महाराष्ट्रातील वाचनाभिरुचीविषयी काही लिहिण्याआधी महाराष्ट्रातील वयाने, आकाराने आणि ग्रंथसंग्रहाने सर्वात मोठय़ा असलेल्या आणि त्याच्याशी जोडलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची काय अवस्था आहे, ते पाहू.
१८९८ साली मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय ही संस्था स्थापन झाली. मुंबईतले पहिले ‘मराठी गं्रथालय’ ही बिरुदावली प्राप्त झालेली ही संस्था होय. ठाण्यात पहिले मराठी ग्रंथसंग्रहालय कै. वि. ल. भावे यांनी स्थापन केले आणि त्याचा प्रभाव मुंबईत आणि उर्वरित महाराष्ट्रावर पडला. मराठी गं्रथालयांचा प्रारंभ अशा काळात झाला, की ज्या काळात ब्रिटिशांनी भारतीय ब्रिटिशांसाठी तयार केलेल्या स्टेशन्स आणि नेटिव्ह लायब्ररीज् केवळ त्यांच्यासाठीच प्रामुख्याने उघडल्या होत्या. अर्थातच त्यामध्ये इंग्रजी भाषेतली पुस्तकेच साठवली जात. मराठी पुस्तकांना फारसे स्थान नसे. ही स्थिती पाहून मराठी पुस्तकांचा संग्रह करून त्यांच्या वाचनाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने ‘मराठी ग्रंथालये’ महाराष्ट्रभर स्थापन झाली. ‘महाराष्ट्र सारस्वतकार’ वि. ल. भावे यांचे हे कार्य महनीय आहे. मराठी समाजात वाचनाभिरुची जोपासण्यात मराठी ग्रंथालयांचा वाटा फारच मोठा आहे.
ग्रंथालयांनी वाचनाभिरुची वाढवावी, हे त्यांच्या शिरावर असलेले कार्य सर्वच ग्रंथालयांनी आपल्या परीने उत्तम केले असले तरी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्य अधिकच लक्षणीय ठरले आहे यात वाद नसावा. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे केवळ गं्रथालय नाही, तर ते एक मराठीतले महत्त्वाचे वाङ्मयीन आणि सांस्कृतिक केंद्र आहे. या वाङ्मयीन व सांस्कृतिक केंद्राने ११६ वर्षे जे कार्य महाराष्ट्रात केले आहे, ते मोलाचे आहे.
आजचा महाराष्ट्र आणि वैचारिकता
टोकावर उभं असलेलं मराठी गाणं!
स्वैर.. मराठी सिनेमा अन् अभिरुचीही!
गणिती विश्वातील तेजस्वी तारा
द्रष्टेपणा.. सैद्धांतिक गणितज्ञांचा!
मुंबईभर पसरलेल्या शाखा आणि स्वत:चा वैशिष्टय़पूर्ण संग्रह असणारा संदर्भ विभाग हा ग्रंथसंग्रहालयाचा कणा आहे. पीएच. डी.चे विद्यार्थी, प्राध्यापक, पत्रकार, संपादक, लेखक, बी. ए., एम.ए., एम. फिल., बी. लिब., यूपीएससी, एमपीएससीचे विद्यार्थी यांच्या केवळ मुंबईतल्याच नव्हे, तर महाराष्ट्रातल्या अनेक पिढय़ा ग्रंथसंग्रहालयाच्या या संदर्भ विभागावर पोसलेल्या आहेत. संग्रहालयाचा कविकट्टा साठोत्तरी वाङ्मयाची साक्ष देणारा तर आहेच; पण अनियतकालिकांची बंडखोर पिढी, ‘सत्यकथा’ जाळणारी पेटून उठलेली पिढी, दलित साहित्य चळवळ तसेच दलित पँथरच्या चळवळींनी गजबजून गेलेला वादविवाद, काव्य- मैफली, नशाबाज कवींची उत्तुंग काव्यविमाने, समीक्षेवर तावातावाने बोलणारे नवसमीक्षक, ‘आलोचना’चा वसंत दावतरी ग्रुप, बांदेकर-तुलसी परब आदी मंडळींचा आतून अत्यंत गंभीर असणारा बंडखोर ग्रुप, नामदेव ढसाळ- राजा ढालेंचा दमदार ग्रुप, मार्क्सवादाने झपाटून गेलेला जीवनवादी ग्रुप आणि ‘मौज’वाला कलावादी ग्रुप, नाटकवाले, सिनेमेवाले, प्रायोगिकवाले, कलात्मक चित्रपटवाले ‘प्रभाती’ पहाट आणू पाहणारे, ‘ग्रंथाली’च्या अभिनव चळवळीने महाराष्ट्रभर पसरू पाहणारी वाचक चळवळ.. किती नावं सांगावीत! या साऱ्या घडामोडी या ग्रंथसंग्रहालयाच्या साक्षीने वाढल्या, विस्तारल्या. त्याच्या सावलीत पिढय़ा बदलत गेल्या नि वाचनाभिरुची विस्तारत गेली..
वाचकाची वाचनाभिरुची वाढते ती ग्रंथांच्या मदतीने- हे तर उघडच आहे. पण ती केवळ फक्त ग्रंथवाचनानेच वाढते असे नाही, तर ती वातावरणाने, चर्चा-संवादाने, साहित्यिक- सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे अधिक संपन्न होते. नुसती पुस्तकांची देवघेव करून वाचनाभिरुची संपन्न होत नाही, तर त्यासाठी ज्ञान वाचकांपर्यंत विविध माध्यमांतून न्यावे लागते. व्याख्यानांतून- म्हणजेच व्यासपीठावरून ज्ञान सोपे, श्रवणीय करावे लागते. चर्चेतून ते प्रवाही करावे लागते. ग्रंथप्रदर्शनांतून ते खुले करावे लागते. स्पर्धेतून आवाहन करणारे करावे लागते. जिथली ग्रंथालये हे कार्य करतात, त्या प्रदेशातील वाचनाभिरुची जोमाने वाढते. पण गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात या आघाडीवर सामसूम म्हणावी अशी स्थिती आहे. पुस्तकांची देवघेव होत नाही असे नाही. पुस्तकांविषयीच्या कार्यक्रमांना तर तोटाच नाही. रोजच कुठे ना कुठे पुस्तक प्रकाशन सोहळे होत असतात. ग्रंथालयांतून पुस्तकं वाचली जातात. परंतु वाचनाभिरुची जोपासणारा, वृद्धिंगत करणारा कुठल्याही समाजाचा जो कणा असतो, त्या महाराष्ट्रातल्या ग्रंथालयांची आज काय परिस्थिती आहे? ही ग्रंथालये चकचकीत इमारतींत गेली आहेत. तिथे उत्तमोत्तम फर्निचर चकाचक रीतीने मांडले गेले आहे. संगणक, नेट, मेल, सोशल मीडिया यांनी न्हाऊन निघालेल्या या ग्रंथालयांतला वाचक मात्र बिनचेहऱ्याचा, बिनचर्चेचा झाला आहे. आदानप्रदान होते आहे; पण ते वेबच्या कॅमेऱ्यातून, चर्चेच्या ग्रुप्समधून. त्यात जिवंतपणा असेल; पण रसरशीतपणा कुठून आणणार? हे सगळे काही वेळेच्या काटय़ावर पळणारे आहे; पण त्यात सळसळणारा प्रवाहीपणा कुठून ओतला जाणार? कविता सर्वदूर नेणारे ‘नेट’ असेल, लागलीच उत्तरे देणारे लेख तिथे प्रकाशित होत असतील; पण गुरुनाथ धुरी-मनोहर ओकांचा गजबजून गेलेला कविकट्टा पुन्हा जिवंत होईल? ‘फूल ना फुलाची पाकळी म्हणून कोबीचा गड्डा’ असा विनोद करणारे ठणठणपाळ आता कोणत्या कार्यक्रमाची थट्टा करणार? श्रोते नाहीत म्हणून मराठी लघुलेखन वर्गातल्या विद्यार्थ्यांना त्याचे डिक्टेशन आजच्या कार्यक्रमात घ्यायला लावणारा काळ आला की समजावे- संस्कृतीपूर्ण भरलेल्या वातावरणाला ‘जराशी टांग’ मारली गेली आहे.
