प्रा. मं. गो. राजाध्यक्ष
अमळनेर येथे होणाऱ्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह जाहीर झाल्यानंतर त्यावर लगेचच चहूबाजूंनी टीका झाली. संमेलनाच्या बोधचिन्हाचे, लोगोचे पारंपरिक रूपडे बदलत नसल्याबद्दल समाज माध्यमांतून खंत व्यक्त करण्यात आली. डिजिटल युगाचे प्रतिबिंब त्यातून उमटत नसल्याची ओरड अजूनही थांबलेली नाही. या पार्श्वभूमीवर बोधचिन्हाच्या पाऊण शतकाच्या इतिहासातील महत्त्वाच्या देशी आणि विदेशी मासल्यांवर चर्चा..
सिम्बॉल अथवा प्रतीक याचा मानवी जीवनाशी एक अविभाज्य असा संबंध आहे आणि तो जेव्हा एखाद्या कंपनीच्या नावाशी जोडला जातो, तेव्हा त्या कंपनीशी त्याची घट्ट नाळ जोडली जाते. आज संभाषण कलेमध्ये सर्वात जास्त जबाबदारी या सिम्बॉल अथवा लोगोवर असते. एखादे मूल जन्माला आल्यावर आपण त्याचे नामकरण करतो, ते त्याला आयुष्यभर साथ देते. त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीचे नाव- जेव्हा एखाद्या डिझायनरकडून बनवून घेतले की त्याचा लोगो बनतो, हे तिच्या अस्तित्वापर्यंत साथ देत असते. क्वचित त्यामध्ये सुधारणा होत असेल, पण त्या लोगोचे मूळ व्यक्तिमत्त्व तसेच सांभाळले जाते. त्याची ओळखही कायम जपली जाते. व्यापारी क्षेत्रात तर अशा लोगोंचा वापर हा त्यांच्या अनेक उत्पादनांसाठी वापरला जाऊन त्यामध्ये करोडो रुपयांची गुंतवणूक होत असते. जसे, टाटासारखी कंपनी- ज्यांची टाटा या चिन्हाखाली अनेक निरनिराळी उत्पादने तयार होत असतात, त्यातून टाटा या नावाचे व्यक्तिमत्त्व जाणवून देता आलेच पाहिजे. म्हणून आपल्या ब्रँडला यशस्वीपणे साकारण्यात या लोगोचा वापर तितक्याच जबाबदारीचा असतो. यासाठी तुमच्या कंपनीचे व्यक्तिमत्त्व, ओळख त्यामध्ये आणणे गरजेचे असते. जर का तुमची कंपनी जड औद्योगिक मशीनरी तयार करत असेल, तर तो जडपणा त्यातून दाखवायला हवा. याउलट एखादे सौंदर्य प्रसाधन, वस्त्र प्रावरण असले की त्यातील नाजूकपणा त्या लोगोमधून प्रकट व्हायला हवा.
आणखी वाचा-भारतीय विरागिनींची प्रवासगाथा
आज भारतात संभाषण कला, तसेच त्यासाठी लागणारी इतर माध्यमे परदेशी संकल्पनांच्या तोडीची होत आहेत. आपले कित्येक डिझायनर परकीय उत्पादनावर विविध माध्यमांद्वारे काम करीत आहेत, पण काही वर्षांपूर्वी सिम्बॉल डिझाइन हे एखाद्या कंपनीसाठी केले की त्या जाहिरात कंपनीचे काम संपत असे. पुढे सदर सिम्बॉल अथवा लोगो तो उत्पादक कशाही तऱ्हेने त्याचा वापर करीत असे. ते कधी लहान, कधी मोठे अशा तऱ्हेने वापरले जाई, पण त्यानंतर त्यामध्ये एक प्रकारची सुसूत्रता आणण्याचे काम एका कल्पक आणि सृजनशील अशा कलाकाराने केले- ते होते जाहिरात क्षेत्रात एक आघाडीचे नाव असलेले प्रा. यशवंत चौधरी. ते मुंबईच्या सर ज.जी. उपयोजित कला संस्थेमधून सर्वप्रथम आले व तेथील स्कॉलरशिप मिळवून ते लंडनच्या ‘सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट’मधून शिक्षण घेऊन पुढे स्वित्झर्लंड येथे गेले. पुढे तेथील सिबा या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करू लागले. तेथे त्यांनी ग्राफिक डिझाईन आणि पॅकेजिंग या विषयांचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी भारतात येऊन येथील सिबा कंपनीत कला दिग्दर्शक म्हणून काम पाहिले. तोपर्यंत भारताने ग्राफिक डिझाइन क्षेत्रात तेवढी आघाडी घेतली नव्हती. त्या गोष्टी चौधरींनी आत्मसात केल्या होत्या आणि बोधचिन्ह अथवा सिम्बॉल हा प्रकार त्यांनी वेगळय़ा पद्धतीने हाताळण्यास सुरुवात केली. सिंबॉल आणि लोगो कंपनीचा आत्माच समजायला हवा. पूर्वी जे बोधचिन्ह अथवा लोगोचा प्रत्येक डिझायनर हवा तसा वापर करे, त्याला चौधरींनी एक शिस्त लावली. लोगोचा आकार, त्याची विशिष्ट प्रकारची ठेवण, त्याचे आकारमान एका ठरावीक पद्धतीवर इतर घटकाला पूरक अशी ठेवून ते केवळ पत्र व्यवहाराच्या स्टेशनरीपुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण व्यवहारात त्याचा वापर त्यांनी केला. यामध्ये कार्यालयाच्या अंतर्गत सजावटीपासून ते कर्मचाऱ्यांचा गणवेश, वाहतुकीची साधने आदी गोष्टींचाही समावेश करण्यात आला. त्यासाठी कलर कोडही वापरण्यात आले. एच. डी.एफ.सी. या गृहनिर्माण संस्थेसाठी त्यांनी पहिली कॉर्पोरेट आयडेंटिटी बनवली. ‘कॉर्पोरेट आयडेंटिटी’ हा लोगोचा नवा आविष्कार अस्तित्वात आला. ग्राफिक डिझाइनमधील एक अधिकारी व्यक्ती म्हणून चौधरी ओळखले जाऊ लागले. या पुढे चौधरींनी अनेक कलात्मक लोगोंचे संकल्पन केले. यामध्ये अमूल दूध, आय.आय.टी. मुंबई, ज्ञानेश्वर विद्यापीठ, इंडस्ट्रिअल बॅंक, लोकनेते चंद्रशेखर यांची पदयात्रा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आय.सी.आय.सी. आय. इंटर नॅशनल फायनान्सिंग, वुमेन असोसिएशन फॉर वेल्फेअर यांचा समावेश आहे.
यानंतर नाव घ्यावे लागेल ते प्रा. र. कृ. जोशी यांचे. उल्का जाहिरात कंपनीचे कला दिग्दर्शक म्हणून काम करीत असताना त्यांनी जाहिरातींसोबत अनेक बोधचिन्हांची निर्मिती केली. स्वत: कवी असल्याने त्यांच्या संकल्पनेतून नेहमी काव्य बहरत असे. त्यांनी केलेले अपंगांसाठीचे बोधचिन्ह होते एक फूल- ज्याची एक पाकळी गळून पडली आहे. हृदयाला हात घालेल अशी ही संकल्पना होती. तसेच बांगला देश निर्वासितांसाठी केलेले बोधचिन्हही बोलके अन् हळवे. कपाळाला हात लावून बसलेली एक सुरकुतलेली स्त्री- जिच्या मागे आगीचा डोंब पेटला आहे. पंजाब बँकेसाठी दाखवलेला हाताचा पंजा जो हातात नाणे घेत आहे. शिवाय गुरुमुखी भाषेतील ‘पं’ हे अक्षरही त्यातून दिसत असते. ‘नेरोलॅक पेंट्स’साठी त्यांनी दाखविलेला हसताखेळता वाघ तर अजूनही हातात ब्रश घेऊन उभा असतो. वेलकम ग्रुपच्या हॉटेल्ससाठी त्यांनी स्वागत करणारे दोन हात दाखवले. एक जागतिक कीर्तीचे सुलेखनकार म्हणूनही ते कार्यरत होते, त्यामुळे ‘चिमणलाल पेपर’ साठी त्यांनी सुलेखन वापरूनही लोगो तयार केला. तसेच सुदर्शन धीर हेदेखील या लोगो-बोधचिन्हाच्या जगतातील चमकणारे तारे होते. आज प्रचलित असलेले अनेक लोगो त्यांनी संकल्पित केले आहेत. ‘टायटन वॉच’ लोगोमध्ये त्यांनी सुलभ अशी रचना करून त्यातून घडय़ाळाची डायल दाखविली आहे. शिवाय घडय़ाळातील मशिनरीदेखील त्यातून जाणवते. हिंदूस्तान पेट्रोलियमसाठी त्यांनी लोगो केला. किसान या उत्पादनासाठी त्यांनी लोगोचा वापर विविध रंग वापरून केला. शिवाय एस्सार ग्रुप, बिल्ट, हिंदूस्थान एरोनॅटिक्स, आय.डी.बी.आय. बॅंक असे तोलामोलाचे लोगो त्यांनी साकारले आहेत.
