कोणत्याही देशाच्या सांस्कृतिक वाटचालीचा प्रवास तिथल्या वास्तुरचनांद्वारे उलगडता येतो. त्या त्या संस्कृतीतील ज्ञान-विज्ञान, बाह्य संस्कृतीशी झालेली सरमिसळ, लोकजीवन, भौगोलिक वैशिष्टय़े आदींचे प्रतिबिंब तिथल्या वास्तुकलेत पडत असते. हजारो वर्षांपासूनची पुरातन मंदिरे, वास्तू, स्तंभ, पुतळे, मनोरे, कमानी, गडकिल्ले तसेच काळाच्या विविध टप्प्यांत उभारल्या गेलेल्या अलौकिक वास्तू ही त्याची उदाहरणे. आपल्याकडेही अशा स्थापत्यशास्त्रीय सौंदर्याबरोबरच जनमानसाशी जोडल्या गेलेल्या नात्यामुळे अनेक वास्तूंना सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. अशाच काही वारसावास्तूंची ओळख ‘गाथा- वारसावास्तूंची’ या अरुण मळेकर यांच्या पुस्तकातून होते. यात मनोरे, कमानी, महापुरुषांची निवासस्थाने, मंदिरे, चर्च, प्रशासकीय इमारती, स्तंभ, शिलालेख आदी वारसावास्तूंची सैर घडवून आणली आहे. पुस्तकातील पहिला विभाग हा मुंबईमधील वारसावास्तूंविषयी आहे. त्यात मुंबई सेंट्रल स्थानक, भाऊचा धक्का, फ्लोरा फाऊंटन, राजाबाई टॉवर, मुंबई महापालिकेची इमारत, गेट वे ऑफ इंडिया आदी वारसावास्तूंविषयी उद्बोधक माहिती मिळते. यानंतरच्या विभागात मंदिर-शिल्पांविषयी माहिती येते. त्यातून अंबरनाथ येथील शिवमंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजापूरस्थित भवानीमाता मंदिर, ठाण्यामधील श्री कौपिनेश्वर मंदिर आदी मंदिरांच्या स्थापत्यकलेचा परिचय होतो. तर औरंगाबादजवळील अजिंठा व वेरुळ लेणीसमूह, नहर-ए-अंबरी ही पाणीपुरवठा व्यवस्था, मुंबईतील घारापुरी येथील त्रिमूर्तीचं बेट, गुजरातमधील रानी की बाव व लोथल या प्राचीन नगरीचे अवशेष आदी जागतिक वारसा ठरलेल्या वास्तूंची तसेच राष्ट्रपती भवन, घुमटाधारी वास्तू, कमानकला यांविषयीही हे पुस्तक माहिती देते. याशिवाय सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट, ला कार्बुझिए, जॉर्ज विटेट, हेमाडपंत, विठ्ठल सायन्ना, नारायण सायन्ना या वास्तुरचना तज्ज्ञांचा एका स्वतंत्र विभागातून परिचय करून दिला आहे. संस्कतिवैभव असलेल्या वारसावास्तूंच्या जपणुकीविषयीची अनास्था अनुभवण्याच्या या काळात वास्तुरचनेतील अजरामर कलाकृती ठरलेल्या वास्तूंचे स्थापत्यशास्त्रीय तसेच ऐतिहासिक-सांस्कृतिक महत्त्व सांगणारे हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘गाथा – वारसावास्तूंची’ – अरुण मळेकर, राजेंद्र प्रकाशन,

पृष्ठे – १८०, मूल्य – २०० रुपये

‘गाथा – वारसावास्तूंची’ – अरुण मळेकर, राजेंद्र प्रकाशन,

पृष्ठे – १८०, मूल्य – २०० रुपये