पिढी म्हातारी झाली, कविकट्टा खचला- असे म्हणावे का? तर पुढची पिढी जन्माला आली आहेच ना? नव्वदोत्तरीची जागतिकीकरणाखाली भरडून निघालेली पिढी आहेच की! त्यांचा आवाज लघुनियतकालिकवाल्यांसारखा का नाही? की त्यांचा आवाज क्षीण झालाय? जाळायला ‘सत्यकथा’च उरली नसल्याने ते पोरके झालेत का? की इथल्या व्यवस्थेने आणीबाणीनंतर सगळ्या तरुणाईला, जगण्याला, संस्कृतीला, चळवळींना जाळून टाकले आहे? १९८५ नंतर राजकीय- सांस्कृतिक- वाङ्मयीन पडझड इतकी झाली, की अख्खी वाङ्मयीन संस्कृतीच ‘माळीण’ गावाप्रमाणे एकाएकी गडप झाली आहे!
नव्या पुस्तकाचा वास कुबट झालाय का? ‘किंडल’ला कोणता वास येतोय? पुस्तकं बाइंडिंगमधून खिळखिळी झाली की ई-बुक्समधील पानांची सळसळ ऐकू यायला लागली? की ते बुकमार्क्स गळून पडले? की दुमडून ठेवलेली पाने कोपऱ्यावरच मोडून पडली? की कानांनी ऐकण्याची कमाल केली? डोळे आता नकोच आहेत वाचनासाठी? कान असले की झाले? मग त्यात पुन:प्रत्ययाचा आनंद आहे का? मिळतो का? मग पुस्तक उपडं ठेवण्याचा आनंद कॉफी तयार होईपर्यंत वाचकाला गुंग करणार तरी कसा?
यंत्राने वाङ्मयीन संस्कृती मारली की वाढवली? पुस्तकांची भूक भागवली, की संगणकबंद करून टाकली? ग्रंथालयांचे वाङ्मयीन-सांस्कृतिक दार उघडून टाकले नि संगणकाच्या डेस्कटॉपवर विराजमान केले?
हे कोणी केले? नव्या पिढीने? की मी, तू, ते, त्या, त्यांनी? ग्रंथालयांनी की लेखकांनी? हे कोणी केले? का केले? कधी केले? आम्हाला कळलेच नाही, की आम्ही कधी गंडवले गेलो आहोत. आम्हाला काहीच कळत नाही.
आज ग्रंथालयात वाचक यायला उत्सुक नाही. का? तर म्हणे घरबसल्या त्याला नेटवरून सर्व काही एका क्लिक्सरशी सारे काही मिळते! पण हे खरे का? फडक्यांच्या, नेमाडय़ांच्या कादंबऱ्या मिळतात का? पूर्वी एकेका पुस्तकावर क्लेम असायचा, तो गेला. कार्यक्रमाला जायची गरज राहिली नाही. प्रवासही जीवघेणा झालाय. त्यापेक्षा कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर दाखवेल त्यावर आम्ही खूश होऊ. थेटपणा गेलाय नि परकेपणा, दुजाभाव आलाय. चालेल. कोण वेळ घालवणार!
हे वाचकाचं चिंतन की मरण? वाचनसंस्कृतीची घरघर, की बदलाचा नवा सर्जनात्मक जन्म? नक्की काय? काही कळत नाही.
टांग मारून गेलेली वाचनाभिरुची!
महाराष्ट्रातील वाचनाभिरुचीविषयी काही लिहिण्याआधी महाराष्ट्रातील वयाने, आकाराने आणि ग्रंथसंग्रहाने सर्वात मोठय़ा असलेल्या आणि त्याच्याशी जोडलेल्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची काय अवस्था आहे, ते पाहू.
आणखी वाचा
First published on: 24-08-2014 at 01:14 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decaying reading interest