रुडयार्ड किपलिंग यांच्या ‘जंगल बुक’च्या प्रेमात न पडणारी व्यक्ती विरळाच! लहान-थोर सगळ्यांनाच या गोष्टीनं भुरळ पाडली आहे. जंगलात सापडलेला लहानगा मोगली आणि त्याभोवतीचे प्राणी यांच्या सहजीवनाची ही गोष्ट. किपलिंग यांनी १८९४ साली ती लिहिली. तेव्हापासून आजवर ही गोष्ट वाचकमनांवर अधिराज्य गाजवून आहे. ‘ज्योत्स्ना प्रकाशन’ने हे ‘जंगल बुक’ आता मराठीत आणलं आहे. क्वेन्तँ ग्रेबाँ यांच्या अप्रतिम चित्रांचा समावेश असणारं हे पुस्तक पुरेपूर वाचनानंद देणारं आहे.
‘जंगल बुक’मध्ये आपल्याला भेटतात- लहानगा मोगली, झोपाळू अस्वल बल्लू, काळा बिबटय़ा बघिरा, दुष्ट वाघ शेरखान आणि मोगलीला सांभाळणारा लांडग्यांचा कळप. या साऱ्यांच्या भोवती फिरणारी ही गोष्ट वाचकांना खिळवून ठेवते. इतकी की, गोष्टीचा शेवट येईपर्यंत हे पुस्तक हातातून खाली ठेववत नाही. या गोष्टीशी, त्यांतील चित्रांशी आणि एकुणातच या पुस्तकाशी आपण एकरूप होऊन जातो. मोगलीचं जंगलात सापडणं, जंगलाशी एकरूप होणं, प्राण्यांशी दोस्ती, संकटांवर मात करणं आणि जंगलातल्या भवतालात झालेली मोगलीची भावनिक गुंतवणूक.. असे अनेक पदर या गोष्टीत आहेत. या गोष्टीवर आधारित मालिका, सिनेमा आले असले आणि अनेकांनी ते पाहिलेही असले तरी ‘पुस्तक’रूपात ही गोष्ट वाचणं, त्या गोष्टीशी वाचक म्हणून समरस होणं, त्यातील चित्रांचं देखणं रूप न्याहाळत बसणं यातही तितकीच गंमत आहे. त्यामुळेच लहानांबरोबरच मोठय़ांनाही लहान होऊन वाचायला लावणारं हे पुस्तक निव्वळ अप्रतिम आहे. क्वेन्तँ ग्रेबाँ यांची चित्रं या पुस्तकाला एक देखणं रूप देतात. या चित्रांतून ही गोष्ट अधिक प्रभावीपणे खुलते. एकूणच शब्द आणि चित्रं यांचा सुरेख मेळच यात घातला गेला आहे.
अशा स्वरूपात हे सुंदर पुस्तक मराठीत उपलब्ध करून देणं हे कौतुकास्पद आहे. शिवाय नीला कचोळे यांनी केलेला मराठी अनुवादही पकड घेणारा झाला आहे.
‘जंगल बुक’- रुडयार्ड किपलिंग,
- चित्र- क्वेन्तँ ग्रेबाँ, मराठी अनुवाद- नीला कचोळे,
- ज्योत्स्ना प्रकाशन, पृष्ठे-१०४, मूल्य- २७५ रुपये.
चित्तवेधक नाटुकल्या
ज्येष्ठ लेखिका सई परांजपे लिखित ‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’ व ‘पत्ते नगरीत’ या दोन बालनाटय़ संहितांची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. सई परांजपेंची ओघवती आणि समृद्ध भाषा, खास लहानग्यांना साजेसे संवाद, मजकुराच्या मधे मधे पेरलेली रेखाचित्रं अशा अनेक वैशिष्टय़ांमुळे या बालनाटय़ संहिता चित्तवेधक झाल्या आहेत. ‘मुलांना भाषेचं महत्त्व कळावं आणि नाटकामध्ये (खरं तर रोजच्या व्यवहरातच) शुद्ध शब्दोच्चार आणि वाक्यांची नेटकी फेक यांना किती महत्त्व आहे याचं आकलन व्हावं, हा या नाटुकल्यांचा उद्देश आहे’ असं सई परांजपे यांनी म्हटलं आहे.
‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’मध्ये दोन नाटुकल्या आहेत. या नाटुकल्या मुळात नभोनाटय़ म्हणून लिहिल्या गेल्या. त्यामुळे त्या संवादप्रधान अधिक आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही नाटुकल्यांत कविता आणि गाणीही आहेत. तर ‘पत्ते नगरीत’ ही दुसरी बालनाटय़ संहिताही रंजनातून ज्ञानार्जन या दिशेने जाणारी आहे. या तिन्ही नाटुकल्यांचे रंगमंचीय सादरीकरण बहारदार होईलच, परंतु वर्गवाचनासाठीही ती उपयुक्त आहेत.
‘पक्ष्यांचं कविसंमेलन आणि देवाची फुलं’, ‘पत्ते नगरीत’
- सई परांजपे मौज प्रकाशन,
- पृष्ठे- अनुक्रमे ३२, ३६
- मूल्य- प्रत्येकी ७० रुपये.