‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासअहवालानुसार, पृथ्वीवरून पुढील ११ दशलक्ष वर्षांत पुरुषजात पूर्णपणे नष्ट होऊ शकते. याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर राकट, कणखर आदी पुरुषाबाबत सांगितल्या जाणाऱ्या विशेषणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या भूतलावर जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी स्त्रियाच अधिक सक्षम असल्याचे विज्ञान सांगत आहे. पण काही दशलक्ष वर्षांची वाट न पाहता एक विनोदवीर या वृत्ताकडे कसे पाहतो?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सगळे पुरुष सारखेच’ ( Men will be Men) अशा टॅगलाइनची एका मद्याच्या ब्रँडची लोकप्रिय जाहिरातीची शृंखला आहे. त्या जाहिरातीमधील स्त्रीला इम्प्रेस करण्यासाठी आपण किती सुडौल, संवेदनशील, रुबाबदार, तंदुरुस्त, आतिथ्यशील आणि एकंदरीतच कूल आहोत हे दाखविण्यासाठी विविध क्लृप्त्या लढविणारे पुरुष आपण सर्वांनी पाहिले असतीलच. एकेकाळी, ‘कठीण कठीण कठीण किती, पुरुष हृदय बाई’ असे ज्या पुरुषांचे वर्णन केले जात असे तेच कणखर पुरुष स्त्रियांना आपण हवेहवेसे वाटावेत म्हणून जीवाचा जो आटापिटा करू लागले आहेत, हे पाहिल्यावर इतका संवेदनशील अन् लेचापेचा झालेला पुरुष-प्राणी या जालीम दुनियेत जगायच्या लायकीचा नाही. त्यामुळे लवकरच तो जगण्याच्या शर्यतीत मागे पडून नष्ट होईल या शंकेचा डायनासोर माझ्या कानात किंचाळला होता.

हेही वाचा >>> डॉक्टरांना कोण वाचवणार?

आजवर पृथ्वीवरून अनेक प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि अनेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु पीअर रिव्ह्यू जर्नल ‘प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यास- अहवालातून अशी माहिती समोर आलेली आहे की, मानव आणि प्लॅटिपस वेगळे झाल्यापासून मागील १६६ दशलक्ष वर्षांमध्ये पुरुषांमधील Y गुणसूत्राच्या सक्रिय जनुकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. दर दशलक्ष वर्षांमध्ये सुमारे पाच जनुके नष्ट होत आहेत. हा कल असाच सुरू राहिल्यास Y गुणसूत्र पुढील ११ दशलक्ष वर्षांत पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. आपल्याला ठाऊक आहेच की, पुनरुत्पादन करण्यासाठी मानवाला शुक्राणू आणि पुरुषांची आवश्यकता असते. Y गुणसूत्र नष्ट झाल्यास या जगात केवळ मुलींचाच जन्म होण्याची शक्यता वाढली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हा अहवाल नजरेस पडला आणि, ‘अब इसे दवा की नही, दुवा की जरुरत हैं’ असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सिनेमातील बाया-बापड्यांची जी अवस्था होते तशी माझीही झाली. मला कसंनुसं व्हायला लागलं. माझं डोकं गरगरायला लागलं. पण मी लवकरच स्वत:ला सावरलं. पुरुषांची जात पूर्णपणे नामशेष व्हायला अजून खूप कालावधी आहे, त्यामुळे आताच आपण चिंता करायची काही गरज नाही अशी मनाची समजूत काढून मी झोपी गेलो. जरा कुठे डोळा लागला होता इतक्यात पुलंचा अंतु बर्वा स्वप्नात येऊन म्हणाला, ‘‘अरे, इथे पुरुष जातीचा एन्रॉन व्हायची वेळ आलीय अन् तू झोपतोस काय रे शिंच्या!’’

मी म्हटलं, ‘‘अकरा दशलक्ष वर्षे म्हणजे खूप वेळ आहे हो!’’

अंतुशेट त्यांच्या सानुनासिक आवाजात बोलते झाले, ‘‘अकरा दशलक्ष वर्षे तुझ्यासाठी मोठ्ठी असतील रे, तिथे ब्रह्मदेवाच्या रिष्टवाचातला काटा एका मिनिटाने देखील सरकत नाही दशलक्ष वर्षे ओलांडल्या शिवाय!’’

इतकी वर्षे पुरुषांना आपण राकट, कणखर अन् स्त्रियांना नेहमी नाजूक, कोमल वगैरे समजत आलो. पण आता विज्ञानानेच दाखवून दिलंय की, या भूतलावर जगण्यासाठी आणि टिकण्यासाठी स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक सक्षम आहेत. त्यामुळे आपल्याला हे सत्य मान्य करण्यावाचून गत्यंतर नाहीये. बायबलमधे म्हटलंय की, देवाने आधी अॅडम नावाचा पुरुष निर्माण केला आणि नंतर इवा नावाची स्त्री. हे लक्षात घेता, स्त्री हे देवाने निर्माण केलेले मानवाचे लेटेस्ट मॉडेल असल्याने, त्याचे बाह्यांग जरी नाजूक दिसत असले तरी त्याचे हार्डवेअर, त्याचा प्रोसेसर, त्याची ऑपरेटिंग सिस्टीम आणि एकंदरीतच ते मॉडेल तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आणि बदलत्या वातावरणात अधिक टिकण्याची क्षमता असणारे असू शकते. अशा निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे.

हेही वाचा >>> एक दिवस धकाधकीचा…

आपल्या दारात अनोळखी नाजूक चप्पल दिसल्यावर कुठलाही पुरुष घराच्या आत जाताना आधी केसांचा भांग काढून, कपडे नीटनेटके करून मगच घरात प्रवेश करतो. एखाद्या पुरुषाने कितीही महागातली सुपरफास्ट बाईक घेतली तरी शहरातील रस्त्यावर ती सुपरबाइक, स्त्री चालवीत असलेल्या अॅक्टिवाच्या मागेच चालते. ही सगळी लक्षणे पुरुषजात दिवसेंदिवस अधिकाधिक नाजूक, कमकुवत आणि भावनाप्रधान होत चालल्याची अन् स्त्रियांच्या तुलनेत मागे पडत असल्याचीच लक्षणे आहेत. इतरांचं कशाला सांगू, माझीच गोष्ट घ्या. टायटॅनिक सिनेमा पाहताना, बुडून मेलेल्या लोकांपेक्षा, बोट कलंडल्यावर बोटीवरील चिनीमातीची क्रोकरी तुटते ते पाहून मला सगळ्यात जास्त रडू कोसळले होते. प्रॉब्लेम असा झालाय की, जेंटलमॅन होण्याच्या नादात मॅन हा जरा जास्तच जेंटल झालाय. हे जेंटल होणेच भविष्यात त्याच्या अस्तित्वावर बेतणार आहे असे दिसते.

याउलट बायका दिवसेंदिवस धीट होत चालल्या आहेत. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक चाळिशीतील बाई दुकानदाराला म्हणाली, ‘‘अशी साडी दाखवा की ती नेसून तिरकस बसल्यानंतर मी आणि साडी सुंदर दिसेल.’’ ही अजब मागणी ऐकून दुकानदाराने ‘नक्की काय प्रोग्राम काय आहे?’ असे विचारले तेव्हा कळले की, त्या महिलेला करोनाची लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर टाकायचा होता.

आमची नेहमीची मदतनीस बाई महिनाभर गावी जाणार होती. म्हणून ती बदलीने येणाऱ्या बाईला घर आणि काम दाखवायला घेऊन आली होती. कामाचं स्वरूप, सोयीची वेळ वगैरे समजून घेतल्यावर ही नवी बाई म्हणाली ‘‘आधीच सांगून ठेवते, सोशल मीडियावर डीपी ठेवण्यासाठी मॅडमचे रोज फोटो काढायचे असतील तर त्याचा एक्स्ट्रा चार्ज लागेल!’’

अगदी पुराणकाळापासून स्त्रियांना रोजच्या रोज, ‘‘आज जेवायला काय बनवू?’’ हा प्रश्न छळत असे. आता त्यात, ‘‘आज स्टेटसला काय ठेवू अन् कोणती रील पोस्ट करू?’’ या दैनंदिन प्रश्नांची भर पडली आहे! पूर्वी नवऱ्यावरील राग व्यक्त करण्यासाठी ती जेवणात तिखट-मीठ जास्त घालायची. आता मोबाइलचा चार्जर लपवून ठेवते. म्हणून मी तुम्हाला सांगतो, काळासोबत बदलण्यामध्ये बायकांचा हात कुणीच धरू शकत नाही.

