‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ हा लेख नरहर कुरंदकरांनी १९६९ साली लिहिलाय. त्यावेळी त्यांचे वय ३७ वर्षांचे होते. याच- दरम्यान ते विविध विषयांवर लिहीत होते आणि इतर विषयांप्रमाणे शिवाजीमहाराजांवरही ठिकठिकाणी व्याख्यानं देत होते. त्यावेळी रेकॉर्ड केलेले एक भाषण २०१० साली मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ऐकायला मिळाले आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण ६९-७० च्या दरम्यान केलेल्या त्या भाषणानंतर काही वर्षांनी जे पुस्तक आले, त्यातले त्यांचे विवेचन त्या भाषणापेक्षा खूपच वेगळे होते. म्हणजे कुरुंदकर जरी असले, तरी तेही चुकीच्या गोष्टी कवटाळून बसू शकतात! अर्थात नंतर पुस्तकाच्या रूपाने त्यांनी स्वत:ची मतं दुरूस्त करून घेतली, हे स्वागतार्हच.
पुनर्विचारासाठी सतत तयार असणे हे कुरुंदकरांचे वैशिष्टय़. त्यामुळे ‘दलितांनी कोषातून बाहेर पडावे’ याही लेखाचा पुनर्विचार पुढच्या काळात त्यांनी नक्की केला असता असे वाटते. प्रत्येकाचा विकास असतो आणि या विकासाला टप्पे असतात, हे कुरुंदकरांचे मत मान्य होण्यासारखेच आहे. दुर्दैवाने त्यांना दीर्घायुष्य लाभले नाही. त्यामुळे आपल्या वैचारिक व एकूणच सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. आजही अनेक प्रश्नांवर कुरुंदकर नव्याने काय म्हणाले असते, असा विचार राहून राहून मनात येतो.
प्रत्येकाला मर्यादा असतात. कुरुंदकरांनाही त्या होत्या. त्यातली एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे भारतीय समाजरचनेतील एका विशिष्ट स्थानावरून किंवा दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले विचार! उदा. बौद्ध धर्माचा स्वीकार करावा की करू नये, हा निराळा प्रश्न आहे. त्याचे उत्तर ‘करावासा वाटेल त्याने करावा. वाटणार नाही त्याने करू नये,’ असे आहे. असे एक वाक्य त्यांच्या लेखात आहे. हे खास कुरुंदकरी विधान आहे. आज हे वाक्य अर्थहीन वाटते. एखादा धर्म स्वीकारावा की स्वीकारू नये याचे माणसाला स्वातंत्र्य आहे, हे आपण (म्हणजे डाव्या चळवळीतले कुरुंदकरांसकट सगळेच लोक) उच्चरवात सांगत असतो. परंतु त्याचवेळी एखाद्याने वेगळा धर्म स्वीकारला की त्याच्यावर टीका करायला लगेचच सरसावतो! याचा दुसरा अर्थ असा की, आपल्याला माणसाचे धर्मस्वातंत्र्य फारसे मंजूर नाही! जोपर्यंत माणूस आपला धर्म सोडून जात नाही, तोपर्यंत आपण जोरजोराने धर्मस्वातंत्र्याबद्दल बोलतो आणि जेव्हा तो खरोखरच आवडेल त्या धर्मात जाऊ लागतो, त्यावेळी मात्र आपल्याला ते आवडत नाही. ‘स्वतंत्र घर करा’ असं आई लग्न झालेल्या मुलाला सांगते. पण खरोखरच मुलगा आणि सून तसे करू लागतात तेव्हा आईला ते रुचत नाही.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लाखो दलित बांधव हिंदू धर्माच्या बाहेर पडले, हे खरे कोषातून बाहेर पडणे होते. नंतर दलितांचे चुकले. अनेक गोष्टी ते चुकतात, हे खरेच आहे. या चुका दाखवून दिल्या पाहिजेत आणि सुधारूनही घेतल्या पाहिजेत. त्याची आवश्यकता आहेच. परंतु ते कोषात अडकले आहेत, असे म्हणणे म्हणजे कोष कशाला म्हणतात, हेच आपल्याला समजले नसल्याचे द्योतक आहे.
खरे तर दलित केव्हाच कोषातून बाहेर पडले आहेत. आता उर्वरितांनी बाहेर पडले पाहिजे. प्रकाश आंबेडकरांच्या (हे एक उदाहरण फक्त) नेतृत्वाखालील पक्षात उच्चवर्णीय येत नाहीत. कारण हा पक्ष आमचा नाही असे ते मानतात. या मानण्याला म्हणतात- कोष. बाळ गंगाधर टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत टिळक यांच्यासारखे अनेक लोक दाखवता येतील- जे खऱ्या अर्थाने कोषातून बाहेर पडले होते. अलीकडचे उदाहरण सांगायचे तर नागपूरच्या डॉ. रूपा कुळकर्णीचा निर्देश करता येईल.
हिंदू हा धर्म नाही. हिंदूूंचे अनेक धर्म आहेत. या अनेक धर्मापैकी माणूस कुठला तरी एक धर्म मानत असतो. बोलताना हिंदूू माणूस सगळ्या दुनियेचे बोलतो, परंतु घरचे लग्नकार्य मात्र वैदिक पद्धतीने देवाब्राह्मणांच्या साक्षीने करतो. याचा अर्थ असा की, हिंदू या शब्दाखाली माणूस मोकळाबिकळा नसतो, तर वैदिक असतो. म्हणूनच उच्चवर्णीयांकडून ‘हिंदू’ शब्दाला विरोध होत नाही. त्या शब्दाच्या आड त्यांना त्यांचे वैदिक वर्णवर्चस्व बेमालूमपणे लपवता येते आणि खपवताही.
भारताची धार्मिक-सांस्कृतिक मुख्यधारा कुठली, मुक्त, मोकळी, बुद्धिप्रामाण्यवादी जीवनधारा कोणती, आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली विशिष्ट कोषात गुलाम करून ठेवणारी संस्कृती कोणती, अशासारखे अनेक प्रश्न उपस्थित करता येतील. परंतु तो फारच व्यापक विषय आहे. लक्ष्मणशास्त्री जोशी, नरहर कुरुंदकर अशा मार्क्स, मानवेंद्रनाथ रॉय, जयप्रकाश, लोहिया, नेहरू, गांधी आदींच्या प्रभावाखालील मंडळींनी (मानसिकदृष्टय़ा) वैदिकतेच्या बाहेर जाऊन जगाकडे पाहिले नसल्यामुळे जगातल्या सर्वच गोष्टींची ते चिकित्सा करतात आणि ती झाली की वैदिकत्वाच्या मानसिक कोषात जाऊन बसतात! थोडक्यात- जगात संपूर्णत: मुक्त असा कुणी नसतो. नरहर कुरुंदकर यांच्याविषयी माझ्या मनात पूज्यभाव आहे, परंतु विचारांचे परिशीलन करण्याच्या आड हा पूज्यभाव येत नाही. या वृत्तीची दीक्षा मला कुरुंदकरांकडूनच मिळाली आहे.
संदीप जावळे