आयुष्यात घडणाऱ्या अनेक घटनांसाठी जणू क्रिकेट आपल्याला तयार करते. क्रिकेटमुळे समजते की यश-अपयश हे दोन्ही किती क्षणभंगुर असते. गेल्या सामन्यातील शंभर धावा आजच्या सामन्यात कामाला येऊ शकत नाहीत. किंवा आजच्या शून्य धावा म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे. निराशा किंवा आशा या दोन्ही गोष्टी सारख्याच बिनमहत्त्वाच्या आहेत, हे नीट समजते. बाद नसताना बाद दिले जाणे यासारखा दुसरा अन्याय नाही, पण अजिबात भावनाविवश न  होता शांतपणे निघून जाणे या गोष्टीला अत्यंत संयम लागतो. ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर आदळ आपट अनेक जण करतात, पण ते साहजिक आहे असे सर्वच कबूल करतील. केलेल्या शतकानंतर अभिनंदनाचा वर्षांव होत असताना हेच हार घालणारे हात उद्या अंडी-टॉमॅटो देखील मारतील, हे प्रत्येक फलंदाजाला पुरेपूर माहिती असते. त्यामुळे वाहवत जाता येत नाही आणि जे वाहवत जातात ते क्रिकेटमध्ये टिकू शकत नाहीत. ‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ’ हे क्रिकेटइतके चांगले कुठे समजेल बरे? खुद्द डॉन ब्रॅडमन आपल्या त्रिशतकांविषयी  जेव्हा म्हणतात. ‘मी त्रिशक काढले हे जरी खरे असले तरी मी ते काढेपर्यंत माझ्यासमोर कुणीनाकुणी खेळत होते म्हणून मी ते काढू शकलो. कुणी टिकलेच नसते तर मी कसे काय त्रिशतक काढू शकलो असतो? म्हणजे या अर्थाने हे त्रिशक म्हणजे खरोखरच सांघिक करामत आहे.’ यातील केवळ थोर माणसांच्यातच आढळणारी नम्रता जरी बाजूला ठेवली, तरी हे खरोखरच सत्य आहे हेही विसरून चालत नाही.
आता गोलंदाजाच्या बाजूने पाहूयात. गोलंदाजाचे हृदय हे खरोखर मोठे लागते. कितीही सुरेख गोलंदाजी केली आणि फलंदाज अनेक वेळा चकला तरी चेंडू  बॅटला न लागता नुसता निघून जातो आणि फलंदाज पुन्हा जिथल्या तिथे. कधीकधी जीव तोडून गोलंदाजी करावी, पण फलंदाजाकडून अतिशय मार खावा लागतो. एखादा झेल उडतो, पण तोही सुटतो. दिवसभर विकेट मिळत नाही. थकून परत यावे लागते. अनेक लोकांकडून फुकट सल्ले ऐकावे लागतात. ‘तू ऑफ स्टंपवर फार शॉर्ट पिच बॉल टाकलेस. स्लोअर वन वापरला नाहीस किंवा फार वापरलास. कंट्रोल अजिबात नाही तुझा. इ. इ.’ कधी कधी हात शिवशिवत असतात गोलंदाजी करायला आणि कप्तान बोलिंगच देत नाही. दिली तर पाहिजे त्या बाजूने देत नाही. मनासारखे नेत्ररक्षण लावू देत नाही. मग झेल उडतात पण तिथे कुणी क्षेत्ररक्षकच नसतो. कधी खेळपट्टी इतकी थंडगार असते की जीव खाऊन चेंडू टाकावा पण तो उसळतच नाही किंवा वळत नाही आणि भयंकर मार खावा लागतो. नशीब असेल एखाद्या दिवशी तर असे अफाट झेल घेतले जातात की डोळ्यांवर विश्वास बसत नाही. एखाद्या फालतू चेंडूवर विकेट मिळते. पंच धडाधड  एलबीडब्ल्यू देतात. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन.’ हे याहून चांगले कुठे कळू शकेल? न कंटाळता प्रत्येक चेंडूवर विकेट मिळवायचीच या जिद्दीने नामोहरम न होता चेंडूवर चेंडू टाकत राहायचे हे येरागबाळ्याचे काम नोहे. अत्यंत चतुराईने बॅट्समनला फसवावे आणि आपल्याच प्रिय मित्राने झेल सोडल्यानंतर संताप आणि निराशा आवरून पुन्हा पुढचा चेंडू टाकायला सज्ज होणे, हे योगसाधनेइतके श्रेष्ठ असते. ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ हे पतंजली योगसूत्रातले पहिले सूत्र असे शिकायला मिळते क्रिकेटमध्ये!!
क्षेत्ररक्षणात तर केवळ प्रतीक्षा असते. कधी कधी अक्षरश: दिवसभरात हाताला चेंडू लागत नाही. प्रत्येक वेळी गोलंदाजाने पळायला सुरुवात केली की आपण पिचच्या दिशेने चालायला लागायचे. आपल्याकडे चेंडू आला नाही की परत वळायचे. पुन्हा पुढच्या चेंडूला हीच गोष्ट पुनश्च. दुपारच्या उन्हात लंचटाईमनंतर हे करणे म्हणजे दिव्यच असते. त्यातच अचानक आपल्याकडे उंच उडालेला झेल येतो आणि मैदानावरची सर्वात महत्त्वाची व्यक्ती, निदान त्या क्षणापुरती, तुम्ही असता. सर्वाच्या अपेक्षा शिगेला पोचतात. तुम्ही तो झेल घेतलात तर टाळ्यांचा कडकडाट होतो. तुम्ही एकदम हीरो बनता. पण जर डोळ्यांवर सूर्य आला, अडखळला किंवा तुमचा अंदाज चुकला तर जे नि:श्वास सुटतात आणि नंतर ज्या शिव्या मिळतात त्या ऐकून पुढे दिवसभर क्षेत्ररक्षण करणे आणि चांगले करणे हे फार अवघड असते. कदाचित तुम्ही चांगले क्षेत्ररक्षक आहात हे सिद्ध करायला परत संधीच मिळत नाही. नेमका तोच फलंदाज पुढे एकही संधी न देता शतकावर शतक काढतो. तुमची टीम हरते आणि कधीही आठवणी निघाल्या की ‘त्या कॅचमुळे मॅच गेली’ हे आयुष्यभर ऐकावे लागते. ते खरेच असल्यामुळे बोलताही येत नाही. कधी तुम्ही अप्रतिम झेल घेता, पण तो नो बॉल असतो. तुमच्या या अप्रतिम कामगिरीचे मोल शून्य. कुणाच्या कधीही लक्षातदेखील राहात नाही. कधी गोलंदाजापेक्षा क्षेत्ररक्षकामुळेच एखादी विकेट मिळते पण श्रेय गोलंदाजाच्या नावावर जाते. क्षेत्ररक्षण म्हणजे केवळ झाडाच्या मुळांसारखे काम असते. सर्वात महत्त्वाचे असते, पण भाव खाऊन जातात ते फलंदाज आणि कधी कधी गोलंदाज.
कप्तानपद म्हणजे सुळावरची पोळी. कप्तानाला फक्त एकामागोमाग एक असे निर्णय घ्यावे लागतात. विशेषत: मॅच निकराच्या स्थितीत असताना कुणाला गोलंदाजी द्यावी हा निर्णय घेताना भावनेच्या आहारी न जाता अत्यंत स्थिर बुद्धीने घ्यावा लागतो. निर्णय घेताना साधक बाधक असा सर्व विचार करून एकदा निर्णय घेतला की विचलित न होता एका मर्यादेपर्यंत तो निर्णय धकवून न्यावा लागतो. निर्णय बरोबर की चूक हे नेहमी नंतर कळत असल्याने, ‘योग्य’ निर्णय अगर ‘अयोग्य’ निर्णय या गोष्टींसाठी कितीही कौतुक झाले किंवा टीका झाली तरी संयमी कप्तानास कधीही आनंद किंवा दु:ख होत नाही. एखाद्या लेग स्पिनरला गोलंदाजी द्यावी तर त्याचा योग्य टप्पा पडायला जरा वेळ लागू शकतो. तेवढय़ात मारपीट होऊन सामना हातातून जाऊ शकतो. ऑफ स्पिनरला द्यावी तर आडव्या बॅटने मारलेल्या फटक्याने सहा धावा मिळू शकतात. जलदगतीला द्यावी तर नुसता ओझरता स्पर्श होऊन चार धावा जाऊ शकतात. एका षटकात छत्तीस धावा देखील होऊ शकतात. किंवा हॅटट्रिक देखील मिळू शकते. काय वाट्टेल ते होऊ शकते. अशा परिस्थितीत योगी पुरुषाप्रमाणे निश्चल राहून तो धैर्यवान पुरुष निर्णयावर निर्णय घेतो. निर्णय बदलणे हा देखील एक निर्णयच असतो. ज्या कप्तानाचे यशस्वी कप्तान म्हणून कौतुक होते तो हे पूर्णपणे समजून असतो, की आपली टीम चांगली होती आणि आपले निर्णय योग्य ठरत गेले हे नशीब. आपले कर्तृत्व फारसे नाही. या व्यतिरिक्त कप्तानास वैयक्तिक कामगिरी करून आपले संघातील स्थान टिकवावे लागते नाहीतर त्यामुळे टीका होते. या परीक्षेत मात्र भलेभले नापास होतात आणि कर्णधारपद सोडून देतात किंवा त्यांना कप्तानपदावरून हटविले जाते. हा एक प्रकारचा अपमान सहन करून दुसऱ्याच्या हाताखाली पूर्ण सहकार्य देऊन खेळणे आणि त्याला यशस्वी कप्तान अशी मान्यता मिळवायला मदत करणे हे सत्पुरुषाचे लक्षण होय.
शहाणा माणूस कधीही क्रिकेटचा टीम सिलेक्टर होत नाही. काहीही करा आणि शिव्या खा असेच ते काम असते. त्यातच कोणतीही टीम कधीही पूर्णपणे गुणवत्तेवर निवडली जात नाही हे अगदी उघडे गुपित आहे. त्यामुळे एखाद्याला का घेतला अगर का काढला याचे स्पष्टीकरण देता देता नाकी नऊ येतात. अनेक लोकांचे राग लोभ सांभाळत ती निवडली जाते. विशेषत: ज्यांना कुणाचाच पाठिंबा नाही, अर्थात ज्यांना ‘गॉडफादर’ नाही फक्त गुणवत्ता आहे अशांचा तर संघनिवडीत कधी कधी विचारही केला जात नाही. केला गेलाच तर कुणाला गाळण्याचा प्रश्न आला की त्यांना पहिले गाळले जाते.
पंचांचे काम नि:पक्षपाती असावे असा एक समज असतो. सामान्यपणे तो खरा असतो पण उडदामाजी काळे गोरे असणारच. आणि मनुष्य स्वभावानुसार कळत नकळत पंचांच्या हातून चुका होतात आणि त्याचे बळी खेळाडू ठरतात. आता इलेक्ट्रॉनिक साधनांनी त्या चुका एका मर्यादेपर्यंत कमी होतील.
क्रिकेट खेळाचा असा आवाका पाहिला की हा खेळ सर्वानी एक चित्तवृत्तीनिरोध म्हणून खेळणे किती आवश्यक आहे, हे सर्वाच्या लक्षात येईल. भारतासारख्या देशात जिथे कुणीही कधीही वेळेवर जात-येत नाही तिथे क्रिकेटचे सामने अगदी वेळेवरच चालू होतात. सर्व खेळांबाबत असे म्हणता येईलच असे नाही. या खेळाच्या माध्यमातून जीवनातील फार महत्त्वाची सत्ये लहान वयातच जवळून पाहायला मिळतात. केवळ आपली टीम हरू नये म्हणून ताप आलेला असताना तासभर किल्ला लढवून सामना वाचवणारे; तर कधी जिंकून देणारे वीर इथे दिसतात. तर आपल्याला कप्तानपद न दिल्यामुळे दुसऱ्या कप्तानाखाली खेळण्यास नकार देऊन संघाला पराभवाच्या खाईत लोटायला मागे पुढे न पाहणारेही दिसतात. आपल्या सहकाऱ्याचे शतक पुरे होत असताना तो धावबाद होऊ नये म्हणून स्वत:ची विकेट देणारे जसे इथे पाहायला मिळतात, तसे मुद्दाम धावबाद करणारेही इथे पाहायला मिळतात. एखाद्याच्या मागे लागून त्याला उद्ध्वस्त करू इच्छिणारे जसे दिसतात तसेच अगदी मनापासून क्रिकेटचे तंत्र आणि मंत्र शिकवणारेही भेटतात. या सर्वातून माणसे शोधण्याची आणि पारखण्याची कला हळूहळू लहानपणीच अंगी बाणवण्यासाठी या खेळापेक्षा महान शिक्षक नाही.
लहान मुलांचे चारित्र्य घडवणे वगैरे लंब्या चवडय़ा गप्पा मारणारे खूप असतात. गोष्टी सांगून चारित्र्य घडवता येते अशा भाबडय़ा समजुतीतून संस्कारवर्गदेखील घेतले जातात. तुम्ही काहीही म्हणा. आपले क्रिकेटपटू हे आजच्या पिढीचे दैवत आहेत. त्यांच्या आयुष्यातील पाचकळ गोष्टींना प्राधान्य देऊन आपण एका सुवर्णसंधीस मुकत आहोत. क्रिकेट खेळतानाची त्यांची वागणूक कशी आहे हे आपण बालवर्गाला समजावून सांगितले पाहिजे, कारण तुमचे चारित्र्य तुमच्या लिहिण्या-बोलण्यातून नाही तर तुमच्या वागण्यातून समजते. क्रिकेटमुळे एकेका प्रसंगात कसे वागावे, याचा वस्तुपाठच मिळत राहतो. आज भारतातल्या प्रत्येक पवित्र गोष्टीचे बाजारीकरण झाले आहे. भारतीय संस्कृतीतील बाजार न झालेली अशी एकही गोष्ट आता दिसत नाही. क्रिकेट जो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे, त्याला कसा अपवाद असणार? पण तरीही या खेळाच्या मागे एक जो सुसंस्कृत विचार आहे तो मनात ठेवून हा खेळ पाहिला की एकाच सामन्याच्या दोनही डावांत पंचांच्या चुकीने बाद दिल्यावर राहुल द्रविड शांतपणे पॅव्हिलियनमध्ये परततो, यामागे केवढी साधना आहे याचा आपल्याला विसर पडत नाही.
उत्तरार्ध

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा