‘‘च्या यला, संप म्हणजे शाप आहे शाप. अरे, एका वर्करचं राहू दे, पण अख्ख्या कंट्रीचं किती नुकसान होतं माहितीये एका दिवसात? निदान एक दशलक्ष रुपये; पण याचा विचार करतो कोण! इकॉनॉमी सांभाळायची जबाबदारी आपली नाही असं समजतात सगळे. सोशल स्टँडर्ड lr09तर इतकं लो होतं या संपकाळात.. आता मनोहरपंत, तुम्ही एक सुपरवायझर आहात म्हणून अगदी विशेष जाणवत नसेल तुम्हाला. पण, अहो, किती तरी दारूची िपपं हा संप रिकामी करायला लावतो. किती तरी छोटे छोटे िशपले उघडे पडतात.’’
पोह्य़ाच्या बश्यांवर बश्या संपवून, येणाऱ्या ढेकरीबरोबर वाक्यं फेकतानाच आणखी फक्त एकदाच ‘नको नको’ म्हणत मेव्हणेबुवांनी बशी पुढं केली. ज्याअर्थी एवढी बडबड सकाळी उठल्या उठल्या मामानं चालवली आहे, त्याअर्थी रात्री स्वप्नात त्याला भला मोठा राक्षस दिसला असावा, असा विचार करून लहानग्या िपटय़ानं मोठा आ वासून छोटासा पोह्य़ांचा घास उडवून चमचा तोंडात कोंबला. ‘हिनं’ भावाच्या वाक्यावर गहिवरल्या डोळ्यांनी पाणी प्यायलं आणि मी निमूटपणे माझी पोह्य़ांची बशी विसळून पुन्हा जागेवर बसलो.
‘‘पण काय हो, मनोहरपंत.. हा अश्वमेध कुणाचा?’’ जरा खासगी बोलल्यासारखा प्रश्न. केवळ १८ वष्रे वयाचा घोडा. त्याला आपला नाटकाचा शौक दाखवायची संधी इथंही सापडली.
‘‘सुरेशबाबू, चाकाखाली जाताना ड्रायव्हिंग कोण करतंय हे कसं दिसणार?’’ सुरेश म्हणजेच आमचे मेव्हणे क्रमांक चार. माझ्या या वाक्यावर ठसका लागला त्याला. वाटलं, बरं झालं. संपली चर्चा इथंच; पण नाही.
‘‘ताई, हे आपलं बरं नाही? कुणीही उठावं, दत्ता सामंत नाही तर शरद जोशी बनावं!’’
यावर मी शांतपणे उद्गारलो, ‘‘का? आंदोलनात बळी गेलेला एखादा कामगार नाही तर शेतकरी बनलं तरी नाव येऊ शकेल ना पेपरात!’’
मेव्हणेबुवांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा दिसली नाही म्हटल्यावर त्यांची बहीणही हसली नाही अन् लगबगीनं त्या चच्रेला तिथंच फाटा देत म्हणाली, ‘‘चला, उठा आता. लवकर आंघोळीपांघोळी उरकून घ्या. आज काय बाई, मोलकरणींचा संप असल्याची कुणकुण आहे. सगळं मेलं मलाच आवरायचंय. कितीही पसे ओता यांच्यावर, पण माजोरीपणा कायम.’’
‘‘अगं, पण आई, आपल्या बाबांना नाही तरी आता सुट्टीच आहे ना?’’ इति कन्यारत्न. वाटलं दाखवावं चांगलं चौदावं रत्न. पण पुढचं वाक्य ऐकून हात आवरला. ‘‘..त्यांना गडबड नाही कसलीच. जरा आवरलं सावकाश तरी हरकत नाही ना?’’
‘‘अगं मने, तुझ्या बाबांना लवकर आवरून तयार झालं पाहिजे. आम्ही आता बाहेर पडणार आहोत लवकर. काय मनोहरपंत, आज कुठं जायचं?’’
सुट्टीसाठी माझ्या राशीला येऊन बसलेल्या या मेव्हणेबुवांना पुणं दाखवायची जबाबदारी माझ्यावर होती ना! पुन्हा यांना दाखवायची प्रेक्षणीय स्थळं काही विलक्षणच होती.
शनिवारवाडा अन् पर्वती दाखवली की तोंड काळं करेल असं मला साहजिकच वाटलं होतं. पण कुठं केसरीवाडा दाखवा म्हणेल; कुठं साहित्य परिषदेत जाऊन बसू म्हणेल; नाही तर नव्या पुलावरनं ओंकारेश्वराजवळची जुनी मंदिरं तासन्तास बघत उभा राहील अन् मंदिर असताना कसं दिसत असेल याचं चित्रं माझ्या डोळ्यांपुढं उभं करण्याचा हट्ट धरेल. वैकुंठ स्मशानभूमीत फेरफटका मारून येऊ म्हणत नाही तोवर नशीब, असं समजून मी, पोटात कावळे, डोळ्यांसमोर काजवे आणि डोक्यात संपाची अन् संपत चाललेल्या गंगाजळीची चिंता ठेवून त्याच्यामागे फरफटला जात होतो. त्याच्या निमित्तानं घरी मनापासून जेवण मिळत होतं हाच त्यातला त्यात आनंद.
माझी नक्की खात्री होती की, या टेकोजीरावांच्या जागी माझा धाकटा भाऊ असता तर त्याच्यापुढं आमच्या संपकाळातल्या भीषण दारिद्रय़ाचं रडगाणं गायलं गेलं असतं अन् त्याला पळता भुई थोडी झाली असती.
‘‘मग काय, मनोहरपंत, आज आपण ती तुमची प्रसिद्ध शाळा, कुठली बरं? आहे बाजीराव रोडला, अगदी नाव तोंडावर आहे हो.. शताब्दी महोत्सवाचं काय काय नवीन केलं आहे ते पाहू. तिथल्या एका शिपायाची ओळख आहे माझी.’’ त्यांच्या डोळ्यांवरच्या जाड िभगातून आरपार दृष्टी खुपसून मी थंडपणे उद्गारलो, ‘‘कारखान्यावर येताय आमच्या, दगडफेक बघायला? जमलं तर करायलासुद्धा!’’
माझ्या या वाक्यानं मेव्हणेबुवा एकंदर हादरून गेल्याचं लक्षात आलं अन् टॉवेल गुंडाळून महाशय गुपचुप बाथरूममध्ये गेले आंघोळीला.
सालं? हा संप म्हणजे एक जुलमाचा रामराम झाला होता सुट्टीचा. काय करावं धड कळत नाही, घरात कुणी स्वस्थ बसू देत नाही. मधले चिरंजीव, वय वष्रे आठ. म्हणाले, ‘‘बाबा, मज्जाच मज्जा; तुम्हाला सुट्टी. आपण आता खूप गंमत करू. बागेत जाऊ, आईस्क्रीम खाऊ. अहो, ग्रेट बॉम्बे सर्कस आलीय डेक्कनवर, जाऊ या का?’’
‘‘तुला सर्कस दाखवायची, पगार बोंबलला मुद्दलात बेमुदत अन् तुम्हाला.. हॅ! पण तुला काय सांगणार! बरं का, बंडय़ा, मीच सर्कसमध्ये आधी काम करतो..’’ यावर फिक्कन् हसण्याचा आवाज आला अन् पाठोपाठ, ‘‘अ‍ॅहॅहॅ! विदूषक व्हायची तरी लायकी आहे का तुमची सर्कसमध्ये?’’ हा सौं.चा नेहमीसारखाच विषारी वाग्बाण.
मेव्हणेबुवा आल्यापासनं तर सिनेमा अन् नाटकं, खाणं-पिणं हे पशापलीकडचं काम झालं होतं. टी.व्ही.वर पाहिलेल्या नवीन पदार्थाचा समाचार आता घेऊन बघितला जाऊ लागला आणि डाएटिंग करण्याचा माझा काटकसरीचा उपदेश चक्क चुलीत घातला जाऊ लागला. मुलांची करमणूक करणं हेच माझ्या जीवनाचं सार्थक बनू लागलं आणि त्यांच्यावर राग काढण्याचं एकही निमित्त मी सोडत नाही हे पाहून सौं.नी तोंडसुख घेताना सुखावली जात होती.
मेव्हणेबुवांबरोबर गप्पा मारताना ओढूनताणून आणलेलं हसूही क्षणार्धात विरघळून जात होतं, कारण त्या गप्पांमधून जगातील किती तरी गोष्टींबद्दल नुसते ऐकून घेण्याइतके आपण अनभिज्ञ असल्याचा भास मला होत असे अन् माठातल्या गार पाण्याच्या घोटाबरोबर राग गिळण्याचा प्रयत्न करीत कोटय़ा करण्याची हातोटी भावाकडून आत्मसात करायला हिला वेळ लागला नाही. त्यातून माझ्याविषयीचा अपप्रचार
बळावत चालला.
