‘बीएमडब्ल्यू’ मोटारी भारतातल्या सर्व शहरांत आताशा दिसतातच, पण या बड्या जर्मन कंपनीचं नाव भारतात चित्र-शिल्प कलेच्या दोन मोठ्या उपक्रमांशी २०१२ पासून जोडलं गेलं आहे. अकरा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पहिल्या ‘कोची बिएनाले’चं प्रायोजकत्व या कंपनीनं अंशत: पत्करलं होतं, पण २०१४ पासून कोचीच्या त्या द्वैवार्षिक प्रदर्शनाशी मुख्य प्रायोजक म्हणून ‘बीएमडब्ल्यू’ जोडली गेली. हेच आठ वर्षांपूर्वी दिल्लीच्या ‘इंडिया आर्ट फेअर’बद्दल झालं. २३ ऑगस्ट २००८ पासून ‘भारतातला पहिलावहिला कलाव्यापार मेळा’ म्हणून दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरू झालेला इंडिया आर्ट समिट हा तीन वर्षांत दुपटीनं वाढला- २००८ सालच्या कलाव्यापार मेळ्यात अवघ्या ३४ कलादालनांचा सहभाग होता. ती संख्या २०१० मध्ये ८४ वर गेली आणि २०१२ मध्ये तर दिल्लीच्या त्या मेळ्यात आपापले ‘बूथ’ (ठेलेच ते!) लावणाऱ्या ९४ कलादालनांपैकी ४४ भारताबाहेरची होती- इतकी या मेळ्याची ख्याती वाढली. साहजिकच, ‘बीएमडब्ल्यू’नं २०१६ पासून या मेळ्याचं प्रायोजकत्व स्वत:कडे घेतलं.

कलेतिहासात पीएच.डी. केलेले प्रा. डॉ. थॉमस ग्रिस्ट हे ‘बीएमडब्ल्यूच्या सांस्कृतिक संबंध विभागाचे प्रमुख’ या नात्यानं यंदाच्याही मेळ्यासाठी दिल्लीत होते. हा मजकूर प्रामुख्यानं यंदाच्या या मेळ्याबद्दलच असला तरी संख्यावाढ, ‘बीएमडब्ल्यू’ यांचा संदर्भ आधी माहीत असायला हवा. अवघ्या चार दिवसांत एखादा कलाविक्रेता जिथं १३ कोटी रुपयांहून अधिक गल्ला गोळा करू शकतो, असा हा कलाव्यापाराचा मेळा आहे.

Samruddhi Highway Thane Nashik tunnels Warli painting
समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
mini buses with best logo running on the Nashik Kasara route
मुंबईच्या रस्त्यांवर बेस्टच्या अनधिकृत गाड्या, नाशिक मार्गावरही बेस्टच्या गाड्यांचा वापर; कंत्राट रद्द झालेल्या गाड्यांचा गैरवापर
Honda Laucned Black Edition and Signature Black Edition
Honda Elevate: होंडाची नवीन एलिव्‍हेट ‘ब्‍लॅक एडिशन’ लाँच! पॉवरफुल एसयूव्ही ह्युंदाई क्रेटाशी करणार स्पर्धा; पाहा किंमत अन् जबरदस्त फीचर्स
Vinfast introduced Two SUV in Bharat Mobility Global Expo 2025
Vinfast Coming To India: ‘विनफास्ट’ची भारतात होणार धमाकेदार एंट्री! भारत मोबिलिटीमध्ये ‘या’ दोन एसयूव्ही करणार सादर
hero splendor plus price hike
देशात सर्वाधिक विक्री होणारी ‘ही’ बाईक आता महाग; जाणून घ्या नवी किंमत
New Car Launch Tata launches Tiago and Tigor in 2025
५ लाखांत टाटाने लाँच केली नवी कार! अपडेटेड Tiago आणि Tigor चे फीचर्स एकदा बघाच; थेट Marutiला देत आहे टक्कर

हेही वाचा – पडसाद: सुंदर व्यक्तिचित्र

.. हे कबूल की, असाच व्यापारकेंद्री मेळा २०२३ पासून मुंबईतही सुरू झालाय. सॅफरॉनआर्ट या लिलावघराचे मालक दिनेश वझीरानी यांनी तो सुरू केला. पण त्यापेक्षा दिल्लीतला मेळा जुना आणि मोठादेखील. शिवाय मुंबईतला वझीरानीप्रणीत मेळा हा ‘पत्रकार आले नाही तरी चालेल’ इतक्या तोऱ्यात चालतो आणि दिल्लीचा मेळा हा तुलनेनं अधिक लोकाभिमुख ठरतो, हा फरक आहेच. पण ‘दिल्लीचा मेळाच मोठा, हे यंदाच्या वर्षांनं सिद्ध केलं’ असा सूर परवाच्या चार/ पाच फेब्रुवारीला अनेकजण लावत होते. ‘आर्टन्यूज’ या १९०२ पासूनच्या आंतरराष्ट्रीय कलाविषयक वृत्तपत्राचे प्रतिनिधी अनिन्दो सेन यांनी तर तसं लिहिलंदेखील. यंदा दिल्लीच्या मेळ्यात कलादालनं होती ७२, पण विक्री हाच मुख्य हेतू नसलेल्या २३ दृश्यकला संस्थांनाही या मेळ्यात स्थान होतं; आणि शिवाय यंदाच्या मेळ्यात सात ‘डिझाइन स्टुडिओ’ होते. रुढार्थानं डिझाइन आणि कलाकृती यांचा बाजारसुद्धा निरनिराळा आणि समीक्षक, कलावंत, आस्वादक या सर्व प्रकारचे लोक कलाकृती आणि डिझायनरनं केलेली कलावस्तू यांची गल्लत करत नाहीत. पण दिल्लीतल्या यंदाच्या कलाव्यापार मेळ्यानं डिझाइनला स्थान दिलं. १३ कोटी रुपयांचा धंदा केला तो या डिझाइनवाल्यांपैकीच एकानं. पण अतुल दोडियांची व्यामिश्र अर्थाची मांडणशिल्पवजा कलाकृतीसुद्धा ६६ लाख ३८ हजार रुपयांच्या पुढल्या किमतीला विकली जाऊ शकते, हेही या मेळ्यानं सिद्ध केलं.

मुंबईतल्या नव्या कलाव्यापार मेळ्याची तुलना यापुढेही दिल्लीच्या मेळ्याशी होतंच राहाणार. पण मुंबईच्या मेळ्यानं पहिल्याच वर्षी बॉलीवूड, फॅशन यांवर भर दिला होता, म्हणून तर दिल्लीनं यंदा डिझाइनवाल्यांना स्थान दिलं नाही ना, अशाही शंकेला वाव राहील. अर्थात, दिल्लीच्या ज्या ‘ओखला एनएसआयसी ग्राउंड’ वर कलाव्यापाराचा मेळा भरला, तिथंच आणि अगदी त्याच मंडपात यंदा १५ फेब्रुवारीपासून ‘इंडिया डिझाइन फेअर’ सुरू होणार आहे- थोडक्यात, दिल्लीमधलं डिझाइन कलावस्तू व्यापाराचं प्रस्थ यापुढे आणखी वाढतच जाणार आहे आणि आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेतली वाढती विषमता- श्रीमंतांकडेच अधिक पैसा येत राहणं- पाहाता ते साहजिकही आहे. मात्र दिल्लीचा कलाव्यापार मेळा हा काही त्या थोड्या, मोजक्या श्रीमंतांपुरता मर्यादित राहिला नाही. अडीच लाखांहून अधिकजण दरवर्षी दिल्लीच्या या मेळ्याला भेट देतातच आणि तो आकडा यंदा वाढला हे दिसतसुद्धा होतंच. अखेरच्या दिवशी दुपारनंतर ‘आम्ही तिकीटविक्री बंद करतो आहोत’ असं आयोजकांना जाहीर करावं लागलं. ‘इंडिया आर्ट फेअर’च्या २०२३ पासूनच्या संचालक जया अशोकन यांनी वर्षभर महत्त्वाच्या कलादालनांना ‘इंडिया आर्ट फेअर.कॉम’ या संकेतस्थळावरूनही सटीप प्रसिद्धी देत राहण्याचं काम सुरू ठेवलं. भारतातल्या शहरोशहरीची कलादालनंच एकत्र येऊन कला सप्ताह (आर्ट वीक / वीकएन्ड) साजरे करताहेत, याकडेही त्यांचं लक्ष आहे. कलाबाजाराशी असा सततचा संपर्क असल्याखेरीज कलाव्यापार मेळा यशस्वी होत नाही, हेच मुंबईतही दिसून आलं. दिल्लीत अनेक कलादालनांनी आपापल्या बूथमध्ये मोठ्या कलाकृतींसोबतच छोट्या आकाराची आणि विशेषत: तरुण चित्रकारांची चित्रंही आवर्जून मांडली होती, त्या कमी किमतीच्या चित्रांना नवख्या, तरुण कला-ग्राहकांचा प्रतिसाद अधिक असल्याचं दिसत होतं.

या व्यापारमेळ्यातही ‘चांगल्या कलाकृती पाहण्यासाठी’ म्हणून आलेले काहीजण असतात. एकंदर मेळ्यात समजा हजारभर कलाकृती असतील, तर त्यापैकी अवघ्या बारा-तेरा कलाकृतींनाच ‘चांगलं’ म्हणणारे हे दर्दी. आय वेवे हा मूळचा चीनचा किंवा ओलाफुर एलियासन हा फ्रेंच दृश्यकलावंत हे एरवी अशा दर्दीचे आवडतेच असतात; परंतु कलाव्यापार मेळ्यात या कलावंतांच्याही अशा कलाकृती येतात की निव्वळ ‘ओरडून लक्ष वेधून घेणं’ एवढंच काम करण्यासाठी या बड्या चित्रकारांच्या कलाकृती आणल्या काय, असा प्रश्न पडावा. आय वेवे यानं गेल्या काही वर्षांत ‘लेगो’ या तुकडे जोडून वस्तू बनवण्याच्या बाल-खेळातल्यासारखे लेगोचेच तुकडे वापरून ‘वॉटर लिलीज- आफ्टर मोने’ वगैरे कलाकृती घडवल्या आणि कलाजगताला मस्तपैकी खिजवलं! तशी एक मोठ्ठी वॉटर लिली कलाकृती जर्मनीतल्या ‘नॉयजेररिएमश्नायडर’ या कलादालनाच्या बूथमध्ये दर्शनी भागातच असल्यानं फटाफट सेल्फी निघत होते! पण दर्दीनाही हुरूप येईल, दाद द्यावीशी वाटेल असा एक अख्खा विभाग दिल्लीच्या कलाव्यापार मेळ्यात असतो. ‘कलासंस्था’ हा तो विभाग. यंदा २३ कलासंस्था होत्या. त्यापैकी बंगळुरुची ‘१ शांतीरोड’ ही कलानिवास (रेसिडेन्सी) सुविधा देणारी संस्था, नेपाळची ‘उन्नती आर्ट व्हिलेज’ या संस्थांचा सहभाग यंदा प्रथमच आणि लक्षणीय होता. काठमांडूनजीकच्या पाच गुणी चित्रकारांचं छोटेखानी प्रदर्शनच ‘उन्नती’नं भरवलं होतं. ‘पुरुषोत्तम ट्रस्ट’, ‘फिका’ अशा संस्थांचे बूथ नेहमीच असतात, त्यापैकी पुरुषोत्तम ट्रस्ट ही मुद्राचित्रणकारांनी, सहकारातून चालवलेली संस्था असल्यानं तिथं पाहण्यासारखी खूप मुद्राचित्रं असतात. आगरतळा फोटो सप्ताहाचा बूथ, बांगलादेशच्या ब्रिटो आर्ट ट्रस्टचा बूथ, ‘व्हिला स्वागतम्’ या भारत-फ्रान्स मैत्री संस्थेसाठी बार्थेलेमी टोग्यो या फ्रेंच चित्रकारानं पाणी या विषयावर साकारलेला बूथ हेही लक्षणीय होतेच, पण दोन बूथ विशेष होते. यापैकी पहिला सी. पी. कुकरेजा फाऊंडेशनसाठी विशाल दार या कलावंतानं साकारलेला. कुकरेजा ही वास्तुशिल्पकारांची फर्म, त्यांनी ‘जेएनयू’तल्या इमारती बांधल्या होत्या. त्या वेळी सरकारी समितीच्या अपेक्षा काय होत्या. ‘जेएनयू’ कशी हवी असं संबंधितांना वाटत होतं, इथपासून ते या इमारतीच्या छोट्या प्रतिरुपांपर्यंत सारं काही जपून ठेवलेलं, मिळवलेलं असं विशाल दार यांनी इथं मांडलं आणि ‘जेएनयू’ला हल्ली झालेल्या जखमांवर फुंकर घातली.

हेही वाचा – आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: सामाजिक चळवळींच्या निमित्ताने..

दुसरा बूथ खुद्द ‘इंडिया आर्ट फेअर’नंच कला-निवासवृत्ती दिलेल्या मयूरी चारी यांचा. मयूरी जरी मूळची गोव्याची, तरी हैदराबादला तिनं (घरच्यांचा विरोध पत्करून) कलेचं उच्चशिक्षण घेतलं. स्त्रीदेहाचंच चित्रण वासनाहीनतेनं करता येईल का, हा तिचा ध्यास ठरला. त्यासाठी रंगसाधनांऐवजी भरतकामाचा वापर ती करू लागली. कलेच्या सामाजिक ताण्याबाण्यांचा विचार करणारा गुंफणकार (क्युरेटर) प्रभाकर कांबळे हा मयूरीचा सहचर. त्यांनी कोल्हापूरनजीक बांधलेल्या घरात सुमारे वर्षभर राहून मयूरीनं ऊसतोड कामगार किंवा अन्य कष्टकरी महिलांना बोलतं केलं. पाळीबद्दल, स्थलांतरातून होणाऱ्या त्रासाबद्दल प्रश्न विचारले. त्यातून तयार झालेलं दृश्यरूप म्हणजे शेणाची योनी. ते या बूथच्या एका भिंतीवर, मुलाखतींच्या व्हिडीओसह होतं. कलाकृती सार्थ असल्यानं कुणीही त्यावर आक्षेपबिक्षेप घेण्याचा प्रश्नच नव्हता.

एकंदर ‘इंडिया आर्ट फेअर’ यशस्वी होतोय. कुठल्याही कलाव्यापार मेळ्याला गर्दी असतेच ती कशी, हे पाहायचं असेल तर मुंबईत वरळीच्या ‘नेहरू सेंटर’ इमारतीत ‘इंडिया आर्ट फेस्टिव्हल’ हा आठ फेब्रुवारीपासून सुरू झालेला पर्यायी कलाव्यापार मेळा (जिथं खासगी मालकीची कलादालनंच नव्हे, तर एकटेदुकटे चित्रकारही बूथ घेऊ शकतात) ११ फेब्रुवारीच्या रविवारी संपणार आहे, तिथंही जाता येईल. पण दिल्लीचा कलाव्यापार मेळा हाच भारतातला सर्वात मोठा, यावर ‘बीएमडब्ल्यू’ सातत्यानं शिक्कामोर्तब करते आहे, हे मात्र खरं. ‘बीएमडब्ल्यू’ काय किंवा कोणतीही अन्य मोटार काय, मोकळ्या- बांधीव रस्त्यावर सुसाट चालू शकते.. तसा मोकळेपणा आणि बांधीवपणा दिल्लीच्या मेळ्यानं दिला आहे, त्यामुळे ‘बीएमडब्ल्यू’प्रमाणेच कलाबाजारही सुसाट आहे!

abhijit.tamhane@expressindia.com

Story img Loader