यावर्षीचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार कॅनॅडियन कथालेखिका अॅलिस मन्रो यांना देण्यात आला. त्याअनुषंगाने मराठी कथेची आजची अवस्था काय आहे? साठच्या दशकात दर्जेदार (नव)कथा लिहिली गेली. पण अलीकडच्या काळात कथा फारशी लिहिली जात नाही. जी लिहिली जाते आहे तिचा परीघ आक्रसत चालला आहे, तसेच ती खुरटत चालली आहे. असे का होत आहे, याची चाचपणी करत मराठी कथेचे रोडावलेपण आणि तिची आवश्यकता या विषयीचे दृष्टिकोन सांगणारे हे लेख..
एकूणच मराठी गदय़ वाङ्मयाचा इतिहास फार दीर्घ नाही. त्यातही कथा-कादंबऱ्यांचा तर मोजून शंभर-दीडशे वर्षांचाच इतिहास आहे. आजघडीला मराठी साहित्यसृष्टीचा पसारा ऐसपस वाढलेला आहे आणि त्यात लिहिणाऱ्यांची संख्याही अफाट वाढलेली आहे. मराठीत आज सर्वाधिक लिहिली जाते ती कविता. कवितेच्या खालोखाल दुसरा लिहिला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे कथा. इतर कुठल्याही गदय़ लेखनप्रकारापेक्षा मराठीत कथाच जास्त लिहिली जाते.
थोडक्यात कथांचे पीक मराठीत विपुल आहे, कथा लिहिणाऱ्यांना तुटवडा नाही, ही गोष्ट निश्चितच चांगली आहे. ही झाली कथेची संख्यात्मक बाजू. पण गुणात्मक, दर्जात्मक, विषयात्मक आणि आशयात्मक बाजूनेही कथेकडे पाहणे आवश्यक आहे.
कोणत्याही साहित्यप्रकाराच्या दृष्टीने शे-दीडशे वर्षांचा काळ हा दीर्घच आहे आणि एवढय़ा काळाच्या संस्कारात कोणत्याही साहित्यप्रकाराने निरनिराळी उंची गाठणे काहीच अवघड नाही. आणि गेल्या शे-दीडशे वर्षांत काळ एवढय़ा झपाटय़ाने आधुनिक झाला, बदलत गेला, समाजाने सुधारणेची एवढी स्थित्यंतरे अनुभवली, त्या तुलनेत मराठी कथा कुठे आहे, हे शोधणेही आवश्यक आहे.
कथा किंवा कोणताही साहित्यप्रकार लिहिण्याचे दोन प्रकार आहेत, असे मला वाटते. जेवढे स्वतच्या जगण्यात येते, तेवढेच लिहायचे, हा एक प्रकार आणि आपल्या जगण्याबाहेर उतरून, मुद्दाम लेखक म्हणून दुसऱ्या, परक्या जगण्याचा अनुभव घ्यायचा आणि मग लिहायचे, हा दुसरा प्रकार. बहुतेक सर्व मराठी लेखक पहिल्या प्रकारात बसून लिहिणारे असतात. दुसऱ्या प्रकारात मराठी लेखक अपवादानेही सापडत नाहीत. त्या दुसऱ्या प्रकारात स्वतचे जगणे सोडून, तात्कालिक कारणांसाठी आणि काळासाठी दुसऱ्या जगण्यात शिरण्याची तयारी लागते. त्यासाठी संशोधक वृत्ती व अभ्यासक वृत्ती लागते, ती मराठी लेखकांनी आजवर दाखवलेली नाही.
स्वत:च्या जगण्यात जेवढे येते, तेवढेच लिहायचे, हा जो वाङ्मय किंवा कथा लिहिण्याचा प्रकार आहे, तो मराठी लेखकांनी सतत आणि जोरकसपणे हाताळला. पण त्या लेखनप्रकारातही मराठी लेखकांचा एकांगीपणा, संकुचितपणा, आत्ममग्नता आणि आत्मतुष्टपणा, कप्पेबंदपणाच जास्त राहिला, असे दिसून येते.
तटस्थाच्या व्याख्येत मराठी लेखक फारसे बसतात, असे दिसत नाही. स्वतच्या जगण्यात येते तेवढेच लिहायचे असे असले तरी ते स्वत:बाहेर येऊनच लिहावे लागेल, ही श्रेष्ठ आणि कालातीत साहित्याची अट मराठी लेखकांनी पाळलेली दिसत नाही आणि त्यामुळेच त्यांची कथा किंवा इतर साहित्य काळावर आणि जगावर राज्य करत नाही. बाहेरच्या जगात तर जाऊ दय़ा, आपल्या देशावरसुद्धा राज्य करताना दिसत नाही. बंगाली, कानडी, पंजाबी, उर्दू साहित्याचा जेवढा प्रभाव देशावर आहे, तेवढाही मराठी साहित्याचा व कथावाङ्मयाचा प्रभावही देशावर नाही.
मराठी कथेच्या मागासलेपणाला अनेक कारणे आहेत. मुख्य कारण आहे म्हणजे खरा आणि श्रेष्ठ लेखक कसा असावा याची जी व्याख्या आपण करतो आहोत, त्या व्याख्येत बहुतेक मराठी लेखक बसतच नाहीत. लेखक माणूस म्हणून कसाही असला तरी त्याच्या लिहिण्याच्या आशयविषयापासून लिहिताना तो पूर्ण अलिप्त, तटस्थ असला पाहिजे. त्याच्या व्यक्तिगत आचारविचारांचा आणि जगण्याचा प्रभाव लेखनविषयावर पडता कामा नये आणि त्याने स्वतशी प्रामाणिक राहून नव्हे, तर विषयाशी प्रामाणिक राहून लिहिले पाहिजे ही ती व्याख्या आहे. यालाच मी स्वत:च्या जगण्यातून बाहेर येऊन लिहिणे म्हणतो. कोणत्याही विषयाला आपल्याला वाटणारी, दिसणारी एक बाजू असते, पण त्याही पल्याड जाऊन आपल्याला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते, तर आधी आपण ती दुसरी बाजू शोधून, दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून, त्यांचा मध्य काढून, सम्यक बुद्धीने लिहिले पाहिजे. तसे लिहिताना आपले हृदय विशाल असले पाहिजे. कुणा एका बाजूची तळी उचलून धरतोय आणि दुसऱ्या कुणा बाजूवर अन्याय करतोय असे घडायला नको, तरच ते लिखाण कसदार आणि काळाच्या ओघात कायम टिकून राहणारे होईल, याचे भान मराठी लेखकांकडे फारसे दिसत नाही. मराठी लिखाण त्या त्या काळापुरते, काही काही हेतू घेऊन गाजते, गाजवले जाते, पण ते आपल्या देश-प्रदेशाच्या सीमा ओलांडून आणि काळाच्या मर्यादा ओलांडून लांबवर पोहोचत राहते, असे होत नाही. मराठी लेखक आणि त्यांचे गाजणे तात्कालिक ठरते आणि पिढी दर पिढीचा चालत राहणारा सलग वाचक त्यांना मिळत नाही. ५० -७५ वर्षांपूर्वीच्या कथालेखकांची नावेसुद्धा आज आपल्याला आठवत नाहीत, अशी अवस्था होते.
ज्या समाजात भेदांचा तुफान बुजबुजाट असतो, तो समाज कमालीचा अस्वस्थ, अशांत, बेचन, गोंधळलेला, भरकटलेला, विविध अनाचार आणि अत्याचारांना ऊत आलेला, भोंदू, ढोंगी आणि बेनवाड असतो. अशा समाजातली माणसामाणसांतली सर्वच पातळय़ांवरची स्पर्धा, ईष्र्या, असूया तीव्र वाढते. सर्वच स्तरांवर माणसे एकमेकांशी टकरत, लढत, संघर्ष करत असतात. एकमेकांच्या उरांवर बसत असतात. खरे तर समाजाची ही बिकट आणि बेकार स्थिती म्हणजे त्या समाजातल्या तमाम लेखकांना लिहायचं भांडवल किंवा मालमसाला म्हणून अतिशय पूरक आणि फायदेशीर. समाज जेवढा अनागोंदीचा, तेवढा लेखकांसाठी विषयांचा, आशयांचा पुरवठा मुबलक. जगात नुसत्या सुखाच्या गोष्टी लिहिता येत नाहीत. रोचक, वाचनीय, दर्जेदार गोष्टी होतात, त्या नेहमी दुख, दारिद्रय, दैन्य, समस्या, संकटे, अडचणी यांच्याच. त्या अर्थाने मराठी समाज आजच्या मराठी लेखकांना विषय पुरवण्याच्या दृष्टीने अत्त्युच्च टोकावर आहे. मराठी समाज सर्वच बाबींत एवढय़ा प्रमाणात भंगलेला आहे की, लेखकांना लिहिण्याच्या दृष्टीने हा काळ आव्हानात्मक व आवाहनात्मक आहे. त्यांच्यासाठी विषयांचा तुटवडा नाही. इतके विषय सभोवताली आहेत की, लेखक म्हणून जगायला त्यांना १०-१२ लाख वर्षांचे आयुष्यही कमी पडेल.
मराठी लेखक माहीत करून घेऊन लिहीत नाहीत, तर फक्त माहीत असलेले तेवढेच लिहितात, ही गोष्ट खरीच असली तरी माहीत असलेले तरी लिहिताना खऱ्या अर्थानं दिसतात का? असा एक आरोप मराठी साहित्यावर सातत्याने केला जातो, एवढी मोठी भारत-पाक फाळणी झाली, तिचे साधे दर्शनसुद्धा मराठीत होताना दिसत नाही. त्या एवढय़ा मोठय़ा फाळणीचे जाऊ दय़ा हो, ती फार दूर घडली, पण जे काही मराठी प्रांतात घडत असते, त्याचे तरी खरे दर्शन मराठी साहित्यात कुठे घडते? उदाहरणार्थ, मराठी प्रांतभर सतत धार्मिक, जातीय, सांप्रदायिक दंगली होतात, त्यावर तरी कुठे लिहिले जाते? मराठवाडय़ात एवढे मोठे विद्यापीठ नामांतर आंदोलन झाले, त्यावर तरी दलित सोडून इतर जातिधर्माच्या लेखकांनी कुठे लिहिलेय? गुजर-मारवाडय़ांची एवढी मोठी स्थलांतरे झाली, त्यावर मराठी साहित्यात काय आहे? आदिवासी आणि भटक्याविमुक्तांची एवढी परवड झाली, तिच्यावर त्यांच्यातल्या सोडून इतरांनी काय लिहिलेय? ब्राह्मण सोडून ब्राह्मणांच्या हालअपेष्टांचे कुणी काय लिहिलेय? पक्षीय राजकारण्यांनी मराठी प्रांतात जी वाताहतखोर उलथापालथ चालवलीय तिच्यावर कुणी काय लिहिलेय?
असे कित्येक विषय आहेत जे भोवती दिसत असूनही, अनुभवत असूनही मराठी लेखक त्यावर लिहीत नाहीत. मराठी लेखकांची संख्या आजमितीला भरपूर आहे, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून मुद्दाम किंवा नकळत दुर्लक्षित राहणाऱ्या विषयांची संख्याही अफाट आहे. ते लिहिले जात नाहीत, हे मराठी साहित्याचे मोठे वैगुण्य आहे.
मराठी लेखकांना भेद असतात, हे एक वेळ आपण मान्य करू, पण त्यांनी लिहिलेल्या कथेचेसुद्धा भेद पाडण्याची प्रथा आजकाल जोरात प्रचलित आहे, ती मात्र माझ्या स्वत:च्या पचनी पडत नाही.
मी असे मानतो की, कथा ही फक्त कथाच असते. कथा म्हणजे सांगण्याची गोष्ट. किंवा ‘सांगणं’ म्हणजेही कथा. सांगणे हे नुसते सांगणे असते, त्याची वर्गवारी होऊ शकत नाही. आदिम काळात माणसात जेव्हा संवेदना निर्माण झाल्या, तेव्हापासून माणूस सांगणे सांगतो आहे. माणसांचा समूह टिकवून धरणे, माणसाच्या काळाची नोंद पुढच्या पिढय़ांना धडा मिळावा म्हणून नोंदवून ठेवणे, एकमेकांशी व्यवहार सुरळीत होणे आणि त्यातून जगणे सुसह्य़, सुरक्षित, शांत, सुखी होणे असे माणसाच्या सांगण्यामागे हेतू असतात. या सांगण्याच्याच आदिम परंपरेचा एक आविष्कार म्हणजे गोष्टी किंवा कथा. त्या आविष्कारात आता आता, काल-परवा माणसांनी आपल्या भेदनीतीनुसार वर्गवारी सुरू केली आहे. जगभर लिहिल्या जाणाऱ्या कथांमध्ये फारसे भेदप्रकार असल्याचे आढळत नाही, मराठी कथेमध्ये मात्र बेसुमार भेद आहेत. ग्रामीण, दलित, ललित, ब्राह्मणी, अब्राह्मणी, शहरी, महानगरी, स्त्रीवादी, सामाजिक, कौटुंबिक, कलात्मक, मुस्लिम, जैन, इत्यादी, इत्यादी. अशी कथांची विभागणी म्हणे अभ्यासकांना उपयुक्त असते. समजा, अभ्यासकांना कथेबद्दल बोलायचे असेल तर ते अमक्या कथेत तमका विषय आणि ढमका आशय मांडलेला आहे असे बोलू शकतात की. त्यासाठी कथेला कुठल्या तरी एका वर्गवारीच्या कप्प्यात कशाला घालायचे? त्यामुळे मला वाटते, त्या कथेचा, त्या कथेतल्या सांगण्याचा संकोच होतो. त्या कथेला समाजाचा, जगाचा विस्तृत आणि असीम अवकाश मिळू दिला जात नाही, तर ती कथा एका तात्कालिक कोंडवाडय़ात कोंडली जाते. ती कथा प्रचारकी पत्रकाप्रमाणे होते न् तिच्यातले ‘सांगणं’ या आदिम परंपरेचा दिलखुलासपणा निघून जातो. समजा, अजून हजार वर्षांनी मराठी समाजात एकही जात नसेल, किंवा काही जाती नष्ट झालेल्या असतील, तेव्हा आजच्या जातीय वर्गवारीने पाहिल्या किंवा लिहिल्या गेलेल्या कथांचे मोल कसे आणि काय असेल? तेव्हा त्या कथा कुठल्या अर्थाने अर्थपूर्ण ठरतील?
थोडक्यात, कथांच्या प्रकाराचे भेद पाडून कथा लिहिली जाणे हे गर आहे आणि साहित्यसृष्टीच्या एकूण विकासाला आणि संभावित विशालतेला हानिकारक आहे, असे वाटते. अभ्यासकांचा अभ्यास होतो, पण मराठी साहित्यसृष्टीचे वाटोळे होते. अभ्यासकांच्या या ‘भेदिक’ वर्गवारीच्या निकषांनी मराठी साहित्य खुरटलेले आणि संकुचितच राहते, हे आपण लक्षात घ्यावे लागेल.
कथांची मापे ठरवण्याची एक चुकीची प्रथा आपल्याकडे अस्तित्वात आली आहे. पुन्हा सांगायचे तर, कथा ही कथाच असते, तिला मापाचा आधार घेण्याची गरज नसते. कथा म्हणजे सांगणे, त्या सांगण्यात सांगायचा एक विषय पूर्ण करणे किंवा आणलेले सर्व विषय पूर्ण करणे म्हणजे कथा. ते सांगणे किती मापाचे असावे हे कसे सांगणार? अमुक शब्दमर्यादा, अमुक पानमर्यादा आणि त्या मर्यादेवर अवलंबून कथा लघुकथा, दीर्घकथा अशी विभागली जाणे, हा खेळ फार पुसट आहे.
गोष्ट ही सविस्तरच सांगितली पाहिजे. ती संक्षिप्त आणि सांकेतिक असता कामा नये. त्या संक्षिप्ततेमागे आणि सांकेतिकतेमागे जे दडून राहणारे आहे ते का नाही सांगायचे? लेखकाची संक्षिप्तता सगळय़ाच्या सगळय़ा समाजाला एकाच वेळी कळू शकेल असे नाही. त्या संक्षिप्ततेत आणि सांकेतिकतेत दडलेले जे संदर्भ आहेत, ते सर्वच्या सर्व समाजाला माहीत असतात असे गृहीत धरणेही चूक आहे. आणि समजा एका काळातल्या एका समाजाला सगळे संदर्भ माहीत आहेत असे आपण मान्य केले तरी भावी काळातल्या, भावी पिढय़ांना ते संदर्भ जसेच्या तसे माहीत होतील याची शक्यता काय? काळ, समाज, भाषा यांचे संदर्भ सतत बदलते राहू शकतात, तर मग आज संक्षिप्त आणि सांकेतिक कथेचे तेव्हाच्या काळात मोल काय?
कथा ही सविस्तर, तिचे सर्व संदर्भ नीट मांडलेली, लोकांच्या प्रचलित भाषेत आणि एकाही शब्दाची दडवादडवी न करता आणि लोकांना सगळेच माहीत असते असे गृहीत न धरता लिहिली जायला हवी. तरच ती कथा लोकांमध्ये वाचली जाईल, तिचे किंवा तिने दिलेले संदर्भ लोकांमध्ये नांदत राहतील, लोक ते संदर्भ पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवत राहतील आणि भावी पिढय़ांनाही ती कथा वाचायला अवघड जाणार नाही, त्या अनुषंगाने मग ती कथा भावी पिढय़ांपर्यंत टिकून राहील.
मध्यंतरी मराठीतले काही महाभाग म्हणाले की, कथा हा मुळात साहित्यप्रकारच नाही. त्यांनी हे मत कुठून उचलले कळत नाही. कथा हा साहित्यप्रकार नाही, असे म्हणणाऱ्यांपकी काही जण कविता आणि कादंबरी हा प्रकार मात्र हाताळत राहिले. त्यांच्या अनुषंगाने इथे एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की, कथा काय, कविता काय किंवा कादंबरी काय, (किंवा नाटक, चित्रपट, नृत्य, चित्र, इत्यादी कला काय,) यातून माणसाला अंतिमत: कथाच सांगायची असते. कवितेतही कथाच मांडावी लागते, मांडणीचा प्रकार फक्त वेगळा, कथेतही कथाच मांडायची असते न् कादंबरीतही कथाच मांडायची असते. हे सगळे कथा सांगण्याचेच प्रकार आहेत. सांगणे मांडण्याचेच प्रकार आहेत. त्यामुळे कादंबरी न् कविता चांगली न् कथा वाईट असे काही म्हणता येत नाही. थोडक्यात, लयबद्ध सांगितलेली कथा म्हणजे कविता, तर अधिक विस्ताराने मांडलेली कथा म्हणजे कादंबरी. त्यात हा प्रकार नको न् तो प्रकार हवा, असा भेद करून चालणार नाही.
आपल्या मराठी परिप्रेक्ष्यापुरते बोलायचे ठरले तर गेल्या शे-दीडशे वर्षांत मराठीत भरपूर कथा लिहिली गेली आहे. १९५० च्या आसपास आणि त्यानंतर मराठी कथेला खऱ्या अर्थाने बहर आलेला दिसतो. नुसते कथाकार म्हणून या काळात असंख्य नावे गाजली, पण इतर साहित्यप्रकारात नावे झालेल्या लेखकांनीही आपापल्या परीने मराठी कथेत भर घालायचे काम केलेले आहे. प्रयोगशीलता आणि जीवनानुभवांची वैविध्यपूर्ण मांडणी याबाबतीत आकलनाच्या मर्यादा असल्या तरी आणि आकलनांचा, कथांच्या मांडणींचा मुख्य आधार पाश्चात्य साहित्य असला तरी मराठी कथेने आपल्या मगदुरात समृद्ध होण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. कथेची नवी मांडणी, स्वत:ची मांडणी, एखादा नवा प्रयोग मराठी कथेने अजून जगाला दिलेला नसला तरी गेल्या शे-दीडशे वर्षांतल्या पेरणीवर भविष्यातली मराठी कथा तशी दिशा घेईल अशी आशा वाटते. ल्ल
ं‘२ँं१ेंल्लं५@८ंँ.ूे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा