श्रीनिवास बाळकृष्ण
काय होडी, काय कोंबडी, काय पतंग.. ओक्केमधी एकदम!
मित्रा, मागच्या लेखात खरीखुरी पत्रं लावलेल्या पुस्तकापेक्षा आजची पुस्तकं त्याहून भारी आहेत. ही पुस्तकं वाचायची कमी आणि पाहायचीच जास्त असल्याने आज मीही कमी लिहून पुस्तकांतील चित्रं जास्त दाखवणार आहे.तुझ्यासाठी इथं दोन पुस्तकातील काही भाग आणलाय. दोन्ही पुस्तकाची नावं, कथा सोडून दे. इथलं प्रत्येक पान उघडल्याबरोबर त्यातून काहीतरी बाहेर डोकावतंय. पानापानांतून काहीतरी वर येतंय. या प्रकाराला ‘पॉपअप बुक्स’ म्हणतात मित्रा.
कार्टूनॲनिमेशन (हलती चित्रं) मुलांना जास्त आकर्षित करतात, तर पुस्तकातही हलती चित्रं टाकून असा प्रयोग करता येईल का, हा विचार यामागे होता. (आपल्या मराठीत नाही हो असा काही विचार!)
उदा. या थॉमस नावाच्या इंजिनाचे कार्टून तुम्ही टीव्हीवर पाहिलं असेलच. पण इथं पुस्तकात पाहताना काय मजा येतेय. असं वाटतं, हे पुस्तक नसून एक आडवा रंगमंच आहे. ज्यावर सर्वच एकामागोमाग एक उभं आहे. इंजिन तर पानाच्या कित्ती बाहेर डोकावतंय. असं वाटतंय की अंगावरच येईल.
पुस्तकातील कथा साधीच असते. पण यातली चित्रं आणि चित्रावर चित्र येणं महाकठीण! चित्रकार, हस्तकलाकार, डिझायनर, पिंट्रर असे सर्वानी एकत्र मिळूनच हे होऊ शकतं. बोले तो एकदम थ्रीडी मामला. अशा पुस्तकात केवळ बाहेर येणाऱ्या गोष्टीच असतात असं नाही, तर त्यात सूचनाबाण दिलेले असतात. वाचणाऱ्याने ते हलकेच हाताने खेचले तर चित्रात तशी कृती घडते. एकदम गंमतच! पान उघडलं की एक हंस हलत पुढे जातो आणि तो फ्लॅप खेचला की पूर्ण स्वत:भोवती गिरकी घेत जागेवर येतो. यार, मी हे पुस्तक पाहतोय की कार्टून? पोटलीबाबा तर वेडाच झाला आहे. तुम्हीही व्हा! हो, पण वेडे होऊन पुस्तकं कशीही हाताळू नका.. ही खूप नाजूक यंत्रं असतात. ही पुस्तके फाटत नाहीत, तर तुटतात. यांचा पॅटर्नच वेगळाय.
shriba29@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा