अमिताच्या भुणभुणीला वैतागून तिच्या बॉसनं दोन महिन्यांची सुट्टी मंजूर करून टाकली. तिनं तत्परतेनं कॅनडा आणि फ्रान्स या दोन स्वर्गलोकांचे व्हिसा मिळवले. नवऱ्याला सवड नव्हती. नसायला काय झालं? पण बायकोच्या घमेंडखोर भावंडांकडे स्वखर्चानं जायचं म्हणजे हात दाखवून अवलक्षण करून घेणं होतं. मग अमिता एकटीच मॉन्ट्रियलला भावाकडे आणि पॅरिसला बहिणीकडे जाऊन आली.
फॉरिन रिटर्नड् अमितामध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल घडून आले. एक- आतापर्यंत निगुतीनं जोपासलेला अव्यवस्थितपणा झटकून ती घेतलेल्या वस्तू परत जागच्या जागी ठेवू लागली. दोन- संध्याकाळी ऑफिसातून आल्यावर ती अंघोळ करू लागली. पहिला बदल पटकन उघडकीस आला. पूर्वी अमिता ऑफिसात गेली की तिची सासू मोलकरणीला हाताशी धरून पसारा आवरायला घ्यायची. पण आता अमिताच्या तावडीत सकाळपासून सापडलेला घराचा बराचसा भाग शोरूम कंडिशनमध्ये असायचा.
मात्र दुसऱ्या बदलाचा साक्षात्कार कुटुंबातल्या ज्येष्ठ नागरिकांना होण्याकरता काही दिवस मावळावे लागले. ऑफिसातून परतल्यावर अमिताच्या बेडरूमचं दार नेहमीपेक्षा खूपच अधिक वेळ बंद राहत असल्याचं सासूबाईंच्या लक्षात आलं. एकदा चोरपावलांनी ते हळूच ढकलल्यावर कळलं की ते खरं तर उघडंच होतं; पण आतल्या अटॅच्ड बाथरूमचं दार बंद होतं आणि बंद दारामागून सिनेसंगीताच्या विटंबनासोबत शॉवरबाथचा आवाज येत होता.
चहा पिण्यासाठी डायिनग टेबलापाशी बसलेल्या सुनेला सासूनं विचारलं, ‘‘काय ग? आज वाटेत चिखलबिखल उडाला की काय अंगावर?’’
‘‘नाही. सकाळचा उपमा संपला का? तिखटाशिवाय चहाचा घोट घशाखाली उतरत नाही माझ्या.’’
चिवडय़ाचा डबा समोर ठेवून सासू म्हणाली, ‘‘घासूनपुसून अंघोळ केलीस आज म्हणून विचारलं ग.’’
‘‘रोजच करते. चकल्या संपल्या?’’
‘‘शेवटच्या दोन तुझ्या नवऱ्यानं फस्त केल्या. रोजच करतेस का?’’
‘‘काय ते? रात्रीच्या जेवणात काय आहे?’’
‘‘अंघोळ.’’
‘‘अं? हं. सगळेच करतात की.’’
‘‘संध्याकाळी नाही करत कोणी.’’
‘‘इन फॅक्ट आमच्यासारख्यांनी संध्याकाळी जरूर करावी. ऑफिसातून घरी येईपर्यंत अंग चिकचिकीत होऊन गेलेलं असतं. मनसोक्त अंघोळ केली की स्वच्छ आणि मस्त वाटतं.’’
‘‘हो, पण दोन दोन वेळा पाणी गरम केलं की विजेचं बिल वाढणार त्याचं काय?’’
‘‘बिल कसं वाढेल? माझ्या वाटय़ाची अंघोळ मी संध्याकाळी करते.’’
सासूच्या हातातून चहाचं भांडं निसटलं. साडी झटकत ती म्हणाली, ‘‘म्हणजे तू हल्ली सकाळी उठल्यावर अंघोळच करत नाहीस? शी! पारोशीच ऑफिसात जातेस?’’
‘‘फॉरिनमध्ये तसंच करतात. सकाळी वेळ कोणाला असतो? ताई पहाटे सहालाच घराबाहेर पडते. दादाचं घरही सातच्या आत रिकामं होतं. रात्रीच्या जेवणात काय आहे?’’
‘‘तिथं करतात त्या सगळ्याची नक्कल इथं कशाला? ते बल-डुक्कर खातात. आपण खातो का?’’
‘‘चूक! दादा-ताईकडे शुद्ध शाकाहारीच जेवण असतं. वहिनी तर चक्कजैनांची आहे. कांदा-लसूणही वज्र्य असतो दादाच्या घरात. आपण मात्र खातो.’’
या हल्ल्यानं सासू गडबडली. नरमाईनं म्हणाली, ‘‘तसं नव्हे अमिता. पण सकाळी उठून सगळी आन्हिकं उरकली की, कसं शुचिर्भूत वाटतं.’’
विषय तिथंच संपला. सासूसासरे देवभक्त होते. कोकणातलं वडिलोपार्जति घर बंद केल्यानंतर तिथले देव त्यांनी इथं आणले होते. वयोमानानुसार सासऱ्यांना आता जमत नसल्यामुळे सासू दर दिवशी सकाळी स्वत:ची अंघोळ झाल्यावर देवांच्या मूर्तीवर अभिषेक करून गंधफूल वाहत असे. कधीतरी तिची तब्येत नरमगरम असली तर ते काम सुनेवर येऊन पडत असे.
तर एकदा सासू रात्री झोपताना म्हणाली, ‘‘उद्या देवांचं तूच बघ ग बाई. माझं अंग मोडून आलंय. पण उद्या मात्र सकाळी अंघोळ कर हं.’’
अमिताच्या कपाळावर आठय़ा पडल्या, ‘‘का? आत्ता थोडय़ा वेळापूर्वी केली की. परत उद्या सकाळी का? उगीच अर्धा तास आधी उठावं लागेल.’’
‘‘अगं पण देवाचं करायचं तर असं ओवळ्यानं कसं करता येईल? शुचिर्भूत झाल्याखेरीज देवांना शिवायचं नसतं इतकंही ठाऊक नाही तुला?’’
‘‘मला एक सांगा, तुम्ही संध्याकाळी जेव्हा देवीच्या मूर्तीवर गजरा माळता तेव्हा अंघोळ करून येता?’’
‘‘अगं सकाळी केलेली असते ना? मग?’’
‘‘तेच तर म्हणते मी. आपण सकाळी केलेली अंघोळ संध्याकाळच्या पूजेला चालते तर संध्याकाळी केलेली अंघोळ सकाळच्या पूजेला का चालू नये?’’
सासू ‘आ’ वासून बघतच राहिली. भानावर येऊन म्हणाली, ‘‘असं नसतं ग. शास्त्रात जे काही नियम आहेत ते पाळायला हवेत ना?’’
‘‘कोणतं शास्त्र? आरोग्यशास्त्र आणि तर्कशास्त्र या दोन्ही शास्त्रांच्या कसोटीवर माझं म्हणणं तपासून बघा. तुम्ही २४ तासांतून एकदा अंघोळ करता. मीही २४ तासांतून एकदा अंघोळ करते. म्हणजे अंघोळीची व्हॅलिडिटी २४ तास. बरोबर?’’
‘‘व्हॅलिडिटी म्हणजे?’’
‘‘वैधता.’’
‘‘वैधता म्हणजे?’’
‘‘म्हणजे तोपर्यंत आपण स्वच्छ आहोत, असं आपण मान्य करतो. पण इथं सकाळी अंघोळ करून घराबाहेर पडल्याक्षणापासून घाम यायला लागतो. गर्दीत तऱ्हेतऱ्हेच्या लोकांची अंग घासतात. घरी आल्यावर घामट अंगावरचे फक्त कपडे बदलून तसंच खायचं, प्यायचं आणि झोपायचं. खरं तर ते पारोसं! त्यापेक्षा संध्याकाळी अंघोळ केली तर ते आरोग्यदृष्टय़ा उत्तम असतं. रात्री आपण एसी लावून झोपतो. सकाळी उठल्यावर म्हणजे अंघोळ करून १२ तास झालेले असले तरी फ्रेश वाटतं. ते खरं शुचिर्भूत! म्हणजे मी सकाळी शुचिर्भूतच असते.’’
सुनेच्या या अफलातून तर्कशास्त्रानं सासू हैराण झाली. पण त्यात नेमकं काय चुकीचं आहे ते तिला उमजेना. शेवटी तिनं तिच्याकडचं फायनल अस्त्र बाहेर काढलं, ‘‘हेच शिकवलं काय ग देवाधर्माचं तुला तुझ्या आईनं. थांब, करतेच तिला आत्ता फोन आणि पारोशानं तुमच्यात देवाची पूजा करतात का ते विचारूनच घेते.’’
अमितानं सासूला थांबवलं, ‘‘तिच्याशी बोलण्यात अर्थ नाही. तिच्यावर तुमच्याचसारखं जुनाट बुरसटलेल्या विचारांचं भूत आहे. तिला फोन केलात तर तुमच्या दसपट ती मला फैलावर घेईल. त्यापेक्षा मी आता टीव्ही ऑफ करून झोपून जाते, उद्या सकाळी लवकर उठून अंघोळ करते आणि तुमच्या दृष्टीनं शुचिर्भूत होऊन देवांची पूजा करते. मग तर झालं?’’
सासू खूश होऊन म्हणाली, ‘‘सुबुद्धी सुचली तुला ते बरं झालं. देव पावला! उद्या संध्याकाळी अंघोळ केली नाहीस तरी चालेल बरं का मला.’’

Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Snehal Tarde
“मी फार प्रेमात…”, लग्नात प्रवीण तरडेंकडे स्नेहल तरडेंनी मागितलेली ‘ही’ गोष्ट; म्हणाल्या, “आयुष्यात कधीही…”
om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…
sukanya mone reveals she got call from manoj joshi wife at midnight 2 pm
सुकन्या मोनेंना मध्यरात्री २ वाजता फोन केला अन् विचारलेलं…; ‘आभाळमाया’तील ‘त्या’ सीनमुळे मनोज जोशींच्या पत्नीवर झालेला परिणाम
salman khan and salim khan effigies burnt in jodhpur
संतप्त बिश्नोई समाजाने सलमान आणि त्याच्या वडिलांचा पुतळा जाळला; सलीम खान यांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे भावना दुखावल्या…
dumper hit bike, Ratnagiri, Ratnagiri latest news,
रत्नागिरीत डंपरने दुचाकीला उडविले; दोघांचा जागीच मृत्यू
Rohini Hattangadi
“‘बाईपण भारी देवा’च्या रिलीजनंतर मी म्हटलं होतं…” रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितली आठवण