हात थरथर कापत आहेत.
तळव्यांना घाम फुटला आहे.
तोंड कोरडे पडले आहे.
छातीची धडधड वाढली आहे..
हल्ली संगणकासमोर टाइपण्यास बसलो रे बसलो, की आमचे हे असे कसेसेच होते!
मित्रों, आम्ही मूळचे पोटावळे पत्रकारू. लिहिणे हे आमुच्या उदरभरणाचे यज्ञकर्म. ते न करावे, तर पोट भरावे कैसे?
पाकिटे घ्यावीत?
पेड-न्यूजा घ्याव्यात?
जाह्य़रात पुरवण्या काढाव्यात- जीवेत् शरद: शतम्च्या?
की नगरसेवकांस भाषणे लिहून देण्याची कंत्राटे घ्यावीत?
प्रंतु या क्षेत्री गर्दी फार. स्पर्धा मोठी. स्पर्धक तर त्याहून मोठे, जुनेजाणते, पत्रकार संघांनी पुरस्कारून नावाजलेले. तेथे आपणांस कोण नेता हिंग लावणार? आपण तर अदनासे पोटावळे! फार फार तर आपवाले आपणास विचारणार. प्रंतु त्यांचा काय उपेग? त्यांचीच डिपॉझिटे जप्त झालेली!  
बरे, हे न करता (नाइलाज का नाम नि:स्पृहता!) सरळसरळ लेखनच करावयास जावे, तर ही शारीरिक आपत्ती!
हे दुखणेही ऐसे, की कोणास सांगताही येत नाही. तरीही परवा हिला सांगितले. म्हणालो, ‘‘प्रिये, आम्ही लिहावयास बसलो ना, की आमचे नं हात कापतात, छातीची धडधड वाढते..’’
तर तिने डोळ्यांस पदरच लावला. ‘‘तरी मी सांगत होते- सोडा सोडा.. पण मेलं आमचं ऐकतं कोण? आता झालं ना लिव्हरमधी पाणी?’’
शेवटी मनी श्रेष्ठ धारिष्टय़ धरून आम्ही आमुचे परमशेजारी रा. रा. लेले यांच्या कानी आमची दुरवस्था घातली. लेलेच का? तर ते आमुच्या चाळीचे मानसोपचारतज्ज्ञ आहेत. ते रोज ‘मनमोराचा पिसारा’ वाचतात!
त्यांनी डोळे मिटून सगळे ऐकले. मग लांब चेहरा करून म्हणाले, ‘‘अप्पाजी, तुम्हांला आत्मचिंतन करावे लागेल. त्यासाठी बैठक बोलवावी लागेल..’’
या लेलेंना दुसऱ्याच्या खर्चाने बैठक करण्याची वाईट खोड! खरे तर आमच्याऐवजी हेच पत्रकार व्हायचे!
म्हटले, ‘‘लेले, दुरवस्थेनंतर आत्मचिंतन करायचे असते, हे तर राहुल गांधींनासुद्धा माहीत आहे. तुम्ही काहीतरी नवीन सांगा..’’
ते म्हणाले, ‘‘मला सांगा, तुम्हाला हा त्रास नेमका कधीपासून होऊ लागलाय?’’
आम्हाला ते आठवले. आणि काय सांगू? नुसत्या त्या आठवणीनेच आमुच्या कंठास शोष पडला. हात थरथर कापू लागले. छाती धडधडू लागली.
चांगले आठवतेय- त्या दिशी साप्ताहिक सुटी होती. त्या दिशी पत्रकारूंस पेपरे वाचणे ऐच्छिक असते. तेव्हा ते टाळून टैम्पासमिषे संगणकी गेलो. सवयीने फेसबुक उघडले. आधी डोळे भरून भिंतीवरील मजकूर वाचला. मग डोळे बंद करून पाच-दहा ठिकाणी लाइक्स केले. एक-दोन ठिकाणी काँग्रेट्स, वॉव, ग्रेट ऐशा कॉमेन्टा नोंदविल्या. मग वाटले, आपणही का न या ज्ञानयज्ञात दोचार समिधा टाकाव्यात? सुचले ते लिहिले, की-
‘‘आज हवा काय वाईट पडलीय.. वाटते, झोपून जावे.’’
पुढे एक दातओठ खाणारी पितरंगी स्माईलीही टाकली. आणि मग लाइक्स पडण्याची वाट पाहत बसलो.
लाइक्स नाही, पण धाडधाड कॉमेन्टाच सुरू झाल्या..  
– ‘‘आता तुम्हाला हवापण वाईट वाटणारच.’’
– ‘‘लेखक सोनियांचा दलाल आहे. त्याला मनमोहनच्या काळातली हवा दिसली नाही. त्यावेळी त्याने अशी टीका केल्याचे आठवत नाही. पण तुम्ही कितीही कोल्हेकुई करा, अच्छे दिन आल्याशिवाय राहणार नाहीत, हे विसरू नका.’’
– ‘‘असे भिकार स्टेटस टाकण्यापेक्षा कायमचेच झोपून जा. देशाला तुमच्यासारख्या गद्दारांची गरज नाही.’’
– ‘‘हवा वाईट पडली याला जागतिक परिस्थिती जबाबदार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांमुळे भारतीय उपखंडातील हवा बिघडली आहे. पण ती नीट होणार आहे. नाही झाली तर अणुबॉम्बचे बटण आता आपल्या हातात आहे. तेव्हा जरा धीर धरा आणि कुठेही पचकू नका.’’
– ‘‘याला कोणीतरी नमोचहा पाजा रे. झोप उडेल.’’
– ‘‘वन्दे मातरम्.. नासक्या मनोवृत्तीने हवेकडे पाहणे चुकीचे आहे. अजून मोदींना येऊन चार दिवसही झाले नाहीत तोच ही टीका सुरू झाली. मोदींचे यश बघवत नाही का? जागते रहो.’’
जागते रहो काय? या प्रतिक्रिया वाचल्या आणि आमची झोपच उडाली.
हात थरथर कापू लागले. तळव्यांना घाम फुटला. तोंड कोरडे पडले आणि छातीची धडधड वाढली..                                                          

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा