लहानपणापासूनच मला काळ्या निग्रोंचे पांढरेशुभ्र दात फार आवडतात. त्यांचे दात माझे आयकॉन होते. त्यामुळे दात पांढरेशुभ्र व चमकदार ठेवण्यासाठी मी अथक परिश्रम घेते. याला सगळे ‘वेडं खुळं’ म्हणतात. पण माझ्या दातांनीच असहकार पुकारला. माझ्या या वेडाला माझ्या दातांनीच डेंटिस्टची पायरी चढणे भाग lok04पाडले. आणि काय सांगू महाराजा, माझ्या दाढदुखीची दु:खद कहाणी!
त्याचे असे झाले : काही कामासाठी माझे आई-वडील पुण्याहून माझ्याकडे आले होते. जावयाकडे जाऊन राहणे म्हणजे दशम ग्रहाची आराधना करणे असे मानणारे माझे आई-वडील! आले होते दोनच दिवसांसाठी; पण त्यांना मुक्काम करावा लागला तेरा दिवस!  मोठय़ा प्रेमाने त्यांनी आमच्यासाठी खास चितळेंची बाकरवडी आणली होती. आल्या आल्या बाकरवडीचे पार्सल माझ्या हातात देत आई म्हणाली, ‘हे बघ, हल्ली तुला नवे पदार्थ करायला वेळ नसतो. कारण तू लष्कराच्या भाकऱ्या थापत असतेस. त्यामुळे जावईबापूंच्या खाण्यापिण्याची हेळसांड होत असणार. म्हणून त्यांच्यासाठी बेसनलाडू आणलेत.’ आई एवढं म्हणतेय तोच बेल वाजली. दार उघडलं तर ‘दशमग्रह’ आलेले. चहाच्या वाफाळल्या कपाबरोबर बेसनलाडू व बाकरवडीची डिश पाहून जावईबापू संतुष्ट झाले. मीही कितीतरी दिवसांनी आवडती बाकरवडी खायला लागले. मोठय़ा खुशीत मी उजव्या दाढेने त्या खुशखुशीत वडीचा तुकडा तोडला. आता सुखद चव जिभेवर रेंगाळणार व मी वडय़ांचा मी फडशा पाडणार.. पण हाय रे दैवा! सुखद चव राहिली बाजूलाच; पण उजव्या दाढेतून जीवघेणी कळ आली. मला ब्रह्मांड आठवलं. नेमकी त्याचवेळी माझी दाढदुखी सुरू झाली.  मंडळी, मला कुठलेच दुखणे सहन होत नाही हो!  दाढ दुखायला लागल्यावर वाटलं की, मरण आले तरी चालेल, पण ही दाढदुखी नको! माझे विव्हळणे सुरू झाले. माझं अतिच बाऊ करणं आईला माहीत असल्यानं ती म्हणाली, ‘जावईबापू, तुम्ही खा हो. तिच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका.’
माझ्याकडे मजेत पाहत हे आरामात बाकरवडी खायला लागले. आणि आई गं! परत ती जीवघेणी कळ आली. ‘अहो, हे सहन करणं कठीण जातंय हो. तुमचे खाणे झाले की आपण डेंटिस्टकडे जाऊ या.’ यावर आई म्हणाली, ‘कापूर वा अमृतांजनाचा बोळा धर दाढेत. लाळ सुटेल. वेदना कमी होतील. आताच ते कामावरून दमून आलेत ना?’
‘मी अमृतांजनाचा बोळाबिळा ठेवणार नाही. मी डेंटिस्टकडे जाते. आणि बरं का, तुम्हाला माझ्याबरोबर यायचं असेल तर चला. नाहीतर बसा बाकरवडय़ा खात!’ आम्ही डेंटिस्टकडे गेलो.
दवाखान्यात माझ्यासारखे कित्येक दुर्दैवी जीव रुमालात गाल लपवून बसले होते. त्या समदु:खी माणसांकडे बघत मी माझा नंबर येण्याची वाट पाहू लागले. बघते तो काय- माझा ‘१३ वा’ नंबर होता! १३ आकडा मला अशुभ ठरतो. नंबर आल्यावर सुहास्य मुद्रेनं डॉ. सुहास दंताळे यांनी मला भल्या- मोठय़ा खुर्चीवर बसायला सांगितले व म्हणाले, ‘मोठा आ करा पाहू.’ मी आ केल्यावर माझे ३२ धडधाकट दात त्यांनी मनात मोजले असावेत. माझ्या उजवीकडच्या दाढा स्टीलच्या छोटय़ा हातोडीने ठोकत ‘इथं दुखतं का? दुखलं की सांगा हं मला!’ म्हणत माझ्या तीन दातांवर ठोकाठोकी केल्यावर मी एकदम ओरडले, ‘आई गं.. आई!’ त्या ओरडण्याने डॉक्टरांना एवढा आनंद झाला म्हणता, की आर्किमिडीजलाही तेवढा झाला नसेल. ‘सापडला! हे बघा- तुमची उजवी दाढ किडलीय. त्यामुळे हिरडय़ांना सूज आलीय. सूज उतरल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. पण वेदना थांबवण्यासाठी मी इंजेक्शन देतो. सूज उतरेल.’ हिरडीला कसं इंजेक्शन देतात या कल्पनेनेच मला कापरे भरले. त्यावर डॉक्टर म्हणाले, ‘अहो, अगदी मुंगी चावल्यासारखे होईल. तुम्हाला कळणारसुद्धा नाही!’ डॉक्टरांनी सुई हातात घेतली आणि मी जाम घाबरले. डॉक्टर सांगत होते, ‘मोठा आ करा. जीभ मागे घ्या. जीभ मधे येता कामा नये.’ आणि हाय रे देवा! त्याचवेळी माझी जीभ वळवळली आणि जिभेच्या बाजूला इंजेक्शन दिले गेले. आणि माझी जीभ जड होत गेली. मला बोलणेही अशक्य झाले. तरीही बोबडय़ा आवाजात मी तक्रार केलीच- ‘चुकीच्या जागी इंजेक्शन दिलेच कसे?’ डॉक्टरांनी सगळा दोष माझ्यावर ढकलून ‘सॉरी’ म्हटलं. औषधं लिहून दिली व दुसऱ्या दिवशी परत बोलावलं.
अहो, झोपेतसुद्धा बडबडणारी मी जड झालेल्या जिभेमुळे हताश झाले. घरी जाईतो रस्त्यात दहाजण भेटले आणि मला सहानभूती दर्शवीत मार्गस्थ झाले. घरी आल्यावर आता मी जिभेची बधिरता कमी झाल्याशिवाय बोलू शकणार नाही, हे ऐकून आईने हुश्श केलं. जीभ बधिर झाली होती, पण दुखरा दात मात्र जागरूक होता. त्यामुळे रात्रभर मी वेदनेनं तळमळत होते. घरातले इतर मंद सुरात घोरत होते.
सकाळी उठल्या उठल्या त्यांनी ‘आता कशीय तुझी दाढ?’ असं विचारून कर्तव्य बजावलं. सूज आल्यानं गाल गोबरे झाले होते. कळा येतच होत्या. सावरीच्या मऊ उशीवर उजवा गाल टेकवून मी सोफ्यावर पडून होते. ऑफिसमध्ये जाताना ‘हे’ काळजी व्यक्त करून गेले. संपूर्ण दिवसभर पातळ पदार्थ उदरभरणासाठी घेत होते. वडलांनी मायेनं चौकशी केली. पण आई म्हणाली, ‘अहो, थोडी सहनशीलता हवीच मुलीच्या जातीला. उद्या बाळंतपण आले तर ती थयथय नाचवेल सर्वाना!’ दिवस कसाबसा गेला. संध्याकाळी हे आल्यावर आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे गेलो.
तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले, ‘तुमच्या किडलेल्या दातांनी बरीच कामगिरी बजावलीय. आज हाताला छोटी गाठही लागतेय. एक्सरे काढावा लागणार. तुम्ही सुशिक्षित माणसे दाढ किडू देता व मग अती झाले की डॉक्टरकडे येता.’ माझे बौद्धिक घेत डॉक्टरांनी एक्सरे काढला व औषधे बदलून दिली. परत दुसरे दिवशी यायला सांगितले. त्याचवेळी माझ्या दिरांचे छोटे ऑपरेशन झाले होते. म्हणून त्यांना भेटायला आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. दाढदुखीमुळे अत्यंत बेचैन झालेली मी कमालीची बापुडवाणी दिसत होते. माझा तो अवतार बघून हॉस्पिटलमधील नर्सेस, आया, डॉक्टर मंडळींना वाटलं- पेशंटच आलाय. त्यांची धावाधाव सुरू झाली. रूम मोकळी होतीच. फक्त कॉटवरचे बेडशीट बदलण्यात आले. सलाइनचा स्टँड तयार होताच. पण आम्ही पेशंटला बघायला आलोय, असा खुलासा ह्य़ांनी केल्यावर मंडळी नव्‍‌र्हस झाली. मी दिरांची चौकशी करण्यापूर्वी तेच म्हणाले, ‘तू बरीच आजारी दिसतेस?’ यावर ह्य़ांनी सगळा इतिहास कथन केला. मी कसंबसं दिरांना सांगितलं, ‘दाढेजवळ हाताला गाठ लागतीय. ती सरळ ‘टाटा’पर्यंत नेणारीही असू शकेल. मग तुम्हाला भेटायचं राहून जाईल म्हणून आले.’ दिरांनी मला धीर दिला. घरी गेल्यावर आई-वडिलांना ताजा तपशील ह्य़ांनी सांगितला आणि माझ्या मनाची खात्री झाली की, ही गाठ साधीसुधी नाही. एक्सरे रिपोर्ट संध्याकाळी मिळणार होता. तोवर १२ तास गॅसवर राहणार होतो आम्ही! कामावर जाताना हे केविलवाणे दिसले. सचिंत मनाने ते कामावर गेले.
लष्करच्या भाकऱ्या भाजण्याचा माझा उद्योग असल्यामुळे माझं फ्रेंड सर्कल खूप आहे. चार-पाच दिवसांची माझी गैरहजेरी त्यांना जाणवली. त्यामुळे मला भेटण्यास मंडळी येऊ लागली. नेहमी कलकल करणाऱ्या आम्ही शांत होतो. भेटायला आलेल्या मंडळींनी सफरचंदे, मोसंबी, संत्री, चिकू इत्यादी फळे आणली होती. एवढे गंभीर वातावरण असूनही आईला त्यांचे फ्रुट सॅलड करावे लागले. अगदी नाइलाजाने हो! भेटायला आलेली मंडळी म्हणत होती, ‘बाळंतपणाच्या कळा परवडल्या, पण ही दाढदुखी नको. अगं तू एक ‘लेंडी पिंपळी’ घेऊन तोंडात धर. तात्काळ दाढ थांबेल, सूज उतरेल व गाठही कमी होईल!’ तर दुसरी म्हणाली, ‘बर्फाने शेक गं!’ तिसरी म्हणाली, ‘गरम पाण्याचे चटके दे!’ शेजारच्या वयस्कर मावशी म्हणाल्या, ‘आमच्या वेळी नव्हते हो स्पेशालिस्ट. हल्ली कंपन्यांकडून मेडिकल सुविधा मिळतात. शिवाय मेडिक्लेम पॉलिसी असतातच. म्हणून मग तुम्हाला लुटतात.’ अशा रीतीने उपचार व अनुभवांची देवाणघेवाण झाली. सारीच प्रेमाची माणसं! संध्याकाळ कधी झाली, कळलंच नाही.
बरोबर रात्री आठ वाजता आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांनी रिपोर्ट काढला. जणू तो माझा मृत्यूलेखच आहे अशा गंभीर आवाजात म्हणाले, ‘हे पहा मॅडम, तुमच्या दाढेजवळ गळू झाला आहे. घाबरण्याचं कारण नाही. औषधं चालू आहेत. उद्यापर्यंत तुमची दाढदुखी थांबेल. सूज उतरेल. दोन दिवसांनी मला तुमचे दोन दात व एक दाढ काढावी लागेल.’ त्यावर मी डॉक्टरांना म्हटलं, ‘डॉक्टर, माझे दात वाचवा हो!’ त्यावर ते म्हणाले, ‘दात वाचवणं हा डेंटिस्टचा धर्म आहे. पण तुमच्या बाबतीत ते शक्य नाही. परवा रात्री ८ वाजता येताना थोडं खाऊन या म्हणजे त्रास होणार नाही.’
त्या रात्री मला बऱ्यापैकी झोप लागली. औषधाचा परिणाम जाणवू लागला. सूज उतरली. कळा थांबल्या. थोडं जेवणही मी घेतलं. तो संपूर्ण दिवस मी समाधानात घालवला. संध्याकाळी डॉक्टरांकडे जाताना आईने दहीभात खायला दिला. कारण आज माझ्या दातांना निरोप द्यायचा होता ना! लहानपणापासून ज्या दातांवर मी प्रेम केलं, त्यांची निगा राखली, ते आज कायमचा निरोप घेणार होते. नकळतच त्या दातांवर मी मायेनं हात फिरवला आणि मला रडायलाच आलं.
कसा देऊ यांना निरोप? त्यांचे २९ सवंगडी त्या तिघांचं मरण उघडय़ा डोळ्यांनी पाहणार होते. जिभेलाही आता चुकल्या चुकल्यासारखं वाटणार. मला खूप भरून आलं. मी तरी कोणाकोणाचं सांत्वन करणार? उरलेल्या सवंगडय़ांचं की लाडावलेल्या जिभेचं? अहो, वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून मी यांना वळण लावलं. दूधभातापासून अगदी जर्दाळू फोडण्यापर्यंत सारं काही शिकवलं. उणीपुरी ३० वर्षे मी त्यांच्यावर प्रेम केलं. त्यांचा निरोप कसा घेऊ हो?
जड अंत:करणाने मी खुर्चीवर बसले. डोळे तुडुंब भरलेले. डॉक्टर आले. जणू माझ्या दातांचा यमदूतच! त्यांनी फासाचा दोर अचूक टाकला. त्यांच्या गळ्याभोवती आवळत नेला आणि माझे तीन लाडके भुईसपाट झाले. बिचारे पंचत्वात विलीन झाले. त्यांची मृत शरीरे ट्रेमध्ये होती. मी त्यांना डोळे भरून पाहिलं. त्यांना मनोमन श्रद्धांजली वाहत म्हटलं, ‘माझ्या लाडक्यांनो, पुढच्या जन्मी तुम्ही माझेच असाल. मी तुमची अधिक काळजीपूर्वक निगा राखेन, म्हणजे तुम्हाला अकाली मृत्यू येणार नाही!’ डोळे पुसत पुसत मी खुर्चीवरून उठले. डॉक्टर म्हणाले, ‘तुमच्या भावना मी समजू शकतो. पण माझा नाइलाज होता. तुम्ही आता तीन दात दत्तक घ्या. म्हणजे गेलेल्यांचं दु:ख तुम्हाला जाणवणार नाही.’ ह्य़ांनी अंत्यक्रियेपर्यंतचा सर्व खर्च डॉक्टरांना बिलाच्या रूपात दिला आणि मी घरी परत आले. पण माझ्या दातांच्या अंत्ययात्रेचे सूतक या क्षणापर्यंत मी विसरलेले नाही.

मीना गोडखिंडी

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh Rawat Ballarpur Assembly constituency
लक्षवेधी लढत : मुनगंटीवार यांच्यासमोर कडवे आव्हान
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
expert answer on career advice questions career advice tips from expert
करीअर मंत्र
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…