कविवर्य मंगेश पाडगावकरांचा जन्म १९२९ सालचा आणि त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘धारानृत्य’ १९५० सालचा. पाडगावकर जवळजवळ ७० वर्षे अखंड कविता लिहिताहेत. या काळात कवितेने कितीतरी वळणे घेतली! बा. सी. मर्ढेकर, दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, अनियतकालिकातली कविता, विद्रोही कविता, समाज परिवर्तनाची जाणीव व्यक्त करणारी कविता, नंतरची नव्वदोत्तरी कविता ही सारी मराठी कवितेची वळणे जवळून पाहत पाडगावकर स्वत:ची कविता निष्ठेने लिहीत राहिले. ‘जिप्सी’, ‘विदूषक’, ‘सलाम’, ‘गझल’, ‘बोलगाणी’, ‘उदासबोध’ ही त्यांच्या कवितेची वेगवेगळी रूपे होत. त्यांची कविता रसिकांना मोहवीत राहिली. ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘बोलगाणी’ यांसारख्या त्यांच्या काही कवितासंग्रहांच्या आवृत्यांची संख्या वीसच्या आसपास जाते. ‘बोलगाणी’ वाचकांनी एवढा उचलून घेतला की एका वर्षांत आवृत्ती पुन्हा काढली गेली. वाचकांना कळणाऱ्या भाषेत स्पर्शून जाणाऱ्या भावना व्यक्त करणारी पाडगावकरांची कविता मराठी वाचकांनी अतिशय प्रेमाने वाचली आहे हे नि:संशय.
‘अखेरची वही’ हा पाडगावकरांचा ताजा संग्रह. पाडगावकरांच्या काव्यात्म व्यक्तित्वाची सगळी वैशिष्टय़े या संग्रहात प्रतिबिंबित होताना दिसतात. त्या दृष्टीने वसंत सरवटे यांनी केलेले मुखपृष्ठ बारकाईने पाहण्यासारखे आहे. डोहाकाठी उदास बसलेले पाखरू (‘पाखरू’), बासरीवाल्याच्या सुरांबरोबर आयुष्यात प्रथमच चालणारा पोलीस (‘बासरीवाला’), मोटारीचं चित्र काढणारा मुलगा (‘विचित्र’), खूप कबूतरे बसलेली आहेत असा नेत्याचा पुतळा (‘निष्कर्ष’), झाडावरून गळून खाली पडलेले पान (‘क्वचितच’), बसच्या रांगेत उभे राहून नेत्याच्या पोस्टरकडे पाहणारा माणूस (‘हरवला आहात काय’) अशा या संग्रहातल्या काही कविताच त्यांनी चित्रित केल्या आहेत. छोटय़ा छोटय़ा कागदाच्या तुकडय़ांवर आणि या साऱ्या दृश्यांना मागे टाकत एक कवी काळोखातून प्रवासाला निघालाय. त्याची वाटचाल संपलेली नाही, सूर्य अद्याप अस्ताला जायचा आहे. पाडगावकरांचे हळवे, निसर्गावर प्रेम करणारे मन, राजकीय-सामाजिक वास्तवावर आणि त्यातल्या विसंगतींवर नेम धरणारा त्यांचा औपरोधिक स्वर, जगताना अनुभवाला येणाऱ्या छोटय़ा छोटय़ा प्रसंगांनी प्रफुल्लित होणाऱ्या त्यांच्या चित्रवृत्ती, त्यांची चिंतनशीलता, सहजी स्फुरणारा विनोद, मोकळा आनंदी स्वभाव अशा अनेक छटा या संग्रहातल्या ८० कवितांत विखुरल्या आहेत.
कवितांची अखेरची वही, प्रत्येक कवितेखाली माझी सही :
जी माझ्या असण्याची सर्जनशील ग्वाही!
ही ‘अखेरची वही’ची सुरुवात आहे. ‘न सांगता अकस्मात येणाऱ्या स्टेशनवर गाडीतून उतरायची वेळ’ आल्याची शांत पक्व जाणीव या कवितेत व्यक्त होते. तरीही अजून भोवतीचे नेहमीचे रुक्ष, गद्य जग असे सुंदर होऊनच जाणवते : ‘चमत्कार’च म्हटला पाहिजे हा, जसे,
पाउस पाउस रस्ते ओले, फांद्यांचे झोपाळे ओले!
रस्त्यावर कर्कश मोटारी : भिजून त्यांचे पक्षी झाले!
..रस्ता ओलांडून जाणारी, घूस नव्या नवरीपरि चाले!
किंवा, निसर्गाचे एक साधे दृश्य : अलगद कविता बनून येते : ‘मूड’च तसा होतो.
तलावाचं संथ निळं पाणी, काठावर पांढरे पक्षी
त्यांच्यावर हळुवार पसरलेले सोनेरी कोवळं ऊन सकाळचं..
मनात माझ्या येऊन बसलेले
पांढरे शुभ्र शब्द;
आणि त्यांच्यात पसरलेला
हळुवार कोवळा सोनेरी मूड-सुचलेल्या नव्या कवितेचा!
पाडगावकरांच्या मनात सतत कविता किंवा गाणे असते. ती कविता किंवा गाणे वर यायला काहीही निमित्त पुरते. इमारतींच्या गर्दीत नाजूकशी हिरवळ दिसली किंवा रित्या रित्या फांद्यांवर एक हिरवागार पक्षी बसलेला दिसला की ‘मी स्वत:शीच अन् स्वत:साठीच खुशीचे गाणे गुणगुणले!’. या संग्रहात कविता किंवा गाणे यांचे उल्लेख कितीदा आणि कसे येतात ते पाहण्यासारखे आहे. कविता लिहिणारा ‘लिहिण्याच्या आंतरिक अटळ अशा ऊर्मीतून आत्माविष्कार’ करत असतो, पक्षी हळवे ‘गीत’ ऐकवत असतो. पाऊस आल्यावर ‘कवितेच्या वहीत फूल फुलून’ येते, हळुवार रात्र ओठावरच्या बासरीसारखी ‘ओठावर गाणे’ होते, अगदी रूक्ष, दाहक वास्तवावरदेखील. ‘गद्याळ कविता नको, एखादं गाणं लिही’ असे कवीला सांगणारे सांगतातच. भीक मागणारी मुलगी भीक न घेताच गाणे म्हणत पुढे जाते तेव्हा कवी खुशीचे गाणे गुणगुणू लागतो. तिने ‘नुकत्या सुचलेल्या कवितेसारखे फुलून यावे’ असे कवीला वाटते, झाडं हिरवंगार गाणं गात असतात, कविता सुचते तेव्हा कवीच्या मनात शब्दांचे मोर नाचू लागतात- निर्मितीच्या, सृजनाच्या आनंदात पाडगावकर सतत निमग्न असतात. त्याचबरोबर ज्यांच्या आधाराने हे सृजन संभवते, त्या शब्दांचा आणि ते शब्द ज्या भाषेचे अंग असतात त्या भाषेचाही विचार त्यांच्या चिंतनाचा एक विषय असतो.
विचार, भावना, यांना नाही अस्तित्व भाषेशिवाय;
काही कळलं असं म्हणणं हीदेखील भाषाच!
विचार नाही, भावना, कल्पना, भाषा नाही :
या काहीनाहीला शून्य म्हणणं, हीदेखील भाषाच झाली..
असे हे भाषेचे त्रांगडे आहे. ‘शब्द तोच असतो तरिही, शब्द तोच नसतो तरिही!’
किंबहुना, ‘जगणं हा खेळ असतो भाषेचा! .. शब्दांचे पोशाख सतत बदलत राहतात. शब्दांत अर्थ पेरणाऱ्या भाषेशी तऱ्हातऱ्हांचे खेळ खेळता येतात..’ त्यामुळेच पाडगावकरांची प्रार्थना अशी असते, जी ध्वनीपासून कवितेपर्यंत पोचते-
ओम् नमो जी। आद्यध्वनी ‘अ’
ओम् नमो जी । आद्याक्षर ‘अ’
ओम् नमो जी । आद्यशब्द ‘अक्षर’
ओम् नमो जी । आद्यशब्दगर्भ ‘आशय’
ओम् नमो जी । आशयगर्भ ‘अनुभूती’
ओम् नमो जी । अनुभूतिगर्भ ‘कविता’
पाडगावकरांची ही प्रार्थना गेली कित्येक वर्षे मनोमन सुरू होती, आज ती त्यांनी वाचकांना ऐकवली आहे.
या लहान संग्रहातही पाडगावकर लयीचे वेगवेगळे प्रकार पकडतात. ते कसे आशयानुगामी असतात ते मुळातूनच अनुभवण्यासारखे आहे. काळोखाचा ‘अभंग’ (‘अभंग काळोख’) असतो, मुक्तछंद असतो, द्विपदी आणि ध्रुवपद यांना गुंफलेले गीत असते, दोन दोन ओळींचे शेर असतात, पण ती गझल नसते. पण,
गाणे गातो तोच असा जर हा थकलेला,
सांग अता मग घालावी मी हाक कुणाला?
..द्वेष सुराचा करू लागले जर हे सगळे
माझे गाणे इथे अता मी म्हणू कशाला?
 अशी ‘गझल’ही आढळते. किंवा ‘पाउस आला रे, धारा झेला रे!’ असे ‘पाऊसगाणे’ही असते.
पाडगावकरांनी एका कवितेत म्हटलेले आहे :
‘कोवळं कोवळं पोपटी हिरवं गवताचं पातं
आपलं डोकं मातीच्या थराखालून वर काढतं..
कविता सुचते तेव्हा अगदी तसंच होतं.
अचानक मनात माझ्या नाचू लागतात. मोर शब्दांचे!
तिन्ही त्रिकाळ मोरच नाचतात असं नाही,  
काळे काळे कावळेही कर्कश काळ्या चोची
त्वेषाने फांदीवर घासत करतात काव काव
ज्यात असते उपरोधाची मर्मभेदक तीक्ष्णता!..
पाडगावकरांच्या प्रस्तुत संग्रहातही जागोजागी उपरोध आढळतो. राजकीय-सामाजिक वास्तव ते उपरोधाने लक्षात आणून देतात. ‘अखेरची वही’त अशा औपरोधिक कवितांची संख्या एकूण २० इतकी, म्हणजेच लक्षणीय आहे. या वास्तवापासून वाचकानेही दूर व्हावे. निखळ आनंदात पाडगावकरांप्रमाणेच रमावे असे जाणवून देणाऱ्या ‘श्रावणातल्या घना’, ‘चमत्कार’, ‘पालवी’, ‘फुलणं’, ‘सगळी फुलं’, ‘मूड’, ‘झाडं बोलतात’, ‘झाडाचं असणं’, ‘देणं घेणं’,  ‘रिमझिम’,  ‘प्रेम सुंदर आहे’, ‘पाऊसगाणे’,  ‘मेघ फुलांचा’, ‘मनात माझ्या’- अशा जगातल्या सुंदर गोष्टींकडे लक्ष वेधून घेणाऱ्या कविताही आहेत. ‘फक्त पाच मिनिटं’ या कवितेत पाडगावकरांना शेवटी सांगावे लागते,
समोरचं हिरवंगार झाड पिवळ्याधमक फुलांनी भरून गेलंय,
खिडकीजवळच्या झाडावर चिमणीने नाजूक सुंदर विणीचे घरटे बांधले आहे,
झाडाच्या फांदीवरून तुरुतुरु धावतेय एक खार;
अहो, फक्त पाच मिनिटं टीव्हीसमोरून उठा आणि हे सगळं डोळ्यात हळुवार भरून घ्या!
‘प्रेम सुंदर आहे, म्हणून तर जगणं सुंदर आहे’ याची आत्मप्रचीती प्रकट करणाऱ्या काही मोजक्या कविताही या संग्रहात आहेत. ‘वाचणारा कोणीही नाही इथे, कूसही नाही उबेची राहिली’ असा काळोखही अनुभवाला येतो, पण तो क्वचित. एरवी,  ‘तुला काय द्यावं?’ याचे पाडगावकरांचे उत्तर, ‘फुलणं देतो. फुलंभरल्या वेलीचं झुलणं देतो; खिडकीतून आलेलं हळुवार चांदणं देतो; पहाटेच्या आभाळाची नीळ देतो; सरीमागून सरी ओलंचिंब जग देतो!’ हे आहे. आजकाल हे कुणीही कुणाला देत नाही. आपल्याला हे देणारा कवी अद्याप आपल्याजवळ आहे याचा आतल्या आत आनंद मानून घ्यावा.
‘अखेरची वही’ – मंगेश पाडगावकर,मौज प्रकाशन गृह, मुंबई,पृष्ठे – ८८, मूल्य – ८० रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा