सुहास जोशी – suhas.joshi@expressindia.com
करोनाने शहरांतील स्थलांतरित श्रमिक व कष्टकऱ्यांची रोजीरोटीच हिरावून घेतल्याने त्यांना आपल्या गावाकडे परतण्यावाचून दुसरा पर्याय उरलेला नाही. या पिचलेल्या मजूर-श्रमिकांचे तांडे सध्या रस्तोरस्ती कळाहीन चेहऱ्याने वाटचाल करताना दिसताहेत. मन विषण्ण व विकल करणारे हे दृश्य.. फाळणीचे तसेच ‘द ग्रेट मायग्रेशन’चे स्मरण करून देणारे!
दृश्य १..
टेम्पोत खच्चून भरलेली.. किंबहुना कोंबलेली माणसे. लहान मुले, महिला, पुरुष, तरुण मुले असा सगळा गोतावळा. ट्रकच्या हौद्याच्या तिन्ही बाजूस लटकवलेल्या बॅगा. कुठे दोरीवर टांगलेले कपडेदेखील. काहींनी मुखपट्टय़ा बांधलेल्या, तर काही तसेच- मुखपट्टय़ाविना. पुढे आणखीन एक टेम्पो. त्याचा हौदा पूर्णपणे उघडा. त्यातही भरलेली माणसे. उन्हापासून थोडी आडोशाला सावलीला थांबलेली. पुढे दिसू लागले आणखी काही छोटे छोटे टेम्पो. सगळ्यांत खचून कोंबलेली माणसे. कुठे उभी, कुठे बसलेली. मागच्या बाजूने बंदिस्त असली, तरी वरच्या बाजूने डोकी दिसायचीच. रात्री ठाणे ते भिवंडी नाका या टप्प्यात शे-दोनशे टेम्पोंत असे माणसे कोंबण्याचे काम सुरू होते.
दृश्य २..
नव्याकोऱ्या चकचकीत सायकली. काहींचे तर प्लास्टिकचे बाह्य़ वेष्टनदेखील अजून काढलेले नव्हते. सुरुवातीला पाच सायकली दिसल्या. त्यादेखील घोडा सायकली. पुढे मग सायकलस्वारांचे गटच दिसू लागले. काही नव्या पद्धतीच्या, पण एकाच गिअरवर चालणाऱ्या. ठरावीक मर्यादित वेगापलीकडे न जाणाऱ्या. त्यावरच्या कुणाला झारखंडमधलं रांची, तर कुणाला बिहारातलं मधुबनी, तर कुणाला गोरखपूर गाठायचंय. कुणाकडे जुन्याच सायकली.. वितरणाच्या नोकरीसाठी म्हणून घेतलेल्या, तर कुणी पाच हजार रुपये खर्चून नुकत्याच विकत घेतलेल्या. तर कुणी थेट गावावरून पैसे मागवून घेतलेली नवीन सायकल. दिवसाला किमान १०० कि. मी. अंतर कापायचेच ठरवून सगळे निघालेले. किमान १५-२० दिवसांत गावाला पोहोचू, ही आशा. प्रत्येकाच्या मागे बोचके बांधलेले. तर कुणी चक्क डबल सीट. एका दिवसात किमान ३०० तरी असे सायकलस्वार दिसले.
दृश्य ३..
काही जण पायीच निघालेले. रस्त्याची डावी बाजू पकडून एका लयीत चाललेले. उन्हाने दमायला झालेच तर पेट्रोल पंप, बंद ढाबे किंवा एखादे झाड पकडून थांबणारे. आताशा महामार्गावर झाडे तशी कमीच आढळतात. नेहमीप्रमाणे रुंदीकरणात गेलेली. आणि नवीन लावायची कुणाला माहीतच नाही.
शहर सोडून सर्वजण अखंड चालत होते. कुठपर्यंत? गाव येईपर्यंत! पंधरा-वीसच्या समूहाने निघालेले. कधी अगदी चार-पाच जणदेखील. मधेच मागे वळून एखादा छोटा टेम्पो किंवा ट्रक मिळतो का, ते पाहायचे. हात केला आणि कुणी थांबलाच तर सोडेल तिथपर्यंत जायचे. बाकी चालणे काही थांबलेले नाही. वाटेत काही ठिकाणी जवळपासच्या गावांतील मंडळांनी केलेली पाण्याची, जेवणाची सोय. तिथे गरजेप्रमाणे पाणी भरून घ्यायचे. कुठेही हुल्लडबाजी नाही की फुकट मिळाले म्हणून ओरपून घेण्याचा प्रकार दिसला नाही.
गेल्या आठ दिवसांतील ठाणे ते इगतपुरी या रस्त्यावरील ही काही प्रातिनिधिक दृश्ये. गेल्या सहा दिवसांत एसटीची सुविधा सुरू झाली तसे पायी जाणारे आणि सायकलस्वार कमी झाले, इतकाच काय तो बदल. टाळेबंदीचा तिसरा टप्पा सुरू झाला तशी स्थलांतरित मजुरांची अस्वस्थता इतकी वाढली की ते मिळेल तो पर्याय स्वीकारून हे शहर सोडून जाऊ लागले. रेल्वेने जाण्यासाठी नंबर कधी लागेल माहीत नाही आणि खासगी बसचा खर्च परवडणारा नाही. गेला दीड महिना हाताला काम नाही, खिशात पैसे नाहीत. कुणाकडून मदत मिळाली तरी तीदेखील तोकडीच. दुसरीकडे करोना वाढत चाललेला. त्यात या लोकांची घरे छोटी. कुठे कुठे पत्र्याचीच. त्या भट्टीत २०-२५ जण (एरवी बदलणाऱ्या पाळ्यांमध्ये काम असल्याने एका वेळी सात-आठ जणच खोलीत असतात.) रिकामी बसण्यापेक्षा आपल्या गावाकडे निघालेले बरे. कारण आता हे शहर काही आपल्याला काम आणि पर्यायाने पोटाला अन्न देणार नाही, हे त्यांना कळून चुकलेले.
करोनाचा प्रसार वाढू लागला तसे स्थलांतरित कामगारांसाठी राज्य सरकारने काही निवारा शिबिरे उभारली. त्यात प्रामुख्याने ज्यांना राहण्याची सुविधा नाही असे मजुर होते. पण बांधकाम सुरू असलेल्या इमारतींत राहणारे, समूहाने भाडय़ाचे का होईना घर आहे असे, काहींची कुटुंबेदेखील आहेत अशांची मोजदाद कुठे होती? यातील अनेक जण दहा-वीस वर्षे मुंबई आणि महानगर परिसरात राहणारे आहेत. काहींचे हातावर पोट, तर काहीजण थोडेसे स्थिरावलेले. पण गेल्या दीड महिन्यात सारेच ठप्प झालेले. त्यातच ‘करोना हमारे एरिया में आयेगा तो?’ ही भीती प्रत्येक जण बोलून दाखवत होता. करोनाने प्रचलित केलेला हा नवीन वाक्प्रचार!
शक्यतो एकत्र राहणारे, एकाच वस्तीतील किंवा चाळीतील असे हे स्थलांतरित कामगार शहर सोडून निघू लागले. ‘इतक्या खचाखच गर्दीत करोनाची भीती वाटत नाही का?’ या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, ‘हम सारे एकही जगह रहनेवाले है. हमे एक दुसरे पे पुरा भरोसा है.’
नंतरच्या टप्प्यात तर कसलीच ओळखपाळख नसणारेदेखील पन्नास-शंभर जण एकत्र जाऊ लागले. तेव्हा तर केवळ येथून बाहेर पडायचे, हेच त्या प्रत्येकाचे ध्येय होते.
एका खचाखच भरलेल्या टेम्पोमध्ये छायाचित्र घेण्यासाठी किनात जरा बाजूला करायला सांगितली. समोर अनेक लहान मुले, महिला, वृद्ध पाहून हतबुद्धच व्हायला झाले. त्या गर्दीतल्या एकाने सांगितले, ‘फोटु निकालो साहब, कम से कम ये देख के बाद में आनेवालों को तो सरकार कुछ अच्छी सुविधा देगी.’
सुरुवातीच्या टप्प्यातील बहुतांश जण बांधकामावर बिगारी काम करणारे होते. प्रत्येकाची व्यथा एकच : ‘मुकादमने कुछ दिन राशन दिया, बाद में वो दिखाईच नहीं दिया.’ अर्धवट बांधलेल्या इमारतीतच यांचा मुक्काम असायचा. पण पोटालाच काही मिळेनासे झाले तेव्हा निघालेले बरे असे त्यांनी ठरवले.
एका पेट्रोल पंपावर भगभगत्या उन्हात भल्या मोठय़ा कंटेनरमध्ये अनेक माणसे बसलेली दिसली. जरा डोकावल्यावर बाहेरच्या बाजूच्या मंडळींचे कोंडाळे गोळा झाले. सगळे ट्रकचालक. त्या सर्वानी ट्रक तिथेच ठेवले आणि ते सगळे एका कंटेनरमधून इंदोरला त्यांच्या गावी जाण्यास निघालेले. खरे तर इंदोर हादेखील करोनाचा हॉटस्पॉट. पण इथे दीड महिना रिकामेच बसून राहिल्यावर हे ठिकाण सोडण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. कंटेनरमधल्या अस उकाडय़ात त्यांचा इंदोपर्यंतचा प्रवास कसा होणार, हा विचार मनात येताच अंगावर काटा आला.
‘सायकल गाँव में चलाते थे, लेकिन इतना लंबा कभी नहीं चलाई..’ सायकलवरील प्रत्येक जण हेच सांगायचा. पण यापूर्वी कुणी ना कुणी तरी मुंबईहून सायकल चालवीत गावी पोचलेले त्यांना नक्की माहीत होते. त्यामुळेच तेही निघालेले. एका समूहात तर अपंग व्यक्तीदेखील होती. तर दुसऱ्या एकाने पन्नाशीच्या पत्नीला डबलसीट घेतले होते. या सर्वानी सायकलवर पैसे खर्च केले असल्याने त्या सायकली ट्रकमध्ये टाकून पुन्हा प्रवास खर्च करणे परवडणारे नव्हते. जमेल तसे पोहोचू, हाच काय तो आशावाद.
भिवंडीतील यंत्रमाग कामगारांचा एक मोठा जथ्था बिहारमधील मधुबनीला निघाला होता. झाडून सगळ्यांनी जुन्या सायकली दीड-दोन हजारात खरेदी केलेल्या. सायकल चालवत जायला पंधरा दिवस आणि परत गावी जाऊन अलगीकरणात राहायचे आणखी १४ दिवस काढावे लागणार याची त्यांना जाणीव होती. पण त्यावर त्यांचे अगदी साधे उत्तर होते.. ‘आम का मोसम है, हम लोग वहा जा के रहेंगे, काम करेंगे. लेकिन अब इस शहर में फिर वापस नहीं आएंगे.’
कसारा घाटात अगदी वरच्या टप्प्यात एक चाळिशीच्या पुढचे गृहस्थ एकटेच सायकल दामटत होते. त्यांच्या कॅरिअरवर एक बोचके बांधलेले आणि त्याला एक प्लास्टिकची बाटली खोचलेली. त्यात हरभरे भरले होते. पाण्यात भिजत ठेवलेले. हा त्यांचा खुराक.
आता एसटीची सुविधा मिळू लागली आहे खरी; पण तिने केवळ राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यापेक्षा थेट गावापर्यंत जाण्यासाठी शक्य आहे त्यांनी चार पैसे मोजून ट्रकनेच जायचे ठरवले होते. जरी तो ट्रक खच्चून भरलेला असला तरी! पायी चालणाऱ्यांना आणि सायकलस्वारांना इगतपुरीत बसमध्ये बसवले जाऊ लागले.. तेवढाच दिलासा!
शहरातले सारे काही पूर्ववत सुरू होईल याची कुणालाच शाश्वती नव्हती. बिगारी कामगारांना तर कसलीच खात्री नसल्याने त्यांनी शहर सोडले. अनेकांनी कुटुंबीयांसहित गावी जायचा मार्ग पत्करला. गावाला जाऊन चौदा दिवस अलगीकरणात राहावे लागले तरी चालेल, पण येथे राहून महामारीमध्ये अडकण्याचा धोका त्यांना नको होता.
शहरातील घटनांचे पडसाद निरनिराळ्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचत होते. शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील करोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह हलवण्यास लागलेला विलंब आणि त्याच ठिकाणी इतर रुग्ण असणे ही घटना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यात पसरली. ‘अभी बंबई मे मुडदों को रखने की जगह नहीं है, उनके बीचही इलाज शुरू है..’ असे या घटनेचे वर्णन एकाने केले.
या सगळ्या पाश्र्वभूमीवर हे उलटे स्थलांतर सुरू झाले. इथे एका नैसर्गिक, परंतु अद्भुत घटनेची आठवण येते. ‘द ग्रेट मायग्रेशन’! टान्झानिया आणि केनिया या दोन देशांमधील मारा नदी ओलांडून लाखो विल्डबीस्ट, झेब्रा आणि अन्टीलोप हे प्राणी दरवर्षी जून ते सप्टेंबरमध्ये स्थलांतर करतात. केनियातील मसाई मारामधून टान्झानियातील सेरेन्गिटी नॅशनल पार्कमध्ये हे स्थलांतर होते. कारण एकच : तिकडे उपलब्ध असलेली खाद्य संसाधनांची मुबलकता. वाटेत मारा नदी पार करताना त्यांना मगरींचा अस हल्ला सहन करावा लागतो. त्यात अनेक प्राणी जीव गमावतात. तरीही वर्षांनुवर्षे सुरू असलेले हे स्थलांतर सुरूच राहते. ते पाहायला लाखो पर्यटक तिथे जातात. निसर्गात पक्षी, फुलपाखरे यांची अशी हजारो मैलांची स्थलांतरे होत असतात. जगण्यासाठी पोषक वातावरण, विविध संसाधनांची उपलब्धता हा त्यामागचा मूलाधार. मुंबई आणि महानगर परिसरात उत्तर भारतीयांचे लाखोंच्या संख्येने स्थलांतर होते ते इथे असलेल्या रोजगारसंधींच्या उपलब्धतेमुळेच. ज्यातून पोटाची खळगी भरता येते आणि दोन पैसे कुटुंबासाठीदेखील पाठवता येतात. पण आज हेच स्थलांतर उलटय़ा दिशेने सुरू झाले आहे. आणि ‘द ग्रेट मायग्रेशन’चा संदर्भ उलटय़ा अर्थाने गडद होतो आहे.
या मजुरांशी संवाद साधणे जरा कठीणच. सगळेच जण किमान आणि ठरावीक बोलणारे. एकीकडे त्यांना वाटेत कोणी अडवेल का, ही भीती खात असायची. वाटेत जेवण, पाणी वगैरे मिळेल का, याचीही शाश्वती नाही. त्यात पुन्हा पत्रकाराशी तोच टिपिकल संवाद करायचा, हे अन्यायाचेच. पण गप्पांच्या स्वरूपात थोडीशी बातचीत होई. मात्र, कुणाच्याच चेहऱ्यावर प्राप्त परिस्थितीबद्दल राग, द्वेषाचे भाव नव्हते. दोष देऊन तरी कोणाला द्यायचा, अशीच सामूहिक भावना. या शहरात आलो, काम मिळाले, त्यातून जगणे थोडेसे सुस झाले.. म्हणजे पोटाला अन्न आणि अंग टेकायला जागा मिळाली, याचेच समाधान. आणि आता पुन्हा तेच ‘द ग्रेट मायग्रेशन’! संकटाला सामोरे जात ते स्वीकारून जगण्याची धडपड. पण आता इथे कामच मिळणार नसेल तर मग काय करायचे? जगण्यासाठी मग एकच पर्याय.. उलटय़ा दिशेचे आपल्या गावाकडे परतणे.
एरवी रेल्वेगाडीचा हक्काचा सोपा आणि स्वस्त पर्याय आज उपलब्ध नाही. मग काय, मिळेल तो पर्याय स्वीकारायचा. याबद्दलची असहायता प्रत्येक मजुराच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसायची. जोडीला अगतिकतादेखील. चेहरे निराशेने सुकून गेलेले. पण ‘आता सारे काही संपले आहे’ अशा निराशेच्या गर्तेत कुणी दिसले नाही. चिकाटीने, चिवटपणे प्रवास सुरू होता. सगळे सुरळीत झालेच तर ‘वापस आयेंगे जरुर’ असे म्हणणारेदेखील त्यांत होते.
‘राबणाऱ्याला काम आणि पोटाला अन्न’ ही मुंबई महानगरीची ख्याती. सर्वच स्थलांतरितांची ही महत्त्वाची गरज. गावाकडे रोजगाराअभावी आयुष्य रडतखडत काढण्यापेक्षा मुंबईत जाऊन पडेल ते काम करून चार पैसे मिळवावेत, त्यातले थोडे गावी पाठवावेत, ही त्यांच्या जगण्याची रीत. तीच आता शक्य नसेल तर त्यातून आलेल्या असहायतेपोटी त्यांना पुन्हा गावाकडे जाण्यास मजबूर करते आहे. मिळेल त्या मार्गाने. पायी तर पायी. वाटेत अन्नपाण्याला मोताद झाल्याने मरण येईल का, हा विचार त्यांच्या डोक्यात येणेच अशक्य. तसे असते तर त्यांनी ही वाट चोखाळलीच नसती. पण वाटेत धोके- जसे ‘द ग्रेट मायग्रेशन’मध्ये आहेत- तसेच या मार्गातदेखील आहेतच. ते स्वीकारायचे, जमेल तसे ते टाळायचे.. अगदीच अंगावर आले तर त्याला भिडायचे आणि पुढे जात राहायचे. सर्व स्थलांतरितांमध्ये दिसते ती हीच भीषण असहायतेतून आलेली तगण्याची धडपड.
देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच फाळणीमुळे एक मोठे स्थलांतर घडून आले होते. त्यावेळी प्रचंड मनुष्यहानी झाली होती. त्याला धार्मिक विद्वेषाची झालर होती. जे हाताशी असेल ते घेऊन देश सोडून निघालेले जथ्थेच्या जथ्थे. या दहशतीच्या सावटाखालील प्रवासात कधीही जीव जाऊ शकेल, ही पुन्हा टांगती तलवार. तर इथे करोनाची टांगती तलवार! त्यात वाटेत पोटापाण्याची सोय होईल की नाही याची अशाश्वती. वाटेत आणखी काय होईल याचीही शाश्वती नाही. अगदीच अशक्यप्राय वाटणारे पर्याय स्वीकारून त्यांचा हा प्रवास चाललेला. रस्तादेखील अनोळखी. तो कधी आणि कसा संपेल, माहीत नाही. सरकारी यंत्रणा त्यांच्याशी कशा वागतील, त्यांचे गाववाले त्यांना कशी वागणूक देतील, हेदेखील माहीत नाही. पण सर्वाची जगण्याची धडपड आणि ओढ मात्र न संपणारी..