‘लोकरंग’मध्ये (१४ एप्रिल) ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा (कै.) नरहर कुरुंदकर यांचा लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावर अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यापैकी कुरुंदकरांच्या मुद्दय़ांचा प्रतिवाद करणाऱ्या या दोन प्रतिक्रिया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा नरहर कुरुंदकर यांचा लेख वाचला.  प्रतिपाद्य विषयासंबंधी प्रेम व आपुलकी नसेल तर विचारवंत केवढाही मोठा असो, हाती फारसे काही लागत नाही. स्वत:ला साम्यवादी, समाजवादी व पुरोगामी म्हणविणारे कुरुंदकर होळीवरील नगरेश्वर मंदिरात सोवळ्याने पूजाअर्चा करण्याएवढे कर्मठ होते, हे नांदेडच्या लोकांना तरी सांगायला नको. एखाद्या समाजाचा वा चळवळीचा अभ्यास करणे, त्याच्यासंबंधी त्या अनुषंगाने काही निष्कर्ष काढणे वेगळे, आणि अगोदरच निष्कर्ष काढून त्यास पूरक तेवढीच समाज-चळवळीची मांडणी करणे, ही अभ्यासाची शास्त्रीय पद्धत असू शकत नाही. कुरुंदकर ना बुद्ध धर्माचे अभ्यासक आहेत, ना दलित समाजाचे, ना दलित साहित्य चळवळीचे.

कुठली भूमिका घ्यायची, हा त्यांना अधिकार आहे. पण स्वत: ब्राह्मणी कोषात आयुष्यभर रममाण होणाऱ्या कुरुंदकरांनी दलितांना कोषाबाहेर पडण्याचा सल्ला कुठल्या अधिकारान्वये दिला? घेट्टोसारख्या वस्तीत अस्पृश्यांचे जिणे जगणाऱ्या दलितांना समतेने, बंधुभावाने व माणुसकीने वागवावे, असा स्पृश्य समाजाला सल्ला देण्याऐवजी हा विचारवंत अस्पृश्यतेच्या व दारिद्रय़ाच्या बेडय़ांनी जखडून जराजर्जर झालेल्या दलितानांच कोषाबाहेर पडायला सांगतो आहे. जणू काही या जाती-धर्माच्या बेडय़ा दलितांनी स्वत:हून आपल्या हातापायात अडकवल्या आहेत.

या लेखात कुरुंदकरांना नेमके काय मांडायचे आहे, याचा पत्ताच लागत नाही. कधी दलित समाजाच्या, साहित्याच्या मर्यादा ते सांगतात; कधी राजकीय, धार्मिक मर्यादांची चर्चा करतात; तर मधूनच बुद्ध धर्माच्या मर्यादांवर लिहितात. कथा, धर्मश्रद्धांच्या आधारे हिंदू आणि बौद्ध धर्मातील जीवनमूल्ये एकच असल्याचा निर्वाळा देतात. कथा, कर्मकांडे आणि तत्त्वज्ञान वेगवेगळे असते, हे आम्हा पामरांनी काय सांगावे? बरे, बौद्ध धर्माच्या जोडीला त्यांनी जैन, महानुभाव, लिंगायत, शीख या पंथांची जीवनमूल्ये आणि हिंदूंची जीवनमूल्ये एकच असल्याचे ठासून सांगितले आहे. हे सारे एकच असते तर हे पंथ का निर्माण झाले असते?

मानवी गुलामगिरी टिकविण्याच्या प्रथेचे व सरंजामशाहीचे बौद्ध, जैन, महानुभाव, लिंगायत आणि शीख पंथांनी समर्थन केले, असे असत्य आणि विपर्यस्त विधान ते करतात. पण त्याबद्दलचे पुरावे मात्र देत नाहीत. बुद्धाने स्त्रिया आणिशूद्रातिशूद्रांना दीक्षा दिली. महानुभावीयांनी संस्कृत भाषेला नकार देऊन सर्वसामान्यांच्या लोकभाषेत समतेचा संदेश दिला. बसवेश्वरांनी वर्णभेद व जातिभेदाला कडवा विरोध केला. जैन आणि शीख पंथांनीही समतेची शिकवण दिली. हे वास्तव कुरुंदकरांना ठाऊक नाही असे नाही.

१९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली, दिलेली बुद्ध धम्माची दीक्षा ही या देशातीलच नव्हे, तर जगातील फार मोठी सांस्कृतिक घटना होती. तेव्हापासून महाराष्ट्रभर गावोगावी बुद्ध धम्मस्वीकाराची लाटच आली. नवदीक्षित आणि नवशिक्षित दलित माणूस आपल्या व्यथा, वेदना, आक्रोश साहित्यादी कलांतून मांडू लागले. या प्रवाहाच्या प्रपातापुढे मुख्य प्रवाह समजले जाणारे साहित्य पार गळाठून आणि गारठून गेले. नाके मुरडणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हा साहित्यप्रवाह जोमाने समृद्ध होत गेला. या साहित्यप्रवाहाच्या प्रेरणास्थानी होते बुद्ध, म. फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या प्रेरणास्थानांचीच चिकित्सा केली, त्यांच्या मर्यादांची चर्चा केली तर या प्रवाहाला थोडीफार वेसण घालता येईल, या निकडीतून कुरुंदकरांनी हा लेख लिहिला असावा.

या लेखात कुरुंदकरांनी स्पष्टपणे हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यांची जीवनमूल्ये सारखीच असल्याचे नमूद केले आहे. त्याचबरोबर हे दोन्ही धर्म मानवी गुलामगिरीचे, राजेशाहीचे, सरंजामशाहीचे आणि आजच्या भांडवलशाहीचे समर्थन करणारे असून, अंधश्रद्धा व वामाचार यांच्या चिखलात लोळणारे आहेत, शिवाय आजच्या काळात सामाजिक प्रगतीला बौद्ध धर्माचा फारसा उपयोग होणार नाही, जातिभेद मोडण्यास बौद्ध धर्म-स्वीकारामुळे काही मदत होणार नाही, असे निदान त्यांनी केले आहे. कुरुंदकर असे निदान यासाठी करतात, की अस्पृश्य जाती-जमातींनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारू नये, त्याने त्यांच्या जीवनात फारसा फरक पडत नाही. कारण दोन्ही धर्म जातिभेदाचे, गुलामगिरीचे, अस्पृश्यतेचे समर्थन करणारे आहेत. मग एक सोडून दुसरा घ्या कशाला? यासाठी त्यांनी चीनचा दाखलाही दिला आहे. हिंदू धर्माचा त्याग करून बहुसंख्य अस्पृश्य जातीजमाती बौद्ध धर्माकडे वळत असलेले पाहून कुरुंदकर अस्वस्थ व भयभीत झाले असावेत. या भयभीत अवस्थेत अत्यंत नैराश्यापोटी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चिकित्सेच्या, मूल्यमापनाच्या नावाखाली प्रतिमाहनन केले आहे.

उदा. बाबासाहेबांना सर्व दलित समाज एका संघटनेत आणता आला नाही, अस्पृश्यांतील एका जातीला दुसऱ्या जातीचा विश्वास संपादन करता आला नाही, बाबासाहेबांना महाराष्ट्राबाहेरील अस्पृश्यांचा पाठिंबा मिळवता आला नाही, पुणे कराराबाबतही त्यांची धरसोडीची भूमिका होती, इत्यादी आक्षेप ते घेतात. याबाबतीत एवढेच सांगता येईल की, पुणे करार करताना बाबासाहेबांना कुरुंदकरांपेक्षा बहिष्कृत वर्गाचे हित अधिक कळत होते, एवढे तरी त्यांना मान्य करावे लागले. बाबासाहेब घटना परिषदेवर पश्चिम बंगालमधून नमोशूद्र जातीच्या लोकांमधून निवडून आले होते. त्यांच्या हयातीत शे. का. फे. हा पक्ष मद्रास, पंजाब, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत मूळ धरून होता. बाबासाहेबांच्या चळवळीत मातंग समाज, चांभार समाज कमी प्रमाणात असेल, पण तो सामील होत होता. हे सारे संदर्भ कुरुंदकर मुद्दाम नजरेआड करतात. हेतू एवढाच, की बाबासाहेबांना मानणाऱ्या महार समाजाने बौद्ध धर्म स्वीकारला तरी चांभार, मातंग समाजाने मात्र बौद्ध धर्माकडे वळू नये. म्हणून हा प्रश्नव्यूह कुरुंदकर उभा करतात. भटके विमुक्त आणि ओबीसी बांधव आज बौद्ध धर्माकडे वळत आहेत. पण हे पाहायला कुरुंदकर हयात नाहीत.

अस्पृश्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न आर्थिक दारिद्रय़ाचा आहे. कुरुंदकरांनी हे सत्य मात्र प्रांजळपणे मान्य केले आहे. अस्पृश्य शेतमजूर आणि औद्योगिक मजूर अशा जवळजवळ ८८ टक्के लोकांचा हा प्रश्न असल्याचेही कुरुंदकर सांगतात. पण हे दारिद्रय़ संपविण्यासाठी कुरुंदकर ज्यांचे प्रतिनिधित्व करतात, अशा १२ टक्के लोकांनी काही त्याग करावा, ८८ टक्के लोकांचे दारिद्रय़ दूर होण्यासाठी हाती असलेल्या संसाधनांचे वाटप- फेरवाटप करावे, असा सल्ला मात्र चुकूनही कुरुंदकर देत नाहीत. उलट, दलितांनाच जाती-पंथांच्या चौकटीतून बाहेर पडण्याचा शहाजोगपणाचा सल्ला देतात. स्वजातीच्या विरुद्ध समाजमनात खदखदत असलेला असंतोष कमी करणे, संघर्ष थांबवणे यासाठी कुरुंदकर लेखणी झिजवतात. भांडवलशाहीविरुद्धच्या लढय़ात ८८ टक्के अस्पृश्यांना, शेतमजुरांना सर्व ब्राह्मण समाज साथ देईल, सर्वतोपरी मदत करील, असे अभिवचन मात्र कुरुंदकर देताना दिसत नाहीत.

‘एक माणूस वाचवण्यासाठी कोटय़वधी दलितांचे हक्क बाबासाहेबांनी सोडून का दिले?’ असा प्रश्न पुणे करारासंदर्भात विचारणारे कुरुंदकर लेखाच्या शेवटी दलित संघटनांना कोणत्याच राजकीय नेत्याविषयी, सामाजिक तत्त्वज्ञानाविषयी, राजकीय संस्थेविषयी आपुलकी वाटत नसल्याचे जाहीर करतात. या परिच्छेदात दलित संघटना काँग्रेसच्या छत्रछायेखाली वावरतात, सत्तेच्या राजकारणात तडजोडी करतात असेही म्हणायचे आणि राजकीय नेत्यांविषयी, राजकीय संस्थेविषयी आपुलकी नाही असेही म्हणायचे. याला दुटप्पीपणाशिवाय दुसरे काय म्हणणार?

कुरुंदकरांनी नसते सांगितले, तरी जीवनाचा प्रवाह वेदावर संपला नाही, तसा बुद्ध, बाबासाहेबांनंतरही चालूच राहील. या दोन महामानवांनी तेवढी विचारशक्ती समाजाला दिलेली आहे. मठात अडकून राहण्याची खरी भीती तर कुरुंदकर ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात, त्या समाजालाच अधिक आहे. त्यांचेच जातभाई आज मोठय़ा प्रमाणावर मठांचे, मंदिरांचे निर्माण करून, धार्मिक उन्माद माजवून देशाची लोकशाही धोक्यात आणत आहेत. समाजाची निर्माणशक्ती नाकारून, विचारप्रक्रिया बंद करून नेहमीच विचारसंघर्षांपासून दूर पळू पाहणाऱ्या वर्गाचे प्रतिनिधित्व जे कुरुंदकर करतात, त्यांनाच कोषातून बाहेर पडायची खरी गरज होती व आहे. मठातून, मंदिराच्या कोषातून बाहेर पडले तरच त्यांचे, दलितांचे आणि देशाचेही कल्याण होणार आहे.

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Comment on narahar kurundkars article on ambedkar dalits and buddhism