कला, साहित्य, उद्याोग आदी विविध क्षेत्रांतील भेटलेल्या आणि मनात साठलेल्या व्यक्तींची स्नेहचित्रे चितारणारे सदर दर पंधरवड्यास…

दयाशंकर यांचा नैतिकतेचा मापदंड इतका वरचा होता की तो पार करण्याची क्षमता फक्त त्यांच्यासारख्या एखाद्याकडेच असणार. त्यांचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा कस्टम्समधल्या कित्येक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. आजही कस्टम्समधे दाखल होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना दयाशंकर यांचा आदर्श बाळगा, असा उपदेश केला जातो. पण अशा आदर्शांना मोल काय द्यावं लागतं हेही सांगत असतील का?

Screen Time Social Media YouTubers and Influencers
वखवख तेजाची न्यारी दुनिया…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
loksatta editorial Donald Trump 2024 presidential campaign
अग्रलेख: सुज्ञ की सैतान?
india s economy slowing down
अग्रलेख : मध्यमवर्ग मेला तरी…
Loksatta editorial Donald Trump victory in the US presidential election
अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
What and how much do your children watch on social media
तुमची मुलं काय आणि किती पाहतात?

‘‘अरे, तू न्यूज दे दे… वो एम. एल. पेंडसे के सामने बेल के लिए नही जाएंगे…’’

हा असा आत्मविश्वासी ठामपणा हे दयाशंकर यांचं वैशिष्ट्य. गोव्याला कस्टम्स कलेक्टर पदावर दयाशंकर येऊन एखादा महिनाच झाला असावा. पण या काही दिवसांत त्यांचा इतका दोस्ताना जमला की मी पत्रकारिता विसरून त्यांच्यासाठी काम करतोय की काय असं वाटायला लागलं होतं. दिवसाची सुरुवात मांडवी नदीकाठच्या कस्टम्स कार्यालयातनं व्हायची. दयाशंकर यांच्या हातचा दिवसाचा पहिला चहा प्यायचा. तोपर्यंत अँथनी फर्नांडिस, प्रकाश कामत हे दोन सहव्यवसायी आलेले असायचे. दयाशंकर यांचा दरबार सुरू व्हायचा. स्मगलिंगच्या जगातल्या ताज्या घडामोडी, कोणत्या अधिकाऱ्यानं कुठे काय केलं वगैरे… रात्री घरी परतताना तेच. दयाशंकर यांच्या कार्यालयात जायचं. दिवसाची ख्यालीखुशाली घ्यायची आणि मग घरी. कधी कधी तर रविवारीही हेच. दयाशंकर ऑफिसमध्ये असायचेच असायचे. इतकं कार्यालयावर प्रेम असलेला सरकारी अधिकारी तोपर्यंत पाहिला नव्हता. अर्थात नंतरही तसे कमीच पाहायला मिळाले. आणि त्यांच्या इतकं प्रेम पुढच्या चार दशकांच्या पत्रकारितेत दुसऱ्या कोणत्या सरकारी अधिकाऱ्यावर जडलं नसेल. दयाशंकर यांच्यासारखी माणसं बहुधा जन्माला येत नाहीत आताशा!

हेही वाचा >>> वखवख तेजाची न्यारी दुनिया…

गोवा त्या वेळी भलत्याच कारणांनी गाजत होता. ते कारण होतं साक्षात मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांचा भाऊ मारला गेला त्याचं. तो काळ स्मगलिंगचा. सुकूर नारायण बाखिया, हाजी मस्तान वगैरे दादा मंडळी बाजारात होती आणि दाऊद इब्राहीम हातपाय मारू लागला होता. स्मगलिंग व्हायचं ते मुख्य सोनं. त्याची पिवळी जर्द तेजाळ बिस्किटं स्मगलिंगचं प्रतीक बनली होती. तर चर्चिल यांचा भाऊ आल्वर्नाझ हा अशा कथित लँडिंगमध्ये सापडला. कस्टम्स अधिकाऱ्यांना खबर होती असं काही होणार आहे त्याची. त्यांनी सापळा रचला. तोही चर्चिल यांच्या गावच्या किनाऱ्यावर आणि आल्वनार्झ त्यात आपसूक अडकला. पळायचा प्रयत्न केला त्यानं. कॉस्तॉव फर्नांडिस म्हणून एक ज्युडो-कराटेवाला कस्टम्स अधिकारी होता. तो घुसला आल्वनार्झच्या गाडीत. आत खूप झटापट झाली. त्यात आल्वर्नाझ हा कॉस्तावकडून मारला गेला.

चर्चिल आलेमाव हे गोव्याच्या राजकारणातलं बडं प्रस्थ. सगळ्या राजकीय व्यवस्थेला कनवटीला बांधून आलेमाव मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले. कोणालाच आवरत नव्हता हा गृहस्थ. आणि मग त्यासाठी नेमणूक झाली दयाशंकर यांची. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनीच दयाशंकर यांची नेमणूक केली होती, अशी वदंता होती त्या वेळी. गोव्यात येईपर्यंत हे दयाशंकर काळे की गोरे माहीत नव्हतं. त्यांच्याविषयी आमच्यात सर्वाधिक माहिती होती ती अँथनीला. तो स्थानिक ‘ओ हेरॉल्ड’चा चीफ रिपोर्टर होता. गुन्हेगारी जगत हा त्याचा अभ्यासाचा विषय. हेराल्डचा संपादक राजन नारायण हा मोठा विक्षिप्त गृहस्थ. त्याच्या कार्यालयातच बिछाना अंथरलेला असायचा. तिथेच झोपायचा. जागा असला की तोंडात बिडी. सगळे दात गेले होते त्याचे. दिसायला खुडूक, पण लेखणीची ताकद अशी की भले भले टरकायचे. हा काय लिहील ते सांगता येत नाही म्हणून. त्याविषयी नंतर कधी. तर अशा गोव्यात दयाशंकर यांची नेमणूक झाली. त्या वेळी तिथे ‘डेव्हलपमेंट कमिशनर’ अशी एक पोस्ट होती. त्यावर शक्ती सिन्हा होते. नंतर अटलबिहारी पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या मागे सतत एक गोरा, हसरा अधिकारी असायचा. तो शक्ती. रणजीत नारायण पोलीस कमिशनर होते. ते पुढे दिल्लीत ‘एनएसजी’चे प्रमुख झाले. ही सर्व अधिकारी मंडळी आमच्या खास आतल्या वर्तुळातली. आणि त्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी दयाशंकर.

सुकूर नारायण बाखिया नावाच्या एका बड्या स्मगलरचा भर समुद्रात पाठलाग करून दीव-दमण परिसरात त्याला ठाणबंद करणारा अधिकारी म्हणजे दयाशंकर. मुंबईत असताना दाऊदच्या घरात जाऊन त्याचा भाऊ अनीसला पकडण्याची हिंमत दाखवणारा अधिकारी म्हणजे दयाशंकर. पण यापेक्षा अधिक तो आवडू लागला त्याच्या एका कृत्यासाठी. त्या वेळी स्मगलिंग पकडलं गेलं की त्या चोरून आणल्या जाणाऱ्या मालाच्या किमतींतला काही एक वाटा पकडणाऱ्या कस्टम्स अधिकाऱ्याला दिला जायचा. अर्थमंत्री असताना विश्वनाथ प्रताप सिंग यांनी ही योजना आणली होती. दयाशंकर हा एक(च) अधिकारी होता त्यानं त्यातला एक रूपयाही कधी घेतला नाही. त्या वेळी त्यानं नाकारलेल्या बक्षिसाची रक्कम होती १४ लाख रुपये. त्या वेळी त्याला विचारलं… ‘‘हे पैसे का नाही घेत.’’ तर त्याचं उत्तर होतं- ‘‘तू क्या चाहता है मै स्मगलिंगका पैसा ले लू?’’ ही योजना सिंग यांची आहे असं टोचल्यावर त्यानं जितक्या जमेल तितक्या सभ्य शब्दांत त्यांचा उद्धार केला.

हे दयाशंकर यांचं एक लक्षात येईल असं वैशिष्ट्य. कानातले केस जळतील अशी जळजळीत जहाल भाषा तो अगदी गोडपणे सहज वापरायचा. मूळचा बिहारी. त्यात जिभेवर सरस्वतीचा बारमाही वसंत. उंचीला बुटका नाही, पण उंच म्हणावा असाही नाही. कायम जीनची पँट. तिच्या पट्ट्याचा उपयोग पॅंटपेक्षा पोट सावरायला अधिक. पँटमधे खोचलेला शर्ट भेदून लोंबणारं पोट. डोक्याला तेल थापलेलं. त्याच्या कार्यालयात एक तेलाची बाटली कायम असायची. येताजाता लावायचा. टेबलाच्या मागच्या टेबलावर चहाची इलेक्ट्रिकची किटली. शेजारच्या डब्यात चहाचा पाला. तो कपावरच्या गाळणीत घालणार आणि वरनं उकळतं पाणी. तसा चहा पहिल्यांदा दयाशंकरकडे घेतला. नंतर त्याची चटकच लागली. दिवसात वीसेक कप चहा होत असेल त्याचा. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी जा. हा चहा करणार आणि समोरच्यालाही पाजणार. चेहरा कायम हसरा. फोनवर बोलताना ऐकताना त्याची जरब जाणवायची. ‘‘उसको अंदर लेले.’’ असं तो कोणा कनिष्ठाला सांगताना ऐकलं की आत काय होणार हे दिसू लागायचं. दयाशंकर अशा काळात जवळचा झाला की तो काळ त्याच्यासाठी, देशासाठी आणि पत्रकार म्हणून आमच्यासाठीही बरंच काही शिकवणारा होता.

तर आलेमाव प्रकरणाच्या बंदोबस्तासाठी दयाशंकरची गोव्याला नियुक्ती झालेली. लौकिक असा की काम करणार ते स्वत: आखलेल्या, पाळलेल्या नैतिक निकषांवर. त्याला काही ‘सांगू’ शकण्याची हिंमत नव्हती कोणात. त्या वेळी झालं असं की, इतकं स्मगलिंग प्रकरण गाजत असताना सीबीआयनं कारवाई केली ती कॉस्तॉव फर्नांडिसवर. खुनाचा आरोप लावला त्याच्यावर. कॉस्तावचं घर पर्वरीला माझ्या घरासमोर. त्याच्या घरावर चर्चिलची माणसं चालून येतील की काय अशी स्थिती. कॉस्ताव गायब झालेला. चर्चा अशी की दयाशंकरनीच त्याला गायब केलेलं. दयाशंकर पिंजऱ्यातल्या वाघासारखा तडफडत असायचा कार्यालयात. आपल्या अधिकाऱ्यावर सीबीआय कारवाई करणार या कल्पनेनं नुसता पेटून उठलेला. माणसाचा ज्वालामुखी होताना तेव्हा पहिल्यांदा पाहिलं. बिहारीबाबूंच्या असतील नसतील त्या शिव्या… अगदी ‘ओटीटी’ स्टाइल… त्याच्या तोंडातनं बरसायच्या. त्याच्या साहेबांशीही तो तसाच बोलायचा. स्मगलिंग पकडणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला पाठिंबा देण्याऐवजी सीबीआय त्याच्यावरच कारवाई कशी काय करू शकते… इतकाच त्याचा प्रश्न.

दयाशंकरचं मोठेपण, हिंमत, कौतुक, धडाडी, सत्याची चाड वगैरे हे की, त्यानं हे प्रकरण इतकं लावून धरलं की शेवटी चर्चिल आलेमाव याला ‘कॉफेपोसा’ (कन्झर्व्हेशन ऑफ फॉरिन एक्स्चेंज अँड प्रिव्हेंशन ऑफ करप्शन अॅक्ट (हा त्या वेळचा जालीम कायदा) कायद्याखाली अखेर अटक झाली. फोर्ट आग्वाद तुरुंगात त्याची रवानगी झाली. गोव्यात तुरुंगातल्या कैद्यांना रविवारी भेटता यायचं. एका रविवारी मी आणि राजदीप (सरदेसाई… तेव्हा तो टाइम्स ऑफ इंडियात होता. आम्ही एकाच समूहातले. प्रकरण त्या वेळी इतकं गाजत होतं की अनेक राष्ट्रीय दैनिकांचे पत्रकार गोव्यात वार्तांकनासाठी आले होते.) फळांची परडी घेऊन चर्चिलला तुरुंगात भेटायला गेलो. अशी प्रथा असल्यानं कोणी कशाला आलात वगैरे काहीही विचारलं नाही. चर्चिलला सहज भेटता आलं. इतका बोलला की आम्हाला आठ कॉलमी हेडलाइन मिळाली. काँग्रेसचं सरकार उलथून टाकीन वगैरे. दुसऱ्या दिवशी आमच्या या बातम्या छापून आल्या तर आम्हा दोघांवर- मी आणि राजदीप- ‘तुरुंगफोडी’ केल्याचा गुन्हा!! आम्ही कपाळाला हात लावला. नंतर राजदीप मुंबईत परतला. संध्याकाळी आमच्या गोवा ग्रुपची गाडी दयाशंकर यांच्या कस्टम्स गॅरेजात. त्याला आमच्या या उद्योगाची पूर्वकल्पना होती. नंतर गुन्ह्याचंही कळलं. संपूर्ण देहभर तो पोटासह गदगदून हसत होता.

मग विषय निघाला चर्चिलच्या जामिनाचा. राजकीय कैद्यांना कसाही जामीन लगेच मिळतो हे अनेकदा पाहिलेलं. त्यामुळे चर्चिलचा तुरुंगवास हा क्षणिक असणार, हे आम्हीही गृहीत धरलं होतं. तर या चर्चेला पूर्णविराम देत दयाशंकर म्हणाले, ‘‘जोपर्यंत एम. एल. पेंडसे आहेत तोपर्यंत जामीन याचिका दाखल केली जाणार नाही.’’ (मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात त्या वेळी न्या. पेंडसे यांचं पीठ होतं.) हे वाक्य ऐकलं आणि आम्ही तिघेही एकमेकांकडे आणि दयाशंकर यांच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिलो. काय काय माहीत असतं या माणसाला…! पुढे सगळा घटनाक्रम दयाशंकर म्हणाले होते तसाच घडला. एकदा म्हणाले, ‘‘तू मुलीला ज्यांच्याकडे सांभाळायला ठेवतोस ना त्यांना सांग तू किंवा बायको या दोघांकडेच मुलीला सोपवायचं… दुसरं कोणी तुमच्याकडनं आल्याचं सांगितलं तरी तिला त्यांच्याकडे द्यायचं नाही.’’ हे ऐकल्यावर मी उठलो आणि थेट मुलीला ज्यांच्याकडे ठेवायचो त्यांच्या घरी गेलो. तिला पाहिल्यावर जीव भांड्यात पडला. वास्तविक मुलगी, तिचं बेबीसीटिंग वगैरे काही विषयही नव्हता कधी दयाशंकर यांच्याशी निघालेला. पण त्याही वेळी आणि आजही सगळे सांगतात दयाशंकर यांचे ‘सोर्सेस’ कसे तगडे होते ते. हा माणूस खुर्चीतला अधिकारी नव्हता. स्वत: रस्त्यावर उतरून, समुद्रात स्वत: कोळ्यांच्या होड्यांत जाऊन हेरगिरी करणारा. ड्रायव्हरही कधी नेमला नाही त्यांनी. स्वत: गाडी चालवायचे.

आपल्या सहकाऱ्याला वाचवलं दयाशंकर यांनी… पण माणूस सतत अस्वस्थ असायचा. तापलेल्या कढईत लाह्या फुटतात तसा तडतडत असायचा सतत. कारण एकच- भ्रष्टाचार. दयाशंकर यांचा नैतिकतेचा मापदंड इतका वरचा होता की तो पार करण्याची क्षमता फक्त त्यांच्यासारख्या एखाद्याकडेच असणार. पुढे आलेमाव प्रकरण शांत झालं आणि दयाशंकर यांचीही बदली झाली. नंतर बातम्यांतून आणि कस्टम्समधल्या सोर्सेसमधून त्यांची हालहवाल कळायची. त्यात हालच जास्त. एका बड्या उद्याोगसमूहाच्या साम्राज्याला हात लावला म्हणून दयाशंकर यांच्यावर कारवाई झाल्याची बातमी अशीच. अजिबात आश्चर्य वाटलं नाही. अशा बातम्यांची सवय होण्याइतकं सरावलेपण आलं होतं एव्हाना. सगळ्यांचे- अगदी सर्वपक्षीयांचे- मातीचे पाय पाहून पाहून नजरही मेली होती.

तरीही काही व्यक्तींच्या वाईटाचं वाईट वाटतच. दयाशंकर यांच्याविषयी असं वाटत राहिलं. केंद्र सरकारनं नंतर त्यांची थेट ऑस्ट्रेलियात बदली केल्याचं कळलं. देशात हा माणूस फारच जड होत चालला होता सगळ्यांना. पण ऑस्ट्रेलियात बदली होतीये म्हटल्यावर दयाशंकरही कंटाळले. त्यांनी अभ्यासात, नव्या पदवीत मन रमवायचं ठरवलं. खात्याकडून रीतसर रजा घेतली आणि विद्यापीठात नाव नोंदवलं. वाटलं मन रमेल तिथे आता त्यांचं. रमलंही असतं. पण १० लाख रुपयांचा प्रश्न एकदम आ वासून उभा राहिला.

कारण रजेच्या काळातील पगाराच्या वसुलीसाठी सरकारनं त्यांच्यावर नोटीस बजावली. ज्या अधिकाऱ्यानं स्वत:च्या बक्षिसाच्या तब्बल २२ लाख रुपयांच्या रकमेवर (एव्हाना १४ लाख रुपयांचे २२ लाख झालेले.) तत्त्वासाठी पाणी सोडलं, त्याच्यावर १० लाख रुपयांच्या वसुलीसाठी सरकारनं नोटीस बजावली. असंही कळलं, ही दहा लाख रुपयांची रक्कम कोणाकोणाकडून हातउसने घेऊन त्यांनी उभी केली. ती त्यांनी सरकारदरबारी जमा केली आणि काही दिवसांतच दयाशंकर गेले. आकस्मिक निधन.

नंतर जेव्हा जेव्हा दयाशंकर यांचा विषय निघायचा तेव्हा तेव्हा कस्टम्समधल्या कित्येक जणांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. आजही कस्टम्समधे दाखल होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांना दयाशंकर यांचा आदर्श बाळगा, असा उपदेश केला जातो. पण अशा आदर्शांना मोल काय द्यावं लागतं हेही सांगत असतील का? आणि मुख्य असं की, अशी नैतिक माणसं इतरांना सोयीनुसार हवी असतात आणि सोय संपली की ती नकोशी होतात, हेही सांगत असतील का त्यांना? दयाशंकर यांची आठवण जरी आली तरी हा प्रश्न पडतो.

girish.kuber@expressindia.com @girishkuber

Story img Loader