संदीप वासलेकरांनी म्हटल्याप्रमाणे, सरकारच सगळं करेल, अशी अविवेकी अपेक्षा न ठेवता प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे. ऊर्जाबचत, स्वच्छता, भ्रष्टाचार टाळणे, आपल्या लोकप्रतिनिधींना सतत सर्वानी पत्रे पाठवून आपल्या भागाच्या विकासासंदर्भात सूचना करणं, किंवा ते काय प्रयत्न करताहेत याची सातत्याने विचारणा करणं, असे बदल निष्ठापूर्वक आपण बाणवले पाहिजेत. इतर अनेक देशांचा विकास याच मार्गामुळे झाला आहे. जसा वर सिंगापूरचा उल्लेख केलाय, त्याप्रमाणे कायदे पाळण्यात सरकारचाच नव्हे, तर लोकांचा सहभागही तिथे तितकाच महत्त्वाचा ठरला.
असे सामाजिक विचार व वर्तनात बदल केले तरच सुखासमाधानाची अनुरूप भावना समाजातही वाढीला लागेल, हे नक्की! कविवर्य केशवसुतांनी म्हटल्याप्रमाणे-
‘जुन्या नभी या ताजे तारक,
जुन्या भूमिवर नवी टवटवी,
आणण्यासाठी जुने जाऊ द्या मरणालागुनी’
हा मार्ग अनुसरला पाहिजे आणि त्यासाठी-
‘एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकून टाकीन जी मी स्वप्राणाने’
याप्रमाणे प्रत्येकाने बदलाची ही तुतारी सातत्याने निष्ठेने फुंकत राहणं गरजेचं आहे!
ं६िं्र३स्र्ंिँ८ी1972@ॠें्र’.ूे
(समाप्त)
तुतारी
इसिडॉर इस्साक राबी हा पदार्थवैज्ञानिक व नोबेल पारितोषिकविजेता त्याच्या न्युक्लिअर मॅग्नेटिक रेझोनन्सच्या शोधाबद्दल प्रसिद्ध आहे. तो म्हणत असे, ‘माझ्या आईने तसा काही हेतू नसताना मला शास्त्रज्ञ
First published on: 22-12-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व माझिया मना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Civic sense