सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

करोनाकृत वैश्विक संचारबंदीचा आणि टाळेबंदीचा प्रचंड फटका क्रीडाक्षेत्रालाही बसला आहे. सर्व क्रीडास्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित झाल्या आहेत किंवा रद्दच झाल्या आहेत. फेडरर, कोहलीसारखे अव्वल दर्जाचे वलयांकित खेळाडू सोडल्यास इतर बहुतेकांसमोर जगण्याचा प्रश्न भेसूर बनत चालला आहे. विख्यात माजी टेनिसपटू विजय अमृतराज यांनी मध्यंतरी काही मुलाखतींमधून टेनिसपटूंच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. पुरुष आणि महिला क्रमवारीतील पहिले वीसेक टेनिसपटू सोडल्यास बाकीच्यांना चरितार्थासाठी ग्रँड स्लॅम स्पर्धाचा आधार असतो. यंदा ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा वगळता इतर तीन महत्त्वाच्या स्पर्धा एकतर रद्द झाल्या आहेत (विम्बल्डन) किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. उदा. फ्रेंच आणि अमेरिकन या स्पर्धा वगळता वर्षभर टेनिसच्या इतरही स्पर्धा सुरू असतात. पण त्यांतून मिळणारे मानधन ग्रँड स्लॅम स्पर्धाच्या तुलनेत अत्यल्प असते. जॉर्जियाची एक टेनिसपटू सोफिया शापाटावा हिची कहाणी सध्या वृत्तमाध्यमांतून गाजते आहे. ती एक सर्वसामान्य टेनिसपटू. सध्या जागतिक क्रमवारीत ती ३७५ वी आहे. तिला २०२० मध्ये आतापर्यंत २९०० डॉलर कमावता आले! तिने आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेकडे ऑनलाइन याचिकेच्या माध्यमातून मदत मागितली आहे. या याचिकेवर आतापर्यंत २००० टेनिसपटूंनी डिजिटल सह्य केल्या आहेत. खरे तर शापाटावाने आपण कफल्लक झाल्याचे सांगण्याची हिंमत तरी केली. पण येत्या काही आठवडय़ांमध्ये ही वेळ कदाचित पहिल्या ५० क्रमांकांमध्ये असलेल्या टेनिसपटूंवरही येऊ शकेल. त्यांच्यापैकी किती जण स्वत:हून मदत मागण्याची हिंमत करतील हा प्रश्न आहे. इतर अनेक खेळांच्या तुलनेत टेनिस हा अधिक व्यावसायिक खेळ असला तरी तो सांघिक खेळ नसल्यामुळे संघटनात्मक बैठक या खेळाला फारशी मिळालेली नाही. याचा फटका आता वैयक्तिक टेनिसपटूंना बसतो आहे. कदाचित असाच प्रकार गोल्फ, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, सायकलिंग, बॅडमिंटन या इतर वैयक्तिक व्यावसायिक खेळांमध्येही असेल. टेनिसला इतर खेळांच्या तुलनेत प्रसिद्धी अधिक मिळत असल्यामुळे त्याची चर्चा अधिक झाली, इतकेच.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
Gukesh becomes youngest-ever world champion
D Gukesh: डी गुकेश विश्वविजेता! भारताच्या बुद्धिबळपटूने घडवला इतिहास
world chess championship loksatta
गुकेशच्या नवचैतन्याची कसोटी!
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
Arjun Erigaisi
व्यक्तिवेध : अर्जुन एरिगेसी
cinema hall Ulhasnagar, Ulhasnagar Parking ,
उल्हासनगरात चित्रपटगृहाशेजारील रहिवाशांची कोंडी, प्रेक्षकसंख्या वाढल्याने रहिवासी क्षेत्रात पार्कींग

या सगळ्यांच्या तुलनेत बुद्धिबळपटू तसे सुदैवी म्हणावे लागतील. एकतर या खेळात टेनिसइतक्या मोठय़ा संख्येने व्यावसायिक खेळाडू नाहीत. शिवाय आजवर या खेळाच्या ‘बैठेपणा’मुळे त्याकडे फारसे पुरस्कर्ते वळायचे नाहीत. पण या टाळेबंदीच्या काळात सगळेच आपापल्या घरांमध्ये बंदिस्त झालेले असताना या एकमेव खेळातील अव्वल खेळाडू आजही ऑनलाइन सक्रिय राहू शकतात. आजघडीला जगात चार ते पाच उच्च दर्जाच्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहेत. गेल्या दशकामध्येच ऑनलाइन बुद्धिबळाची लोकप्रियता जगभर पसरू लागली होती. आता विश्वनाथन आनंद, विदिथ गुजराती या अव्वल बुद्धिबळपटूंपासून ते प्रज्ञानंद, निहाल सरीन, अरविंद चिदंबरम्, गुकेश अशा युवा ग्रँडमास्टरांपर्यंत बहुतेक जण या घडीला कोणत्या ना कोणत्या स्पर्धेत सक्रिय आहेत. विदिथ गुजराती हा आनंदनंतरचा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा बुद्धिबळपटू. जागतिक क्रमवारीत तो २३ व्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी तो ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ ठरला होता. तो ऑनलाइन स्पर्धा खेळतो आहेच; पण परवा तो चक्क भारतातील काही नामवंत स्टँडअप् कॉमेडियन्सबरोबर ऑनलाइन सामने खेळला. विश्वनाथन आनंद एका स्पर्धेनिमित्त जर्मनीत गेला होता. परंतु करोनाचा विळखा भारताला आणि युरोपलाही पडल्यामुळे तो जर्मनीतच अडकला. तरीदेखील मध्यंतरी काही काळ कँडिडेट्स स्पर्धेसाठी तो ऑनलाइन विश्लेषण करत होता. आताही जर्मनीत राहत असला तरी रोजच्या रोज मुलाखती, विश्लेषण, मार्गदर्शन असा त्याचा कार्यक्रम सुरूच आहे. करोनाच्या या काळात जी एकमेव स्पर्धा काही दिवस सुरू राहिली ती बुद्धिबळाचीच (कँडिडेट्स) होती. इतर खेळ पूर्णतया बंद असले तरी बुद्धिबळ हा एकमेव मुख्य प्रवाहातील खेळ जगभर व्यावसायिक आणि हौशी मंडळींकडून सुरूच आहे. कदाचित या संकटातून ऑनलाइन बिझनेस मॉडेलची संधी निर्माण होऊ शकेल. माजी जगज्जेता गॅरी कास्पारॉवने याविषयी अनेक वर्षे आधी बोलून दाखवले होते. त्या काळात पारंपरिक बुद्धिबळाला पुरस्कर्ते कुठून मिळणार, अशी चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी हा खेळ इंटरनेटमधून जिवंत राहील.. एवढेच नव्हे तर वाढेलही असे भाकित कास्पारॉवने केले होते. आज विचित्र परिस्थितीत त्याची प्रचीती येत आहे. इतर खेळांच्या मानाने बुद्धिबळाचा जीव लहान. निव्वळ व्यावसायिक बुद्धिबळपटूंचे प्रमाणही कमी. त्यामुळे करोनामुळे होत असलेल्या विध्वंसाची तीव्रताही त्यांच्या दृष्टीने कमीच आहे. तरीदेखील भविष्यात बडय़ा बुद्धिबळपटूंचे सामने, स्पर्धा अधिकाधिक ऑनलाइन होऊ लागतील, हे नक्की. कँडिडेट्स स्पर्धा अर्धवट अवस्थेत थांबवावी लागली. तिचा उर्वरित भाग ऑनलाइन खेळवला जाऊ शकतो. युरोप, अमेरिका, दुबई, चीन, काही प्रमाणात भारत आणि रशिया ही प्रामुख्याने सध्या बुद्धिबळ स्पर्धा होतात अशी ठिकाणे. या कोणत्याही प्रदेशांत परिस्थिती पुढील काही महिने तरी स्थिरस्थावर होईल अशी चिन्हे नाहीत. या परिस्थितीत जगातील अव्वलच नव्हे, तर इतरही अनेक बुद्धिबळपटू ऑनलाइन स्पर्धाचा आधार घेऊ शकतात. डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, ऑनलाइन गेमिंग कंपन्या, बँका पुरस्कर्ते म्हणून पुढे येऊ शकतात. आज कदाचित यांच्यातील कोणी पुरस्कर्ते म्हणून निधी सैल सोडण्याच्या स्थितीत नसतील, पण भविष्यात याविषयी विचार नक्कीच होऊ शकेल. कारण बुद्धिबळाला ऑनलाइन प्रेक्षक प्रचंड आहे. प्रत्यक्ष स्पर्धा होतात तेव्हा त्यांनादेखील ऑनलाइन चाहतावर्ग मोठा आहे. चीन आणि भारत या दोन देशांतील लाखोंचा प्रेक्षकवर्ग या खेळाला लाभला आहे. करोनामुळे बहुतेक खेळ आणि खेळाडूंची स्थिती सध्या भयाण आहे. या काळवंडलेल्या वातावरणात चंदेरी आशेचा किरण सध्या तरी बुद्धिबळाच्या रूपानेच दिसतो आहे

Story img Loader