सिंधूताई अंबिके.. बालशिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांच्या सहकारी. कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन कोसबाडच्या टेकडीवर सुरू असलेल्या प्रयोगशील शिक्षणाच्या चळवळीशी पन्नासच्या दशकाअखेरीस त्या जोडल्या गेल्या. ताराबाई आणि अनुताईंनी राबवलेल्या बालशिक्षणाच्या प्रयोगांचे शिक्षणव्रत अर्धशतकाहून अधिक काळ सिंधूताईंनी जपले आहे. कोणत्याही चौकटीत न अडकता अनौपचारिक पद्धतीने आणि आपल्या भवतालच्या पर्यावरणाशी, निसर्गाशी जवळीक साधत शिक्षण देण्याच्या या अनोख्या शिक्षणपद्धतीत सिंधूताईंनीही मोलाचे योगदान दिले आहे.
शिक्षकाने आपल्या परिसरात रुजून कसे काम करावे आणि शिकविण्याबरोबच स्वत: शिकण्याची प्रक्रियाही कशी चालू ठेवावी, याचा सिंधूताई या आदर्श ठराव्यात. त्यांच्या ‘वटवृक्षाच्या सावलीत’ या आत्मचरित्रात याविषयीचे तपशील मिळतातच; शिवाय ‘पळसाची फुले’, ‘बालवाडीच्या गोष्टी’ आदी त्यांच्या इतर पुस्तकांतूनही सिंधूताईंच्या कुतूहलजन्य, उत्साही मनाचे प्रतििबब पडलेले आहे. ‘गुंजांची माला’ या अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या पुस्तकातही हेच दिसून येते.
कोसबाडला शिकविण्याचे काम करताना सिंधूताईंना तिथल्या वारली आदिवासी समाज-संस्कृतीचा जवळून परिचय झाला. शाळेत मुलांना शिकविताना त्यांची बोलीभाषा, त्यांचा भाषिक भवताल किती वेगळा आणि समृद्ध आहे, हे सिंधूताईंच्या ध्यानात आले. मग त्यांच्याशी जवळीक साधत त्या साऱ्याचे सिंधूताईंनी आस्थेने संकलन करण्यास सुरुवात केली. गतशतकातील साठच्या दशकाच्या पूर्वार्धात आदिवासी पाडय़ांवर पायपीट करून सिंधूताईंनी प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे शब्दधन उशिरा का होईना, आता पुस्तकरूपात आले आहे. या सव्वाशे पानी पुस्तकात एकूण नऊ प्रकरणांमध्ये वारली समाजातील लोककथा, लोकगीते, लोकनृत्ये, उखाणे, चालीरीती, सण, विवाहाच्या पद्धती आणि त्या वेळी म्हटली जाणारी गीते, देवदैवते, निसर्गोपचार पद्धती, बोलीभाषेतील नेहमी वापरले जाणारे शब्द असा बहुविध ऐवज संकलित करण्यात आला आहे. हे संकलन करताना आलेल्या अनुभवांविषयी सिंधूताईंनी मनोगतात प्रांजळपणे लिहिले आहे. यातील लोकगीतांविषयी त्या म्हणतात, ‘वारली लोकगीतांतून मला भारतीय संस्कृती दिसली. पंचमहाभूतांवरील श्रद्धा दिसली. परंतु तरीसुद्धा हा समाज वर्षांनुवर्षे मागासलेला आहे असे आपण मानत आलो आहोत. पण त्यांच्या काव्यातून पर्यावरण, पक्षी-प्राण्यांवर प्रेम, बहिणीची माया, पराक्रमी मुले, त्यांचे धाडस, कल्पकता असे खूप मला दिसले.’ हे पुस्तक वाचून वाचकानांही सिंधूताईंच्या या म्हणण्याचा नक्कीच प्रत्यय येईल!
‘गुंजांची माला’ – सिंधूताई अंबिके,
नूतन बालशिक्षण संघ, पालघर,
पृष्ठे – १२५, मूल्य – १५० रुपये.