‘माझी पेंटिंग आणि विचार’ हे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांचे पुस्तक लवकरच ज्योत्स्ना प्रकाशनतर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या प्रास्ताविकातील संपादित अंश..
कलेच्या इतिहासात कालक्रमाने नवनवे प्रयोग आणि बदल झालेले आपण पाहतो. त्यानुसार वेगवेगळ्या ‘इझम’ची वर्गवारी आखली गेली. मात्र कलाकाराने स्वत:ला ‘इझम’च्या कुंपणात बसवून कलाकृती निर्माण केली नाही. निर्मिती अगोदर होते आणि त्यानंतर त्याला ‘इझम’ची चौकट प्राप्त होते. वरील विचारांना अनुसरून माझी स्वत:ची कलानिर्मिती माझ्या संकल्पनात्मक चित्रातून व्यक्त करण्याचा मी प्रयत्न करू लागलो. या प्रक्रियेत एक विशिष्ट नियमावली आखलेली आहे. ही केवळ माझ्या वैयक्तिक सोयीकरता नसून सर्वच अभिजात कलांना लागू पडते.
अभिजात कलानिर्मितीचे तीन सोपान आहेत.   १) निरीक्षण, २) चिंतन आणि ३) प्रत्यक्ष कृती किंवा निर्मिती.
निरीक्षण – आपण जे पाहतो, ऐकतो, वाचतो किंवा प्रत्यक्ष अनुभव घेतो त्याची आपल्या मनाने घेतलेली विचारपूर्वक दखल म्हणजे निरीक्षण. त्याला सत्याचा आधार असतो. ते खरे ज्ञान असते. ज्ञानेंद्रियांनी घेतलेली नोंद निरीक्षणाच्या चौकटीत समाविष्ट असते.
चिंतन – निरीक्षणाला चिंतनाने अर्थ प्राप्त होतो. चिंतनानेच चूक-बरोबर, योग्य-अयोग्य अशा त्या- त्या विषयाच्या अर्थगर्भाची व्याप्ती वाढते. अनुभवाला निरीक्षणाचा आणि सत्याचा आधार असतो आणि चिंतनाला स्वत:च्या विचारांची आणि प्रतिक्रियेची जोड असते. या चिंतनातूनच कलाकृतींची अप्रकट संकल्पना आपल्या मनात आकार घेत असते.
प्रत्यक्ष निर्मिती – एखाद्या गोष्टीचे केलेले निरीक्षण आणि मनात चाललेले चिंतन याला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाली म्हणजे त्याचे मूर्त स्वरूप कलाकाराला आणि रसिकाला अनुभवता येते. म्हणूनच प्रत्येक अभिजात कलाकृतीच्या निर्मितीमध्ये या तीनही पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. विचारांना मूर्त रूप देणारे माध्यम हे साधन असते. शब्द, चित्र-शिल्प, वस्तू किंवा अभिनयासाठी शरीर ही सर्व साधने आहेत. कलानिर्मितीसाठी साधनांची हाताळणी आणि सातत्यशील सराव हादेखील तितकाच महत्त्वाचा आहे. संकल्पना नेमकेपणाने साकार करण्यात साधनांवरचे प्रभुत्व आणि कुशलता यांची महत्त्वाची भूमिका असते.
पहिल्या दोन पायऱ्यांपैकी एखादी जरी वगळली तर कलाकृतीची अभिजातता क्षीण होऊ लागते. उदाहरणार्थ, केवळ निरीक्षणाला अनुसरून केलेली कृती चिंतनाची जोड नसल्यास अनुकरण ठरेल. तसेच निरीक्षणाच्या अनुभूतीशिवाय केवळ काल्पनिक कृतीला सत्याचा आधार राहणार नाही. आणि केवळ निरीक्षण आणि चिंतन हे कृतीशिवाय कलाकृतीच्या मूर्त रूपात साकारच होणार नाही.
आपल्या विचारांना भाषा असते. आपण नेहमी आपल्याला अवगत असलेल्या भाषेतून विचार करत असतो. तसेच आपल्या मन:पटलावर त्या त्या विचारांचे दृश्य स्वरूप सरकत असते. विचारांची आणि चिंतनाची तीव्रता जशी असेल तशी त्या दृश्याची स्पष्टता आपल्याला जाणवत असते. कलाकार त्या कल्पनेला कलाकृतीद्वारे अभिव्यक्त किंवा साकार करत असतो. चित्राची दृश्य भाषा विश्वात्मक आहे. या भाषेला लेखी किंवा बोलीभाषेप्रमाणे भौगोलिक आणि मानवनिर्मित राजकीय सीमारेषा नसते.
चित्र समजून घेण्यासाठीही कलाक्षेत्राचे साहचर्य आणि त्याचा आस्वादपूर्ण अभ्यास आवश्यक असतो. कलेविषयी रुचीही बाळगावी लागते.
चित्र कळावे म्हणून त्याला शीर्षक किंवा विषय असेलच असे नाही. काही वेळा ‘Untitled’ चित्रदेखील परमावधीचा आनंद देते. चित्राचे शीर्षक चित्राला पूरक असले तरी चित्राचा दृश्य परिणामच  अधिक महत्त्वाचा आहे.
चित्रनिर्मितीचे तीन सोपान आपण लक्षात घेतले तसेच कलाकृतीच्या आस्वादाच्याही तीन पायऱ्या सांगता येतील. एखादे चित्र पाहिल्यावर केवळ दृश्यानुभव जाणवतो. केवळ पाहिले म्हणजे बरेवाईट, आनंद किंवा समाधान झाले हा एक प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे चित्र पाहिल्यावर पाहणाऱ्याच्या बुद्धीला किंवा विचारांना चालना मिळते. चित्राचा विषय, रंग, रचना, तंत्र, कौशल्य वगैरे तपशीलवार तो विचार करू लागतो. तिसऱ्या प्रकारात एखादी कलाकृती पाहिल्यावर ती मनाला किंवा हृदयाला भिडते. इथे विचारांना चालना मिळतेच, शिवाय त्या कलाकृतीचा प्रभाव दीर्घकाळ मनावर बिंबून राहतो. मात्र या तीन प्रकारांच्या आधारे कलाकृतीच्या दर्जाची वर्गवारी केली जाऊ नये, कारण प्रत्येक कलाकाराच्या कलानिर्मितीत हे तीनही प्रकार अंतर्भूत असतात.
एखाद्या कलाकाराने स्वत:च्या कलानिर्मितीबद्दल बोलताना ‘मला वाटले म्हणून हे चित्र काढले!’ किंवा ‘मला जे आवडते ते मी करतो’ असे म्हणून थोडक्यात समर्थन केले की प्रश्नकर्त्यांला काही विचारताच येणार नाही. कलाकाराने आपल्याला पटणारे आणि आवडणारे विषय साकार करणे हे अगदी योग्य आहे. याबरोबरच त्या निर्मितीमागची प्रेरणा, कार्यपद्धती ही कलाकाराच्या शब्दांत व्यक्त झाल्यावर तो आस्वादकांसाठी अभ्यासाचा विषय होतो. याच आधारावर कलाशाळांमध्ये चित्रकलेचा अभ्यासक्रम आखला जातो.
आज भारतातील सर्वच प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वात जास्त आर्ट स्कूल आहेत. त्यात स्केचिंग, स्टिल लाइफ, फिगर ड्रॉइंग, पोटेर्र्ट पेंटिंग, क्रिएटिव्ह पेंटिंग, कॉम्पोझिशन असे अनेक विषयांचे अभ्यासक्रम आखलेले असतात. यात यथार्थवादी विषयांबाबत विद्यार्थ्यांना फारशी शंका नसते. सातत्यशील सरावाने या विषयांमध्ये प्रगती साधता येते. परंतु कॉम्पोझिशन, क्रिएटिव्ह पेंटिंग, जान्र पेंटिंग वगैरेबाबत बहुसंख्य विद्यार्थ्यांचा नेहमी गोंधळ असतो. अनेक वेळा विद्यार्थ्यांशी चर्चा करताना ‘आमचे कॉम्पोझिशन जरा कुमकुवत (हीं‘) आहे, त्यासाठी काय करावे?’ असा प्रश्न असतो. मी स्वत: विद्यार्थी असताना माझ्याही मनात ही संभ्रमावस्था होती. ज्या चित्रप्रकाराला कॉम्पोझिशन, क्रिएटिव्ह पेंटिंग म्हणतात, किंवा सर्वसामान्य भाषेत ज्याला कन्टेम्पररी आर्ट वा मॉडर्न आर्ट म्हणतात, ते नेमके काय असा मला प्रश्न पडे.
खरे पाहाता ज्याला आपण कॉम्पोझिशन म्हणजेच रचनाकौशल्य म्हणतो ते केवळ क्रिएटिव्ह पेंटिंगपुरतेच लागू नसते. कॉम्पोझिशन हा सर्वच कलांचा ‘प्राण’ आहे. कोणत्याही कलाकृतीत कॉम्पोझिशन चांगले नसेल तर ती निस्तेज होते.
कलाकृती वास्तववादी असो किंवा केवलाकारी, ती मुख्यत: कॉम्पोझिशनमुळेच आकर्षक ठरते. हे लक्षात आले तरी क्रिएटिव्ह पेंटिंग शिकताना कोऱ्या कागदावर चित्रविषयाचे स्पष्ट स्वरूप साकार करता येत नसे. कारण समोर दिसते त्यावरून चित्र रंगवण्यापेक्षा एखादी संकल्पना विचारपूर्वक परंतु सहजपणे चित्रातून व्यक्त करणे काही जमेना. जर काही प्रयत्न केलाच तर ते चित्र फिगर ड्रॉइंग किंवा लँडस्केपकडे झुकत जाई किंवा फार तर ते कथाचित्रासारखे होई. इतका वास्तववादी शैलीचा माझ्या निर्मितीवर पगडा होतो, किंबहुना तो सहजपणे झुगारून द्यावा असे आजही मला वाटत नाही. जमत नाही तर पूर्वसुरींच्या एखाद्या कलाकाराच्या शैलीचे अनुकरण करून आपली निर्मिती त्या इझममध्ये बसवावी असेही मनाला पटत नव्हते. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आर्ट स्कूलमध्ये शिकताना साल्वादोर दालीच्या आणि तत्सम अतिवास्तववादी  कलाकारांच्या चित्रशैलीचा प्रभाव काही काळ माझ्यावर होता हे मी नाकारत नाही. कारण आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर आपण संकल्पना चित्रांना साकार करण्यासाठी करू शकतो हा मला त्या वेळी थोडासा दिलासा मिळाला होता.
माझ्या चित्रांचे विषय भारतीय विचारसरणीचा प्रभाव असणारे असल्याने केवळ स्वप्नसदृश फॅन्टसी रंगवण्यापेक्षा आपल्यावरच्या संस्काराशी निगडित असलेली जाणीव माझ्या चित्रांसाठी कारण बनू लागली. त्यामुळे चित्रातील विषयात निवेदनाबरोबर कथाबोध दर्शवणारी चित्रे मी रंगवू लागलो. एखाद्या विषयाचा अभ्यास आणि चिंतन करून चित्र साकारण्यात मला अधिक आनंद आणि समाधान मिळते. अशा अनेक विषयांची आणि अनुभवांची जंत्री आपल्या मनात साठवलेली असते. त्यातल्या एखाद्या विषयाचा सर्वागाने अभ्यास आणि चिंतन करून त्यावर आधारलेली चित्रांची मालिका शोधप्रबंधासारखी साकार होते. त्या चित्रांमधून व्यक्त होणारी परिपक्व अनुभूती रसिकांपर्यंत संक्रमित होते.
आतापर्यंत असे वेगवेगळे विषय घेऊन ‘संकल्पना चित्रांची’ मालिका मी रंगवत आलो. या चित्रांतून विशिष्ट बोध- प्रत्यय देण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणून मी या चित्रांना ‘बोधचित्रे’ असेही म्हटले आहे. प्रदर्शनातली मालिका २५ ते ३० चित्रांची असली तरी त्या त्या विषयांना अनुसरून येणारी अनेक चित्रे पुढेही रंगवली गेली. ही सर्व वास्तववादी शैलीशी जवळीक ठेवून रंगवली आहेत. पूर्णपणे फोटो रिअ‍ॅलिझम न स्वीकारता आवश्यक तेथे आकारांचे आणि रंगाचे विरूपीकरण करण्याचे स्वातंत्र्यही मी घेतले आहे. चित्रांचे विषय एखाद्या प्रसंगावर आधारित असले तरी प्रसंगवर्णन करणे किंवा इलस्ट्रेट करणे हा उद्देश नसून चित्रातील गर्भित आशय प्रस्तुत होणारी रचना साकार करण्याचा माझा प्रयत्न असतो.
सातत्यशील रेखांकन, व्यक्तिचित्रण, वस्तुचित्रण आणि निसर्गचित्रांचा अभ्यास यामुळे बोधचित्रांच्या रचनेला पूरक आधार मिळाला ही वस्तुस्थिती आहे. प्रस्तुत पुस्तकात अशा बोधचित्रांच्या मालिकेतली काही निवडक चित्रे सादर केली आहेत. चित्राचा विषय, त्यामागची प्रेरणा, चिंतन आणि प्रत्यक्ष रेखाचित्रापासून पूर्ण चित्र साकार करतानाचा अनुभव याचा तपशील चित्रांसोबत दिला आहे. अभ्यासकाने चित्रांचे किंवा रचनापद्धतीचे अनुकरण करू नये असा स्पष्ट आणि प्रेमळ सल्ला मी इथे देऊ इच्छितो. कारण केवळ अनुकरणाने कलाकार स्वत:च्या स्वयंप्रेरित रचनाशक्तीला मुकतो. त्यामुळे या पुस्तकातून प्रेरणा घेऊन आपल्यामध्ये असलेल्या अंतर्भूत कल्पनाशक्तीला जागृत करावे आणि स्वयंभू कलानिर्मिती करावी हा हेतू आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा