कोणत्याही साहित्य महोत्सवाची किंवा उत्सवाची ओळख ही तिथल्या ग्रंथव्यवहारावरून ठरते. पुस्तकांचे वाचन ही कधीच मूलभूत गरज वाटत नसलेल्या मराठी समुदायात प्रकाशकांसाठी ग्रंथउलाढालीचा मराठी साहित्य संमेलन हा हक्काचा वार्षिक सोहळा असतो. गावागावांत विखुरलेल्या वाचकांनाही बहुविध प्रकारची पुस्तके खरेदी करण्याची संधी या काळात मिळते. यंदाचे संमेलन दिल्लीत होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर प्रकाशक संघटनेने बहिष्काराचा पवित्रा दाखविला. प्रवास खर्चासह दिल्लीत मराठी ग्रंथविक्रीचे गणित कसे जुळणार, याविषयी काही प्रकाशकांनी मांडलेली मते…

प्रकाशकांसाठी अव्यवहार्यच…

प्रकाशकांसाठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं स्थळ दिल्ली असणं हेच मुळात अव्यवहार्य वाटतं. कारण प्रकाशकांना संमेलनस्थळी एक व्यक्ती म्हणून तिथं जायचं नसतं, तर पुस्तकं आणि त्यासाठी लागणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेसकट जावं लागतं. यासाठी लागणारा वेळ आणि खर्च फार मोठा असतो. जिथे मुळात मराठी माणसांचीच संख्या फार नाही तिथे पुस्तक विक्री ती कितीशी होणार? महाराष्ट्रातील गेल्या दोनतीन संमेलनांचा अनुभवही प्रकाशक म्हणून फारसा चांगला नाही अगदी ग्रंथ विक्रीपासून ते व्यवस्थेपर्यत. महामंडळाला कोटीच्या घरात अनुदान मिळतं, पण आयोजक आणि महामंडळही प्रकाशकांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबाबत उदासीन असतं. आगामी संमेलन स्थळ दिल्ली असल्याने प्रकाशकांची संख्या घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. संमेलनात पुस्तकविक्री हा महत्त्वाचा घटक असूनही प्रकाशकांचा आणि ग्रंथ व्यवहाराचा विचार केला जात नाही, हे दुर्दैवी आहे. – अशोक कोठावळे, मॅजेस्टिक प्रकाशन.

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Supriya sule on sunil tingre
Supriya Sule : “पोर्शेप्रकरणी शरद पवारांनी माफी मागावी”, सुप्रिया सुळेंनी ‘ती’ नोटीसच दाखवली, म्हणाल्या…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
BJP Manifesto For Election
BJP Manifesto : भाजपाच्या जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचं आश्वासन , शेतकऱ्यांना कर्जमाफीसह ‘या’ घोषणा
pune samyukta Maharashtra movement
त्यागी लोकप्रतिनिधी आणि पदनिष्ठ राजकारणी

हेही वाचा…सीमेवरचा नाटककार..

खरेदीऐवजी अडचणीच वाढणार?

महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनातदेखील स्टॉल, पुस्तकांचा वाहतूक खर्च, हॉटेल, राहण्याचा खर्च आणि संमेलनात होणारी विक्री याचा ताळमेळ घालणे सध्या जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे साहित्य संमेलनातून दोन पैसे मिळतील ही प्रकाशकांची मानसिकता आता नसते, तर फार अधिक तोटा होऊ नये यासाठीच तो प्रयत्नशील असतो. पुस्तकांच्या प्रसिद्धीसाठी आम्हाला साहित्य संमेलनात भाग घेण्याशिवाय पर्यायच उपलब्ध नसतो.

दिल्लीत साहित्य संमेलन असल्यामुळे वाहतूक खर्च बेसुमार वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साहित्य संमेलनात आम्ही एक ट्रक भरून पुस्तके नेतो. या वेळेस तसे करता येणार नाही. दोनचार प्रकाशकांना मिळून एकत्र वाहतूक करावी लागेल किंवा पार्सल सर्व्हिसने पुस्तके पाठवावी लागतील. रेल्वेने पुस्तके पाठवता येतील का, याचीदेखील आम्ही चाचपणी करत आहोत. महाराष्ट्रात होणाऱ्या संमेलनात दुकानदार मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. पण दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील कोणताही दुकानदार कशाला खरेदी करेल? दिल्लीत आणि आजूबाजूला राहणारे मराठी भाषिक घेऊन घेऊन किती पुस्तके घेणार? महाराष्ट्रातील साहित्य संमेलनाला लोकांची खूप गर्दी असते. परंतु दिल्लीमध्ये मुद्दाम साहित्य संमेलनासाठी म्हणून किती लोक महाराष्ट्रातून जातील? त्यामुळे या वर्षी विक्री किती आणि कशी होईल याबद्दल साशंकता आहे. दरवर्षी आम्ही चार स्टॉल भाड्याने घेतो. या वेळेस तेदेखील कमी करायला लागणार असे दिसते. आयोजकांनी मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये आयोजित करण्याची इतरही अनेक महत्त्वाची कारणे असू शकतील, पण आम्हा प्रकाशकांसाठी हे साहित्य संमेलन असंख्य अडचणींना तोंड द्यायला लावणारे ठरणार आहे.-शिरीष शेवाळकर, राजहंस प्रकाशन

हेही वाचा…आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : जतन-सुविधेचा सोपा काळ..

विशेष नियोजन आवश्यक…

दिल्लीला साहित्यिक कार्यक्रमांची, प्रदर्शनांची मोठी परंपरा आहे. त्यामुळे आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राबाहेर असलं तरी ते दिल्लीत असल्यानं थोडं वेगळेपण आहेच. त्यामुळे आम्ही या संमेलनात सहभागी होणार आहोत. कारण लोकांसमोर चांगली पुस्तकं येणं आवश्यक आहे. पण उदगीर, अंमळनेर, वर्धा इथल्या साहित्य संमेलनांचा अनुभव केवळ प्रकाशकांनाच नव्हे तर साहित्यप्रेमींसाठीही अत्यंत वाईट असाच होता. या संमेलनांमध्ये प्रकाशकांना फारसं कोणी विचारात घेत नाहीच, पण सामान्य रसिकांचाही विचार केला जात नाही याचाच प्रत्यय आला. असं असतानाही दिल्लीचा केवळ साहित्यिक माहोल वेगळा असल्याने दिल्लीतील साहित्य संमेलनाला ‘मौज’ प्रकाशन जाणार हे नक्की; अर्थात दिल्लीतील साहित्यिक कार्यक्रमांचा वारसा लक्षात घेता प्रकाशक म्हणून आम्ही खूप आशा ठेवून आहोत. अगदी नफातोटा याचा विचार न करता आम्ही यात सहभागी होणार आहोत.

मला इथे एक सुचवावंसं वाटतं की, आयोजकांनी प्रकाशकांच्या स्टॉल्सच्या रचनेबाबतही जागरूक असायला हवं. यासाठी साहित्य मंडळ तसंच अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांनी प्रकाशकांना विश्वासात घ्यायला हवं. एका चांगल्या नियोजनकाराकडून स्टॉल्सची व्यवस्था कशी असावी याबाबतच्या सूचना जाणून घ्यायला हव्यात. माझ्या मते, संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूलाच पुस्तकांचे स्टॉल्स हवेत. जेणेकरून लोक पुस्तकं हाताळतील, विकत घेतील. पुस्तकांच्या स्टॉल्समधूनच चर्चासत्रांच्या मंडपांचा मार्ग असावा. म्हणजे पुस्तकं आणि साहित्य रसिक यांची सतत गाठभेट होत राहील. त्याचा सकारात्मक परिणाम पुस्तकांच्या विक्रीवर होईल. मुख्य दालनापेक्षा पुस्तकांचे स्टॉल्स खूप लांब असतील तर लोक त्या बाजूला फिरकतच नाहीत. हे झालं पुस्तकांच्या बाबतीत, पण संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठीही उत्तम सोय केलेली नसते. या सर्वांचा परिणाम पुस्तक अप्रत्यक्षपणे विक्री न होण्यावर होत असतो. फक्त मंडप, जेवण यांवर मोठाले खर्च करून उपयोग नाही, तर साहित्याशी संबंधीत अन्य गोष्टींचे नियोजनही उत्तम हवे. आयोजकांनी या गोष्टीचा विचार करावा असं मला वाटतं.-श्रीकांत भागवत, मौज प्रकाशन गृह

हेही वाचा…झाकून गेलेलं..

हेतू उदात्त असला तरी…

महाराष्ट्राबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत मराठी भाषेतलं साहित्य पोहोचावं, त्यातून मराठी वाचनसंस्कृतीचा विस्तार व्हावा आणि त्यातून मराठी भाषेचं संवर्धन व्हावं अशा उदात्त हेतूने अशी संमेलनं भरविली गेली. तोच उदात्त हेतू दिल्लीत साहित्य संमेलन भरविण्यामागे असावा. पण हेतू उदात्त असला तरी तो साध्य होण्यासाठी लागणारं आवश्यक पोषक वातावरण महाराष्ट्राबाहेर आहे का? या दृष्टीनेही विचार होणं गरजेचं आहे. मात्र तसा विचार झालेला दिसत नाही. तो खरोखरच झाला असता तर आजवरच्या अनुभवावरून संमेलन महाराष्ट्राबाहेर नेण्याचं धाडस कुणी केलं नसतं. या संदर्भात जागतिक पुस्तक मेळ्याचं उदाहरणही पुरेसं बोलकं आहे. दिल्लीत दरवर्षी ‘नॅशनल बुक ट्रस्ट’च्या वतीने जागतिक पुस्तक मेळा भरविला जातो आणि तो आपल्या दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या साहित्य संमेलनाच्या तुलनेत अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि अनेक घटकांचा विचार करत भरवला जातो. या पुस्तक मेळाव्यात आपल्या देशातील प्रकाशकांबरोबर जगभरातील प्रकाशक सहभागी होतात. या प्रदर्शनात प्रादेशिक भाषेतील प्रकाशक संघटनेला मोफत दालन उपलब्ध करून दिले जात असे. परंतु दहा दिवसांच्या या मेळ्यात मराठी ग्रंथांना अल्पसा प्रतिसाद मिळतो. तीच गत या मेळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी भाषेसंबंधातील कार्यक्रमांची असते. त्यामुळे अत्यंत उत्कृष्ट नियोजन असतानाही मराठी प्रकाशक परिषदेने या मेळ्यातला आपला सहभाग थांबवला. कारण अपेक्षित सोडाच, किमान पुस्तक विक्री होत नसल्याने या पुस्तक मेळ्यातील सहभाग मराठी प्रकाशकांसाठी तोट्याचा ठरू लागला. हीच गत इंदूर, बडोदा, घुमान इथल्या साहित्य संमेलनात झाली होती. त्याचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. निव्वळ नफा मिळवण्यासाठी प्रकाशक कुठल्याही साहित्य संमेलनात सहभागी होत नाहीत. या निमित्ताने नवनव्या विषयांवरील, नवनव्या लेखकांची पुस्तकं वाचकांसमोर जावीत, त्यांची वाचकांच्या पातळीवर चर्चा घडावी, हा मुख्य उद्देश असतो. त्याचप्रमाणे शाळामहाविद्यालये, अनेक संस्था, ग्रंथालये यांचे प्रतिनिधी या संमेलनात येतात. पुस्तक प्रदर्शनांना भेटी देऊन अगदी चोखंदळपणे पुस्तकांची निवड करू शकतात आणि पुस्तक खरेदीची नोंदणी करून जातात.

साहित्य संमेलन म्हणजे समाजमन घडवणाऱ्या लेखकांचा, प्रकाशकांचा, वाचकांचा आणि खरेदीदार संस्थाव्यक्तींचा एक सांस्कृतिक मेळा असतो. त्या दृष्टिकोनातून साहित्य संमेलन आयोजन करताना ग्रंथ आणि एका व्यापक अर्थाने ग्रंथव्यवहार याला केंद्रस्थानी ठेवून या सर्व घटकांचा विचार झाला पाहिजे. तसा तो होत नसल्याने संमेलन स्थळ निवडण्यापासूनच नियोजनातील ढिसाळपणा जाणवायला लागतो. मग ते स्थळ महाराष्ट्राबाहेरचं असो अथवा महाराष्ट्रातील असो. प्रमुख कारण साहित्य महामंडळ हे वाचक, प्रकाशक यांना गृहीतच धरत नाही. किंबहुना साहित्य संमेलनाच्या आयोजनाच्या केंद्रस्थानी ग्रंथ असायला हवा तो नसतो. मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी वाचन टिकवून धरण्याचे काम गेली कित्येक दशके मराठी प्रकाशक करीत आहेत. अनेक नवोदितांना लिहितं करत नवनवे विषय आर्थिक जोखीम पत्करून वाचकांपुढे ठेवण्याचं काम प्रकाशक करत असतो. परंतु त्या प्रकाशकाला मराठी साहित्य व्यवहारात कुठेच स्थान नाही. त्याचे मतही विचारले जात नाही. तरीही तो स्वखर्चाने साहित्य संमेलनांमधून सहभागी होतो आणि सर्वोत्कृष्ट साहित्य वाचकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी धडपड करतो. पण त्याच्या वाट्याला असुविधा यापलीकडे काहीच येत नाही. अगदी अलीकडच्या वर्धा, नाशिक, उदगीर इथल्या संमेलनांतून हाच अनुभव त्याच्या वाट्याला आला आहे. आज मराठी प्रकाशक किमान वितरणावर आपले व्यवसाय सुरू ठेवत आहे. महाराष्ट्रात ३६ जिल्हे. यापैकी २० जिल्ह्यांत मराठी ललित साहित्याचे दुकान नाही. १२ कोटींच्या महाराष्ट्रात निव्वळ मराठी ललित साहित्याची एकूण दुकाने ४० ते ५० च्या घरात आहेत. वाचक खूप आहेत. मराठी तरुण पिढी बऱ्यापैकी वाचते, पण त्यांना त्यांच्या ठिकाणी पुस्तकं मिळत नाहीत. ग्रंथालयाची खरेदी नाही, शासनाची योजना नाही, राजा राम मोहन राय पुस्तकाची खरेदी चारचार वर्षं होत नाही. प्रत्यक्ष वाचकांच्या जिवावर विक्री सुरू आहे. अशा काळात साहित्य संमेलनातील विक्रीच ही महत्त्वाची ठरते. त्यात दिल्लीसारखी ठिकाणं संमेलनासाठी निवडणं म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशीच प्रकाशनांची अवस्था करण्यात आली आहे.-अरविंद पाटकर, संचालक, मनोविकास प्रकाशन

हेही वाचा…वास्तूंच्या सुरसरम्य कहाण्या..

सर्वच दृष्टीने अव्यवहार्य…

दिल्लीत संमेलन भरवण्याच्या निर्णयामागे महामंडळाचा उद्देश निश्चितच मराठी भाषेच्या व्यापक हिताचा असणार. एक तर दिल्ली व त्या लगत राहणाऱ्या मराठी जनतेला त्याचा लाभ होऊ शकेल. ते मराठी साहित्याचा आनंद लुटू शकतील. मराठी पुस्तकं त्यांना पाहता येतील. तसेच अमराठी रसिकही मराठीशी काही प्रमाणात जोडले जातील. इतर भाषिक प्रकाशक ही संमेलनात येतील व मराठी पुस्तकं त्यांच्या नजरेसमोर येतील. मराठी पुस्तकं इतर भाषेत जाण्याची शक्यता वाढेल. हे झालं एक चित्र. पण वस्तुस्थिती काय सांगते? दिल्लीस्थित मराठी माणसं किती आणि त्यातील संमेलनाला येणार किती? याचा विचार झाला आहे का?

दुसरं म्हणजे मराठी पुस्तकं एवढ्या लांब पोचू शकणार आहेत का? किती प्रकाशक जाऊ शकणार आहेत? जाणं येणं, राहणं, वेळ याचा विचार करता मोठा खर्च होणार. त्यातून काय साध्य होणार, याचा विचार प्रकाशक करणारच. चला, प्रकाशकांच्या अडचणींचा विचार बाजूला ठेवूया, पण महाराष्ट्रात किती तरी जागा अशा आहेत जिथे संमेलन बराच काळ भरलेलं नाही. तेथील जनता मराठी साहित्य संमेलनाच्या लाभांना मुकणार नाही का? याचा विचार प्राधान्याने व्हावा. इतर राज्यातील मराठी भाषिक जनतेचा नव्हे.

मला निश्चितपणे वाटतं की महामंडळाने या निर्णयाचा फेरविचार करावा. प्रकाशकांसाठी संमेलन भरवले जात नाही, हे मान्य केलं तरी पुस्तकं ही साहित्याचा प्रसार करत असतात आणि ती संमेलनाचा अविभाज्य घटक असतात. म्हणून संमेलनात पुस्तकांची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असायला हवी हेही तितकेच खरे आहे. मला एकंदरीत विचार करता असं वाटतं, की महामंडळाने संमेलन दिल्लीत भरवणे, हे सर्वच दृष्टीने अव्यवहार्य आहे.-प्रदीप चंपानेरकर, रोहन प्रकाशन