लग्नानंतर तो बदलेल या अपेक्षेने स्त्री पुरुषाशी लग्न करते, पण तो काही बदलत नाही. लग्नानंतरही ती तशीच राहील या अपेक्षेने पुरुष स्त्रीशी लग्न करतो, पण ती बदलते. या गोष्टीचे तात्पर्य हेच की, काळाप्रमाणे बदलणे हे स्त्रीचे वैशिष्ट्य आहे. ती काळाप्रमाणे बदलते म्हणून भविष्यातही स्त्रीच्या टिकून राहण्याची शक्यता जास्त आहे.

एखादा माणूस जेव्हा मरण पावतो तेव्हा लोक म्हणतात, ‘‘देव चांगल्या माणसाला आपल्याकडे घेऊन जातो.’’ खरं तर असं बोलणारे लोक अप्रत्यक्षपणे आपण स्वत: वाईट असल्याची आणि त्यामुळे देवाने आपल्याला अजून नेलं नसल्याची कबुली देत असतात. ‘‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला’’ हाच जर निसर्गाचा नियम असेल आणि वर उल्लेख केलेल्या या संशोधनाप्रमाणे, भविष्यात देव जर पुरुषांना जन्मालाच येऊ देणार नसेल तर याचा अर्थ पुरुष किती चांगले (आणि त्यामुळे देवाच्या आवडीचे) व बायका किती वाईट असतील हे लक्षात घ्या.

भविष्यात जेव्हा या जगात एकही पुरुष नसेल तेव्हाच्या लोकांना ‘पुरुष’ नावाचा प्राणी कसा दिसायचा हे कळावं म्हणून कपड्यांच्या दुकानात लेडीज ट्रायल रूमच्या बाहेर खांद्याला लेडीज पर्स लटकावून उभा असलेला. किंवा समुद्रकिनाऱ्यावर तीनचार चपलांचे जोड, दोन लेडीज पर्स, टोप्या, पाण्याची बाटली, काही गॉगल्स आणि एक मोठी कपड्यांची पिशवी सांभाळत किनाऱ्यापाशी उभा असलेला अशा एखाद्या नवरा नामक ड्युटीवरील पुरुषाचा भव्य पुतळा निवडणुकीच्या आधी उद्घाटनाची घाई न करता, शिल्पकाराला पुरेसा वेळ देऊन, उभारावा अशी माझी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून युनोच्या अध्यक्षापर्यंत सगळ्यांकडे मागणी आहे.

स्त्रियांनो, मला ठाऊक आहे, तुम्ही हुशार आहात. कर्तृत्ववान आहात. स्वत:च्या अक्कलहुशारी आणि ताकदीवर तुम्ही खूप मोठमोठ्या गोष्टी साध्य करू शकाल. परंतु कधीतरी काहीतरी कारणाने समजा तुम्हाला अपयश आले किंवा एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी झाली नाही तर अशावेळी ज्याच्या डोक्यावर आपल्या अपयशाचं खापर फोडता येईल असा एक हक्काचा पुरुष असावा असे तुम्हाला वाटत नाही काय? कदाचित, विज्ञानाच्या मदतीने तुम्ही पुरुषांशिवाय देखील मुलांना जन्म देऊ शकाल, त्यांचं पालनपोषण सगळं काही करू शकाल. पण घरात घुसणाऱ्या पाली आणि झुरळांना पळवून लावण्यासाठी तरी आपल्या हाताशी, एक कसाबसा का होईना, पुरुष असावा अशी तुमची इच्छा नाही काय?

माता, भगिनी, मैत्रिणींनो विज्ञान म्हणते त्याप्रमाणे पुरुषजात नष्ट होणारच असेल तर त्यासाठी तुम्ही काही करू शकत नाहीत. अस्तंगत होऊ घातलेल्या वाघांसाठी, काळविटांसाठी, चिमण्यांसाठी अन् गिधाडांसाठी तुम्ही याआधी व्हर्च्युअल लढा दिल्याचे आम्ही पाहिले आहे. आता, केवळ आम्हा पुरुषांना बरे वाटावे म्हणून तुम्ही, ‘पुरुष वाचवा’ असा बोर्ड हाती घेऊन एखाद दिवस आझाद मैदानात उभं राहायला किंवा निदान सोशल मीडियावर SaveMen असा हॅशटॅग चालवायला काय हरकत आहे? हजारो वर्षे तुम्हाला तुमच्या सुखदु:खात साथ देणाऱ्या आणि भविष्यात नामशेष होऊ घातलेल्या पुरुषांसाठी तुम्ही इतकं तरी कराल ना प्लीज?

sabypereira@gmail.com

मराठीतील सर्व लोकरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decline of the y chromosome human males likely to disappear from earth zws