आणखी वाचा-‘बीबी’चा मकबरा!
जागतिक क्षेत्रात काय?
आता काही जागतिक स्तरावरील लोगो पाहूया. कारण आता ही सर्व उत्पादने भारतात उपलब्ध असल्याने आपला त्यांच्याशी संबंध येतोच. आपण ध्यानात ठेवले पाहिजे की या प्रत्येक लोगोना अर्थ असतो. सर्वप्रथम आपण रोजच्या दैनंदिन जीवनात, विशेष करून कोविडच्या काळापासून जोडलो गेलो आहोत त्या ‘अमेझॉन’ या सेवेबद्दल पाहूया. या लोगोमध्ये पहिले अक्षर A व चौथे अक्षर Z याखाली एक हास्याची वक्ररेषा दाखविण्यात आली आहे. या दोन्ही अक्षराकडे ती पॉइंट दर्शवते. याचा अर्थ अमेझॉन आपणाला A to Z सर्व उत्पादनाची सेवा देते. जेव्हा स्टीव्ह जॉबने ‘अॅनपल’ ही आपली कंपनी सुरू केली त्यावेळी त्याचा लोगो होता तो सर आयझ्ॉक न्यूटन हे अॅेपलच्या झाडाखाली बसले आहेत, त्याच्या वर आणि खाली अॅआपल कॉम्प्युटर अँड कंपनी हे लेटिरग टाकले होते. पूर्वीच्या इंग्लिश पुस्तकातील बोधचित्राप्रमाणे हे चित्र होते. पण पुढे स्टीव्ह जॉब्स यांनाच ते खटकू लागले आणि त्यांनी अॅीपलचा नवा सुधारित लोगो करण्यास एका डिझायनरला सांगितले. अॅकपल अजून सुलभ करण्यात आले व एका बाजूने चावा घेतलेले दाखवण्यात आले. तसेच त्या अॅंपलवर रंगीत पट्टे दाखवण्यात आले. डिझाइन सुंदर झाले होते. पण स्टीव्हनी विचारले, ‘‘हा एका बाजूला चावा घेतलेला का दाखविण्यात आले आहे?’’ त्यावर त्या कलाकाराने उत्तर दिले, ‘‘जर का मी ते पूर्ण अॅचपल दाखविले असते, तर त्यात त्याची ओळख राहिली नसती. ते कदाचित पीच अथवा इतर फळ वाटण्याची शक्यतादेखील होती. पण एखादे अॅपल हातात आल्यावर मनुष्य धर्माप्रमाणे तो त्याचा घास घेतो- तेच मी दाखवले आहे. हे स्टीव्ह जॉब यांना पटले. आता तर अॅपलने आपले रंगीत पट्टेदेखील काढून टाकले आहेत. आता अॅहपलच्या लोगोने काय क्रांती केली आहे हे आपण पाहतोच आहे.
फील नाइट यांची ‘नायके’ ही बुटांची कंपनी सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झाली होती. स्पर्धक होते आदीदाससारखे मोठे ब्रॅण्ड. या कंपनीला स्वत:चा असा लोगो हवा होता. त्यासाठी त्यांनी कॅरेलाइन डेव्हिडसन या एक लहान स्टुडिओ चालविणाऱ्या मुलीला ते काम दिले. त्यासाठी तिला ब्रिफ देण्यात आले. कॅरेलाइनने मोजक्या पैशांत आज जो ‘नायके’ वापरते तो स्वूशचे चिन्ह असलेला आणि ग्रीक देवता व्हिक्टरी यावरून करण्यात आलेला लोगो बनवला. आणि त्यामागे तिने वेग, त्यामागची जाणवणारी वेगाची झुळूक या बाबी ध्यानात घेतल्या होत्या. आणि येथून पुढे नायकेची भरभराट होण्यास सुरुवात झाली. पुढे जेव्हा कंपनीने आपल्या एक समारंभ केला, त्यावेळी कॅरेलाइनला कंपनीचे ५०० शेअर, तसेच तिच्याच लोगोवरून रूपांतरीत केलेली एक हिरेजडीत सुवर्णाची अंगठी भेट म्हणून ‘नायके’नी दिले.
आणखी वाचा-शाळा बुडवणारी ‘पानशेत योजना’
‘फेडेक्स’ या कंपनीचा लोगो आपण सर्वजण पहात आलो आहे. मूळ फेडरल एक्सप्रेस असलेली ही कंपनी जेव्हा नव्याने कात टाकू लागली, तेव्हा सर्वप्रथम तिचे नाव थोडक्यात करण्यात आले, ते होते Fed Ex, व त्याचा लोगो बनविण्यात आला तेव्हा मधल्या रिकाम्या जागेत जो बाण तयार केला आहे तो त्या लोगोचे वैशिष्टय़ दर्शवतो. आज त्यांच्या विमानावर देखील तो तितक्याच दिमाखात झळकतो. तसेच बी एम डब्ल्यू या गाडीचा लोगो देखील आपले व्यक्तित्व दर्शवत असतो. मुळात ही कंपनी विमानांचे इंजिन तयार करणारी. विमानाचे पंख जेव्हा मोठय़ा वेगात फिरू लागले की त्या वेगामुळे आतमध्ये एक निराळाच आकृतिबंध तयार होतो आणि तोच या गाडीचा लोगो बनविण्यासाठी वापरात आणला आहे. तसाच रंग हादेखील एक महत्त्वाचा घटक लोगो बनवताना विचारात घ्यावा लागेल.
सुलभीकरण महत्त्वाचे..
असे हे लोगो तयार करण्यासाठी मुळात कलाकाराने सर्जनशील असावे लागते. लोगो हे ग्राफिक असावेत म्हणजे त्यात सुलभीकरण असावे. क्लिष्ट, किचकट लोगो पाहिले जात नाहीत. संकल्पना करताना त्यामध्ये सौंदर्य, लय, ग्राफिक दर्जा आणि पाहणाऱ्याला आश्वासक वाटेल, असे संकल्पन हवे. शिवाय पूर्वी त्यांचे लघुरूप केवळ पेन वगैरे गिफ्ट आर्टिकलसाठी मर्यादित होते. पण आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे की, आपल्या मोबाइल फोनवर तसेच त्याच्या आतील भागावर देखील कंपनीचा लोगो दाखवला जातो. त्यामुळे आपल्या लोगोचे संकल्पन इतके सुलभ व्हायला हवे की तो कितीही लहान झाला तरी तो स्पष्ट दिसावा. आणि मुळात म्हणजे तो अर्थपूर्ण असावा. बोलका असावा. मग भले उद्या ती कंपनी अस्तित्वात असेल नसेल तरी लोकांच्या स्मरणातून तो कधीच जाणार नाही. आठवतो ना मर्फी रेडिओ. अजूनही लोकांना त्या कंपनीचे नाव त्याच्या बालकासह आठवते.
आणि हो! विसावे शतक गाजवणाऱ्या निप्पर कुत्र्याला आपण कसे बरे विसरू? मार्क बेरावुड याच्या निधनानंतर त्याचा निप्पर हा कुत्रा उदास झाला होता. मार्कचा पेंटर भाऊ फ्रान्सिस याने ग्रामोफोनवर रेकॉर्ड लावली. ग्रामोफोनच्या कण्र्यातून जेव्हा गाण्याचे सूर निघू लागले, तेव्हा निप्परला वाटले आपल्या मालकाचा आवाज त्यातून निघत आहे. आणि तो कान लावून तन्मयतेने ते गाणे ऐकू लागला. आणि हाच त्याचा क्षण फ्रान्सिसने टिपला आणि त्याचे पेंटिंग केले. पुढे हे व्हिक्टर कंपनीने विकत घेतले. नंतर त्याचा प्रवास ‘हिज मास्टर्स व्हॉइस’ पर्यंत झाला आणि जगभरातील संगीत प्रेमीवर त्याने अधिराज्य गाजवले. आज ‘एचएमव्ही’ आपल्याकडे अस्तित्वात नाही, पण जगभरातील लोक हा ग्रामोफोन ऐकणारा कुत्रा कोणीच विसरणार नाही. एवढी ताकद असते या लोगोत. फक्त त्यामागे असावी लागते तुमच्या सर्जनशील मनाची उभारी. तुमची सौंदर्यदृष्टी. विचार करण्याची क्षमता. आणि कलाकार म्हणून त्या कल्पनेला दृश्यस्वरूपात आणण्याची शक्ती. मग त्यातून निर्माण होऊ शकतो एखादा सृजनशील लोगो. जो आपल्या आस्थापनाबद्दल, एखाद्या सेवेबद्दल आपले व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे उलगडून सांगेल.
आणखी वाचा-चौसष्ट घरांच्या गोष्टी: बुद्धिबळातील जीवनसार..
माघारी घेतल्याची उदाहरणे..
एखाद्या लोगोचे संकल्पन लोकांना जर का आवडले नाही, तर मात्र लोक त्याला मागे घेण्यास भाग पाडू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणून आपल्याच एअर इंडियाकडे पाहावे लागेल. १९०० साली एअर इंडियाने आपला सेंटॉर हा लोगो बदलून त्याजागी एका अमेरिकन जाहिरात कंपनीकडून नवा लोगो करवून घेतला. त्यामध्ये एक लालरंगाची तिरकी पट्टी दाखविण्यात आली होती व त्यावर सूर्य दाखवला होता. विमानावर हे नवीन संकल्पन येताच त्यावर जनतेकडून प्रचंड नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या. शेवटी अल्पावधीतच एअर इंडियाला सदर लोगो मागे घ्यावा लागला. म्हणून कोणत्याही कंपनीने आपला लोगो योग्य रीतीने व शास्त्रशुद्ध पद्धतीने करून घ्यावा. कारण तोच या स्पर्धात्मक जगात तुमची ओळख जगाला करून देतो. सुमार संकल्पनाला त्यात वाव नाही. म्हणून आपण जर कधी एखादा चांगला लोगो पाहाल तेव्हा त्याच्या मागील कल्पना जाणून घ्या. त्याच्या गुणग्राहकतेची प्रशंसा करा! कारण दिसायला छोटासा असलेल्या लोगोमागे त्याला घडवणाऱ्या संकल्पनकाराला किती मेहनत आणि संशोधन करावे लागते याची कल्पना आपल्याला नसते.
संमेलनाच्या यंदाच्या लोगोत काय?
खान्देशातील अनेक प्रतिमांचा वापर करून हा लोगो बनविण्यात आला आहे. त्यात बहिणाबाई यांचे जाते, संबळ हे खानदेशी वाद्य, तारपा हे आदिवासी वाद्य, केळीची पाने, सरस्वतीच्या प्रतीकासह अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर आणि सखाराम महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रतिकृतींचा वापर केला आहे. दरवर्षी संमेलनाचे बोधचिन्ह स्पर्धा भरवून त्यांतून सर्वानुमते निवडले जाते. मात्र सर्व स्थानिक प्रतिमांची गर्दी करण्याचा सोस दरवर्षी का दिसतो, असा प्रश्न अनेक जाणकार वाचक, साहित्यिक आणि कलाकारांनी यंदा उपस्थित केला आहे.
rajapost@gmail.com