एतद्देशीय, सवयीचे पदार्थ खाणं केव्हाही श्रेयस्कर. ‘म्हणजे अमुक अमुक पदार्थ आम्ही काय आयुष्यभर खायचे नाहीत?’ असं विचारणाऱ्या व्यक्तींनी मनात पक्की खूणगाठ बांधायला हवी, की नियमाविरुद्ध खाल्लेलं पचवायला पचनशक्ती उत्तम असावी लागते आणि ती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘शारीरिक कष्ट’
lok07जेवणानंतर काय करावं किंवा कुठल्या प्रकारच्या आहारानंतर काय प्यावं, काय करावं याचेही काही नियम आहेत. ते नियम तोडणे याला ‘परिहारविरुद्ध’ आहार म्हणतात. जमिनीवर मांडी घालून जेवायला बसावं आणि त्यानंतर पायाकडील रक्तपुरवठा सुरळीत चालू राहण्यासाठी शतपावली घालावी असा नियम आहे. पण मुळातच जर ‘बफे(लो)’ म्हणजे चरत चरत जेवण केलं तर पायाकडे रक्तप्रवाह होतच असतो. अशा वेळी पुन्हा शतपावलीची काय गरज? तळलेले, भरपूर चीज किंवा बटरयुक्त स्निग्ध पदार्थ खाल्ल्यावर ते कुठेही चिकटून राहू नयेत म्हणून गरम पाणी प्यायला हवं. आज बटर आणि चीजयुक्त पाव-भाजी, पिझ्झा, बर्गर अशा पदार्थावर शीतपेय पिण्याची पद्धत आहे. हे परिहारविरुद्ध आहे. यामुळे सूज येण्यासारखा कष्टसाध्य आजार होऊ शकतो.
सचिनला मलेरिया झाला. मलेरिया या आजारात मुळातच भूक आणि पचनशक्ती अगदी कमी होते. त्यात औषधांनी तर भुकेचा सत्यानाश होतो. जोडीला प्रचंड अशक्तपणा. यातून लवकर बाहेर पडण्यासाठी सचिननं पौष्टिक आहार चालू केला. कच्चं सलाड आणि मोड आलेली कच्ची कडधान्यं..आठ दिवसांत त्याला पुन्हा ताप आला. याही वेळी सगळ्या तपासण्या झाल्या. पण तापाचं कारण कळेना. पचनशक्ती कमी असताना असे कच्चं किंवा अर्धकच्चं पदार्थ खाणं हे पाकविरुद्ध आहे. चायनीज पदार्थामध्ये भाज्या, तांदूळ खूप वेळा अर्धवट शिजवलेले असतात. हॉटेलमधली तंदुरी रोटी, उत्तप्पा, डोसा असे पदार्थ बरेच वेळा जळलेले असतात. असे कमी किंवा जास्त शिजलेले पदार्थ पाकविरुद्ध होत. त्यांच्या सेवनानं पोटाचे असंख्य विकार उद्भवू शकतात.
शास्त्रात काही पदार्थ एकत्र करणं निषिद्ध सांगितले आहेत. मद्य- खिचडी- खीर किंवा दूध- केळी- ताडगोळे- दही- ताक या गटातले कुठलेही दोन पदार्थ एकत्र करून खाणं हे संयोगविरुद्ध आहे. अशा प्रकारच्या आहाराने रस आणि रक्त धातू बिघडून त्वचाविकार, रक्तक्षय असे आजार होण्याची शक्यता बळावते.
स्वप्निलचं वय वष्रे आठ. त्याला दूध अजिबात आवडत नाही. पण जाहिराती बघून बघून त्याच्या आईनं पक्का समज करून घेतला होता की दूध नाही घेतलं तर तिच्या मुलाची वाढच होणार नाही. रोज ती माता त्याला बळजबरीनं दूध प्यायला लावते आणि रोज तो ते १५ मिनिटांत ओकून बाहेर काढतो. ‘‘तो ओकतो तरी कशाला देतेस?’’ असं विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘१५ मिनिटं पोटात राहतं नं त्याच्या. तेवढय़ा वेळात त्यातला काही भाग तर शोषला जात असेल? तेवढाच फायदा ना?’’ (यावर प्रतिक्रिया म्हणून कुठलेीेूल्ल२ टाकता येतील याची कल्पना करा.) असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लागणं याला ‘हृद्विरुद्ध’ म्हणतात. मोठी माणसं स्वत: आपले आवडते पदार्थ खाण्याचं आणि नावडते पदार्थ न खाण्याचं स्वातंत्र्य घेतात. सक्ती होते ती बिचाऱ्या लहान मुलांवर. दूध, पालेभाज्या, कारलं, शेपू असे न आवडणारे पदार्थ त्यांना बळजबरीने खावे लागतात. पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी तो मनाविरुद्ध खाल्ला तर अंगी कसा लागेल?

एकदा मंडईत एक महिला भाजीवाल्याशी पाच रुपयांसाठी वाद घालत होती- ‘फार महाग भाजी विकता तुम्ही, मी नेहमी घेते, इतकी घेतली, दुसऱ्या भाजीवाल्याकडे स्वस्त आहे’ वगरे. भाजीवाला वैतागून म्हणाला, ‘अहो ताई, ही निवडलेली भाजी आहे. हे बघा, यातली खराब भाजी आम्ही वेगळी काढून ठेवली आहे, मागे पोत्यात. इथले आजूबाजूचे हॉटेलवाले ही भाजी घेऊन जातात. तिथे तुम्ही वाटेल ते पसे मोजून ती खाता. आणि गरिबाला पाच रुपयांसाठी नाडता होय?’’ मला ऐकून मळमळायला लागलं. आहारीय पदार्थ गुणसंपन्न असणं आवश्यक असतं. किडलेले, सडके, बुरशी लागलेले, सुकलेले पदार्थ, उत्तम आणि शुद्ध शरीरघटक बनवूच शकत नाहीत. विकतच्या खाद्यपदार्थाच्या बाबतीत ‘दृष्टीआड सृष्टी’ अशी आपली अवस्था असते. बिस्किटे बनवणाऱ्या कित्येक नामवंत कंपन्या, पोरकिडे आणि अळ्या लागून खराब झालेली धान्यं वापरतात हे मला एका फूड इन्स्पेक्टरनं सांगितलं होतं.  ‘रेडी टु कूक’ पदार्थामध्ये तर सुकवलेल्या भाज्या मुद्दाम वापरतात. माझी एक मत्रीण पसे वाचवण्यासाठी रात्री उशिरा भाजी घ्यायला जायची. शिल्लक राहिलेली भाजी तिला अगदी निम्म्या भावानं मिळायची. पण ती भाजी म्हणजे लोकांनी मागे ठेवलेला कचराच असायचा. त्या भाजीत वाचणारे पसे आणि त्यातून उद्भवणाऱ्या आजारपणात खर्च होणारे पसे याचा ताळेबंद मी तिला एकदा करून दाखवला. तो सहसा केला जात नाही, हे दुर्दैव. असा गुणसंपन्न नसलेला आहार म्हणजे ‘संपत् विरुद्ध आहार’ होय.
मागे आपण भोजनाविधीची माहिती घेतली होती. भूक लागल्यावर, हात स्वच्छ धुऊन, उष्ण, ताजं, स्निग्ध, एकाग्रचित्तानं, पोटात थोडी जागा ठेवून जेवावं असे काही नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून घेतलेला आहार म्हणजे ‘विधिविरुद्ध’ आहार होय. अशा आहाराचे तोटे आणि विधियुक्त आहाराचे फायदे आपण पूर्वीच्या लेखात वाचले आहेतच.
आहाराचे असे निषेधवजा नियम सांगितलेले कुणालाच आवडत नाहीत. ‘इतकं सगळं सांगण्यापेक्षा काय खायचं ते सांगा की,’ असं म्हणून वैद्यांना वेडय़ात काढण्यापर्यंत लोकांची मजल जाते. नको नको ते खाल्ल्यामुळेच आजार होतात. म्हणून ‘हे पदार्थ खाऊ नका,’ असंच आधी सांगावं लागतं. जे खाऊ नये त्याच्या विरुद्ध खावं हा एक साधा नियम. उदा. ‘विधिविरुद्ध खाऊ नये’ याचाच अर्थ आहारविधीप्रमाणे खावं. ‘अग्नीविरुद्ध खाऊ नये’ यात अग्नीप्रमाणे / भुकेप्रमाणे खावं हे ओघानंच आलं.  ‘सवयीचे नसलेले पदार्थ खाऊ नयेत’ यात दडलेला अर्थ आहे, ‘सवयीचे पदार्थ खावेत.’ इ.
तरी पण ‘खाऊ नये’ची यादी बघून आपल्या खाण्यावर भरमसाट बंधने आली आहेत, असं लोकांना उगीचच वाटतं. खरं तर आपण शहरातली माणसं खूप तऱ्हेचे पदार्थ खात असतो. ‘जगातले सगळ्या प्रकारचे पदार्थ मला खाता आले पाहिजेत,’ हा अट्टहास आधी सोडायला हवा. (अविचाराने सगळे पदार्थ खाण्याच्या प्रवृत्तीला माझी आई ‘घर खाईन, दार खाईन, घराचे वासे खाईन,’ म्हणायची.) आपले निरोगी पूर्वज, आजही जगात आढळणाऱ्या निरोगी जमातींच्या आहारात आपल्या आहाराइतके वैविध्य आढळत नाही. ऋतूनुसार उपलब्ध फळं- भाज्या-धान्य आणि सणांना अनुसरून करायच्या पाककृती यात पुरेसं वैविध्य आहे आणि ते आरोग्याला हितकारकही आहे. इतर देशांमधील पदार्थ, कृत्रिम खाद्यपदार्थ यांची गरज भासणार नाही इतकं भारतीय पाकशास्त्र संपन्न आहे. म्हणून ‘काय खावं?’ याचं सोप्पं उत्तर म्हणजे ‘आपल्या पणजी आणि पणजोबांनी खाल्लेले एतद्देशीय पदार्थ खावेत.’
‘मग हे सगळे पदार्थ आम्ही काय आयुष्यभर खायचे नाहीत?’ असं विचारणाऱ्या व्यक्तींनी मनात अशी पक्की खूणगाठ बांधावी, की नियमाविरुद्ध खाल्लेलं पचवायला पचनशक्ती उत्तम असावी लागते. उत्तम पचनशक्ती एक तर प्रकृतीत असते म्हणजे आनुवांशिकरीत्या प्राप्त होते किंवा आपल्याला प्राप्त करावी लागते. ती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘शारीरिक कष्ट’. शहरी जीवनात आपण खूप यंत्रावलंबी झालो आहोत. (आणि ग्रामीण भारतातल्या कष्टकरी लोकांनाही तसं व्हायला प्रवृत्त करत आहोत.) कमीत कमी कष्ट आणि जास्तीत जास्त आहार हे चुकीचं सूत्र आपण अंगीकारलं आहे. ज्यांना जिभेचे सगळे चोचले पुरवायचे आहेत त्यांनी स्वत:साठी, कुटुंबासाठी, देशासाठी भरपूर शारीरिक कष्ट करून, कडकडून भूक लागेल आणि दगडसुद्धा पचतील अशी व्यवस्था आधी करून घ्यावी. निसर्गानं खाण्याचा अधिकार फक्त कष्टकरी माणसाला दिला आहे. त्याच्या या नियमातून आपली सुटका नाही.
 कारण निसर्गाकडे वशिला किंवा लाचलुचपत चालत नाही. तेव्हा ‘आरोग्यसंपन्न भारता’साठी आता आपण ‘कष्टाळू भारत अभियान’ सुरू करू या.                     

Story img Loader