मागच्या आठवडय़ात आपण चंगळवाद (Consumerism) म्हणजे काय, हे बघितले. भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि चंगळवाद यांचा तसा जवळचा संबंध. जेवढी वस्तूंची खरेदी-विक्री जास्त प्रमाणात होते, तेवढाच अर्थव्यवस्थेला फायदा होतो. जसा भांडवलशाहीचा प्रचार, प्रसार आणि प्रभाव वाढत गेला तसाच चंगळवादही वाढला. आज आपणही या चंगळवादी संस्कृतीचा भाग आहोत. आणि चंगळवाद म्हणजे नेमके काय, हे जरी माहिती नसले तरी त्याचे फायदे-तोटे आपल्याला आजूबाजूला दिसतच आहेत. पण समाजात नेहमीच वेगवेगळे विचारप्रवाह, जीवनपद्धती अस्तित्वात असतात. काळानुसार काही जोर धरतात, तर काही सुप्तपणे कोणत्या तरी कोपऱ्यात आपले अस्तित्व टिकवून ठेवतात. चंगळवादाला प्रतिक्रिया म्हणून आणि एक पर्याय म्हणून अशीच एक जीवनपद्धती अस्तित्वात आहे आणि वाढू पाहते आहे- मिनीमॅलिझम.
‘मिनीमॅलिझम’ हा शब्द प्रसिद्धीस आला कलाजगतातून. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेली आणि १९६०-७० च्या दशकांत प्रसिद्धीस आलेली ‘मिनीमॅलिझम’ ही विचारसरणी म्हणजे कलेमध्ये एक वेगळा विचार देणारी चळवळ होती. दृश्यकला, संगीत, स्थापत्य अशा कलेच्या अनेक क्षेत्रांत तिचा उपयोग करण्यात आला.. अजूनही करण्यात येतो. मिनीमॅलिझममध्ये नावाप्रमाणेच ज्याची आवश्यकता आहे तेवढय़ाच गोष्टी ठेवण्यात येतात आणि अनावश्यक गोष्टींना फाटा दिला जातो. यात साधेपणाला, सोपेपणाला खूप महत्त्व दिले जाते. ‘Less is more’ असे मिनीमॅलिझमचे बोधवाक्यच आहे. हाच साधेपणा, सोपेपणा आपल्याला आपल्या आयुष्यात आणता येईल का, या विचारातून मिनीमॅलिझम या जीवनपद्धतीला सुरुवात झाली.
चंगळवादात भौतिक वस्तू याच सुखाचे आणि आनंदाचे साधन आहेत असे मानले जाते आणि या वस्तू जमा करण्यात सारी ऊर्जा, श्रम, वेळ आणि पसा गुंतवण्यात येतो. याचे प्रमाण एवढे वाढते, की या वस्तू ‘साधन’पासून ‘साध्य’ बनतात. मिनीमॅलिझमची सुरुवात या अशा खूप साऱ्या वस्तूंनी आपले आयुष्य भरण्याच्या विचारांना नाकारण्यापासून होते. खरंच आपल्याला एवढे सारे कपडे, जोडे, घरातील फर्निचर आणि इतर अनेक वस्तूंची गरज आहे का, असा प्रश्न ही विचारसरणी करते. कोणत्या वस्तू असाव्यात आणि कोणत्या नसाव्यात, हे त्या वस्तूंच्या त्यावेळच्या उपयुक्ततेनुसार किंवा आपल्याला त्यांच्या असणाऱ्या महत्त्वावरून ठरवावे असे मिनीमॅलिझम सांगते. मिनीमॅलिझम आचरणात आणणारे मिनीमॅलिस्ट लोक एका नव्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करून पाहत आहेत. मिनीमॅलिस्ट बनण्याची सुरुवात घरातील अनावश्यक सामान कमी करून (ownsizing) केवळ आवश्यक तेवढय़ाच वस्तू ठेवून करता येते. यात आहे ते सामान हळूहळू कमी करणारे जसे आहेत तसेच काही अगदी ठरावीक ५०-१०० एवढय़ाच वस्तू बाळगणारेही आहेत. तसेच एकदा का तुमच्या जवळच्या वस्तू कमी झाल्या की तुमची जास्त जागेची गरजही कमी होते. त्यामुळे मिनीमॅलिस्ट मोठय़ा घराचा हव्यास न धरता छोटय़ात छोटय़ा, पण गरज भागवू शकेल अशा घरांना पसंती देतात. मिनीमॅलिझमचा स्वीकार लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केला आहे. राहत्या घरातच गरज आणि वस्तू कमी करून महत्त्वाच्या गोष्टींसाठी जागा बनवणारी कुटुंबे जशी आहेत तसेच एका बॅगमध्ये मावतील एवढय़ाच वस्तू घेऊन, नोकरी सोडून जगप्रवास करत अनुभव मिळवणारे कलंदर लोकही यात येतात. पण मिनीमॅलिझम म्हणजे फक्त भौतिक वस्तू कमी करणे एवढेच नाही. एक प्रकारे मिनीमॅलिझम आपल्याला आपल्या आयुष्यात खरंच महत्त्वाचं काय आहे याचा विचार करायला लावते. हा प्रश्न आपण आयुष्यातल्या वेगवेगळ्या पलूंसंबंधी स्वत:ला विचारू शकतो. उदा. आपला वेळ, नातेसंबंध, आर्थिक व्यवहार, आपले ध्येय, स्वप्ने, इत्यादी. वेळ- आपण दिवसातला किती वेळ कोणत्या गोष्टींसाठी घालवतो? आपण दिवसभर व्यस्त असतो; पण नेमके कशात? मोबाइल, ई-मेल, समाजमाध्यमं आपल्याला कामातून कितीदा विचलित करतात आणि आपला त्यावर किती वेळ जातो? किती गोष्टी आपण खरंच आवडतात म्हणून करतो आणि किती गोष्टी काहीतरी करायचं, पाहायचं, व्यक्त करायचं, अनुभवायचं राहून जाईल या भीतीतून (Fear of Missing Out) म्हणून करतो. जर आपण कुटुंब आणि आरोग्य याला प्राधान्य देतो असे म्हणत असू, तर अनेक छोटय़ा, अनावश्यक गोष्टी टाळून आपण आपला वेळ या महत्त्वाच्या गोष्टींसाठी देऊ शकतो. नात्यांच्या, मत्रीच्या बाबतीतही ‘सोसल’ तेवढंच ‘नेटवìकग’ करून हजार मित्र जोडण्यापेक्षा संकटाच्या प्रसंगी हजर राहतील अशीच मत्री, नाती जोडण्यावर भर देता येईल. थोडक्यात- Less is more म्हणजे कमी महत्त्वाच्या गोष्टींना कमी करून महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देणे. विचार केला तर असे जाणवेल की या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे वस्तू नसून जगण्याचे अनुभव, चांगली नाती, आरोग्य आणि आवडत्या कामात रमणे या असू शकतात. अर्थात त्यांच्यासाठी आपण जागा ठेवली तर!
तसे म्हटले तर मिनीमॅलिझम खूप नवीन तत्त्वज्ञान किंवा जीवनपद्धती नाही. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा पुरस्कार सगळ्याच धर्मात, संस्कृतींत केला जातो. पण या आधुनिक युगात सामान्य लोकांना त्यांच्या सामान्य आयुष्यात अशा प्रकारचा विचार आणि जीवनपद्धती व्यावहारिक, शाश्वत पद्धतीने वापरता येईल का, याचे उत्तर मिनीमॅलिझम शोधत आहे. शेवटी मायकल अँजेलो म्हणाला तसा- दगडाच्या शिळेत सुंदर शिल्प आधीपासूनच असते, शिल्पकाराचे काम असते ते त्याच्या आजूबाजूचा नको असलेला भाग काढून टाकणे. आपल्याही आयुष्यातल्या कमी महत्त्वाच्या, आवश्यकता नसणाऱ्या गोष्टी जर आपण ओळखून दूर करू शकलो तर कदाचित आपल्याही हाती काही सुंदर लागेल. मिनीमॅलिझममधून एवढे आपण नक्कीच शिकू शकतो.
parag2211@gmail.com