आजचे संवेदनशील कवी व गीतकार म्हणून दासू वैद्य परिचित आहेत. भोवतालातील घटना, व्यक्ती आणि मानवी जगण्याकडे कवीच्या नजरेतून पाहणारे त्यांचे नवे पाक्षिक सदर..

विद्यापीठाचं रिसर्च हॉस्टेल. १९९२-९३ चा काळ. विज्ञान शाखेतले संशोधक संख्येने जास्त. त्यात भाषा, सामाजिक शास्त्रातील आम्ही काही बोटावर मोजण्याएवढेच. पण सगळे मिळूनमिसळून. पेपरवाचन, टीव्ही, lok01गप्पांचं गुऱ्हाळ, बऱ्याचदा जेवण.. सारं काही एकत्र. हॉस्टेलची प्रत्येक खोली म्हणजे एक स्वतंत्र प्रकरण. इथिओपियाचा रझ्झाक, सोमालियाचा पॅट्रिक, केरळचा थॉमस, वारकरी असणारा गात, अबोल राहणारा खामकर, जाता-येता सगळय़ांना हटकणारा शिंदे, आंघोळीच्या वेळी अंगाला साबण लावून कॉरिडॉरमध्ये फिरणारा रफिक, प्रत्येकाच्या कानाशी हितगुज करणारा देशपांडे, निवांत असणारा मुंढे, प्राण्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारा अनिल, विद्यापीठाच्या युवा राजकारणात व्यस्त असणारे किरण व आण्णा, हळूच गादीखालच्या कविता काढून वाचून दाखवणारा कांबळे असे कितीतरी. या सर्वात वेगळा होता तो केरळचा श्रीनिवासन. बॉटनीमध्ये संशोधन करायचा. तोडकीमोडकी हिंदी. इंग्रजी मात्र मधाळ बोलायचा. सदान्कदा गडबडीत असायचा. हॉस्टेलसमोरच्या मैदानात सकाळ-संध्याकाळ आमच्या गप्पा रंगायच्या. श्रीनिवासन ‘येस..येस’ करीत यायचा. थोडंसं थांबल्यासारखं करून मोठय़ा आदबीनं परवानगी घ्यायचा, ‘शाल आय मुव्ह?’ आणि लॅबमध्ये निघूनही जायचा.
श्रीनिवासन दिसायचा हिंदी मालिकेतल्या पात्रासारखा. केव्हाही टापटीप. शर्टची बटनं गळय़ापर्यंत लावलेली. विस्कटलेले केस नाहीत की चुरगळलेले कपडे नाही. केसांचा देवानंदसारखा फुगा. पुराणातल्या देवांना दाढी-मिशा नसतात तशी सदोदित क्लीन शेव्ह. इस्त्री केलेले सोबर रंगाचे कपडे. नेहमी इन् शर्ट. पायात चकाकणारे काळे बूट. भित्रेपणा वाटावा अशी विनयशीलता. त्यामुळे श्रीनिवासन खूपदा थट्टेचा विषय व्हायचा.
बऱ्याचदा संध्याकाळी विद्यापीठ गेटजवळच्या मोनू हॉटेलमध्ये अड्डा बसायचा. गरमागरम, कडक गोल्डनlr07 चहा पिणाऱ्यांची तिथे गर्दी असे. या हॉटेलला लागून असणाऱ्या एसटीडी बूथवर फोन करणाऱ्यांचाही चांगलाच राबता होता. तेव्हा मोबाइल नव्हते. हॉस्टेलवर राहणाऱ्यांना घरच्यांशी किंवा बाहेर कुठं बोलायचं असेल तर एसटीडीवरूनच बोलावं लागे. आम्हीही तिथूनच फोन करायचो. श्रीनिवासन चहा प्यायचा आमच्यासोबत; पण फोन लावायला मात्र लांबच्या दुसऱ्या एसटीडी बूथवर जायचा. काही दिवसांनंतर श्रीनिवासनचं मुद्दाम लांबच्या एसटीडीवर जाणं आम्हाला उगीच खटकू लागलं. आमच्या एसटीडीवाल्याशी श्रीनिवासनचं काही बिघडलं असण्याची सुतराम शक्यता नव्हती. कारण त्याचा कोणाशीच वाद होणं शक्य नव्हतं. त्याला काही खासगी हितगुज करायचं होतं असंही नव्हतं. फोनचं बिलही सगळीकडे सारखंच होतं. इतरही काही कारणं सापडेनात. उलट, आमचा एसटीडीवाला हसतमुख आणि सुस्वभावी होता. पण श्रीनिवासन शेवटपर्यंत आमच्या एसटीडी बूथवर आलाच नाही. खूपदा मागे लागल्यावर त्याने एकदा न येण्याचं कारण सांगितलं. कारण ऐकून आश्चर्यापेक्षा जास्त हसू आलं. काय होतं कारण? या एसटीडी बूथवर लाल रंगाचा फोन होता. या लाल रंगाच्या फोनमुळे श्रीनिवासन अस्वस्थ व्हायचा. त्याला बोलणं सुचायचं नाही. त्यामुळे श्रीनिवासन हा एसटीडी बूथच टाळायचा. ही बातमी हळूहळू हॉस्टेलमध्ये पसरली. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने श्रीनिवासनची टर उडवली. कुणी त्याला खोदून प्रश्न विचारले. कोणी ‘‘ ‘रेड वाइन’ चालेल का?’’ असं विचारलं. एकाने त्याला लाल रंगाचा पेन भेट दिला. बिचाऱ्याला जरा त्रासच झाला. श्रीनिवासन मात्र शांत राहिला. लाल रंगाच्या फोनमागची गोष्ट त्याच्या महाकाय मौनाखाली दबून गेली. पुढं रिसर्च संपवून विनम्रपणे ‘शाल आय मूव्ह?’ म्हणत श्रीनिवासन गावी निघून गेला. आम्हीही पोटापाण्याच्या शोधात पांगलो.
परवा ‘खेळ’चा २०१४ चा दिवाळी अंक हाती आला. एका कवितेजवळ थांबलो. बोलीभाषेतला संवाद असलेली ‘गायीचे डोळे’ ही विनायक पवारांची कविता..
‘ए.. माय
आत्ताच जेवलास ना मुडद्या
भाकर नई माघत वं
मंग जिव मागतो क काय मव्हा?
ए माय.. ते हिरवं लुगडं
तू नेसत जाऊ नको
काहून रे बाप्पा?
माये तुपल्या अंगावरचं
हिरवं लुगडं पाहून
गायीचे डोळे चमकतेत.’
ही कविता वाचून पुन्हा एकदा श्रीनिवासन आठवला. दुष्काळग्रस्त भागातल्या झोपडीतला माय-लेकाचा संवाद. दुष्काळात करपलेल्या खोपटात लेकरानं हाक मारली म्हणजे तो भाकरी मागेल याची मायीला भीती आहे. लेकराचं मात्र मायीकडं वेगळंच मागणं आहे. हिरव्या रंगाचं लुगडं मायीनं नेसू नये असं मुलाला वाटतंय. ठिगळाचं का होईना, पण मायीनं नेमकं हिरव्या रंगाचंच लुगडं नेसलंय. मुलाचा असलेला हिरव्या रंगाला विरोध कुणाला आश्चर्यकारक आणि गमतीदार वाटू शकतो. (जशी लाल रंगाचा फोन बघून श्रीनिवासनला येणारी अस्वस्थता हास्यास्पद ठरली होती.) हिरव्या लुगडय़ाला विरोधाचं कारण मुलगा एका वाक्यात सांगतो, ‘माय, तुपल्या अंगावरचं हिरवं लुगडं पाहून गायीचे डोळे चमकतेत.’ हे कारण कळल्यावर आपला अस्वस्थ श्रीनिवासन होतो. दुष्काळी परिस्थिती. खाण्यापिण्याची मारामार. जनावरं चारा छावणीत नेऊन बांधावीत, नाहीतर खाटकाला विकून टाकावीत. माणसाला प्यायला पाणी नाही; मग ढोरांना चारा कुठून मिळणार? बिचारी मुकी जनावरं मरणघटका मोजत बसून आहेत. अशावेळी हिरवा रंग दिसला तरी ढोरांना चाऱ्याचा भास होऊ शकतो. भुकेची कळ तीव्र होऊ शकते. गाईच्या डोळ्यात भुकेची वेदना मुलाने पाहिलेली आहे. या भीतीपोटी कवितेतला मुलगा मायीला हिरवं लुगडं नेसायला मज्जाव करतोय. म्हणजे एखाद्या रंगाचा संदर्भ किती जीवघेणा असू शकतो!
