एखाद्या नव्या राज्यात वा प्रदेशात आपण जेव्हा जातो, त्यावेळी त्या प्रांताचे संस्कृतीदर्शक किंवा ‘कल्चरल इंडिकेटर’ म्हणून ज्या खुणा आपल्याला खुणावतात, त्यांत तेथील भाषा, वेश, सण, उत्सव, खाद्यपदार्थ या घटकांकडे आपण आवर्जून आकृष्ट होतो. अर्थात या प्रत्येक ‘कल्चर इंडिकेटर’मध्ये दुबईत इतके वैविध्य आहे, की त्यांचा स्वतंत्रपणे वेध घेता येईल. काळानुरूप संस्कृतीचे जतन आपापल्या परीने होत असले तरी जेव्हा पारंपरिक वेशभूषा हीच दैनंदिन वेशभूषा म्हणून अंगिकारली जाते तेव्हा स्वाभाविकच त्या देशाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल आणि त्यांच्या वेशभूषेबद्दल जास्तच आकर्षण अन् कुतूहल वाटते.
अन्य देशांच्या तुलनेत दुबईत या कल्चर इंडिकेटर्सच्या खुणा अगदी आपण विमानातून बाहेर पडल्यापासूनच दिसू लागतात. आपण इमिग्रेशन विभागात प्रवेश करतो तेव्हा विमानतळाच्या भव्यतेसोबतच निरनिराळ्या काऊंटरवर बसलेले दिमाखदार पारंपरिक अरबी वेश परिधान केलेले कर्मचारी मनात भरतात. दुबईत पहिल्यांदा गेले तेव्हा कल्चरल इंडिकेटरची ही खूण प्रथम मनावर ठसली होती. त्यांची वेशभूषा, देहबोली अन् त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रतिबिंबित होणारा दरारा बघून खरे तर थोडे दपडूनच जायला झाले. पण मला नवनव्या फॅशनची आवड असल्याने मनातील कुतूहलही जागे झाले.
इथले पुरुष साधारणपणे पांढराशुभ्र, डौलदार, पायघोळ कफनीसदृश्य वेश परिधान करतात. त्याला ‘कंधुरा’ म्हणतात. तर महिला जो काळा पेहेराव परिधान करतात त्याला ‘अबाया’ असे म्हणतात. त्यांच्या कपडय़ांतील वैविध्य इथेच संपते का? यात कसली आली आहे फॅशन? असे कपडे एकसुरी वाटत नाहीत? हे प्रश्न स्वाभाविकच मनात आले. या प्रश्नांचे उत्तर पहिल्याच नोकरीत मिळाले. दुबईमधील बहुतांश कंपन्यांमध्ये स्थानिकांचा समावेश असतो. १९९० पर्यंत बहुतांश स्थानिक हे केवळ सरकारी नोकऱ्यांतच दिसायचे. पण काळ बदलला, विविध क्षेत्रांचा विस्तार झाला, तसे येथील स्थानिक लोकही विविध व्यवसायांत दिसून येऊ लागले.
असो. तर सांगायचा मुद्दा आहे कपडय़ांचा. नोकरीत महिनाभर रुळल्यानंतर येथील स्थानिक तरुण-तरुणींशी मैत्री झाली. त्यांनी सांगितलेल्या माहितीतून इथली संस्कृती आणि प्रथमदर्शनी एकसुरी वाटलेल्या त्यांच्या पेहेरावातही किती वैविध्य आहे, हे लक्षात आले.
पुरुष कंधुरा परिधान करतात. त्याला काही परदेशी लोकांनी ‘डिश-डेश’ असेही नाव दिले आहे. हा पांढराशुभ्र अंगरखा असतो. लक्षणीय गोष्ट म्हणजे तो तुम्हाला कधीच घाण, मळलेला वा सुरकुतलेला दिसणार नाही. कारण नीटनेटकेपणाला इथे महत्त्व आहे. असं म्हणतात की, अरब पुरुषाच्या कपाटामध्ये कंधुराचे एका वेळी किमान ३० सेटस् असतात आणि किमान २० सेटस् लॉण्ड्रीमध्ये ड्रायक्लीनिंगसाठी दिलेले असतात.
देश तसा वेश! निरनिराळ्या आखाती देशांमध्ये सर्वच पुरुष कंधुरा परिधान करीत असले तरी त्यांच्या पद्धती वेगळ्या आहेत. कतार-बाहरीनमध्ये कंधुऱ्याला शर्टासारखी कॉलर, तर कुवेतमध्ये एक बटण असलेली बंद कॉलर, तर सौदीमध्ये दोन बटणे बंदची कॉलर व शर्टासारखे स्ल्व्हीज् अशा पद्धतीची त्यांची रचना आढळते. दुबईमध्ये इमाराती पद्धतीत कॉलर नसते आणि त्याचे फीटिंगही थोडे ढिले व सुटसुटीत असते.
कंधुऱ्याचा साधारणपणे पांढराच रंग असला तरी या रंगात १५ प्रकारच्या छटा (शेडस्) उपलब्ध आहेत. शिवाय पांढऱ्याशिवाय तब्बल ६०० रंगांत कंधुरा शिवता येतो. त्यांची टापटीप आणि नीटनेटकेपणाचे आणखी एक उदाहरण सांगायचे तर त्यांच्या डोक्यावरचा रेखीव पद्धतीने (सिमेट्रिकली) परिधान केलेला स्कार्फ. त्याला ‘घतरा’ असे म्हटले जाते. घतरा घालायच्या बऱ्याच पद्धती आहेत. अर्थात पद्धत कुठलीही असली तरी त्यात कौशल्य असते. तो सरकू नये म्हणून वर घातलेले कॉन्ट्रास्ट रंगाचे (पण बहुतांश वेळा काळ्या रंगाचे!) ‘अगाल’ युनिक फॅशन स्टेटमेंटची प्रचीती देते. आपल्याला वरकरणी वाटतो तितका हा वेश सरधोपट नाही. विशेषत: घतऱ्याच्या खाली घातलेल्या टोपीवरील कलाकुसर व बारीक नक्षी त्यांची सौंदर्याबाबत असलेली संवेदनशीलता प्रकट करते.
अहमद नावाचा माझा एक अरब मित्र माझ्यासोबत काम करायचा. ऑफिसचा दरवाजा उघडल्यावर उजव्या बाजूला माझे क्युबिकल होते. अहमद सकाळी ऑफिसमध्ये आला की तो त्याच्या जागेवर जाऊन बसायच्या आत मी त्याला ‘गुड मॉर्निग’ म्हणायचे. दोन-पाच दिवसांनी त्याने विचारलेच, ‘दरवाजातून कुणी आत आल्याचे तुला दिसणे शक्य नाही. कारण तुझ्या बाजूला तो उघडतो. तरीही तुला नेमके कसे कळते, की मी आलोय ते..’ खळखळून हसत मी त्याला सांगितले, ‘मित्रा, तुझी चाहूल लागते तुझ्या अत्तरामुळे. आपल्या ऑफिसमध्ये इतका घमघमाट कुणाच्याच अत्तराचा येत नाही. बाकीचे तर सौम्यच म्हणावे असे परफ्युम लावतात. पण तू अत्तर लावतोस आणि त्या ऊद आणि बखुरच्या घमघमाटानेच तू आल्याची वर्दी मिळते.’ अत्तर हाही इथल्या फॅशनचा अविभाज्य घटक आहे. पण हे अत्तर तेलयुक्त असल्याने कपडय़ांना त्याचे डाग पडू शकतात. यासाठी इमाराती पुरुष कंधुऱ्याला छोटा गोंडा- म्हणजे ‘तरबूश’ लावतात. तरबूश अत्तरात भिजवून टायसारखा लावता येतो आणि कंधुऱ्याची शुभ्रता कायम राखली जाते.
अरब पुरुषांच्या वेशभूषेत इतके वैविध्य; तर मग स्त्रियांची काय बात! त्यांच्या साचेबद्ध कपडय़ांमध्येही डिझाइनचे अनेक उत्तमोत्तम नमुने पाहायला मिळतात. संयुक्त अरब इमिराती अर्थात युएई हा एक पुरोगामी देश आहे. आपली मूळ संस्कृती न सोडता अभिव्यक्तीची घेतलेली झेप त्यांच्या अप्रतिम अबायांमध्ये दिसून येते. काळाबरोबर इथल्या स्त्रियांनी काळ्या अबायाचा मूळ बाज कायम राखत त्याचे रूप पूर्ण पालटले आहे. त्यामुळे एका अबायाची किंमत दोन हजार रुपये ते तब्बल एक लाख रुपये इतकीही असू शकते. या किंमतवाढीमागे अर्थातच असतो तो दर्जा. उत्तम दर्जाचे तरल, तलम कापड, त्याला तुम्ही कसे युनिक कट देता, किंवा त्यावर काय डिझाइन करता, यावर त्याची किंमत ठरते. श्रीमंती कळते ती अबायांवरील डिझाइनवरून. एक्स्क्लुसिव्ह अथवा लिमिटेड एडिशनच्या डिझाइन्सचे कपडे खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो.
अबाया हा ड्रेसच्या बाहेर घालायचा रोब असतो. मला कुतूहल होतं की या अबायाच्या आत स्थानिक लोक कुठला ड्रेस घालतात? इथला पारंपरिक ड्रेस आहे ‘जेलबिया’! लांब गाऊनसारखा असणारा हा जेलबिया वेगवेगळ्या आकर्षक रंगांत मिळतो. काहींवर सुरेख प्रिन्टस्, तर काहींवर बारकाईने सुंदर भरतकाम केलेले असते. वेगवेगळ्या प्रसंगांसाठी वेगवेगळे जेलबिया असतात. लग्नासाठी किंवा विशेष समारंभासाठी असलेले जेलबिया अतिशय सुरेख आणि भरजरी असतात.
दोन गोष्टींचा विशेष उल्लेख करायला हवा. पहिली म्हणजे अबायांमध्ये बहुतांश डिझाइन्सना किनार असते ती इस्लामिक पद्धतीच्या कलाकुसरीची. बारकाईने केलेले हे कुशल नक्षीकाम निरखून पाहिले नक्षीकामाचा उत्तम नमुना पाहिल्याची अनुभूती मिळते. इस्लामिक आर्किटेक्चरमध्ये जसे नक्षीकामाला महत्त्व असते, किंवा ते नक्षीकाम जसे त्या वास्तूच्या रचनेचा आविभाज्य भाग असते, तसेच अबायांवरील नक्षीकाम हेदेखील अविभाज्य घटक असते.
दुसरी गोष्ट म्हणजे दुबई म्हटले की लोकांना आठवते ते सोने. इथल्या स्थानिकांमध्येही सोन्याची हौस दिसून येते. दागिनेच नव्हे, तर स्त्रियांच्या कपडय़ांवरील नक्षीकामातही सोनेरी रंगाचा वापर आवर्जून आढळतो. सोन्याच्या जरीच्या अत्यंत बारीक अशा लेस किंवा सोनेरी रंगाच्या प्रिंटचे कापड किंवा उत्तम क्रिस्टलचा केलेला वापर या सर्वातून त्यांची सोन्याची हौस अधोरेखित होते. डोके आणि केस झाकण्यासाठी महिला ‘शेला’ वापरतात. तो तलम व वजनाने अत्यंत हलका असतो. त्याचा पारंपरिक रंग काळा असला तरी आता त्यात वेगवेगळे रंग आणि डिझाइन्स आल्या आहेत. विशेषत: हातातल्या डिझाइनर पर्सला साजेसे शेले बाजारात आपले लक्ष वेधून घेतात.
‘बुरखा’ हा शब्द आपल्या परिचयाचा आहे. पण काही आखाती देशांमध्ये, विशेषत: UAE मध्ये वयस्कर स्त्रिया एक युनिक बुरखा वापरतात. हा बुरखा सोनेरी वा तत्सम धातूच्या मुखवटय़ासारखा दिसतो. प्रत्यक्षात तो कापडाचा असतो. हे कापड भारतातून आयात होते. त्याला निळा वा जांभळा डाय लावला जातो आणि चमक येईपर्यंत एका काचेच्या बॉलने त्याला पॉलिश केले जाते. यातही खूप डिझाइन्स पाहायला मिळतात. झबील, अल-ऐन, शारजा, ओमानी, इत्यादी. या छोटय़ा मुखवटय़ालाही इथल्या स्त्रियांनी आपल्या कल्पनाशक्तीने आणि सर्जनशीलतेने ‘Piece of Art’ बनविले आहे.
पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादा ‘कंधुरा’ वा ‘अबाया’ बघाल तेव्हा त्याकडे बारकाईने बघा. इथल्या वातावरणामुळे कपडय़ांचे साधारण स्वरूप सारखेच वाटले तरी नीट पाहिल्यावर दिसते ते त्यातले वैविध्य. प्रत्येक अरब स्त्री व पुरुषाच्या पेहेरावात दिसते एक अनोखे मिश्रण.. त्यांचे संस्कृतीबद्दलचे प्रेम.. आगळंवेगळं फॅशन स्टेट्मेंट.. त्यांचे ‘युनिक’ व्यक्तिमत्त्व आणि त्यास लाभलेली बदलत्या काळाची सोनेरी लेस..