‘तुम्ही तुमच्या बाकीच्या पेशंट्सना पण सांगता का असं लंघन करायला? आणि त्यानं बरं वाटतं का?,’ आपला ‘गिनी पिग’ बनवला जात नाहीए ना, याची खातरजमा करण्यासाठी नेहानं प्रश्न विचारला.
‘हो. अगदी पहिल्या दिवसापासून. गंमत म्हणजे माझ्या खासगी वैद्यकीय व्यवसायातला माझा पहिलाच रुग्ण तापाचा होता. माझ्यासारख्या नवीन वैद्याकडे तो कसा आला, माहीत नाही. मी मात्र आयुर्वेदाच्या सिद्धान्ताप्रमाणे त्याला सुरुवातीला लंघन करायला सांगितलं. अन्य सूचना दिल्या. औषध काही दिलं नाही. तो बिचारा दोन-तीनदा रेंगाळला. पण मी माझ्या ‘लंघनोपचारा’वर ठाम होते. थोडय़ा वेळानं मी दवाखाना बंद करून बाहेर पडले तर कोपऱ्यावरच्या दुसऱ्या दवाखान्यात माझा पहिलाच रुग्ण औषधासाठी नंबर लावून बसलेला मला दिसला. ‘औषधाशिवाय आजार बरा होऊच शकत नाही-’ ही जनसामान्यांची धारणा मला त्या दिवशी कळली. मी मात्र माझा ‘लंघनोपदेश’ अजूनही चालू ठेवला आहे. जे पाळतात, त्यांचा निश्चित फायदा होतो.’
माझ्या या खुलाशावर नेहा काही बोलणार, इतक्यात तिच्या सासूबाई आत आल्या. म्हणाल्या, ‘नेहा, अथर्वला बहुतेक भूक लागली आहे. ‘मंमं हवं म्हणून रडतोय बघ.’ नेहा आनंदातिशयानं खुर्चीवरून टुणकन् उडी मारून उठली. ‘बरं झालं, मी येताना त्याच्यासाठी बदामाचा शिरा बनवून आणलाय. आता भरवते..’ तिला मधेच तोडत मी म्हटलं, ‘बदामाचा शिरा नको देऊस.’
‘का?,’ नेहानं निरागसपणे विचारलं.
‘अगं, तापात बऱ्याच वेळानंतर भूक लागली आहे ना त्याला? काहीतरी हलकं खायला दे,’ मी म्हणाले. नेहा पुरती गोंधळून गेली.
सासूबाई तिच्या मदतीला धावल्या. ‘माझ्याकडे राजगिऱ्याचा लाडू आहे, तो दिलेला चालेल का?,’ त्यांनी मला विचारलं. मी होकार दिल्यावर त्या पुन्हा नातवाच्या सेवेत रुजू झाल्या.
‘मॅडम, पण राजगिऱ्याच्या लाडूनं त्याचं पोट कसं भरणार? आणि शक्ती कशी येणार?,’ नेहा अधीर झाली होती.
‘मुळात पचनशक्ती चांगली असेल तर आपली शक्ती चांगली राहणार ना? सर सलामत तो पगडी पचास!’
‘म्हणजे?,’ नेहानं काहीच न समजून विचारलं.
‘मॅडम, अहो मीडियम इंग्लिश आहे; नाही समजायचं..’ निखिल नेहाची विकेट घेत म्हणाला. त्याच्याकडे काहीसं दुर्लक्ष करून मी नेहाला म्हटलं, ‘अथर्वला आता बऱ्याच वेळानं भूक लागली आहे. ती एकदम नाही वाढणार. हळूहळू वाढेल. तोपर्यंत त्याच्या पचनशक्तीला ताण देऊन चालणार नाही.’
‘हळूहळू का वाढणार?,’ नेहाला हा विचार पचला नसावा.
‘तू कधी जंगलात सहलीला जाऊन तिथे चूल किंवा शेकोटी पेटवलेली बघितली आहेस का?,’ मी विचारलं.
‘जंगलात नाही, पण माझ्या आजोळी मामा सकाळी चूल पेटवायचा पाणी तापवण्यासाठी. ते बघितलंय. पण त्याचा इथे काय संबंध?’
‘कशी पेटवायचा गं मामा ती चूल?,’ मी विचारलं.
‘आधी तो वाळलेला पालापाचोळा एकत्र करून चुलीत घालायचा आणि तो पेटवायचा. आग पेटली की त्यात बारीक काटक्या टाकायचा. मग थोडय़ा मोठय़ा काडय़ा, मग फांद्या. मग आग मोठी पेटली की झाडाचा एक मोठा तुकडा..’
‘ओंडका म्हणतात त्याला..’ निखिलचं चालूच होतं.
‘हं, तर तो ओंडका चुलीत ठेवून द्यायचा.’ नेहाचं सांगून झालं होतं आणि चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्हही मोठ्ठं झालं होतं.
‘बरोब्बर! अग्नी असा हळूहळू प्रज्ज्वलित होतो. पालापाचोळा पेटल्यावर मामानं एकदम ओंडका सारला असता चुलीत, तर?,’ मी नेहाला विचारलं.
‘तर त्याचे चूल पेटवायचे प्रयत्नच चुलीत गेले असते..’ निखिलचा वारू उधळला होता.
‘आपल्या पचनशक्तीचंही तसंच आहे. आजारपणात भूक लागली रे लागली की आपण खाऊ ते पचतं असं नाही. पचनशक्ती हळूहळू वाढवावी लागते. त्यासाठी आधी हलके पदार्थ खावे लागतात,’ मी नेहाला समजावून सांगत होते.
‘मग आता घरी गेल्यावर अथर्वला काय देऊ?’
‘साळीच्या किंवा ज्वारीच्या लाह्यांची पेज दे. मूठभर लाह्या दोन कप पाण्यात शिजवायच्या. चांगल्या शिजल्या की त्यात मीठ, जिरेपूड, थोडं गाईचं तूप आणि गरज वाटली तर थेंबभर कोकम आगळ घालून दे त्याला. तांदूळ भाजून पण अशीच पेज करता येते. तीही उत्तम. मूगाचं ‘यूष’ तर अशावेळी सर्वात चांगलं. अख्खे मूग तीन-चार चमचे घेऊन ते दोन कप पाण्यात शिजवायचे. बारीक गॅसवर ठेवून अर्धा कप पाणी राहीपर्यंत ते आटवायचं. हे पाणी गाळून घेऊन त्यात मीठ, जिरेपूड, तूप घातलं की यूष तयार. या यूषानं कफ कमी होतो. भूक लागते. ताकद मिळते आणि तोंडाला चवही येते.’
‘फळं किंवा नारळाचं पाणी चालेल ना?,’ हा प्रश्न सगळेचजण विचारतात. ‘नको. त्यांनी कफ वाढतो. तापात शिजवलेलेच पदार्थ खावेत. बाहेर अग्नीचा संस्कार झाला असेल तर तो पदार्थ पोटात गेल्यावर आतल्या अग्नीला- म्हणजे पचनशक्तीला ताण पडत नाही. फार भूक लागली तर मूगडाळ- तांदूळ भाजून खिचडी करून दे. मात्र, ही खिचडी झाकण न ठेवता शिजव. प्रेशर कुकरमध्ये तर मुळीच शिजवू नकोस. झाकण न ठेवता शिजवली की हलकी होते खिचडी पचायला.’
‘मग दूध, सूप चालेल का?,’ – नेहा.
‘दूध नको. नवीन तापात देऊ नये. सूप चालेल. पण टोमॅटोचं नको. दुधी, पडवळ, दोडका, मुळा, शेवग्याच्या शेंगा यांचं सूप चालेल. त्यात जिरेपूड, मिरपूड घाल.’
‘आता ताप आहे म्हणून मी त्याला दुपारी आंघोळ घालते. त्यापूर्वी खायला देते. चालेल ना?’ नेहा काय काय विचारत होती.
‘खाण्यानंतर आंघोळ? ही कुठली पद्धत? आधी बंद कर. ताप आहे तोपर्यंत आंघोळ घालूच नकोस. आपणही नसते करायची तापात आंघोळ. ताप गेल्यावर आंघोळ करायची ती खायच्या आधीच. मागे माझ्याकडे इंजिनीअरिंगच्या होस्टेलवर राहणारी एक मुलगी औषधाला आली होती. वर्षभर बारीक ताप होता तिला. तिच्या तपासण्यांची एक जाडजूड फाइल तयार झाली होती, पण तापाचा ‘कीडा’ काही सापडला नाही. मी सुरुवातीलाच आयुर्वेदाच्या पद्धतीनं तिची दिनचर्या विचारली. ती मुलगी दुपारी जेवल्यानंतर आंघोळ करायची. कारण सकाळी आंघोळीला लवकर नंबर लागत नाही म्हणे. हे तिचं कारण दूर केलं आणि तिचा तापही गेला. तू असं काही करू नकोस बाई,’ मी म्हणाले.
‘असंही असतं? आम्हाला माहीतच नव्हतं हो, हे काही.’
‘प्यायला पाणी उकळूनच दे. त्या पाण्यात उकळताना थोडी सुंठ किंवा नागरमोथा टाकला तर पाणी सुगंधी होतं आणि पचनशक्ती वाढते. मात्र, एका वेळी खूप पाणी देऊ नकोस. त्याला पाहिजे तेवढं तो पिईल.’
‘खाणं कसं वाढवू?’
‘भूक वाढेल तसं वाढव. फुलका, भाकरी, पडवळ / दोडका/ दुधी/ कोहळा/ घोसाळी अशा तूप-जिऱ्याच्या फोडणीत शिजवलेल्या भाज्या, लसणाची फोडणी दिलेलं मूगाचं वरण असा हलका आहार दे त्याला. दही, ताक, बिस्किटं, ब्रेड, केक, टोमॅटो, थंड पेय हे अजिबात देऊ नकोस.’
तापासंबंधीचं बरंच पथ्य-अपथ्य नेहानं जाणून घेतलं. ‘अथर्वला तपासायला आणते,’ म्हणून ती बाहेर गेली, तेव्हा न राहवून मी निखिलला विचारलं, ‘ही ‘मीडियम इंग्रजी’ काय भानगड आहे?’
‘हा आम्हा मराठीत शिकलेल्या मित्रांचा फंडा आहे. हुशार मुलं कुठल्याही माध्यमात शिकलेली चालतात. पण मध्यम किंवा सुमार बुद्धिमत्तेच्या मुलांना इंग्रजी शाळेत घातलं की त्यांचं मराठी, हिंदी, संस्कृत अगदी वाईट राहतं. आकलन, तर्क, विवेचन अशा त्यांच्या क्षमताही विकसित होत नाहीत आणि ज्यासाठी अट्टहास केला ते इंग्रजीही मध्यम म्हणजे मीडियमच राहतं. म्हणून आम्ही त्यांना ‘इंग्लिश मीडियम’ न म्हणता ‘मीडियम इंग्लिश’ म्हणतो.’
‘हो. पण तुझ्या शाळेनं तुझ्यावर असे संस्कार केले आणि तुझ्या लहानपणी तुझ्यावर साठे वैद्यांनी आयुर्वेदाचे संस्कार केले, म्हणून नेहासमोर भाव खातोस होय?’
‘तिच्यावर आयुर्वेदाचे संस्कार तुम्ही करताच आहात की! मला खात्री आहे- तीही एक दिवस होईल ‘आयुर्वेदिक’!’
राणे कुटुंबीय गेल्यावर इतका वेळ फक्त निरीक्षण करणारी माझी विद्यार्थिनी कांचन म्हणाली, ‘मॅडम, किती वाईट आहे हो! आयुर्वेदाच्या जन्मभूमीतल्या लोकांवरच आयुर्वेदाचे संस्कार करावे लागताहेत आपल्याला.’
‘हो ना! घेतलाय खरा वसा आपण! आता टाकता येणार नाही.’
तापाला चाप : भाग २
‘तुम्ही तुमच्या बाकीच्या पेशंट्सना पण सांगता का असं लंघन करायला? आणि त्यानं बरं वाटतं का?,’ आपला ‘गिनी पिग’ बनवला जात नाहीए ना, याची खातरजमा करण्यासाठी नेहानं प्रश्न विचारला.
First published on: 02-02-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व Rx=आहार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Controlling fever