अतुल देऊळगावकर – atul.deulgaonkar@gmail.com
‘हवामानबदलाविषयी जिवाच्या आकांतानं निर्वाणीचा इशारा देणं म्हणजे ध्वनिरोधक काचेच्या मागून ओरडण्यासारखं आहे.’
– जगाला हवामानबदलाचा पहिला इशारा देणारे हवामानशास्त्रज्ञ डॉ. जेम्स हॅन्सेन.
खरं तर जगातील प्रत्येकास आपण विज्ञानवादी असल्याचा अभिमान असतो. परंतु तरी विचार-आचाराने शास्त्रज्ञ असणाऱ्यांना ‘जनतेला विज्ञान का पटत नाही?’ हा गहन प्रश्न कायम पडतो. हवामानबदलाविषयी सातत्यानं बोलणाऱ्या वैज्ञानिकांना ही समस्या जनमानसात रुजविण्यासाठी काय करावं, हा प्रश्न भेडसावत आहे. हवामानबदल हे समोर येऊन उभं ठाकलेलं महाकाय आव्हान आहे. परंतु त्याची भयावह व्याप्ती पाहून माणसाच्या मनाला बधिरता येते आणि त्याचं गांभीर्य गळून पडतं? कोणत्या पद्धतीने हा प्रश्न मांडला तर तो लोकांना भिडू शकेल? म्हणूनच हवामानबदलाच्या प्रश्नाची मांडणी कशी करावी, हे ठरवण्यासाठी जगभर मंथन सुरू आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाने हवामानबदलाचं विज्ञान समजून घेण्यासाठी स्थापलेल्या ‘इंटर गव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आय. पी. सी. सी.) ही संस्था हवामानबदल का, कसा व किती होतो आहे याचा अन्वय लावत आहे. १९८८ पासून या संस्थेचे वैज्ञानिक अनेक अंगांनी व अनेक ठिकाणी नोंदी घेऊन सर्वेक्षण व संशोधन करीत आहेत. त्यांच्या निष्कर्षांतून १९५ राष्ट्रांनी हवामानबदल रोखण्यासाठी धोरणात्मक बदल करून समायोजनाकरता झटावे यासाठी संस्था वेळोवेळी अहवाल प्रसिद्ध करीत असते. याखेरीज अनेक देशांतील विविध संस्था हवामानबदलामागील शास्त्र समजावून सांगण्याचा अथक प्रयत्न करीत आहेत. हवामानबदलाच्या आर्थिक परिणामांचे भाकीत अर्थशास्त्रज्ञ करत आहेत, तर समाजशास्त्रज्ञ त्यातून होणाऱ्या सामाजिक परिणामांचा भविष्यवेध घेत आहेत. हे अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत. तरीही जनमताचा कल पाहिला तर हवामानबदल, पर्यावरणाचा विनाश हे मुद्दे लोकांच्या अग्रक्रमात का दिसत नाहीत? हा प्रश्न वैज्ञानिकांना अस्वस्थ करत आहे.
२००३ पासून अमेरिकेतील येल विद्यापीठातर्फे हवामानबदलाबद्दल जनमत जाणून घेण्यासाठी वेळोवेळी चाचणी घेतली जाते. ‘येल प्रोग्रॅम ऑन क्लायमेट चेंज कम्युनिकेशन’(‘वाय. पी. सी. सी. सी.’)कडून ‘हवामानबदल ही संज्ञा ऐकल्यावर आपल्या मनात काय येतं?’ अशी विचारणा केली असता अमेरिकेतील सात टक्के लोकांनी ‘अफवा’ वा ‘घोटाळा’ असं सांगितलं होतं. २०१० साली अगदी हेच उत्तर देणाऱ्यांची संख्या २३ टक्के झाली. याच काळात ब्रिटनमध्ये हवामानबदलाचे दावे अतिरंजित आहेत असं मानणाऱ्यांचं प्रमाण १५ टक्क्य़ांवरून ३० टक्के झालं. अमेरिकेतील ‘प्यु रीसर्च सेंटर’ने विविध काळांत केलेल्या सर्वेक्षणानुसार,अमेरिकेतील रिपब्लिकन व डेमॉक्रॅटिक या राजकीय पक्षांतील सदस्यांना १९९७ पर्यंत हवामानबदल ही समस्याच वाटत नव्हती. आजही अमेरिका, कॅनडा, जर्मनी व ब्रिटनमधील कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या मतदारांना ही समस्या अजिबात महत्त्वाची वाटत नाही. उदारमतवादी व हरित पक्षाच्या मतदारांना मात्र त्याची चिंता वाटते.
केंब्रिज विद्यापीठातील ‘हवामान व संस्कृती’ विषयाचे प्रो. माइक ुम ‘व्हाय वुई डिसअॅग्री अबाऊट क्लायमेट चेंज’ या पुस्तकात म्हणतात, ‘‘सामान्य व्यक्तीला पर्यावरण विनाश वा हवामानबदल या समस्या आपल्या वाटतच नाहीत. उलट, त्या दूरच्या, अनाठायी व क्षुल्लक वाटतात. याचं कारण व्यक्तीच्या स्वभावात (की स्थायीभावात?) दडलेलं आहे. आपल्या स्व-भावानुसार मनातील आयुष्याविषयीच्या कल्पना, मूल्ये व उद्देश ठरतात. त्यातून आपला जगाकडे पाहण्याच्या वैश्विक दृष्टिकोन ठरतो. आपलं वर्तन व कृती यांचं मूळ तिथं खोलवर रुजलेलं असतं.’’ वाढतं कर्बउत्सर्जन व त्याचे परिणाम, हवेचं प्रदूषण, पिण्यासाठी स्वच्छ पाणी याविषयी लोक आग्रही नसल्याने या समस्या राजकीय पटलावर येत नाहीत. परिणामी पर्यावरण व हवामानबदल हे विषय राजकीय अनास्थेचे ठरतात. त्यामुळेच पर्यावरण प्रश्नांची लोकांना पटेल अशी मांडणी कशी करावी, हे एक आव्हान ठरते आहे.
नॉर्वेतील मानसशास्त्रज्ञ व ग्रीन पार्टीचे नेते पर इस्पेन स्टोकन्स यांनी ‘व्हॉट वुई थिंक व्हेन वुई ट्राय नॉट टू थिंक अबाऊट ग्लोबल वार्मिग’ या पुस्तकात हवामानबदल ही समस्या लोकांची न होण्यामागील काही कारणं सांगितली आहेत. लोकप्रतिनिधी असलेल्या स्टोकन्स यांच्या मते, ‘‘लोकांना ही समस्या आपली व जवळची न वाटता स्थळ व काळाने खूप दूरची वाटते. प्रलयंकारी भविष्यकथनापायी ही समस्याच त्यांना टाळावीशी वाटते. आपल्या आवडीनिवडी व जीवनशैलीत बदल अनिवार्य आहे असं सुचवणारा विचारच त्यांना नकोसा वाटतो. मनात निर्माण होणारी भीती व अपराधगंड ही समस्या नाकारताच दूर होतात. हवामानबदल व पर्यावरण विनाश हे अस्वस्थ करणारे विषय असल्याने अनेक वैज्ञानिक पुरावे मिळूनसुद्धा ते आपल्या मनातील धारणांच्या विरुद्ध असल्यामुळे आपण त्यांचा स्वीकार करत नाही. उलट, हे विषय टाळण्यासाठी इतर कारणं, सबबी व पळवाटा शोधल्या जातात. कित्येकदा आपल्याला अति माहिती असल्याच्या भ्रमामुळेही असं घडतं.’’
हवामानशास्त्रज्ञ व जॉर्जिया विद्यापीठातील भूगोलाचे प्रो. जे. मार्शल शेफर्ड यांचं ‘तुमच्या भूमिकांना आकार देणारे तीन पूर्वग्रह’ हे व्याख्यान (टेड टॉक- २०१८) प्रसिद्ध आहे. त्यात त्यांनी आपल्या धारणांचं व वैश्विक दृष्टिकोनाचं परखड विश्लेषण केलं आहे. त्यांच्या मते, आपण वाचतो, ऐकतो तेव्हा आपलं मन अजिबात खुलं नसतं. नवीन काही स्वीकारण्याची आपली तयारी नसते. आपली मतं आधीच ठरलेली असतात. तीन तऱ्हांच्या पूर्वग्रहांमुळे आपण आपला वैश्विक दृष्टिकोन दृढ करीत जातो. एखादा विचार ऐकताना केवळ आपल्या मताच्या समर्थनासाठी त्याचा शोध घेतला जातो. दुसऱ्या प्रकारात आपल्या जाणिवेपेक्षा भिन्न विचार असल्यास तो तात्काळ नाकारला जातो. तर कधी कधी फारशी माहिती नसतानाही आपल्याला अधिक माहिती असल्याचा ग्रह तयार होतो. यातून आलेल्या श्रेष्ठत्वगंडामुळे पूर्वग्रह तयार होतो. व्यक्तीचे पूर्वग्रह व समज यातूनच विज्ञानविषयक मते तयार होतात. प्रो. शेफर्ड म्हणतात, ‘‘आपले पूर्वग्रह, समजुती व मते याविषयी सतत आत्मपरीक्षण करावं. नवीन माहिती व विचार यांची खात्री करून घ्यावी. पर्यावरण व हवामान- बदलाच्या प्रश्नांमुळे आपल्याला आतून त्रास झाला, आपल्या भावनाविश्वात त्याला स्थान मिळालं तरच ही लोकांची समस्या होईल. व्यक्तीची मन:स्थिती ही वातावरणासारखी वेळोवेळी वेगळी असू शकते. व्यक्तिमत्त्व हे हवामानासारखंच व्यापक असतं. हवामान- बदलाची समस्या ही मनाच्या आत खोलवर जाऊन ती स्वभावाचा भाग झाली तरच ती लोकांची समस्या होईल. पर्यावरणीय समस्यांचं उत्तर हे जनमानसात आहे, विज्ञानात नव्हे.’’ जगातील अनेक ज्ञानशाखांच्या वैज्ञानिकांनी प्रो. शेफर्ड यांचा हा सिद्धांत गांभीर्यानं घेतला आहे.
‘वाय. पी. सी. सी. सी.’चे महासंचालक अॅँथनी लिसेरोवित्झ यांनी १३० राष्ट्रांतील नागरिकांची मते जाणून घेण्याचा प्रकल्प दहा वर्षे राबविला. त्यांच्या सर्वेक्षणात- ‘जगातील सरासरी दहा प्रौढांपैकी चारजणांनी हवामानबदल ही संज्ञा ऐकलेलीच नसते. हवामानबदलाची अतिजोखीम असणाऱ्या बांगलादेशातील तीन-चतुर्थाश जनतेला हवामानबदल ही संकल्पनाच ठाऊक नाही. भारतातील दोन-तृतीयांश लोकांना तापमानवाढ, पाऊसमानातील बदल जाणवत आहे. पण त्यांनाही हवामानबदलाची व्यापकता कोणी सांगितलेली नाही.त्यामुळे हवामान- बदलाचं विज्ञान समर्पकपणे स्थानिक भाषेत तळागाळापर्यंत पोहोचवलं तर लोकांची ती प्रमुख मागणी होऊ शकते,’ असं लक्षात आलं आहे.
हवामानबदलाचे जबरदस्त तडाखे बसत असूनही कोणत्याही देशाच्या सामाजिक वा राजकीय चर्चेत या मुद्दय़ाला महत्त्वाचं स्थान लाभत नाही. सामाजिक व राजकीय जीवनातील कथनाशी (नॅरेटिव्ह) लोकांना भावनिक नातं सहजपणे जोडता येतं. त्यामुळे ते विज्ञान व तर्क यापेक्षा अधिक प्रभावी ठरतं. असं असूनही देशोदेशींचं राजकीय व सामाजिक जग हे हवामानबदलाचं विज्ञान व वास्तव यापलीकडचं आहे. ही कोंडी फोडणारी मांडणी हीच बदलाची ठिणगी होऊ शकते. २००६ साली अल गोर यांच्या ‘अॅन इनकन्व्हिनियंट ट्रुथ’ या वृत्तपटाने अमेरिकी जनमत बदलण्यात फार मोठं यश मिळवलं होतं. त्याआधी पाच-सहा वर्षे अमेरिकी जनमानस आणि प्रसारमाध्यमे पर्यावरणविषयक विचारांबाबत साशंक असायची. पर्यावरणीय दुष्परिणामांच्या मजकुरास ‘सोश्ॉलिस्ट कावा’ संबोधून हेटळणी करणे, तुच्छ लेखणे ही रीत नसानसांत भिनली होती. अशा वातावरणात ‘अॅन इनकन्व्हिनियंट ट्रुथ’ या वृत्तचित्रातून अमेरिकनांना अजिबात पसंत न पडणारे कडवट सत्य गळी उतरवण्याचं काम गोर यांनी केलं. त्यात उधळपट्टी, नासाडी करणाऱ्या अमेरिकन जीवनशैलीवर घणाघाती प्रहार केले आहेत. एक अमेरिकन व्यक्ती रोज किती वीज जाळते, किती पेट्रोल खर्च करते, किती अन्नपदार्थ खाते, त्याचवेळी इतर देशांतील साधारण व्यक्तीचं जगणं कसं असतं, याची तुलनाच त्यात समोर ठेवली आहे. अमेरिकन जीवनशैलीची निर्भर्त्सना करणाऱ्या गोर यांच्या समर्थनासाठी आठ लाख पत्रं येणं ही या बदलाची साक्ष होती. (ते बळ पुरेसं नव्हतं, हा भाग वेगळा!) या घटना अल गोर यांना ऑस्कर व नोबेल मिळण्याआधीच्या आहेत. ‘अॅन इनकन्व्हिनियंट ट्रुथ’ हा वळणबिंदू मानला जातो, तो यामुळेच. ऑस्कर स्वीकारताना अल गोर ‘जागतिक हवामानबदलाचं आणि पर्यावरणाचं आव्हान हे राजकीय नसून नैतिक आहे,’ असं म्हणाले होते. यावरून लोकांना नैतिक आवाहन भावण्याची शक्यता असते, हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
प्रत्येक व्यक्तीने स्वीकारलेल्या नीतिमूल्यांनुसार त्या व्यक्तीची मते ठरत असतात. आजही अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचे समर्थक गर्भपात व स्थलांतरित या मुद्दय़ांना विरोध करतात. ते उघडपणे लिंगभेद व वर्णभेद मानतात. तर डेमॉक्रॅॅटिक पक्षाचे पाठीराखे या सर्व मुद्दय़ांवर त्यांच्या विरोधात असतात. त्यावरून विचारांनी प्रगत कोण, हे ठरवलं जातं. हे निकष बदलत असतात. त्या निकषांमध्ये हवामानबदल व पर्यावरण विनाश हे मुद्दे आल्यास हवामान- बदल नाकारणाऱ्यांना, प्रदूषकांना मागास मानले जाईल आणि तेव्हाच ही समस्या सर्वमुखी होईल. ती पटवून सांगण्याची गरज उरणार नाही. एखादा मुद्दा लोकांनी आत्मसात केला की ती लोक-चळवळ होते. ही किमया महात्मा गांधी, मार्टिन ल्युथर किंग आणि नेल्सन मंडेला यांना साध्य झाली होती.
हवामानाचे हेलकावे पाहून पाश्चात्त्य देशांतील अनेक नागरिकांना चिंता (क्लायमेट अँक्झायटी) वाटते. तसेच हवामानबदलाची आपत्ती सहन करणाऱ्यांवर मानसिक आघात (क्लायमेट ट्रॉमा) होत आहे. (नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीनंतरची शेतकऱ्यांची अवस्था पाहावी.) अशा मनोविकारांचं वाढतं प्रमाण अनुभवणाऱ्या डॉ. रिने लेट्र्झमॅन यांनी ‘हवामान मानसशास्त्र’ ही नवी ज्ञानशाखा विकसित केली आहे. त्या म्हणतात, ‘‘चिंता व आघात या विकारांनी व्यक्तीचा ताबा घेतला की कृतिप्रवणता नष्ट होते.’’ त्या पर्यावरण- हवामान क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना मानसशास्त्रीय दृष्टी (इनसाइट्स) देत आहेत. अमेरिका, ब्रिटन, चीनमधील विद्यापीठे, ‘वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड’, ‘गूगल’ व हवामान कृतीसाठी कार्य करणाऱ्या अनेक संस्थांच्या त्या सल्लागार व प्रशिक्षक आहेत. सार्वजनिक संस्था, शासकीय अधिकारी व राजकीय नेते यांनी हवामानबदलाची आणीबाणी लक्षात घेऊनही ती कशी संयमानं हाताळावी, संवाद कसा साधावा, याविषयीचा सल्ला देण्याकरिता डॉ. लेट्र्झमॅन यांनी अन्य मानसशास्त्रज्ञांना सोबत घेऊन ‘क्लायमेट सायकॉलॉजी अलायन्स’ ही आघाडी उघडली आहे. त्यांच्या मते, ‘कोणत्याही बा कारणांमुळे हताशा, उद्विग्नता आल्यास ती वाटचाल ‘हवामानबदलासारख्या जगड्व्याळ समस्येपुढे मी काहीच करू शकत नाही’ अशा हतबलतेकडे होते. त्यातून मानसिक चिंतेची पातळी वाढत जाते. त्यामुळे आपल्या भावनिक प्रतिक्रियेची तीव्रता कमी करून आपली सहनशीलता वाढवणं गरजेचं आहे. या प्रयत्नांतून कोणत्याही व्यक्तीला स्वत:ची भावनिक बुद्धिमत्ता वाढवता येते. हा पहिला टप्पा पार केला की कृतिप्रवणतेकडे जाणं अगदी स्वाभाविक होऊन जातं.’’
पर्यावरणीय मानव्यशास्त्रामध्ये (एनव्हायर्नमेंटल ुमॅनिटिज) पर्यावरण, तत्त्वज्ञान, मानववंशशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखा व उपशाखांचा संगम घडवून संशोधन केलं जातं. त्यातील अभ्यासानुसार, ‘हवामानबदल कसा रोखावा?’ अशी मांडणी न करता ‘हवामान- बदलाचे परिणाम हे वैयक्तिक व सार्वजनिक आयुष्यात कसे होत आहेत?’ यावर अधिक रोख असावा असं वैज्ञानिक सांगत आहेत. गोर यांच्या कैकपटीने अधिक पाठिंबा मिळवणाऱ्या ग्रेटा थुनबर्गच्या आंदोलनातून (२०१८-१९) याची प्रचीती आली आहेच. तिने विज्ञान सांगताना नीती व मूल्ये यांविषयी प्रश्न उपस्थित करून विवेकाला आवाहन केलं आहे. त्यामुळे जगभरातील आबालवृद्ध तिच्यासोबत आले आहेत. तेव्हापासून ग्रेटाचं निवेदन हृदयाला का भिडतं, याविषयी चर्चा सुरू झाली. तरीही ‘हवामानबदल रोखा’ म्हणणाऱ्यांचं बळ हे निर्णायक (क्रिटिकल मास) नव्हे. प्रत्येक देशातील निवडणूक (आताची अमेरिकेचीही!) याची जाणीव करून देत आहे. लोकांची समज (पर्सेप्शन) व वैज्ञानिक वास्तव यांच्यातील अंतर मिटवणं आवश्यक आहे. भावनेला विज्ञानाची जोड देता आली तर हवामानबदलाची लोकचळवळ होऊ शकेल. अर्थात् त्यासाठी प्रत्येकाने आपल्या भावना कठोरपणे तपासायला हव्यात. वर उल्लेख केलेले सर्व वैज्ञानिक भावनिक बुद्धिमत्तेची पातळी उंचावण्याकरता कला महत्त्वाची आहे असं मानतात. जनमानसावर विलक्षण प्रभाव टाकण्याची क्षमता कविता, कथा, चित्रात असू शकते. अगदी मोजक्या शब्दांत लोकभावनेचं मर्म सांगण्याची किमया एखादी घोषणा करू शकते आणि तिथून जनांचा प्रवाहो चालू शकतो.
झरे, ओहोळ, नाले, ओढे एकत्र येत पुढे नदी बनते. नदीची धार म्हणजे खळाळता प्रवाह. बाजूचे दोन काठ त्याला बांध घालत असतात. विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी ‘धार आणि काठ’ (१९७१) या ग्रंथात मराठी कांदबऱ्यांमध्ये आलेल्या विविध प्रवाहांची समीक्षा केली होती. त्यांनी भावनांच्या प्रकटीकरणाला तर्काच्या अन्वयांचे काठ लावले होते. कुरुंदकरांनी भावनांचे महापूर पाहिले होते आणि विवेकी पर्वाचे प्रयत्नही अनुभवले होते. साहित्यिकांनी अधिक वास्तवदर्शी, तार्किक व्हावं याकरिता कुरुंदकर प्रयत्नशील होते. त्यांचेच रूपक वापरून म्हणता येईल की, लोकभावनांच्या धारांना विवेक, विज्ञान व तर्काचा भक्कम काठ लावण्याची गरज प्रत्येक काळात असते. साहित्यिक, वैज्ञानिक व तत्त्वज्ञ हे वेळोवेळी आपापली भूमिका वठवून जातात. अभ्यासांती ते त्यांच्या मांडणीत बदलही करीत असतात. प्रश्न.. आपलाच आहे.