भरतमुनींनी त्यांच्या नाटय़शास्त्रात नाटक करणाऱ्यांसाठी काही नियम सांगितले आहेत. त्यातला एक नियम म्हणजे नाटय़प्रयोगात रंगमंचावर भोजनाचं दृश्य दाखवू नये. भरतमुनींच्या मते, रंगमंचावर प्रयोग सुरू असताना पात्र उघडपणे पदार्थाचा आस्वाद घेऊ लागले तर प्रेक्षकांच्या भावना चाळवल्या जाऊ शकतात. नाटय़ास्वादात व्यत्यय येऊ शकतो. खरं तर आजच्या नाटय़प्रयोगांचा विचार करता नाटकाला आलेले बरेच प्रेक्षकच नाटक सुरू असताना काय काय खात असतात. कदाचित पुढच्या रांगेतील प्रेक्षकांच्या या खाऊगिरीमुळे रंगमंचावरच्या कलावंतांच्या भावना चाळवल्या जाऊ शकतात. त्यामुळे भरतमुनींच्या नियमांत ‘रंगमंचावर व प्रेक्षागृहात प्रयोग सुरू असताना कुणीच कुठलेही खाद्यपदार्थ खाऊ नयेत’ अशी सुधारणा करण्याची वेळ आलेली आहे. थोडक्यात काय, तर रंग, गंध असेही त्रासदायक असू शकतात. रंगमंचावर खाण्याचे दृश्य दाखवू नये असं सांगणारे भरतमुनी असोत किंवा कवितेतील मायला हिरवं लुगडं नेसू नको म्हणणारा मुलगा असेल; परिस्थिती वेगळी असली तरी दोघांचीही भूमिका सारखीच आहे.
रंगांना आपले वैयक्तिक संदर्भ चिकटतात. मग रंग आवडते होतात. कधी नावडते होतात. काही रंगांना आल्हाददायक ठरवलं जातं. काहींना त्रासदायक ठरवलं जातं. पण रंगांचे संदर्भ येतच राहतात. कवी वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांमधून येणारे काळय़ा रंगाचे संदर्भ भीषण आहेत. काळोखाच्या निमित्ताने व इतर स्वरूपातही या कवितांमधून काळा रंग येत राहतो. काळी पाखरे, काळा सूर्य, काळय़ा काचेतून पाहावा, काळय़ा फुलांचा सडा, काळा गाढ रंग, काळय़ा घोडय़ांच्या टापा, पांढऱ्यावर काळे करणारे शब्द, काळसर पाण्यात, काळी कुरतड, काळा पक्षी, कोळशाच्या काळय़ा भुकटीनं, अज्ञाताचं काळं बोट कपाळावर टेकलं गेलं, जिभेवर काळ्या श्लेषाची कडवट चव, दहशतीचं काळं मांजर, दहशतीचा काळा खेकडा, काळय़ा रंगाचे जाड पडदे, काळय़ा बंद मोटारी, चरित्राच्या काळ्या मातीत, काळोखाची राजवट, धुरानं काळवंडलेलं आभाळ.. हा काळा रंग भोवताल व्यापतजातो. शेवटी बाजारात फक्त काळे कागद उरल्यामुळे दऊतभर पांढरी शाई शोधण्याची वेळ येते. डहाक्यांच्या कवितेत भरून राहिलेल्या काळय़ा रंगाची गोष्ट समजावून घेताना या कवीचं चंद्रपूर भागात गेलेलं बालपण समोर येतं. त्या भागातील कोळशाच्या खाणी.. सर्वत्र