कालच सकाळी आलेल्या माझ्या मित्रानं गार पाणी मागितलं प्यायला तर त्यावरून अष्टवर्षीय आमचे चिरंजीव टुण्दिशी उडी मारून उद्गारले, ‘‘काका, काका, आमच्याकडे दोन दोन माठ आहेत. काळा गार असतो, पण दुसरा मात्र रागानं लालच होतो. आईच म्हणते.’’ असा काही खरपूस लाल करून टाकला बेटय़ाला, त्यात त्याला सोडवायला मध्ये घुसलेल्या मेव्हणेबुवांनाही चार धपाटे घालण्याचा माझा हेतू मी पुरवून घेतला. रात्री त्यांच्या पाठीला तेल लावून चोळायचं काम मलाच लागलं ती गोष्ट अलाहिदा.
एकंदरीतच, या साऱ्या प्रकाराला मी अगदी कंटाळून गेलो. त्यापेक्षा कारखान्यावर जाऊन दगडफेक करून पोलिसांच्या ‘आरामगाडी’तून आरामात जावं अन् चार दिवस ‘एकांत’ साधावा असं मनोमन वाटू लागलं. नाही तरी तो अनुभव अजून कधी नव्हताच आला. एक अनुभव आणि विश्रांती असे एका दगडात दोन पक्षी अशा विलक्षण विचारानं मी दोन क्षण थरारूनही गेलो.
खरं म्हणजे हवेच्या पंपाच्या दट्टय़ातून हवा निसटावी तसे काही कामगार संपातून फुटल्याची कुणकुण माझ्या कानांवर आली होती. पण पुढचं काहीच कळलं नव्हतं. एकंदरीत असेच आपण कुजत राहणार, काळजीनं खंगत राहणार, घरच्या गिरणीत भरडत राहणार असे अलंकारिक विचार वावटळीसारखे मनात आले अन् गेले. मात्र या सगळ्याचा परिपाक म्हणून की काय अगदी हिमालयात जाऊन पडावं असा निकराचा विचार मात्र बसल्या बसल्या माझ्या मनात दृढ होऊ पहात होता. तोपर्यंत डुलकी, पेंग अन् क्रमाक्रमानं डोळाही लागला.
पण दोन-तीन क्षणांपुरताच. कारण मारुती सपकाळ येऊन टपकला होता.
‘‘काय वहिनी, आज काय बेत जेवायला?’’
‘‘आज चूल बंद!’’ हिचे उद्गार.
‘‘अहो, पण तुमच्याकडे गॅस आहे नं?’’ नाही म्हटलं तरी या फालतू जोकला बंडय़ानं हसून प्रतिसाद दिलाच.
‘‘अहो, गॅसच गेलाय. हे अजून आळसात वेळ घालवताहेत. भाजी नाही घरात. काय करायचं माणसानं?’’ हिची भुणभुण.
‘‘मग काय मनोहर, काय ‘श्रेयस’ला वगरे जायचा बेत आहे की काय जेवायला? नाही तर ‘सपना’ चांगलं आहे. आपली कुठंही यायची तयारी आहे बरं का. सडाफटिंग मी!’’ मारुती बोलला.
‘‘अन् मंडळी कुठं गेली?’’ मी विचारलं.
‘‘पाठवली माहेरी.’’
‘‘छान केलंस. हुशार आहेस हं, मारुती. आमच्याकडं जरा उलटं आहे. हिचं माहेरच इकडं येतंय.़  ‘हातभार’ करायला.’’
मान उडवून सौ. आत गेल्याचं पाहून मारुतीला म्हटलं, ‘‘काय रे, इतके दिवस काय व्यवस्था केलीस? आरामात दिसतोस?’’
‘‘अगदी मजेत. तू मात्र जाम वैतागलेला दिसतोस.’’
‘‘अरे बघ नं! आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास. पसा पुरेना. पगाराचा भरवसा नाही. भागायचं कसं एवढय़ा लोकांचं?’’
