तुषार म्हात्रे
बौद्धिक क्षमता, तर्कशुद्ध विचार आणि शारीरिक-मानसिक स्वास्थ्य हे माणसाच्या स्वास्थ्यपूर्ण जीवनातील कळीचे शब्द. जगाच्या पाठीवर मानवजातीचे हित साधण्यासाठी हे शब्द अत्यंत निकडीचे झाले आहेत. भविष्यातील पिढीचा विचार करता आपली शिक्षणपद्धतीच अशा तत्त्वांवर आधारित केली तर? हाच विचार करून जपानी शिक्षणपद्धतीने ‘ची, तोकु आणि ताई’चा स्वीकार केला. जपानी भाषेत ‘ची’ म्हणजे बुद्धिमत्ता, ‘तोकु’ म्हणजे आपली वर्तणूक, परोपकाराची जाणीव. तर ‘ताई’ हा शारीरिक-मानसिक स्वास्थ्यदर्शक शब्द. जपानमध्ये बालवाडीपासून ते उच्च माध्यमिक इयत्तांचा अभ्यासक्रम आखताना त्यात ‘ची, तोकु आणि ताई’चा समावेश केला आहे. आपल्या भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय जडणघडणीला पूरक अशी वैशिष्टय़पूर्ण शिक्षणव्यवस्था असणारा जपान हा काही एकमेव देश नाही. जगातील बहुतेक देशांनी आपल्या देशाच्या गरजा, ऐतिहासिक-सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन आपली शिक्षणव्यस्थेची वैशिष्टय़पूर्ण आखणी करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅनडातील ‘सहिष्णुता’, दक्षिण आफ्रिकेतील ‘उबंटू भान’, ऑस्ट्रेलियातील ‘स्वयंपूर्ण व्यक्तिविकास पद्धती’, नेदरलँडमधील ‘माणूस घडवणारी शिक्षणपद्धती’, पाकिस्तानातील ‘तारीख आणि तालीम’ ही या विविधतेची काही उदाहरणे. या विविधतेची चर्चा करण्याचे कारण म्हणजे यशवंतराव चव्हाण सेंटरची निर्मिती असलेले एक पुस्तक. देशोदेशीच्या विविध शिक्षणपद्धतींचा एकत्र गुंफलेला पट अनुभवायचा असेल तर ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे पुस्तक प्रत्येकाने एकवार वाचायलाच हवे.
शिक्षण विकास मंचच्या ‘देशोदेशीच्या शिक्षणपद्धती’ या कोविड काळात गाजलेल्या व्याख्यानमालेला पुस्तकाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात व्याख्यानांच्या एखाद्या पारंपरिक संग्रहाप्रमाणे किंवा संदर्भ ग्रंथाप्रमाणे रचना न करता, सर्वसामान्य वाचक नजरेसमोर ठेवून त्यालाही हे पुस्तक वाचावेसे वाटेल अशा रीतीने पुस्तकाची रचना केल्याचे दिसून येते. संदर्भ ग्रंथ म्हणून या पुस्तकाची निर्मिती केली नसली तरी त्याचे संदर्भमूल्य यित्कचितही कमी नाही. याचे श्रेय या पुस्तकाच्या धनवंती हर्डीकर, डॉ. माधव सूर्यवंशी, अजित तिजोरे यांच्या संपादकीय मंडळाला द्यायला हवे. डिजिटिकल वर्क्स एलएलपी, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे तीन विभाग आहेत. पहिल्या विभागात पुस्तकाची संकल्पना मांडणारे डॉ. वसंत काळपांडे, तसेच शिक्षण अभ्यासक किशोर दरक यांचे तुलनात्मक शिक्षणशास्त्र विषयक स्वतंत्र लेख आहेत. या विषयाच्या अभ्यासकांना सुरुवातीचे हे दोन्ही लेख उपयुक्त ठरू शकतील. ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या ज्ञानशाखेवर आधारित हे मराठीतील अशा प्रकारचे पहिलेच पुस्तक आहे, असे म्हणता येईल.
दुसरा विभाग हा पुस्तकाचा मूळ गाभा आहे. देशोदेशीच्या शालेय शिक्षणाचा वर उल्लेखिलेला पट इथे पाहायला मिळतो. लेखरूपातील हा पट उलगडताना विविध देशांच्या शिक्षणपद्धतींतील साम्य-भेद लक्षात येतात. पुस्तकाची सुरुवात तुलनात्मक अभ्यासाने केली असल्याकारणाने ही विविधता भारतीय शिक्षणपद्धतीच्या संदर्भात पाहणे अधिक महत्त्वपूर्ण ठरते. हे लेख संमिश्र स्वरूपाचे आहेत. यांतील बहुतेक लेखक भारतीय असून मराठी बोलणारे आहेत. त्यांच्यापैकी काहींनी विविध निमित्तांनी विदेशात केलेल्या त्यांच्या वास्तव्यात पाहिलेल्या शिक्षणपद्धतींवर लिहिले आहे. तर फिनलंड, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, युनायटेड किंगडम, कॅनडा, जपान, नेदरलँड्स, अमेरिका या काही देशांच्या शिक्षणपद्धतींवरील लेख त्याच देशांत स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून आले आहेत. दक्षिण आफ्रिका, चीन, मंगोलिया या देशांच्या शिक्षणपद्धतीवरील लेख त्या त्या देशांच्या नागरिकांनीच लिहिले आहेत. यातील मूळ इंग्रजी भाषेतील लेखांचे भाषांतर करण्यात आले आहे. पालक, शिक्षक, शिक्षण अभ्यासक अशा विविध स्तरांतील व्यक्तींच्या अनुभव नोंदींमुळे पुस्तकाला मानवी संवेदनांचे अधिक व्यापक आणि स्पष्ट परिमाण मिळाले आहे. त्यांच्या लेखनातील अनौपचारिकपणा वाचकाला अधिक भावतो.
बहुतेक सर्व खंडांतील देशांचा विचार पुस्तकात झाला आहे. एकेका देशातील व्यवस्थेची माहिती घेतल्यानंतर शिक्षणव्यवस्थेचा जागतिक स्तरावर विचार करणे सोपे जावे यासाठी शेवटी काही परिशिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. पुस्तकात समाविष्ट देशांच्या संदर्भात, शिक्षणावर परिणाम करणाऱ्या काही घटकांची माहिती संख्यात्मक स्वरूपात दिली आहे. पुस्तकाची सुरुवात जेथून झाली, त्या व्याख्यानमालेतील व्याख्याने, मूळ इंग्रजी लेख क्यू आर कोडच्या मदतीने लेखांच्या शेवटी दिले आहेत. यामुळे ‘अनुभव कथन’ आणि ‘वस्तुनिष्ठ माहिती’ यांचा दुर्मीळ संयोग या पुस्तकात पाहायला मिळतो.
तिसऱ्या विभागात अजित तिजोरे यांनी करोनाकाळातील शालेय शिक्षण, या काळात झालेली शिक्षण क्षेत्राची हानी, विविध देशांनी त्या संदर्भात योजलेले उपाय अशा घटकांचा संख्याशास्त्रीय आणि वस्तुनिष्ठ लेखाजोखा मांडला आहे.
अत्यंत उपयुक्त, माहितीपूर्ण असलेले हे पुस्तक आहे. मुखपृष्ठावरील रंगीत गोधडीप्रमाणे विविधरंगी लेखांनी सजलेले हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात रस असणारे पालक, शिक्षक, संस्थाचालक, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक या सर्वांनाच आवडू शकेल. विविध स्तरातील घटकांच्या हाती ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ पोहोचून ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या शिक्षणशास्त्राच्या शाखेचा आणखी प्रसार होईल. या पुस्तकाच्या निमित्ताने या विषयावर अधिकचे विचारमंथन घडेल ज्यातून पुढील पिढीचे हित साधले जाईल असे वाटते.
‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’, निर्मिती- यशवंतराव चव्हाण सेंटर, प्रकाशक- डिजिटिकल वर्क्स एलएलपी , पाने- २८८, किंमत- ४९९ रुपये.
tusharmhatre1@gmail.com