डॉ. जयसिंग पवार यांच्या ‘व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे’ या पुस्तकात एकूण अठरा लेखांचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील अनेक मान्यवरांची व्यक्तिचित्रे या पुस्तकात शब्दांकित केली आहेत. यात शरद पवार, पंडित सेतु माधवराव पगडी, मु. गो. गुळवणी, सूर्यकांत-चंद्रकांत हे बंधू, कॉ. गोविंदराव पानसरे अशा अनेक मान्यवर मंडळींचा समावेश आहे. या मंडळींची व्यक्तिचित्रे म्हणजे लेखकाला त्यांच्यातील विविध गुणांमधून घडलेले व्यक्तिदर्शनच होय.
महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतीय राजकारणातही दबदबा असणारे, तसेच सांस्कृतिक, सामजिक विषयांची उत्तम जाण असणारे शरद पवार यांच्यावरील लेख त्यांच्या वैविध्यपूर्ण पैलूंचे तसेच त्यांच्या व्यासंगी आणि वैचारिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवितो. मराठी चित्रपटसृष्टीतील लाडके चंद्रकांत-सूर्यकांत बंधू यांच्यावरील लेखांमध्ये या दोघांमध्ये असलेले प्रेमाचे नाते प्रामुख्याने दिसून येते. इतिहास संशोधक, विचारवंत सेतुमाधवराव पगडी यांच्यावरील लेख म्हणजे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवातून उलगडलेले त्यांचे व्यक्तिचित्र. त्यात सेतुमाधवराव पगडी यांची व्यासंगीवृत्ती, त्यांच्यातील संशोधकवृत्ती, पांडित्य यांचे यथार्थ दर्शन घडते. याचप्रमाणे कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. पतंगराव कदम, इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार, विचारवंत भाई माधवराव बागल, क्रांतिवीर नागनाथअण्णा, प्राचार्य पी. बी. पाटील, मालोजीराजे निंबाळकर या मान्यवरांची ओळख या पुस्तकातून होते.
‘व्यक्तिवेध : शरद पवार ते गोविंद पानसरे’, मेहता पब्लिशिंग हाऊस,
पाने-१३३, किंमत-२२० ६
रुचकर खाद्य मेजवानी
भारतात धर्म, जात, स्थळांप्रमाणे खाद्यसंस्कृती बदलत जाते. त्यामुळेच भारतीय खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. जातवार खाद्यपदार्थ हाही एक संशोधनाचा विषय. एरवी जातीविषयीचा प्रश्न अनेकांना बोचरा ठरतो, उलट अमूक तमूक जातीतील लोकांचा एखादा मांसाहारी किंवा शाकाहारी पदार्थ आवर्जून खावा असे अनेक खवय्ये सुचवतात. ‘जाती’ची खादाडी हे मुकुंद कुळे यांचं पुस्तक म्हणजे विविध जातींमधील विशेष पदार्थाची रुचकर मेजवानीच होय. वाडवळ, सोनार, पाठारे प्रभू, सी. के. पी., जी. एस. बी., लेवा पाटील, कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण, गुरव, आगरी, कोळी, तेली, भंडारी या समाजातील समृद्ध आणि रुचकर खाद्यपदार्थाची माहिती तसे च त्यांच्या खाद्यसंस्कृतीविषयी अभ्यासपूर्ण टिपण वाचायला मिळते. केळपानातील भाकरी, आंबाकोळंबी, सुकं चिकन, रवळी, चिंबोरी-कोलंबीचं खडखडलं, मटणाचे सांबारे, भुजणे, शिवळाची खिमाभाजी, आंबोळे, कडव्या वालाचे बिरडे, सोडय़ाची खिचडी, बांगडय़ाचे तिखले, खापरोळी, कळण्याची भाजी, पुरणाचे कान्होले अशा विविध रुचकर पदार्थाच्या रेसिपी या पुस्तकात आहेत.
‘‘जाती’ची खादाडी’- मुकुंद कुळे, मनोविकास प्रकाशन, पाने- ९०, किंमत- २५० रुपये ६