‘‘ती चिंता आपल्याला नाही. दोन आठवडे बाहेरच जेवतो आहोत सरळ.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘अरे, लग्नं, बारशी, साठीशांत, वास्तुशांत निमंत्रणं आहेतच.. नाही आलं तर कुणकुण लागली की लावूनच घेतो. अगदी वार लावून जेवतो आहोत असं का म्हणेनास!’’ निर्लज्जपणे मोठय़ांदा हसत बोलला मारुती.
‘‘धन्य आहे बाबा तुझी.’’
‘‘बायको तिच्या मत्रिणींकडे भिशांच्या मिषानं, पोरं मामा-मावशीकडे नाही तर त्यांच्या मित्रांकडे, मी असाच तुमच्या आमच्याकडे. अगदी सेन्ड ऑफ सारखी जेवणं झोडतो आहे असं म्हणायलाही हरकत नाही. शेवटी कोणीच उरलं नाही तेव्हा पिटाळली मंडळी माहेरी. म्हटलं, ‘जा आता बापाच्या अंगावर जाऊन पडा.’ हॅहॅहॅ! मीही जाईन उद्या-परवा. बरं, जरा फक्कडसा चहा तरी सांग ना..  जवळच्या अमृततुल्यातलासुद्धा चालेल. पण ‘अण्णाचा’ बरं का, ‘नाना’चा नको.. हॅहॅहॅ! बस झालं माझं पुराण, तुझा काय विचार, मनोहर?’’
‘‘मी? मी हिमालयात जायचा विचार करतोय.’’
‘‘बरोबर आहे. सीझनच आहे हा तिकडे जायचा. पार कडेपर्यंत का? वा!’’
‘‘च्यायला! इथं नको नको झालंय म्हणून.. संन्यास घेऊन. मी.’’
‘‘काही हरकत नाही. पण संन्यास वगरे बाता बरं का.’’
 ‘‘अरे बाबा, माणसाला वीट आला या ऐहिक गोष्टींचा की तो मृगजळातही..’’
‘‘..गटांगळ्या खायला कमी करणार नाही. माहितीय मला, अन् हिमालयात हिमगौऱ्याही खूप आहेत एवढंच आपलं म्हणणं, काय?’’ जरा खासगीत बोलावं तसं मारुती बोलून खो खो हसत सुटला.
काही का असेना, एकंदरीत हिमालयात जाण्याचा माझा विचार काळ्या म्हशीवरचा पांढरा बगळा होऊ लागला अन् एक दिवस सारं सोडून देऊन जायचं, सुखी व्हायचं या विचारानं मी उल्हसित होऊ लागलो. सुखाचा शोध हिमालयात लावणाऱ्या अनेक ऋषी-मुनींपकी आपण एक होणार या विचारानं आसपासचं सारं तुच्छ वाटू लागलं. एकंदर त्याला लागणारी विरक्ती माझ्या अंगात मुरू लागली. सौं.च्या तोंडच्या वाक्यालाही मी केवळ हसून प्रतिसाद देऊ लागलो, म्हणजे ‘‘तुम्ही बाई फारच थंडपणा करायला लागलात..’’ वगरे वगरे.
पण कोणाला नकळत मायापाश तोडून पळून जावं ते कुठल्या वेळेला हे ठरता ठरेना. सकाळी, दुपारी रणरणत्या उन्हात की रात्री गौतम बुद्धासारखं, या विचारातच दोन दिवस गेले अन् तिसऱ्या दिवशी सकाळी ती बातमी आली. मेव्हणेबुवा ओरडले,
‘‘मनोहरपंत, तुमच्या कारखान्यातला संप मिटला. तुम्हाला बोनसही मिळणार, मागचा, पुढचा, या वेळचा अख्खा!’’
‘‘खरंच, किती छान हो बाई! तुझा पायगुण रे सुरेश. अहो.. अहो.. चहात काय बघताय, इकडं बघा. आपण किनई या वर्षी काश्मीरला जाऊन यायचंच.’’
‘‘नाही, म्हणजे माझा थोडाफार तोच विचार होता.’’ मी कसंनुसं हसलो.
‘‘त्या िभगरी ट्रॅव्हल्सकडे उद्याच सीट्स बुक करू.’’ सौें.चा उत्साह उतू जात होता.
त्यावर उतावळ्यासारखा मीही उद्गारलो,
‘‘अगं पण, तो भरवशाचा आहे का? नाही तर जाऊन पडावं लागेल कायमचं हिमालयात !’’    

Story img Loader