दत्तात्रय गणेश गोडसे किंवा अगदी द. ग. गोडसे म्हटले तरी ज्यांना त्यांची अपुरी, चुकतमाकत ओळख पटेल, त्यांना चित्रकार गोडसे म्हटले तरी पुरी, पक्की ओळख पटल्यासारखे वाटेल. त्यासाठी त्यांची चित्रे पाहिलेली असावीत असे मुळीच नाही. ती तशी दुर्लभच. गोडसे हा चित्रे प्रदर्शनात न मांडणारा चित्रकार. पुस्तकांच्या मुखपृष्ठांतून त्यांच्या चित्रकलेची चुणूक त्या अंगाचे भाव असणाऱ्या एकंदरीने अल्पसंख्य वाचकांपर्यंत पोचलेली असते. इतर त्यांची चित्रकारिता ही एक मानून घेण्याची गोष्ट समजत असावेत, किंवा कुण्या एका काळची!
पण आजही आपली अनेकविध व्यवधाने सांभाळून पंधरा तरी रेखाचित्रे काढल्याशिवाय गोडसे दिवसाची सांगता झाली असे मानत नाहीत. आणि ती चित्रे प्राय: स्वत:साठी काढलेली. नवनवीन, अकल्पित वळणांच्या ध्यासाने, व्रत घेतल्यासारखी काढलेली. हे कलाव्रत बालपणी अंगीकारलेले आणि बालपणच्या आणि नंतरच्या काही काळातही ते फार खडतर होते. त्यात विघ्ने होती. परीक्षा पाहणारी इसापनीतीतली प्राण्यांची चित्रे आणि कुटुंबाचे दैवत असलेल्या गणेशाची प्रचंड मूर्ती यांनी या मुलाला झपाटले. त्यात पुन्हा गणेशाचे हत्तीद्वारा प्राणिसृष्टीशी लागेबांधे, मुक्त वाटणारा विशाल आकार, तुंदिल तनू व बाकदार सोंड यातून डोळ्यांत भरणारा वळणावळणांचा स्वैर विलास त्याला फार भावला. त्यातच विरोधाने उठाव घेणारी ऋद्धी-सिद्धींची सुघड, लडिवाळ, ललित रूपे उभय बाजूला. पाटीवर, हाती लागेल त्या कागदावर, िभतीवर ते सर्व उठू लागले. असा त्या मुलाने आपला चित्रकला शिक्षणाचा श्रीगणेशा स्वत:च घालून दिला. पुस्तकी, सांकेतिक शिक्षणाची चाल थबकली. वडीलधाऱ्यांच्या उग डोळ्यांवर हे येणार हे चाणाक्षपणे हेरून त्याने आपला ‘स्टुडिओ’ अडगळीच्या मजल्यावर निवांत सांदीकोपऱ्यात हलवला. पण वडीलमंडळींना या गुप्त स्थानाचा वास लागला आणि स्फोट झाला. सोज्वळ, सधन कुटुंबातील मुलाला चित्रे काढण्याची अवदसा आठवावी? गणित सोडून गणपती? इथे त्या विघ्नहर्त्यांचे छत्र अपुरे पडले. धाकधमक्या झाल्या, ‘हा कार्टा पुढे नाटकमंडळींचे पडदे रंगविण्याचा छाकटा धंदा करणार’, या सुरातली भाकिते गर्जू लागली. उपरोधप्रेमी नियतीने ते कानांत जपून ठेवले असावे. काही महिन्यांपूर्वी संगीत नाटक अकादमीने भारतातील गतवर्षीचा सर्वश्रेष्ठ नेपथ्यकार म्हणून गोडशांचा गौरव केला. गेल्या वीस-पंचवीस वर्षांत मराठी व संस्कृत रंगभूमीच्या सजावटीसाठी त्यांनी केलेल्या कार्याची ती पावती होती. त्यात कधी पडदे रंगविणेही आले. नेपथ्यकार हा वजनदार शब्द अलीकडचा. आताचा चित्रकार म्हणजे तेव्हाच्या सरळसोट व्यवहारात ‘पेंटर’.
पेंटरवरून आठवले. चाळीसएक वर्षांपूर्वीच्या ‘अभिरुचि’ मासिकाचा पहिल्या उल्हासाचा काळ. गोडसे मासिकाच्या अगदी आतल्या गटातले. पण त्यांना मासिकासाठी काही लिहा म्हटले तर आपले काम लेखणीशी नाही, या राजरोस सबबीवर ते नकार देत. आणि ब्रश चालवण्याचा आविर्भाव करत. तेव्हा आम्ही काहीजण त्यांना गमतीने ‘पेंटर’ म्हणू लागलो. मिस्कील नियतीने हेही टिपले. पुढे गोडशांनी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध झाली. त्यांना जाणकारांची मान्यता मिळाली, पुरस्कार लाभले!
गोडशांच्या जन्मकाळाचीही चित्तरकथा वेधक आहे. आईचे दिवस भरलेले. प्रसूतीसाठी माहेरी जायचे ते पूर्णा नदी ओलांडून. उलटय़ा बाजेवर तिला बसवून भोई ती ओढत नदी पार करत होते. पण भर आषाढ. एकाएकी प्रवाह फुगला. बेफाम झाला. भोयांच्या पकडीतून निसटलेली बाज धारेला लागली. आई भयभीत झाली. तिला उतरून घ्यायला आलेल्या दुसऱ्या तीरावरील आप्तांत हलकल्लोळ माजला. पण दैवाने खैर केली आणि बाज अडवली गेली. माहेरच्या तीराला लागली. प्रसूती सत्वर झाली. गोडसे सांगतात की, पुढे अनेक वष्रे रौद्र प्रवाहात बाजेवरून वाहत असल्याचे दुस्वप्न पडत असे. याचा अर्थ कोणी काही लावो. कोणी याचा संबंध कदाचित- फार पुढे, पन्नाशीनंतर त्यांच्या कलाविषयक लेखनात पुन्हा पुन्हा येणारे नदीप्रवाह, त्यांची वाकवळणे, त्यांच्या काठातळातील दगडगोटय़ांच्या आकृती यांच्याशी लावतील! ही कल्पनारम्य कादंबरीत शोभून दिसेल अशी घटना ३ जुल १९१४ च्या उत्तररात्रीची.
गोडसे अल्पभाषी, जवळजवळ अबोल- किंबहुना माणूसघाणे आहेत असा अनेकांचा प्रामाणिक ग्रह आहे. आणि तो खुद्द त्यांनीच कटाक्षाने करून दिला असावा. पण जिथे कुंडली जमते किंवा कधी तार जमते, तिथे गोडशांची वाणी अशी फुलून येते, की शहाण्या माणसाने ऐकत राहावे. कारण तो होश चढला की गोडसे उभे राहून बोलू लागतात. जेवणाची वेळ असली तर जेवण थांबते. काळच थांबतो. विषयही पुन्हा कसला शिळोप्याचा, गमतीचा नव्हे. इतिहास संशोधन, कलाविचार आणि त्यांना स्पर्श करणारी क्षेत्रे- असल्या वजनाचे विषय त्यासाठी हवेत. मात्र, सार्वजनिक भाषणाला त्यांचा ताठ नकार. सभासमारंभाची त्यांना रुची नाही. घनिष्ठ वैयक्तिक संबंधामुळे गेले तरच.
गोडशांच्या बहुरंगी आयुष्यात प्राध्यापकीही आली. बडोदे विद्यापीठातील ‘फाइन आर्ट्स’ विभागाच्या प्रमुखपदी ते आठ वष्रे होते. नंतर मुंबई विद्यापीठातील सौंदर्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी ते चित्रकलेवर व्याख्याने देत. ‘करायचे ते जीव ओतून’ या त्यांच्या वृत्तीमुळे त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांचा मोठा आदर संपादन केला. गोडशांचे व्यावसायिक आयुष्य बहुविध होते. त्यात शिक्षकीचा काळ आला तो शेवटी. आरंभी अनेक स्थळी नोकऱ्या केल्या; त्यानंतर पूर्णवेळ स्वतंत्र व्यवसाय. आपल्या मध्यमवर्गीय व्यवहारनीतीत नोकरीतील स्थर्य हा महान सद्गुण. एकदा चिकटल्यावर शक्यतोवर तिथे चिकटून राहणे, बूड न हलवणे हा संभावित आचार. गोडशांचा आचार रामदासी. ‘ब्राह्मणु िहडता बरा.’ फकिरी, कलंदर म्हणा. शेवाळ किंवा गंज किंवा बुरशी हा अलंकार न मानणारा.
आणि हे नोकऱ्यांपुरते नाही. स्वतंत्रपणेही कलावंत म्हणून त्यांचे अनेक अवतार झाले. व्यंगचित्रकार, रेखाचित्रकार, जलरंगातील चित्रकार. पुस्तकांचे सजावटकार, नेपथ्यकार इत्यादी इत्यादीवर भागवतो. कारण मला इतकेच ठाऊक. व्यंगचित्रकार म्हणून नाव मिळवले ते कॉलेजच्या दिवसांतच. रेखाचित्रे शेकडय़ांनी काढली असणार. चित्रांत कलेइतकेच समकालीनता, ऐतिहासिक वास्तवाशी इमान राखलेली. पुस्तकाची सजावट म्हणजे रंगीत मुखपृष्ठावर रंगेल बाई बसवणे नव्हे. तीस-चाळीस वर्षांपूर्वी बाजार अडवून बसलेला तो कलेचा व्यापार अलीकडे बराचसा उठलेला आहे. याचे मुख्य श्रेय गोडसे आणि त्यांच्यासारखे काही अस्सल कलावंत आणि प्रकाशक यांना द्यायला पाहिजे. वेष्टनावरील गोडशांचे चित्र पुस्तकाच्या नावाला, त्याच्या अंतरंगाला अनुरूप असतेच; पण अनेकदा त्याचे सारसर्वस्व सुचवणारे प्रतीकधर्मी असते. गोडशांची सजावट मुखपृष्ठापाशीच थबकत नाही. संपूर्ण पुस्तकाची मांडणी ते टाइपची निवड, ओळींची लांबी, ओळींतले अंतर, दोन्ही बाजूंचे समास असल्या लहानसहान तपशिलांपर्यंत करतात. पुस्तकाचे अंतरंग व बहिरंग यांचा त्यांना सूर जमायला हवा असतो. मुद्रणकलेतही त्यांना बारीक नजर आहे. सोन्याबापू ढवळ्यांसारख्या मुद्रणाचार्याशी त्यांचे उत्तम जमत असे ते यामुळेच. हरिभाऊ मोटय़ांसारख्या चोखंदळ प्रकाशकाचे त्यांच्याविना पान हलत नसे. पुस्तकाचा असा थाटघाट सिद्ध करण्यात गोडसे मग्न असताना त्यांना न्याहाळणे, त्यांचे आवेगामुळे अडखळणारे बोलणे ऐकणे, हे आनंदाचे असते.
गोडसे नेपथ्ययोजनेत १९४१ पासून आहेत आणि आजवर शंभराहून अधिक नाटकांना त्यांनी ती पुरवली. मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाटकांपासून ते अलीकडच्या बॅरिस्टर, दीपस्तंभ इत्यादी नाटकांच्या यशातील त्यांचा वाटा जाणकार मानत आले आहेत. एकासारखे दुसरे नेपथ्य नाही. प्रत्येक नाटक हे कल्पनेला आणि कारागिरीला आव्हान मानले. आणि त्यात नाटक जुन्या काळचे असले- संस्कृत नाटकापासून ते पाऊणशे वर्षांपूर्वीच्या काळातील ‘बॅरिस्टर’पर्यंत- म्हणजे गोडशांना चिथावल्यासारखे होते.
संस्कृत नाटकांसाठी त्यांनी भरतमुनींनी आखून दिलेला रंगमंच कसोशीने उभा केला. मधल्या आठ शतकांत तो हरवला होता. जर्मनीत ‘शाकुन्तल’ व ‘मुद्राराक्षस’ यांचे प्रयोग झाले तेव्हा गोडशांच्या या नेपथ्याची फार वाहवा झाली. भासाच्या प्रतिमावरून गोडशांनीच अनुवादलेल्या ‘धाडिला राम तिने का वनी?’ या नाटकात आणि त्यांच्या संक्षिप्त शाकुन्तलात मराठी प्रेक्षकाला ते पाहायला मिळाले. पण त्यांचे हे इतिहासाशी इमान केवळ नेपथ्यापुरते नाही. संस्कृत नाटकांच्या प्रयोगात मुळातून किंवा अनुवादातून त्यांनी त्यांचे स्वत्व राखले, प्रतिष्ठा सांभाळली. पोरकट, विपरीत, असंस्कृत मराठीकरण करू दिले नाही.
गोडशांच्या लहान वयातील चित्रकलेतील स्वयंशिक्षणाविषयी आणि मुस्कटदाबीविषयी वर लिहिलेच आहे. तरी ती ऊर्मी दबत नव्हती. रेषेचे रहस्य बोटांत वळवळत होते. त्या ऊर्मीला खुले रान मिळाले ते बी. ए.साठी गोडसे मुंबईच्या विल्सन कॉलेजात आले तेव्हा. कॉलेजातच वस्ती आणि जवळच सा. ल. हळदणकरांसारख्या नामांकित कलाशिक्षकाचे घर. गोडशांच्या चित्रकलेचा अभ्यास झेपावत पुढे गेला. ‘गोडशांसारखा शिष्य मला मिळाला नाही,’ असे हळदणकरांची माझी काही वर्षांपूर्वी पहिली भेट झाली तेव्हा ते म्हणाले. असा गुरुशिष्य योग. वडिलांच्या आदेशाप्रमाणे चित्रकलेचा व्यत्यय येऊ न देता गोडशांनी बी. ए. पदरात पाडून घेतली आणि लंडन विद्यापीठाच्या स्लेड स्कूल या नामांकित कलाशिक्षण संस्थेत ते गेले. तिथले प्रमुख खाब, हे त्यांच्या रेषेवरील हुकमतीमुळे त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांच्याकडून या शिष्याला खूप मिळाले. त्यानंतरचे गुरू म्हणजे ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कलाविभागाचे प्रमुख लँगहॅमर. सहा वष्रे या गुरूमागे हा शिष्य सावलीसारखा होता. आणि गुरूनेही शिष्याला पुत्रवत मानले होते. पण गुरूचा भर तंत्रावर अधिक आहे, म्हणजे आपल्या विकासाला मर्यादा पडणार, हे उमगले तेव्हा गोडशांनी तीही नाळ तोडली.
पण गोडशांच्या मुलुखगिरीची बखर इथेच संपत नाही. चित्रपटासारखा नवा कलाप्रकार- ज्यात अनेक कलांचा मेळ असतो- त्यातून कसा सुटेल! चाळीस वर्षांपूर्वीच्या काळात गोडसे त्या उद्योगात चारएक वष्रे होते. कथा-पटकथा लेखक, सहायक दिग्दर्शक, कलादिग्दर्शक अशा विविध भूमिकांत त्यांनी विश्राम बेडेकरांबरोबर सहा महिने बाजीराव-मस्तानीवर काम केले. त्यातून चित्रपट निष्पन्न झाला नाही. पण मस्तानीत ते अधिकच गुंतले.
हे सगळे प्रकट पराक्रम. आपली संगीतसाधना मात्र गोडशांनी छुपी ठेवली. वर्षांनुवष्रे त्यांनी चित्रकलेचा निष्ठेने रियाज केला तसा मृदंगवादनाचाही केला. पण तो स्वान्त: सुखाय. इतरांसाठी नाही. इतरांत निकटचे स्नेहीही आले. त्याची खुद्दांनी सांगितलेली कथा अशी- ‘‘ज्या शंकरराव अलकुटकरांचा गंडा बांधायचे मनात होते, ती एक विक्षिप्त, तिरसट वल्ली होती. नकाराला निमित्त म्हणून त्यांनी या इच्छुकाला मृदंगावर थाप मारून दाखवायला सांगितले. गोडशांनी ती मारली. आणखी मारल्या. आणि अलकुटकर (स्वत:चा) कान पकडून म्हणाले, ‘असा गादीदार तळवा आमच्या गुरूंचा होता.’ त्यांचे परात्पर गुरू म्हणजे नानासाहेब पानसे. झाले! अलकुटकरांनी गोडशांना गंडा बांधला, कोडकौतुकाने विद्या दिली.
गोडशांचा साहित्याशी संबंध केव्हापासूनचा? वाचक म्हणून तो लहानपणीच जडला. पण लेखक म्हणून? आरंभी नियतकालिकांशी संबंध आला तो व्यंगचित्रकार म्हणून, सजावटीचे सल्लागार म्हणून. प्र. श्री. कोल्हटकर हे आप्त, म्हणून त्यांचे ‘संजीवनी’ घरचेच. वा. रा. ढवळे हे स्नेही, म्हणून त्यांची ‘ज्योत्स्ना’ इत्यादी मासिके जवळची. १९४३ मध्ये बडोद्याहून ‘अभिरुचि’ मासिक निघू लागले आणि लवकरच ते त्यात सामील झाले, ते प्रथम व्यंगचित्रकार म्हणून. त्यात त्यांची व्यंगचित्रे येऊ लागली. त्यांचे आणि माझे तेव्हा जमले आणि घट्ट झाले. पूर्वी फक्त जुजबी परिचय होता. लवकरच ‘अभिरुचि’ची सजावट जणू ओघानेच त्यांच्याकडे गेली. विशेष दिवाळी अंकाची त्यांनी सजवलेली मुखपृष्ठे आतील साहित्याइतकीच समजदार वाचकांच्या मनात भरली. ‘अभिरुचि’च्या कुटुंबातीलच ते एक झाले. मासिकासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या. चोरून थोडेसे लिहिलेही. हे मलासुद्धा फार उशिरा कळले! त्यानंतर किती नियतकालिकांसाठी आपण काय काय केले, याचा हिशेब या बेहिशेबी, आपली नावनिशी पडद्यात ठेवण्याची, अनामिकतेची खोड लागलेल्या या माणसाकडे असणे अशक्य!
गोडशांचे पहिले पुस्तक ‘पोत’ १९६३ चे. म्हणजे पन्नाशीच्या उंबरठय़ावर निघालेले. कलाचिकित्सकांच्या छोटय़ा जगात त्याने मोठी खळबळ माजवली. कलेतील सौंदर्यतत्त्वाचा शोध घेणारी अशी आणखी पाच पुस्तके गोडशांनी पुढे प्रसिद्ध केली. शक्तिसौष्ठव (१९७२), गतिमानी (१९७६), लोकधाटी (१९७९), मातावळ (१९८१) आणि ऊर्जायन (१९८५). समन्दे तलाश (१९८२) हा लेखसंग्रह. यातील पाच तर साठीनंतरची. म्हणजे लेखनकलेतील गोडशांचा हा उशिराचा फुलोरा. यांतील प्रत्येक पुस्तकात स्वतंत्र बुद्धीचा आविष्कार आहे आणि त्याला प्रतिभेची झाक आहे. या व अन्य पुस्तकांतील गोडशांची सर्वच मते आजच्या सर्वच विद्वानांना पटतात असे नव्हे. पटती तर आश्चर्य! कोणाला त्यांत हट्टी नवेपण दिसते, कोणाला त्यांतली एकांतिकता खुपते. कोणाला त्यांतला कल्पनाशक्तीमागे फरपटत जाणारा तर्क खटकतो; कोणाला ती नुसतीच विक्षिप्त वाटतात. उद्यापरवा कदाचित हे आक्षेप मऊ होतील; इतके आग्रही अटीतटीचे राहणार नाहीत. आणि विरोधाचे असे सोहाळे झाले नाहीत तर तो नवेपणा कसला!
गोडशांच्या लेखनातील या विचारधनामागे फार मोठे सांस्कृतिक संचित आहे. विविध कलाप्रकारांचा विलक्षण आस्वाद आणि त्यातल्या बुद्धिप्रधान निर्मितीचा परिपक्व अनुभव आहे. प्राचीन-अर्वाचीन साहित्याचे रसिक परिशीलन आहे. मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य, लोककला आणि त्यांच्या परिघातील विषय यांचा गाढ व्यासंग आहे. विज्ञानाच्या काही शाखांशी परिचय आहे. आणि इतिहासाचा छंद तर बलिष्ठ आहे.
या पुस्तकांशिवाय १९७४ मध्ये ‘काळगंगेच्या काठी’ हे गोडशांचे नाटक प्रसिद्ध झाले. इतिहास व लोककथा यांतल्या संशोधनातून सिद्ध केलेल्या कथानकावर ते आहे. विषय : संभाजीराजे व ‘सती’ गोदावरी. ‘राजयाचा पुत्र अपराधी देखा’ या त्यांच्या अप्रकाशित (पण रंगभूमीवर आलेल्या) नाटकाचा विषय तोच. गोदावरीची लोककथा गोडशांनी रायगडच्या परिसरात टिपली; तिच्यातील इतिहासाचा मागोवा घेतला. तिला असे नाटय़रूप दिले आणि तिच्यावर एक टिपण लिहिले; ते ‘ऊर्जायन’ या पुस्तकात आहे.
‘समन्दे तलाश’ (१९८१) हा गोडशांचा काही लेखांचा संग्रह. त्यांच्याच शब्दांत- ‘समन्दे तलाश म्हणजे शोधाचा.. तर्काचा घोडा. शिवाजीमहाराजांनी औरंगजेबास पाठविलेल्या प्रसिद्ध फारसी पत्रातील हा वाक्प्रचार.’ मुख्यत: महाराष्ट्राचा इतिहास व इथली कला या जोडप्रांतात अज्ञात वा उपेक्षित सत्याचा वास काढीत, लोकप्रिय- नव्हे विद्वत्प्रियही- गैरसमजुतींचा पोकळपणा उघडा करीत गोडशांची लेखणी इथे दौड करते. दौड म्हणण्याइतक्या बेदरकार आत्मविश्वासाने पुस्तक अर्पण केलेले आहे- ‘.. मस्तानीच्या पवित्र स्मृतीस.’ आणि त्यातील सर्वात मोठा लेख तिच्यावर आहे. लहानपणी गोडशांना जसे गणपतीने झपाटले तसे पुढे मस्तानीने झपाटले. पंधराव्या वर्षी हेडमास्तरांच्या खोलीतील ऐतिहासिक पुरुषांच्या चित्रांत इतरांबरोबर स्त्री, पहिल्या बाजीरावाबरोबर कोणी का नाही, या कुतूहलापासून आरंभ. अच्युतराव कोल्हटकरांच्या ‘मस्तानी’ या भडक रंगातील नाटकाने ते वाढीला लागले. गेली अनेक वष्रे त्यांनी तिच्याविषयीच्या निखालस सत्याचा शोध घेण्यासाठी इतिहासाचा कानाकोपरा धुंडाळला आहे. या संशोधनातून तयार झालेले त्यांचे ‘मस्तानी’ हे पुस्तक एवढय़ातच प्रसिद्ध होत आहे. त्यातला तिच्यावरचा लेख पाहता तिचे अवास्तव गुणवर्णन करण्याऐवजी इतिहासकारांनी आणि अन्य लेखकांनी अज्ञानामुळे किंवा कोत्या पूर्वग्रहांतून तिची जी डागाळलेली विपरीत ‘प्रतिमा’ उभी केली, लोकप्रिय केली, तिचा खोटेपणा सप्रमाण सिद्ध करणे, हा त्यांचा प्रधान हेतू असावा.
बुंदेलखंडाच्या राजा छत्रसालाने पहिल्या बाजीरावाला मस्तानी भेट म्हणून दिली. ती त्याने बुंदेलखंडाच्या रक्षणासाठी धाव घेतली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. ती नृत्यकलापारंगत. तिची आई मुसलमान, म्हणून तीही मुसलमान आणि दर्जाने कंचनी- हा सोपा निष्कर्ष आम्ही पाठ केला. विडा खाताना िपक तिच्या गळ्यातून उतरताना दिसे- हा तिच्या आरस्पानी लावण्याचा जणू अर्क म्हणून आंबटषोकी चविष्टपणे आम्ही एकमेकांना सांगत आलो, एवढेच. वस्तुत: मस्तानीचा सामाजिक दर्जा प्रतिष्ठेचा होता. तिच्याबरोबर मोठी वार्षकि तनात आली. मुख्य म्हणजे ती नावापासून- ‘प्रणामी’ या निधर्मी, वर्गविहीन पंथाची होती, हे गोडसे पुराव्यानिशी सांगतात. कोत्या बुद्धीने आणि सरधोपटपणे तिला मुसलमान मानून आणि तिच्या नृत्यकौशल्याचा विपर्यास करून पेशवे कुटुंबाने आणि ब्राह्मणी पुण्याने तिचा उपमर्द केला, छळ केला. पुण्याजवळ पाबळला तिच्या गढीत- मशिदीच्या अंगणात तिची दुर्लक्षिलेली, पडझड झालेली ‘समाधी’ आहे- कबर नाही. अडाणी, कावेबाज थराखाली दोन-अडीच शतके गाडल्या गेलेल्या या इतिहासाचे उत्खनन गोडशांनी निष्ठेने- जणू धर्मकार्य म्हणून केले. पहिल्या बाजीरावाचे रोमँटिक आख्यान रंगवण्यासाठी आणखी एक साधन म्हणून वापरल्या गेलेल्या मस्तानीला आपले खानदानी, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व होते याची महाराष्ट्राला जाण करून देणे, हे ते कार्य.
गोडशांनी कवींवर व कवितांवर रसिकतेने लिहिले आहे. पण गुळगुळीतपणे नव्हे; चिकित्सक चिरफाड करून. तसेच इतर कलावंतांवरही. जेम्स व्हिस्लर या चित्रकारावरील ‘नांगी असलेले फुलपाखरू’ हा लेख असलेला आणि तेच नाव दिलेला त्यांचा लेखसंग्रह याच सुमारास प्रसिद्ध होत आहे.
गोडसे मोठे कलावंत आहेत याची आम्हाला जाणीव होती. न मिरवणारे, म्हणून अधिकच मोठे. जाणीव होती ती पुरी असे म्हणत नाही. कारण त्यांच्या कर्तृत्वाच्या नवनवीन अनपेक्षित बाजू हळूहळू उलगडत होत्या. मुळात चित्रकार, त्यातून अनेक शाखा आणि धुमारे फुटले. त्या मुळात इतर ज्या कला आत्मसात केल्या, त्यांचीही मुळे गुंतली असतील का? त्यांतून एकमेकांचे सूक्ष्म पोषण झाले असेल का? गोडशांच्या कामगिरीत केवळ विविधता नाही; अनेक कलांच्या एकमेकातून आलेली संपन्नताही आहे. त्यांची सर्वच कलासमीक्षा सर्वाना पटेल असे नाही; पण ती मोलाची निश्चितच आहे. तेच त्यांनी आपल्या इतिहास संशोधनातून काढलेल्या निष्कर्षांविषयी म्हणता येईल. महाराष्ट्राचा इतिहास हे त्यांचे विशेष क्षेत्र. आणि तो राजकीय म्हटला जातो तसाच केवळ नाही. त्याला इतर परिमाणे आहेत. सामाजिक तर आहेच, पण कलांचेही आहे. त्यांत साहित्यही आले. त्यांत ज्ञानेश्वरादी संतकवी आले. महानुभावादी अन्य मध्ययुगीन लेखक आले, आणि लोकसाहित्यही आले. चौरस, गाढय़ा, स्वतंत्र अभ्यासातून त्यांच्या मतांनी आकार घेतला आहे. ती सर्वाना रुचतील, सहज पचतील अशी नाहीत. पण ती निखालस त्यांची आहेत. पुस्तकांतून, परंपरेतून, पूर्वग्रहांतून निपजलेली नाहीत, हे निश्चित.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा