‘लोकरंग’च्या २१ जुलैच्या अंकात भारत सासणे यांचा ‘अद्भुत रस गेला कुठे?’ हा लेख वाचला. त्यात त्यांनी मराठीतील बालसाहित्याच्या असमाधानकारक दर्जाविषयीची कारणमीमांसा मांडली आहे. त्यांनी व्यक्त केलेली खंत पटली असली, तरी त्यांनी केलेले निदान जसेच्या तसे स्वीकारता येत नाही. मुळात अद् भुत रस बालसाहित्यातून हद्दपार झाला आहे, हे विधान अतिव्याप्त आहे. उदाहरणे द्यायची तर विंदा करंदीकर यांचा ‘पिशीमावशी आणि तिची भुतावळ’ हा कवितासंग्रह, कविता महाजन यांची ‘कुहू’ ही बाल-कादंबरी ही अद्भुत रसाची उत्तम उदाहरणे आहेत. तसेच फारुक काझी यांचे ‘चुटकीचे जग’ हे पुस्तकही अद्भुताची आभा पकडण्याचा प्रयत्न करणारे आहे. अशी आणखीही उदाहरणे देता येतील. मुख्य म्हणजे अद्भुत रसाचा स्थायिभाव ‘विस्मय’ असतो. मुलांना आश्चर्य वाटण्यासाठी चेटकिणी, राक्षस, राजपुत्र, उडते घोडे यांचीच आवश्यकता असते, असे नाही. ही अद्भुताची एक लोकप्रिय पातळी झाली. याव्यतिरिक्त वेगवेगळ्या पातळ्यांवरही मुलांना विस्मयचकित करणाऱ्या घटना दैनंदिन वास्तवात घडत असतात. त्यांच्याकडे मुलांच्या दृष्टीने पाहता यायला हवे ! उदाहरणच द्यायचं झालं तर आईने लाटलेली सपाट दिसणारी पुरी तेलात टाकली की कशी टम्म फुगते ; हे दृश्य मुलांसाठी अद्भुत ठरू शकते !
प्रस्तुत लेखात सासणे यांनी बालसाहित्यामागील प्रेरणांवर टीका केली आहे. त्यांच्या मते संस्कारवादी, मनोरंजनवादी असलेल्या एखाद्या प्रातिनिधिक पुस्तकाचा त्यांनी नामनिर्देश केला असता, तर त्या पुस्तकाची समीक्षा करता आली असती. कारण बालसाहित्यामागील प्रेरणांपेक्षाही बालसाहित्याच्या निर्मिती प्रक्रियेशी लेखनाचा दर्जा वस्तुत: निगडित आहे. बालसाहित्याचे खरे दुखणे वेगळेच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. बालसाहित्याची समीक्षाच होत नाही, हे खरे दुखणे आहे. तशी समीक्षा होण्याची गरज कोणाला वाटत नाही, हे अधिक गंभीर आहे. समीक्षा होत नसल्याने बालसाहित्य या साहित्यप्रकाराच्या समीक्षेची परिभाषाही तयार होताना दिसत नाही.
हेही वाचा : अद्भुतरस गेला कुठे?
बालसाहित्यात अद् भुतरस किती वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरू शकतो, त्या रसाचा प्रत्यय देण्यासाठी भाषा किती लवचीक असावी लागते याची फारशी जाणीवच लेखकांना नसते. चेतनीकरण, रूपबदल अशा तंत्रांचा वापर करून निर्माण झालेले अद् भुत जग आणि कार्यकारणाची संगती न लावता आल्यामुळे गूढ भासणारे अद्भुत जग अशी यातील अनुभवांची विविधता आणि सूक्ष्मता त्यामुळे नेमकेपणे पारखलीच जात नाही. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे याचा अर्थ नको तितका ताणून काही वेळा बालसाहित्यातून ‘उडते गालिचे’ झटकूनही टाकले जातात! बरेचसे बालसाहित्यकार शिक्षक असतात .त्यामुळे बहुधा शिक्षणात अपेक्षित असलेले गाभाघटक – उदा . मूल्यशिक्षण, पर्यावरणरक्षण आदींना या साहित्यात ढोबळपणे स्थान दिले जाते. हे गाभाघटक कलाकृतीतून मुलांच्या भावविश्वात नकळत झिरपणे अपेक्षित असते . प्रत्यक्षात याउलट या विषयांवरचे लेखन माहितीच्या ओझ्याने वाकलेले आणि भाषेच्या पृष्ठभागावर वावरणारे होत राहते. मराठी वाङ्मयाच्या इतिहासात नमूद केलेल्या बालसाहित्य या विभागातील कित्येक पुस्तकांच्या शीर्षकांवर नुसती नजर टाकली तरी हे लक्षात येईल. त्यात चरित्रकथा, स्फूर्तिदायक पुराणकथा, प्राणी व वनस्पती यांची माहिती अशा पुस्तकांचा भरणा आढळतो. वास्तविक बालसाहित्यात भाषा हा घटक कळीचा असतो. तो घटक समर्थपणे वापरण्यासाठी भाषेत डूब घेण्याचे सामर्थ्य हवे. भाषेकडे केवळ साधन म्हणून न पाहता प्रसंगी तिला आशयद्रव्य म्हणून आकार देण्याची कल्पकता हवी. तसेच निर्मिती प्रक्रियेत विविध घटकांचे कलात्मक पातळीवर संयोजन साधण्याचे भान हवे! मात्र अशा वाङ्मयीन भूमिकेतून बालसाहित्याची चिकित्सा करणारे व्यासपीठ उपलब्ध नाही. त्यामुळे निव्वळ बाह्यप्रेरणांचाच विचार करून अनेकदा लेखनाला मान्यता मिळताना दिसते.
हेही वाचा : बालरहस्यकथांचा प्रयोग
यासाठी साहित्य अकादमीने आजवर पुरस्कार दिलेल्या, तसेच स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत आलेल्या कलाकृतींबाबत परीक्षकांनी दिलेला चिकित्सक अभिप्राय पुस्तिकारूपात प्रकाशित करावा. त्यातून बालसाहित्याच्या मूल्यमापनासाठीचे मापदंड, तसेच समीक्षेसाठीची परिभाषा यासंदर्भात महत्त्वाचा ऐवज उपलब्ध होईल. अन्यथा हा साहित्यप्रकार असाच उपेक्षित राहून अधिकाधिक कमकुवत होईल. तसे होऊ नये, म्हणून हा लेखनप्रपंच!
डॉ. नीलिमा गुंडी, पुणे</p>