एतद्देशीय, सवयीचे पदार्थ खाणं केव्हाही श्रेयस्कर. ‘म्हणजे अमुक अमुक पदार्थ आम्ही काय आयुष्यभर खायचे नाहीत?’ असं विचारणाऱ्या व्यक्तींनी मनात पक्की खूणगाठ बांधायला हवी, की नियमाविरुद्ध खाल्लेलं पचवायला पचनशक्ती उत्तम असावी लागते आणि ती प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘शारीरिक कष्ट’
सचिनला मलेरिया झाला. मलेरिया या आजारात मुळातच भूक आणि पचनशक्ती अगदी कमी होते. त्यात औषधांनी तर भुकेचा सत्यानाश होतो. जोडीला प्रचंड अशक्तपणा. यातून लवकर बाहेर पडण्यासाठी सचिननं पौष्टिक आहार चालू केला. कच्चं सलाड आणि मोड आलेली कच्ची कडधान्यं..आठ दिवसांत त्याला पुन्हा ताप आला. याही वेळी सगळ्या तपासण्या झाल्या. पण तापाचं कारण कळेना. पचनशक्ती कमी असताना असे कच्चं किंवा अर्धकच्चं पदार्थ खाणं हे पाकविरुद्ध आहे. चायनीज पदार्थामध्ये भाज्या, तांदूळ खूप वेळा अर्धवट शिजवलेले असतात. हॉटेलमधली तंदुरी रोटी, उत्तप्पा, डोसा असे पदार्थ बरेच वेळा जळलेले असतात. असे कमी किंवा जास्त शिजलेले पदार्थ पाकविरुद्ध होत. त्यांच्या सेवनानं पोटाचे असंख्य विकार उद्भवू शकतात.
शास्त्रात काही पदार्थ एकत्र करणं निषिद्ध सांगितले आहेत. मद्य- खिचडी- खीर किंवा दूध- केळी- ताडगोळे- दही- ताक या गटातले कुठलेही दोन पदार्थ एकत्र करून खाणं हे संयोगविरुद्ध आहे. अशा प्रकारच्या आहाराने रस आणि रक्त धातू बिघडून त्वचाविकार, रक्तक्षय असे आजार होण्याची शक्यता बळावते.
स्वप्निलचं वय वष्रे आठ. त्याला दूध अजिबात आवडत नाही. पण जाहिराती बघून बघून त्याच्या आईनं पक्का समज करून घेतला होता की दूध नाही घेतलं तर तिच्या मुलाची वाढच होणार नाही. रोज ती माता त्याला बळजबरीनं दूध प्यायला लावते आणि रोज तो ते १५ मिनिटांत ओकून बाहेर काढतो. ‘‘तो ओकतो तरी कशाला देतेस?’’ असं विचारल्यावर ती मला म्हणाली, ‘‘१५ मिनिटं पोटात राहतं नं त्याच्या. तेवढय़ा वेळात त्यातला काही भाग तर शोषला जात असेल? तेवढाच फायदा ना?’’ (यावर प्रतिक्रिया म्हणून कुठलेीेूल्ल२ टाकता येतील याची कल्पना करा.) असे न आवडणारे पदार्थ मनाविरुद्ध खायला लागणं याला ‘हृद्विरुद्ध’ म्हणतात. मोठी माणसं स्वत: आपले आवडते पदार्थ खाण्याचं आणि नावडते पदार्थ न खाण्याचं स्वातंत्र्य घेतात. सक्ती होते ती बिचाऱ्या लहान मुलांवर. दूध, पालेभाज्या, कारलं, शेपू असे न आवडणारे पदार्थ त्यांना बळजबरीने खावे लागतात. पदार्थ कितीही पौष्टिक असला तरी तो मनाविरुद्ध खाल्ला तर अंगी कसा लागेल?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा