पंकज भोसले
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
महासाथीच्या तडाख्यात बसत चाललेला आणि आर्थिक भविष्यभयाच्या दडपणाने गेली दोन वर्षे कुरतडत चाललेला मराठी प्रकाशन व्यवसाय या वर्षी मोकळा श्वास घेत असल्याचे पुस्तकांच्या निर्मितीमूल्यातून दिसत आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे दिवाळी अंकांचे ‘सांस्कृतिक उत्पादन’ यंदा भूषणावह पातळीवर पोहोचले आहे. सर्व वृत्तसमूहांचे अंक बाजारात तातडीने संपले. एका वृत्तसमूहाने तीन लाखांहून अधिक अंक छापले. पुण्यातील एका अंकाला दिवाळी अंकाची दुसरी आवृत्ती काढावी लागली आणि दिवाळीच्या आदल्या आठवडय़ापासून माध्यमांतील वाटाडय़ांवर न विसंबता मुंबई-पुण्यातील मोजक्या ग्रंथदालनांत अंकखरेदीचा उत्साह प्रचंड होता. अल्पावधीत उपसलेल्या यंदाच्या दिवाळी अंकांच्या पसाऱ्यावरील दृष्टिक्षेप..
करोनामुळे जगाला अनेक बऱ्या-वाईट सवयी लागल्या, पण मराठी वाचकांमध्ये आणि काही अंशी लेखकांमध्ये या काळात एक नवी चूष तयार झाली. आवडलेल्या लेखाची-लेखनाची ‘पीडीएफ’ प्रसृती करण्याची. यानंतर लेखनाची नवप्रसृत ‘पीडीएफ’ व्हॉट्सॲप आणि समाजमाध्यमांच्या अंगा-खांद्यावरून पुढे सरकवणारी अबालवृद्धांची फौज अख्ख्या राज्यभर तयार झाली.आरोग्याची काळजी घेण्यासाठी आजीबाईंच्या बटव्यातील नुस्क्यांनाच टंकून या ‘फॉरवर्डी नारायणां’चे ‘पीडीएफ’ आदान-प्रदान अनेकांनी अनुभवले असेल. मायक्रोसॉफ्टच्या ‘लेन्स’ ॲपने तरुणांबरोबर या काळात वृद्धांनाही ‘पीडीएफ’ कलेत पारंगत केले. यंदा दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये कित्येकांना अंकदर्शन होण्याच्या आधीच ‘फॉरवर्डी नारायणां’नी व्हॉट्सॲपवर दिवाळी अंकातील दोन लेखांचा दबदबा ‘पीडीएफ’ धबधब्यांनी इतका वाढविला, की या अंकांचे संपादकही चक्रावूून गेले असतील. त्यातला पहिल्या क्रमांकाचा लेख आहे चिन्मय केळकर यांचा ‘अक्षर’ दिवाळी अंकात छापून आलेला ‘युनायटेड कलर्स ऑफ रमणबाग’ तर दुसरा ‘महा अनुभव’ अंकातील डॉक्टर शंतनू अभ्यंकरांचा ‘आपले मरण पाहिले म्या डोळां’. दोन्ही वैयक्तिक अनुभवांचे कथन असलेले. पैकी चिन्मय केळकरांनी आपल्या आजच्या दुभंगी राजकीय मानसिकतेच्या खुणा शाळेच्या स्मृतींमध्ये शोधल्या आहेत. विचारधारांचे डोस शाळकरी वयात पेरले जाण्याच्या या आठवणी अत्यंत आरपारदर्शक आणि बिनदिक्कत आल्यामुळे त्याला तुडुंब प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर शंतनू अभ्यंकरांनी आपल्या ‘कॅन्सर’चा स्वीकार करत प्राप्त परिस्थितीला खंबीरपणे तोंड देत मांडलेले ‘कर्क-वृत्त’ही ‘फॉरवर्डी नारायणां’ना भलतेच प्रिय वाटले. या ‘फॉरवर्डी’ प्रकरणाला वैध ठरवायचे की अवैध हा भलताच मुद्दा असला, तरी यातून दिवाळी अंकातील उत्तमतेचा वाचककल यंदा वेगळय़ा मार्गातून समोर आला.
यंदाच्या दिवाळी अंकांतील ठळक वैशिष्टय़ांपैकी महत्त्वाचे म्हणजे अन्वर हुसेन यांची मुखपृष्ठे आणि चित्रे. उत्तम आणि दर्जेदार मजकुराची परंपरा राखणाऱ्या तब्बल आठ दिवाळी अंकांची मुखपृष्ठे त्यांची आहेत. पंधरा ते वीस दिवाळी अंकांत त्यांची चित्रे ठळक दिसत असून, त्या लकाकणाऱ्या चित्रांची संख्या १०० हून अधिक आहे. बहुवाचकाश्रय असलेल्या ‘ऋतुरंग’पासून नवख्या ‘अक्षरलिपी’, ‘अक्षरधारा’, ‘अक्षरदान’, ‘वाघुर’ दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठावर त्यांचा कुंचला स्टॉल्स, दिवाळी अंकांच्या प्रदर्शनांत लक्ष वेधून घेत आहे. याशिवाय कित्येक कथा- लेखांना त्यांनी सर्वार्थाने रंगतदार केले आहे.
‘कथा कुणी वाचत नाहीत’ हा अपसमज रूढ झाल्यानंतर त्यांचे प्रमाण कमी करत नेले, तशा आपल्याकडे अनेक साहित्यिक मासिकांचा मृत्यू होत गेला. पण दिवाळी अंकांतील सर्वात लक्षवेधी आणि वाचला जाणारा प्रकार हा कथाच आहे. त्यात गेल्या दशकापासून ‘साहित्याचे केंद्र हे ग्रामीण भागात सरकले’ असल्याचा सिद्धांत चांगल्या उदाहरणांमुळे रुळत चालला आहे. पण तरी नवे लिहिणारे आणि शहरी संवेदना पकडणारे अनेक लेखक आता कथापटलावर गाजत आहेत.मेघश्री दळवी यांच्या ‘महा अनुभव’ अंकातील ‘तीन भविष्यवेधी’ कथा मुंबईसमोर पुढील काही वर्षांत वाढून ठेवलेल्या संकटांच्या काल्पनिका आहेत. ‘श्वास’, ‘मुंबई’ आणि ‘दर्या’ या शीर्षकाच्या या लघुकथांपैकी एकात प्रदूषणात बरबटलेल्या शहरातून गावाकडचा प्रवास आहे. दुसऱ्यात समुद्राने गिळलेल्या शहराची शेवटची घटिका आहे, तर तिसऱ्यात समुद्राच्या आक्राळतेची जाणीव करून दिली आहे. गणेश मतकरी यांच्या कथालेखनात पूर्णपणे मुंबईतल्या उच्चमध्यम वर्गाचे चित्रण असते. यंदा ‘हॉण्टिंग’ (पुणे पोस्ट), अपरात्र (अक्षरधारा) या कथा खासकरून या गुणांसाठी वाचनीय आहेत. विवेक गोविलकर यांची कॉर्पोरेट जगताची आतून-बाहेरून टेहळणी असलेली कथा ‘लाईफ सेव्हर’ (दीपावली), किरण येले यांची ‘घरातली बाई आणि दारातील बाई’ (दीपावली), मुंबईच्या अतिश्रीमंत परिसरातील खबदाडी दाखविणारी विजय खाडिलकर यांची कथा ‘बेटावरचे बेट’ (गंधाली), मुंबईला लागून असलेल्या उपनगरांत महामार्गासाठी जमीन गेल्यानंतर घरा-दारात आलेल्या नवश्रीमंतीचा हालहवाला मांडणारी विवेक कडू यांची ‘वामनाचा काळा डांबरी पाय आणि पोटखराबा’ (पुढारी दीपस्तंभ) आणि डॉक्टर ऐश्वर्या रेवडकर यांची एका दाम्पत्याच्या संबंध विघटनाचे वास्तव मांडणारी ‘छोटय़ा नुन्नुची गोष्ट’ (पुढारी दीपस्तंभ) या कथा लक्षवेधी आहेत. बालाजी सुतार यांच्या शहरगावांतील दोन कथा फारच परिणामकारक आहेत. ‘फरसाण, फ्रॉईड आणि किरकोळ वार्डातल्या गोष्टी’ (मुक्त शब्द) आणि ‘खोल काळी गर्द विहीर’ (अक्षरधारा). यांतली एक कथा अॅपेण्डीक्सच्या ऑपरेशननंतर किरकोळ वार्डात दिसणाऱ्या निवेदकाचा दृश्य-कोलाज आहे. दुसरी कथा अतिआडगावातील सूक्ष्म-साहित्य संमेलनाच्या रिपोर्ताजाची झलक आहे. ‘युगांतर’चा अंक डाव्या विचारसरणीकडे झुकणारा, पुरोगामी विचारांना पुढाकार देणारा असतो. त्यात पंकज कुरुलकर यांची ‘गूगल’ नावाची फार सुंदर कथा आहे. ट्विटरवरील शेरेबाजीमुळे अर्बन नक्सल ठरवल्या गेलेल्या तरुणाची ही कथा देशातील अनेक प्रतिनिधींची गोष्ट बनू शकते. देशद्रोही हा ठपका लावत तुरुंगात टाकण्यात येणाऱ्या या तरुणाची निर्दोष मुक्तता होते, पण गूगलवरून आपला चुकीने दाखविला गेलेला इतिहास पुसायला प्रचंड संघर्ष करावा लागतो. कथा सुखांती असली, तरी त्यातला तपशील आज समाजात घडत असलेल्या घटनांवर बोट ठेवतो.
दोन-तीन दशकांपासून कथा लिहिणाऱ्या सतीश तांबे (अक्षर), सुरेंद्र दरेकर, जी. के. ऐनापुरे (मुक्त शब्द) नीरजा (दीपावली) यांच्यासह या दोन-चार वर्षांत लिहू लागलेले सुरज कोल्हापुरे यांची ‘अदृश्यकला आणि विनायक मामाचा प्लॉट’ (मैत्र) आणि इर्शाद बागवान यांची ‘लडतरां’ (आवाज) या काही दखल घ्याव्यातच अशा गोष्टी.
गेल्या काही वर्षांत वंदना बोकिल- कुलकर्णी यांचा ‘संवादसेतू’ अंक बाजारातून क्षणात पसार होतो. यंदाही तसेच झाले. मात्र दुसरी आवृत्ती काढून त्यांनी दूरवरच्या वाचकांची निराशा टाळली. हा देखणा अंक साकारण्यात लेखनाचा यात जितका वाटा आहे, तितकाच त्यातल्या कथांना चित्र काढणाऱ्या चंद्रशेखर बेगमपुरे या कलावंताचाही! कथेच्या विषयाला इतक्या प्रखरपणे रेखाटणारा हा कलावंत फक्त याच दिवाळी अंकामधून सामोरा येतो. आजच्या ‘न्यू यॉर्कर’ साप्ताहिकात आणि पूर्वीच्या ‘प्लेबॉय’ मासिकात कथा सजविण्यासाठी त्याच्या चित्रांवर विशेष मेहनत घेतली जाई. त्या ताकदीची चित्रे बेगमपुरे या अंकासाठी देतात. या अंकाची सजावट आणि मजकुरावर प्रचंड दक्षता राखल्याचे पानोपानी जाणवत राहते.
मंगळवेढय़ाहून पाच-सहा वर्षे ‘शब्दशिवार’ नावाचा एक अंक निघतो. इंद्रजित घुले हे अतिशय पोटतिडकीने हा अंक काढतात. त्यात मुखपृष्ठ, रेखाटने, मांडणी, सुलेखन आदी सर्व जबाबदारी ही श्रीधर अंभोरे एकहाती पार पाडतात. गेली अनेक वर्षे कलाक्षेत्रात वावरणारा हा कलाकार आपल्या चित्रांनी या अंकाला सजवत असतो. यंदा ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कोकणी लेखक दामोदर मावजो यांची शैला मावजो यांनी मराठीत आणलेली ‘प्रतीक्षा’ ही कथा या अंकात वाचायला मिळते. दामोदर मावजो यांच्यावर सखाराम शेणवी बोरकर यांनी ‘कालनिर्णय’च्या दिवाळी अंकात लिहिलेला प्रदीर्घ लेख माहितीपूर्ण आहे.
रिपोर्ताज हा पूर्वी फार कमी अंकांतून दिसणारा प्रकार होता. ‘महा अनुभव’कडे रिपोर्ताजांची मक्तेदारी असल्यासारखी स्थिती होती. ‘अक्षरलिपी’ या अंकाने गेल्या चारेक वर्षांत यात बदल केला. यंदा आसाराम लोमटे, प्रसाद कुमठेकर, प्रशांत पवार, मुक्ता चैतन्य, प्रशांत खुंटे यांचे ‘अक्षरलिपी’त भरीव योगदान आहे. ‘महा अनुभव’मध्ये असलेला टेनिस क्रिकेटचे अज्ञात विश्व उलगडून दाखविणारा रिपोर्ताज आवर्जून वाचावाच असा आहे. ‘पुढारी दीपस्तंभ’ने चार दीर्घ रिपोर्ताज दिले आहेत. त्यातला जिंजी किल्ल्यावरचा निलेश बने यांचा, तर कोल्हापूर ते गोंदिया असा प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या स्थानकांत उतरून तिथल्या तरुणांची स्पंदने टिपणारा विशाल राठोड यांचा; आणि आंबिवली स्थानकाजवळ चोर हा ठपका बसलेली इराणी वस्ती यावरचा शर्मिष्ठा भोसले यांनी घेतलेला वेधही खूप दिवस लक्षात राहील असा. हिंजवडीत सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या मुंबईच्या नील आर्ते या तरुणाने आठवडय़ातील एका सुट्टीत टॅक्सीचालकाचा वेश साकारून मुंबई पालथी घातली. त्याची प्रवास आणि प्रवासी निरिक्षणांचा कोलाज कोल्हापूरच्या ‘चौफेर समाचार’ने उत्तमरीत्या सादर केला आहे. ‘लोकमत दीपोत्सव’मध्ये विविध राज्यांत ट्रक चालविणाऱ्या ‘उस्तादां’वरचा समीर मराठे यांचा आणि देशभरातील ‘जिगोलो’ संस्कृतीवरचा मनोज गडनीस यांचा रिपोर्ताज खास मेहनतीतून उतरला आहे.
संकल्पना विषयक दिवाळी अंकांची गर्दी यंदा भरपूर आहे. ‘वाघूर’ने यंदा झाड ही संकल्पना घेऊन त्याभोवतीचे लेखन मान्यवरांकडून गोळा केले आहे. ‘अक्षरदान’ या अंकाने राज्यातील जत्रांचा सूक्ष्मदर्शी अहवाल सादर केला आहे. ‘शब्दालय’ अंकाने नव्वदोत्तरी हा विषय निवडला आहे. अगदी अलीकडेपर्यंत ग्लॉसी कागदांवर दिसणारे अंक अत्यंत कमी असत. आता स्थानिक पातळीवरच्या अंकांनाही ग्लॉसी कागदाचा सोस असल्याचे यंदाच्या अंकांकडे पाहिल्यावर जाणवते. त्यामुळे किमती वाढल्या असल्या तरी चांगल्या अंकांना खपाची चिंता दिसलेली नाही.
पूर्वी दिवाळी अंकांमधील मजकुराची झाडाझडती साहित्यिक मासिके पुढल्या वर्षीच्या मार्च एप्रिलपर्यंत घेत राहत. अगदी ‘यंदाच्या अंकांतल्या कथा, कादंबऱ्या, कविता, ललित लेखन, नाटके’ असा विभागवार. त्यातून होणारी चर्चात्मक घुसळण वाचकाला दिशादर्शक ठरे. यंदा ‘फॉरवर्डी नारायणां’नी वाचण्यासाठी जशी दिशा दिली, ती पुढील वर्षांत चांगल्या प्रकारे राबवायला हवी, तरच अनेकांच्या घरात हौसेने घेतलेले अंकांचे गठ्ठे जोमाने वाचलेही जातील; आणि या सांस्कृतिक उत्पादनाच्या गुणवत्तेत चांगली भर पडत राहील.
(लेखकाच्या वाचनाला वैयक्तिक मर्यादा असल्याने वेळ आणि उपलब्धता या निकषांवर वाचल्या गेलेल्या मजकुराची दखल घेतली आहे. इतर अनेक उत्तम त्यातून निसटलेले असू शकते.)
pankaj.bhosale@expressindia.com
(चंद्रशेखर बेगमपुरे यांचे रेखाचित्र)