समकाळातील महत्त्वाच्या कवयित्री म्हणून नीरजा यांची ओळख मराठी साहित्यविश्वाला आहे. त्यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि एकूणच लेखनविषयक भूमिका सर्वश्रुत आहे. या भूमिकेचा प्रत्यय वाचकांना त्यांच्या कविता आणि कथात्म साहित्यातून वेळोवेळी आलेला आहे. अगदी अलीकडेच त्यांचा ‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी..’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ऐंशीच्या दशकापासून लेखन करणाऱ्या नीरजा यांची कविता प्रत्येक संग्रहागणिक अधिक प्रगल्भ होत गेलेली आहे. बहुकेंद्री अनुभवविश्व ही त्यांच्या व्यक्तित्वाची खरी ओळख आहे. या संग्रहात एकूण ८८ कविता आहेत. अनुभवाची, आविष्काराची अनेक अर्थपूर्ण रूपे या कवितेतून भेटतात. ही कविता वाचकाला अंतर्मुख करते. कवितेतील प्रत्येक अनुभवाच्या मागे कवयित्रीचे संवेदनशील मन आहे. समकाळातील अनेक सामाजिक, राजकीय संदर्भ या कवितांमध्ये असले तरी प्रामुख्याने ‘स्त्रीसंवेदना’ हा या संग्रहाचा केंद्रबिंदू आहे. मानसिक अंगाने घडलेल्या पुरुष मनातल्या स्त्रीप्रतिमेचा ही कविता जसा विचार करते, तसाच स्त्रीत्वाच्या आदिम, प्राकृतिक भावविश्वाचा शोधही घेते. हा शोध अर्थातच सर्वस्पर्शी आहे.
आपल्या सांस्कृतिक इतिहासाने स्त्रीचे एक रूप सात्त्विक आणि सर्जनशील, तर दुसरे रूप तामस आणि संहारक दाखवले आहे. या दोन्ही प्रतिमांनी स्त्रीत्वाच्या मानसिक अवकाशाची, तिच्या अस्तित्वाची कुचंबणा आणि निर्भर्त्सना केली आहे. पूर्वकाळातील या मानसिकतेला कवयित्री नव्या काळाच्या पार्श्वभूमीवर समजून घेते. त्यामुळे यातील बहुतांश कविता स्त्रीत्वाच्या आदिबंधाच्या मानसिक अर्थाचे सूचन करतात. ‘तिला माहीत नसतं/ भरताना ओटी खणानारळाची/ ती सोपवत असते माझ्याकडे/ बाईच्या सौभाग्याची अन् ओटीतल्या समृद्धीची मिथकं’ (पृ. ३४) स्त्रीत्वाला स्पर्श करणाऱ्या आधुनिक प्रतिमांमधून ही कविता अभिव्यक्त होते. त्यामुळे या कवितेला समकालीन मानवी वर्तनव्यवहार, विचारधारा आणि विशिष्ट स्वरूपाचे सांस्कृतिक संकेत इत्यादींच्या संदर्भात समजून घ्यावे लागते. तसे केले तरच या कवितेचा मूळ स्वभाव आणि कवयित्रीच्या वैचारिक भूमिकेचा परिचय होईल.
हेही वाचा : विचित्रपट तयार करताना..
‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी’ ही केवळ एक शब्दसंहिता नाही; तर समकाळाचे एक मानवतावादी प्रारूप आहे. माणसाच्या परस्परसंबंधाचा, त्याच्या आंतरिक ताणतणावाचा, त्याच्या सर्जक भावविश्वाचा हा विवेकी शोध आहे. या शोधाच्या मागे कवयित्रीची विशिष्ट अशी जीवनदृष्टी आहे. लोकशाहीला अपेक्षित असणारे आश्वासक भोवताल नसणे, हा आजच्या काळातला मोठा पेच आहे. अशा वेळी माणसाच्या अस्तित्वाचे आकलन कसे करून घ्यायचे, हा प्रश्नच असतो. माणसापुढे परात्मतेचा गंभीर प्रश्न आहे. कला, तत्त्वज्ञानासह अनेक ज्ञानशाखांपुढे हा प्रश्न आहे. भौतिक पातळीवरच्या अनेकस्तरीय देवघेवीमुळे माणसाचे ‘स्वत्व’ आणि त्याच्या अस्मितांचा संकोच होत आहे. त्याचे अस्तित्व केवळ वस्तुरूप बनत आहे. व्यवस्थेसह मूल्य, श्रद्धा आणि संविधानाविषयी काही प्रश्न निर्माण झाले की परात्मतेची तीव्र जाणीव होते. ही जाणीव होऊनही ज्यांना नििश्चत राहता येते ते संत असतात. इतरांना मात्र ते जमत नाही. तथाकथित आदर्श तत्त्वज्ञान किंवा नैतिक मूल्यांचा विसर पडून समाज एका विस्तीर्ण पोकळीत विखंडित होतो. अशा विखंडित मानवी समूहाचा, मूल्यव्यवस्थेचा, नि:सत्त्व जाणिवेचा, सामूहिक वांझपणाचा ही कविता विचार करते. आत्मदुराव्याचे एकाकीपण ही आजच्या काळातील समस्या आहे. कवयित्री या भीषण विश्ववास्तवाला संवेदनशीलतेने प्रतिसाद देते. सामूहिक मनोव्यापाराचा नव्याने अन्वयार्थ लावते. ‘माणसं खेळताहेत युद्ध युद्ध आदिम काळापासून/ शोषणाचा समृद्ध इतिहास आहे आपला/ तरीही करता आहात तुम्ही शांततेची बोलणी’ (पृ. १४६) आपण ज्या समूहात राहतो त्या संस्कृतीचा अर्थच न लागणे किंवा त्या समूहाचा मनोव्यापार न कळणे, ही गोष्ट सामाजिक भावसंबंधातील अंतर्विरोध स्पष्ट करणारी असते. या अंतर्विरोधाचा कवयित्री प्रतीकात्मकतेने शोध घेते.
हेही वाचा : प्रतीकांचा प्रभाव
सहजीवनातून भावनेची उत्कटता नष्ट झाली की मानवी मन अंतर्बा हादरून जाते. विशेषत: स्त्रियांसाठी हा अनुभव अधिक त्रासशील असतो. ‘संस्कृती नावाच्या/ काळय़ाकभिन्न वास्तवाचं’ नीरजा यांनी केलेलं चित्रण प्रचंड अस्वस्थ करणारं आहे. ‘बाई/ तुझी वेदना जाणणारा स्पर्श मिळो/ तुझ्या मनाच्या काठावर विसावलेल्या पुरुषाला/ त्याच्या आत लपलेली बाई सापडो/ तुझ्या सर्जनाचा झरा खळाळत राहो’ (पृ. ६४) हे सद्भावनेचं ‘पसायदान’ खूप आश्वासक वाटतं. माणसाच्या संकुचित आणि क्षुद्र मनोवृत्तीचा, त्याच्या संस्कृतीच्या पोकळपणाचा आणि त्यातल्या हिंस्रतेचा, आचारधर्माचा कवयित्रीने केलेला विचार थक्क करून टाकतो. सांस्कृतिक संकटांवर बोलणारी ही कविता नवनिर्माणाची आस बाळगणारी आणि आत्मसन्मानाचा मार्गशोध घेणारी आहे. ही कविता समग्र स्त्रीजाणिवेचा आणि काळाचाही एका विशिष्ट मनोभूमिकेतून विचार करते. हा विचार अर्थातच सत्याचा, माणुसकीचा आहे. या विचारामागे कलावंत म्हणून असलेल्या जबाबदारीची आणि बांधिलकीची नैतिक प्रेरणा आहे. अर्थात अशी प्रेरणा उसनी घेऊन दु:खाची चिकित्सा करता येत नसते किंवा सांस्कृतिक संभ्रमावर भाष्यदेखील करता येत नसते, तर ही प्रेरणा जगण्याचा एक स्वाभाविक भाग असायला हवी. त्याशिवाय शोषित जाणिवांचा आवाज होता येत नाही.
हेही वाचा : आदले । आत्ताचे : अद्भुताला स्पर्श…
नीरजा यांची एकूणच लेखनविषयक भूमिका कायमच सकारात्मक आणि कृतिशील हस्तक्षेप करणारी राहिलेली आहे. विशेषत: नव्या सामाजिक परिवेशात दडलेल्या अनेक नकारात्मक गोष्टी या कवितेच्या कक्षेत येतात. उत्तर आधुनिक काळातील नवमाध्यमांनी आणि तंत्रज्ञानाने विस्कटून टाकलेली जीवनमूल्ये, नवे सत्ताकारण आणि त्याचा व्यवस्थेवर झालेला दूरगामी परिणाम, सामाजिक सभ्यतेचा झालेला संकोच, बदललेली लोकमानसिकता- भाषा, भीतीग्रस्त भोवताल, नव्या काळाने निर्माण केलेल्या व्यक्तिकेंद्री जाणिवा अशा किती तरी गोष्टींवर कवयित्री कळत-नकळत भाष्य करते. नीरजा यांची कविता एक उच्च दर्जाचे चिंतन आहे. हे चिंतन काळाची असंख्य आशयसूत्रे कवेत घेणारे जसे आहेत, तसेच दु:ख, अभाव, दहशत आणि अर्थशून्यता अशा समाजव्यवहारातील निर्णायक तफावतींचेही अर्थगर्भ चिंतन आहे. ‘स्व’च्या पलीकडे जाऊन दु:खाच्या सनातन जाणिवेला उजागर करणारी ही कविता आहे. ‘अमर्याद आकांक्षांची चादर पांघरून झोपी गेलेला तो/ चाचपडतो आहे/ त्याला लपेटून असलेल्या तृष्णांचे पदर’ (पृ. २९) किंवा ‘माझ्या बायांनो../ शंभर वर्षे उलटून गेलीत आता/ तरी कशासाठी सांभाळता आहात हा वेदनेचा घरंदाज वारसा’ (पृ. ७१) अशा असंख्य ओळींतून स्त्रियांच्या मानसिक धारणांना अधोरेखित करून ही कविता आत्मभानाची जाणीव निर्माण करू पाहते.
हेही वाचा : चौसष्ट घरांच्या गोष्टी: नित्यदिग्विजयी निहाल..
स्त्रियांविषयी, मुलींविषयीची एक व्यापक आस्था या संग्रहात शब्दाशब्दांत जाणवते. ही आस्था वरवरची नाही, तर कवयित्रीचाही ‘बाई’पणाच्या अनेक अवस्थांतराशी जैविक संबंध आहे. त्यामुळेच ती पुरुषसत्ताक मूल्यव्यवस्थेची, संरचनेची, सांस्कृतिक प्रतीकांची, मूल्यभ्रष्ट दृष्टिकोनाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष चिकित्सा करते. शरीरनिष्ठ अनुभवाच्या पलीकडे जाऊन केलेला हा विचार लक्षणीय आहे. कारण या विचारात जात, धर्म, संस्कृती, लिंग, वर्ग, राजकारणासह किती तरी शोषणकेंद्रे अंतर्भूत आहेत. या प्रत्येक केंद्राने स्त्रीस्वातंत्र्याला आणि तिच्या आत्मसन्मानाला नेहमीच छेद दिला आहे. अशा वेळी वैचारिक बदलाची दिशा सूचित करणारी ही कविता नव्याने स्त्रीमानस घडवणारी महत्त्वाची घटना वाटते. नव्या अवकाशाची मागणी करणारी आणि स्त्री-पुरुष संबंधाच्या मर्यादित भावविश्वाच्या किती तरी पुढे जाणारी ही व्यापक आणि सर्वसमावेशक अभिव्यक्ती आहे. ‘या दिशाहीन शतकात ओतलं जात आहे माझ्या घशात/ राष्ट्रवादाचा ग्राईपवॉटर/ मेंदूच्या आत भरताहेत भुसा हिंसेचा/ विकासाच्या बेडक्या फुगवून आखाडय़ात उतरलेले लोक/ कापताहेत माझी लिहिती बोटं’ (पृ. ९५) परंपरावादी विचारधारेचा उपहास करणारी ही कविता विचारस्वातंत्र्यासह किती तरी प्रश्नांना धीटपणे अधोरेखित करते, ही या संग्रहाची जमेची बाजू आहे. ‘मुंबई’, ‘काश्मीर मला भेटलेलं’, ‘केप ऑफ गुड होप्स’, ‘युद्धाच्या कविता’, ‘खैरलांजी ते कोपर्डी’ अशा काही कविता कवयित्रीच्या सामाजिक भानाची प्रचीती देतात. अलीकडच्या काळातील हा एक आश्वासक संग्रह म्हणून वाचक या संग्रहाची नक्कीच नोंद घेतील.
‘विध्वंसाच्या वेदीवर चढण्याआधी..’, – नीरजा, पॉप्युलर प्रकाशन, पाने- १५०, किंमत- ३०० रुपये.
p.vitthal75@gmail.com