पसरलेली कोळशाची काळी भुकटी.. काळा धूर.. कवितेतून पुन:पुन्हा डोकावत राहतो. हा काळा रंग निग्रो कवी लँगस्टन ह्युजेस यांच्या कवितेत वेगळ्या स्वरूपात येतो. त्यांच्या एका कवितेची प्रत्येक ओळ आणि ओळीतला प्रत्येक शब्द- ‘ब्लॅक.. ब्लॅक.. ब्लॅक’ असाच आहे. शोषितांमध्ये घर करून बसलेली ही काळीकुट्ट जाणीव भयावह आहे. यावरती जाऊन बेन्झामिन मोलाईसे हा गोरा कवी काळ्यांची वेदना जाणून घेण्यासाठी रसायनाच्या मदतीने स्वत: काळा झाला. बदललेली काळी कातडी घेऊन स्वत:च्याच घरी गेला तेव्हा अपमानित झाला. तेव्हा त्याला काळ्या रंगाची वेदना कळली.  हे रंग बऱ्याचदा गोंधळात टाकतात. मुला-मुलींचे ‘स्लॅम बुक’ भरून देताना काहीही प्रश्न विचारलेले असतात. बुबुळाच्या रंगापासून ते जीवन कसं जगावं? अशा बेछूट प्रश्नांची उत्तरं भरायचं काम मला फार अवघड वाटतं. विचारलेला असतो- ‘आवडता रंग?’ माझा गोंधळ उडतो. कारण आभाळ भरून आल्यावर ढगांचा काळा रंग मला आवडतो. पण गावाकडच्या बोळीत लहान मुलांना भीती दाखवायला दबा धरून बसलेल्या अंधाराचा काळा रंग मला आवडत नाही. मग काळा रंग आवडता की नावडता? श्रावणातल्या पानांचा हिरवा रंग मला आवडतो. पण दवाखान्यातल्या आयसीयूमध्ये लावलेल्या पडद्याचा हिरवा रंग मला आवडत नाही. मग हिरवा रंग आवडता की नावडता? हे काहीही असो; पण ज्याचा पेरू आतून लाल निघायचा त्याला आम्ही भाग्यवान समजायचो.
पौर्णिमेच्या मध्यरात्री कमळाच्या तळ्यात एकसाथ कमळं उमलतात. त्याक्षणी संपूर्ण तळ्यात रंग कालवला जातो म्हणे. असे दृश्य मनोहर ओक नावाच्या मनस्वी कवीने अनुभवलेले असावे. म्हणूनच ‘बगळा उडून जाताना.. थोडासा शुभ्र गलबला’ अशी ओळ ते लिहू शकले. आपल्याभोवती पसरलेले अनेक रंग आपण पाहत असतो, अनुभवत असतो. पण एखादा रंग विसरताच येत नाही. एकदा तहसील कार्यालयात कामानिमित्त गेलो होतो. अनवाणी पायांनी एक खेडुत बेंचावर बसला होता. रापलेला चेहरा, विटलेले, विरलेले कपडे. कष्टकरी होता. कुणीतरी त्याला हाक मारली. हातातली कागदं सावरत तो उठून गेला. माझं सहज लक्ष गेलं. बेंचाखाली त्या खेडुताच्या पायाच्या जागी लाल रंग ठिबकलेला होता. सरकारी कार्यालयाची चकचकीत फरशी जखमी झालेली होती. फुटलेल्या टाचांतून लाल रंग ओघळलेला होता.
या लाल रंगाचं श्रीनिवासनच्या लाल रंगाशी काय नातं असेल?    

Story img Loader