खूप महिन्यांनी सरोजच्या घरी टी. व्ही. बघायला बसले होते. माझ्या घरातून इडियट बॉक्स तीन वर्षांपूर्वीच हद्दपार झालाय. त्यामुळे बऱ्याच गोष्टी नवीन वाटत होत्या. दुपारची वेळ होती. एका वाहिनीवर खाद्यभ्रमंती चालू होती. एक परदेशी पदार्थ दाखविण्याची तयारी आचारी करत होता.
‘बाप रे, किती वेगवेगळ्या चवीचे घटक घेतले आहेत त्या आचाऱ्यानं? त्याला नक्की कुठल्या चवीचा पदार्थ बनवायचाय?’
‘अगं, त्यांना ‘शेफ’ म्हणतात. ‘आचारी’ काय?’ सरोजनं मला अपडेट करायचा प्रयत्न केला.
त्या शेफची पाककृती सुरू झाली. बटर, मसाल्याचे विविध पदार्थ, भाज्या, सॉसेस, साखर, मीठ असे सगळे घटक तो भसाभसा एकत्र करत होता. आणि अचानक त्यात त्यानं पेलाभर दूध ओतलं.
‘मीठ असताना दूध कसं घालतोय हा? हे विरुद्धान्न आहे..’ माझी ही प्रतिक्रिया सरोजला आवडली नसावी. किंवा तो शेफ तिचा लाडका असावा. तिनं चॅनेलच बदललं. पण दुसरीकडेही तसाच कार्यक्रम. (‘चॅनेल वॉर’ ना!) तिथला शेफ सूप बनवत होता. टॉमॅटो, व्हिनेगर, भाज्यांचं पाणी, मसाले सगळं नीट चालू होतं. शेवटी चवीला म्हणून त्यानं त्यात दुधाची साय घातली.
‘आंबट आणि साय एकत्र? हे पण विरुद्धान्न आहे..’ यावेळी सरोजनं माझ्याकडे असा कटाक्ष टाकला, की मीच चॅनल बदललं. तिथेही उंच पांढरी टोपी घातलेला माणूस. त्याच्याबरोबर कुणी तरुणी होती. ‘ही प्रसिद्ध मॉडेल आहे. व्वा! आज हिची रेसिपी बघायला मिळणार वाटतं..’ सरोज खुशीनं म्हणाली.
‘ही स्वत:च्या घरी तरी करते का कधी स्वयंपाक?’ माझी आपली छोटी शंका!
‘तू ना, अँटिक पीस आहेस!’ सरोज हसत म्हणाली. (‘अँटिक पीस’ ही तिची प्रतिक्रिया ‘अतिशय मौल्यवान’ या सकारात्मक अर्थानं मी स्वीकारली.) या तिसऱ्या शेफनं तर मध शिजवायला ठेवला होता गॅसवर. मी वैतागून तो डबा बंद केला आणि हे कुणीही आचारी नसून केवळ शेफ आहेत, ही खुणगाठ मनाशी बांधली.
खाद्यपदार्थाचे हे कार्यक्रम सध्या खूप लोकप्रिय आहेत. हॉटेलमध्ये तर हे पदार्थ आवडीनं खाल्ले जातातच; पण रोजचा वरण-भात-भाजी-पोळीचा स्वयंपाक न करणाऱ्या महिलासुद्धा हे पदार्थ आवडीनं आणि वेळ काढून बनवतात. (आपल्या आजी, आई यांच्यापेक्षा हे ‘शेफ’ हुशार ना!) पुरणाची पोळी, उकडीचे मोदक, भाकरी, सुरळीच्या वडय़ा असे पदार्थ बनवता येणं हे सुगरणपणाचे निकष आता कालबाह्य़ झालेत म्हणे. आता कॉन्टिनेंटल फूड बनवता आलं पाहिजे.
‘पण आहारीय पदार्थ बनवायचे काही नियम असतात. ते पाळायला नको का? कशातही काहीही मिसळायचं? गार/ गरम कसेही संस्कार करायचे? हे चूक आहे.’ मी सरोजशी पोटतिडिकीनं बोलत होते.
‘आजकाल लोकांना खाण्याच्या पदार्थामध्ये सतत वैविध्य हवं असतं. तू जे मघापासून विरुद्ध काहीतरी म्हणते आहेस ना, त्या तुमच्या (???!!!) जुनाट संकल्पना आता कुणालाही पाळायच्या नाहीत.’
सरोज काहीही म्हणाली तरी मला घेतला वसा टाकून कसं चालेल? त्यामुळे ‘विरुद्धाहार’ हा राग मी तिच्यासमोर आळवलाच.
‘विरुद्धाहार’ ही आयुर्वेदातील अत्यंत वेगळी संकल्पना आहे. जो आहार योग्य पचन न झाल्यामुळे शरीरात वात-पित्त-कफ हे दोष वाढवतो, पण ते शरीराबाहेर काढून टाकत नाही, जो मंद विषाप्रमाणे शरीरात राहूनच त्रास देतो, तो ‘विरुद्ध आहार’- अशी व्याख्या सुश्रुताचार्यानी केली आहे. लहान मुलांना थोडंसं अपचन झालं तरी उलटी किंवा जुलाब होऊन ते शरीराबाहेर पडतं. जसजसे आपण मोठे होतो तसतसं हे अपचनजन्य मंद विष लगेच बाहेर पडेनासं होतं. असे प्रसंग वारंवार घडले तर हे साठलेलं विष अनेक कष्टसाध्य किंवा असाध्य आजारांची निर्मिती करतं. सातत्यानं ‘विरुद्ध आहार’ खाणाऱ्या व्यक्तींना नपुंसकत्व, जलोदर, ग्रहणी, विविध त्वचाविकार, सूज, सांधेदुखी, भगंदर, श्वास, रक्तदुष्टिजन्य आजार, मनाचे आजार, काही विशिष्ट प्रकारचे कॅन्सर असे दुर्धर रोग होण्याची दाट शक्यता असते. एकंदर १६ प्रकारच्या ‘विरुद्ध आहारा’चं वर्णन शास्त्रात केलेलं आहे. व्यवहारात खूपजण सातत्यानं विरुद्ध आहार घेत असतात. त्यांना त्यातून काही आजार होतातही; पण वैद्यांपर्यंत पोहोचल्याशिवाय ‘विरुद्ध आहार’ हे आजाराचं कारण समोर येत नाही.
मोहिनी मूळची राजस्थानातली. त्या रूक्ष देशात आहारात तेला-तुपाचं प्रमाण भरपूर असतं. ते योग्य आहे. मात्र, तिची तीच सवय मुंबईत आल्यावरही चालू राहिल्यानं तिला कफाचे आजार व्हायला लागले. सौराष्ट्र हाही राजस्थानसारखाच रूक्ष प्रदेश. तिथले जे लोक फाफडा, फरसाण असा रूक्ष आहार घेतात त्यांना मूळव्याध, गुदव्रण असे आजार हमखास होतात. आपण राहत असलेला देश ज्या गुणांचा असेल तसाच आहार घेणं, हे देशविरुद्ध आहे. याशिवाय ज्या देशात जे पदार्थ पिकतात ते खाल्ले जावेत. कोकणात तांदूळ, नाचणी, वरी, कुळीथ; घाटावर ज्वारी, बाजरी हे हितकर. सध्या आपण सगळेजण सरसकट गहू खातो, हे देशविरुद्धच आहे. गहू पंजाबात खावेत. पूर्वी महाराष्ट्रात पोळी किंवा पुरणपोळी फक्त सणासुदीला असायची, ती त्यासाठीच. गावात अजूनही ही प्रथा आहे.
जानेवारी हा तसा आरोग्याचा महिना. पण योगिनीला तेव्हा प्रचंड खोकला झाला. ‘किती आईस्क्रीम्स खाल्लीस?’ तिची आवड माहीत असल्यानं मी थेट प्रश्न केला.
‘दहा. आमची पैज लागली होती..’ काहीशा ओशाळलेल्या स्वरात योगिनी म्हणाली.
शीतकाळात शीत, तर उष्णकाळात उष्ण पदार्थ हे कालविरुद्ध ठरतात.
‘पण मी आईस्क्रीम न खाता मला खोकला झालाय..’ तिचा भाऊ सागर म्हणाला.
‘काहीतरी वेगळं खाल्लंच असशील.’ मी असं म्हटल्यावर योगिनी म्हणाली, ‘तो गेले चार दिवस भेळ हाणतोय.’
‘चिंचेची?’
‘नाही, कैरी घालून.’
‘आत्ता तुला कैरी कुठे मिळाली?’ मी आश्चर्यानं विचारलं.
‘कैरी बाराही महिने मिळते की आपल्या मुख्य बाजारात!’
निसर्गावर मात करण्याच्या वल्गना करून आपण ही जी अकाली होणारी फळे खातो, तेही कालविरुद्धच आहे.
साळवी कुटुंबाची कथा वेगळीच. त्यांच्या साचीला दर तीन तासांनी कडकडून भूक लागते. पण तिचे लाडके वेस्टर्न आऊटफिट्स घालण्यासाठी तिला झीरो फिगर राखायची आहे. म्हणून ती फक्त दोन वेळा जेवते. एरवी चुरमुरे, पॉपकॉर्न, राजगिरा-वडी, पाणी यावर निभावते. याउलट तिच्या आईला गेल्या कित्येक वर्षांत कडकडून भूकच लागलेली नाही. तरी शक्ती राहायला हवी म्हणून त्या तीन वेळेला नीट खातात. साचीच्या भावाला सकाळी ११ आणि संध्याकाळी ७ वाजता कडकडून भूक लागते. पण या दोन्ही वेळेला तो खूप कामात असल्यानं त्याला जेवता येत नाही. त्यानंतर दोन तासांनी तो जेवतो, पण तेव्हा त्याला भूक नसते. हे सगळे प्रकार अग्निविरुद्ध आहाराचे आहेत. तिघांचीही पोटं वारंवार बिघडतात. जशी जेव्हा भूक लागेल तसं व तेव्हा जेवण घेतलं जात नसेल तर ते अग्निविरुद्ध ठरतं.
राकेश बैठं काम करणारा तिशीचा तरुण. पट्टीचा खवय्या. ऊस गोड लागला की तो मुळासकटच खाणार. एका वेळी तो तीन कॅडबरी खातो. हॉटेलमध्ये पावभाजी खाल्ली तर कमीत कमी दोन प्लेट्स. शिवाय जास्तीचे पाव. मिल्कशेक घेतले तर दोन तरी लागतातच त्याला. नॉनव्हेज असेल तर पोटाला तड लागेपर्यंत जेवतो. याउलट त्याची पत्नी राशी. ती बहुतेक ५० ग्रॅम पदार्थ मावेल असं एखादं माप जवळ बाळगत असावी. कुठलाही पदार्थ ती तेवढाच खाते. अगदी लाह्य़ासुद्धा. परिणामी दोघेही सतत आजारी असतात. कारण त्यांचा आहार प्रमाण/ मात्रा विरुद्ध आहे. पचायला जड पदार्थ खूप प्रमाणात खाणं, किंवा पचायला हलके पदार्थ कमी प्रमाणात खाणं, हे मात्राविरुद्ध ठरतं. (क्रमश:)
विरुद्धाहार भाग १
खूप महिन्यांनी सरोजच्या घरी टी. व्ही. बघायला बसले होते. माझ्या घरातून इडियट बॉक्स तीन वर्षांपूर्वीच हद्दपार झालाय. त्यामुळे बऱ्याच गोष्टी नवीन वाटत होत्या. दुपारची वेळ होती. एका वाहिनीवर खाद्यभ्रमंती चालू होती. एक परदेशी पदार्थ दाखविण्याची तयारी आचारी करत होता.
First published on: 14-09-2014 at 02:36 IST
मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contrast meal part