समीर गायकवाड
सांज व्हायच्या आधीच वसूनाना पाय खुरडत घराबाहेर पडतो. चालताना त्याच्या सगळ्या अंगाला कंप सुटतो. मान लवलवते. हातपाय थरथरतात. सतत हातात धरून मुठीपाशी मुलायम झालेली लिंबाची काठी घेऊन तो नेटाने देवळाच्या दिशेने निघतो. वाटेनं कितीतरी लोक त्याला बघून न बघितल्यासारखं करून बाजूनंच निघून जातात. बायका-पोरी त्याला बघून काहीतरी कुजबुजतात, मग फिदीफिदी हसतात. जवळून एखादं तरणं खोंड गेलं की त्याचा वसूभाऊला कुठला न कुठला टोमणा ठरलेला असतो, ‘‘अक्काबाई दोही दोऱ्यात फुगडय़ा घालती का न्हाई भाऊ?’’ असलं काही ऐकताच बाकीचे हसतात. टोमण्यानं खजील झालेला वसू ओलेत्या डोळ्याने पुढे जातो. रस्त्यानं जाणारी पोरंठोरं त्याची टिंगल करू लागली की वसूला दुरून पाहणारा एखादा सागवानी म्हातारा धोंडा भिरकावून पोरं पांगवतो, पण वसू जवळ आला की तोदेखील निघून जातो. फर्लागभर अंतर कापायला वसूला दोनेक तास लागतात. वेशीला लागून असलेल्या मारुतीच्या देवळाच्या कट्टय़ापाशी तो कसाबसा पोहोचतो.
वसूनाना म्हणजे वसंता रामहरी लोटके. फाटक्या तोंडाचा. इब्लिस माणूस. जिथे जे बोलू नये म्हणतात तिथं तो ते हमखास बोलायचा. गावभराचं पाणी भरणारा दत्तू पाणक्या मरण पावला तेव्हा वसंतानं विनोद केलेला, ‘‘दत्तू नरकात ग्येला तरी त्येला पाणी भरण्याची शिक्षा व्हईल आन् स्वर्गात ग्येला तर खुशीनं अप्सरा दारी पाणी भरील!’’ त्याच्या कुटाळकीवर कुणी हसलं नाही. तो स्वत:च निर्लज्जासारखा दात काढत राहिलेला. एखादं म्हातारं माणूस आजारपणानं गेलं तर हा तिथं जायचा, ‘‘अण्णांची काहीच इच्छा राहिली नव्हती, सगळ्या भानगडी त्यांनी जितेपणीच पुऱ्या केल्त्या, तवा आता कुणी रडू नगासा. अण्णा सुखाचं मरण मेलाय.’’ असं म्हणून तिथंच तंबाखू मळत बसलेला. मर्तिकास येणाऱ्या माणसांची मापं काढायचा. सांत्वनासाठी कुणी बडी असामी आली की याच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू व्हायचा, ‘‘अण्णा तसा लई भारी व्हता, पण काय करणार, हरेक माणसात खोड असत्ये. अण्णा बी वाईच खोडील व्हता बरं का. त्ये म्हणत्येत ना ऐट रावणाची आन् आस लेंडकाची, तसं त्याचं वागणं हुतं.’’ हातपाय दुमडून जुंधळ्याच्या वाडग्यात हात खुपसून ठेवलेलं अण्णाचं मढं जर जित्तं झालं असतं तर हे ऐकताच वसंताचा जागीच कार्यक्रम झाला असता.
वसंता जितका बेरकी होता तितकाच आडमुठा होता. श्रद्धांजली वाहतानाही मेलेल्या माणसाची पिसं काढायची संधी तो सोडत नसे. बारा भानगडी करणारी पारुबाई मेली तेव्हा हा वदलेला, ‘‘पारुबाई अंगची शिंदळ हुती तिला कुंटण कशाला?’’ पारुबाईचा नवरा जिवंत होता की नाही याबद्दल गावात वदंता होत्या, त्यामुळे काही भोळ्याभाबडय़ा बायकांनी तिच्या कलेवरास कुंकू लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा जवळजवळ वसकलाच, ‘‘बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला?’’ त्याचं हे बोलणं ऐकून त्या बायका भांबावल्या. त्याचं बोलणं असं एकदम फटकळ आणि बीभत्स असायचं, त्यामुळं त्याच्या तोंडाला चाप लावण्याचं धाडस कुणीच करत नसे. त्याला आवर घालण्याच्या नादात त्यानं आपलीच फजिती केली तर काय करायचं या भीतीने लोक गप्प राहत. कुणासमोर किती नि काय बोलायचं हे त्याला ठाऊक होतं. आडमाप, रासवट, रानगटांच्या वाटय़ाला तो जायचा नाही. त्यांच्याकडं काही काम घेऊन तो तिथं गेला की त्यांच्या कपाळाला आठय़ा पडत, ‘हा आणि कशाला आला’ असा भाव त्यात असे. वसंता त्यांचा चेहरा नेमका वाचायचा, मग काहीही पाल्हाळ न लावता म्हणायचा, ‘‘तीन क्येसंबी न्हाईत तर पसाभर राख कशाला?’’ लगोलग आपलं काम सांगायचा.
नसती ब्याद नको म्हणून त्याचं काम लगेच करून दिलं जायचं. यावरही कुणी अपरिचित वा अतिथी व्यक्तीने अशा चांगल्या कपडय़ातल्या माणसाला का मदत करताहात, असं यजमानाला विचारलं की तिकडून उत्तर येण्याआधी वसंताचं तोंड उचकटलेलं असे- ‘‘गाढव सोनं हगू लागलं तर कष्टकरी भीक मागतील का, तसंच माझं हाय ओ. परिस्थिती वंगाळ असत्ये, प्रसंगी गाढवाला देव मानायला लावते.’’ अशा रीतीने मदत करणाऱ्याचाही उद्धार करून त्यानं तिथून पाय काढता घेतलेला असे.
रामहरी कवडय़ाच्या घरी बऱ्याच वर्षांनी पाळणा हलला तेव्हा त्यांनी गावजेवण दिलेलं. वसंताही तिथं गेलेला. हा काहीतरी बरळण्याआधी याला जेऊ घालून हाकून लावलेलं बरं म्हणून रामभाऊंनी तो येताच त्याला पंगतीला बसवलेलं. चाणाक्ष वसंताने ते लगेच ओळखलं. तो भामटय़ागत पंगतीत बसला. पक्वान्नाने भरलेली पत्रावळी समोर येताच मनातलं ओकून मोकळा झाला- ‘‘आदर न करी त्येच्या हातचं भोजन कशाला?’’ रामभाऊ चरकले. यानं आणखी बोलण्याआधी याला गुंतवून ठेवलेलं बरं म्हणून आवाज देण्याच्या बहाण्यानं पंगतीपासून ते लांब गेले, ‘‘ये कोण हाय रं तिकडं ? आपल्या वसंतरावास्नी कांदा लिंबू आणा बिगीनं !’’ त्यांनी असं म्हणायचं अवकाश वसंतानं पुढचा डाव टाकलेला, ‘‘कांद्याला बिस्मिल्ला कशाला?’’ यावर रामहरीची बोलती बंद झालेली.
इतकी शोभा वसंताला पुरेशी नसे. पोटभर जेवून ढेकर देऊन पोटावर हात फिरवून तो अखेरचा घाव वर्मी घाले, ‘‘अळणी ओंडा, तिखट मीठ लावून कांडा.’’ जेवणाच्या वर्णनाआडून त्याने केलेला हा पाणउतारा जिव्हारी लागे. ‘‘प्वार आपलंच हाय ना, न्हाई तर जेवून जायचं गाव आन् वसंताचं व्हायचं नाव!’’ असा जहरी फूत्कार सोडून तो निघून जाई. वसंताच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या या फुलबाज्या जाम टोचणाऱ्या असत. भलेभले त्यानं घायाळ होत. वसंता ज्याचे कपडे उतरवण्याचा कार्यक्रम करी, तिथले बाकीचे लोक त्याच्या तोंडपाटीलकीचा मनमुराद आस्वाद घेत, त्यामुळे त्याला आणखीच चेव येई.
एकदा शंभू पाटलाच्या घरी जागरण, गोंधळ होतं. तिथं न बोलवता वसंता गेलेला. पाटलाशी छत्तीसचा आकडा असणाऱ्या जनार्दन सुव्र्यानी वसंताला त्याच्या नकळत दारू पाजली. वसंताचं पुरतं भान सुटलं. बोलता बोलता त्याची जीभ इतकी घसरली की त्यानं थेट थोरल्या पाटलाचीच औकात काढली. साध्या राहणीत आयुष्य काढलेल्या पाटलांना पुरणपोळीचा त्रास व्हायचा. वाकळ अंथरून जर्मनच्या ताटात त्यांनी बाजरीची भाकर, येळवणाचं कालवण घेऊन जेवायला सुरुवात केली तेव्हा वसंता उद्गारला, ‘‘कुत्रं काशीला गेलं तरी खरकटंच खाणार!’’ त्याची मुक्ताफळं ऐकून शंभू पाटलांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. गुरासारखा फोडला त्याला. आठवडाभर अंग शेकून घेतलं तेव्हा कुठे त्याला बरं वाटलं, इतकं त्याला तुडवलेलं. एवढी बेअब्रू होऊनही तो सुधारला नाही. तोंडाचा पट्टा कधी बंद झाला नाही. कुणाचं काही वाईट ऐकायला येतंय का यासाठी त्याचे कान सदैव टवकारलेले असत. कुणाच्या घरी काही चांगलं घडलं की त्यात काही वाईट दिसतं का याचाच शोध तो घ्यायचा. सगळ्यांची निंदानालस्ती करायचा. वय, वकूब काहीही न पाहता टवाळकी करायचा. गावानं त्याच्या कुचाळकीचा बाऊ जास्तीच केला त्यामुळे तो शेफारत गेला. त्याची चारही पोरं मोठी झाली. सुना घरी आल्या तेव्हा त्यांनी आपल्या सासऱ्याचा कासरा निगुतीनं आवळला. ‘तीळ-तांदूळ एक झाले आणि नेमके वाटाणे बाजूला पडले,’ अशी त्याची गत झाली. पोरांनी त्याला म्हातारपणी घराबाहेर काढलं आणि जुन्या वाडय़ातल्या घरात नेऊन त्याचं भांबड करून ठेवलं. तिथून त्याचे हाल सुरू झाले. मधल्या काळात बायको- कावेरीचं निधन झालं. तिनं आयुष्यभर त्याला सोसलं. पण तिच्यापाठीमागे त्याला सोसायला आता कुणीच तयार नव्हतं. गावातली वारकरी मंडळी त्याची दया करायची, पण त्याची पोरं त्याला शाप बघत नव्हती. एरव्ही कुणीही असं वागलं असतं तर गावानं त्या पोरांना फोडून काढलं असतं, पण इथं वेगळी बाब होती.
उन्हं कलत असताना देवळाच्या कट्टय़ावर बसलेला वसंता आता कसनुसा दिसतो. त्याची पार रया गेलीय. दात पडलेत. गालफाडं आत गेलीत. डोळ्यांचा आड खोल गेलाय, पण त्यात बारोमास पाणी तरळत असतं. पिवळट दाढीचं खुंट वाढलेलं, डोक्यावरचे केस पिंजारलेले, नाक वर आलेलं, अशक्त असलेली मान बगळ्यागत वर आलेली. अंगातले कपडे विटून किटून गेलेले. अंगावर मळाची पुटे चढलेली अशा अवस्थेतला वसंता भेसूर दिसतो. त्याच्या तोंडातून एकसारखी लाळ गळत असते. तो काही बोलायला गेला की त्याच्या अंगात कंपवात वाढतो. त्याला काय म्हणायचं असतं काहीच कळत नाही. तो नुसते हातवारे करतो. खाणाखुणा करतो. हताश होऊन डोळ्यातली आसवं पुसत समोरच्याच्या डोळ्यात बघत आपलं म्हणणं कळलं का, असं मुक्यानंच विचारत असतो. अंधार पडताच देवळातला लामणदिवा लागतो. गावातल्या घराघरांत दिवे लागतात. अलगद येणाऱ्या रात्रीच्या अंधारलीलात गाव बुडून जातं. देवळाच्या कट्टय़ावर बसलेली माणसं एकेक करून आपापल्या घरी निघून जातात. वसंता सर्वात शेवटी निघतो, पण तो एकटा नसतो. त्याच्यासोबत अंधारदेखील येतो- जो कधी त्याच्या मेंदूत तर कधी काळजात राहतो.
sameerbapu@gmail.com